चंद्रयान 3 नंतर आता ‘ओडिसियस’चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऐतिहासिक लँडिंग

मानवी इतिहासात पहिल्यांदाच एका खासगी कंपनीच्या अंतराळयानानं पृथ्वीबाहेरील ग्रहगोलावर यशस्वीरित्या उतरण्याची करामत साधली आहे. अमेरिका आणि भारतासह अनेक देशांच्या चांद्र मोहिमांच्या दृष्टीनंही ही गोष्ट महत्त्वाची आहे.

अमेरिकन कंपनी ‘इंट्यूटिव्ह मशीन्स’चं ‘IM1 ओडिसियस’ हे यान भारतीय वेळेनुसार 23 फेब्रुवारी 2024 च्या पहाटे 4:53 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात अलगद उतरलं. अमेरिकन अंतराळसंस्था नासाच्या सहयोगानं ही मोहीम आखली होती.

याआधी 2023 मध्ये भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेअंतर्गत विक्रम लँडरनं दक्षिण ध्रुवीय प्रदेशात ‘सॉफ्टलँडिंग’ म्हणजे यशस्वीरित्या अलगदपणे उतरत इतिहास रचला होता.

त्यानंतर आता ओडिसियस हे यान याच दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं आहे. इतकंच नाही, तर हे यान उतरलं ती जागा चंद्रयान 3 उतरलं त्या शिवशक्ती पॉइंटपेक्षा दक्षिण ध्रुवाला जवळ आहे.

आजवर केवळ रशिया, अमेरिका, चीन, भारत आणि जपान या पाच देशांच्या सरकारी अंतराळ संस्थांनाच आपली यानं चंद्रावर सुरक्षित उतरवण्यात यश आलं होतं. पण एखाद्या खासगी कंपनीचं यान चंद्रावर उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ओडिसियसच्या निमित्तानं तब्बल 52 वर्षांनी एका अमेरिकन यानानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग आहे.

नासानं 1972 साली अपोलो मोहिमांचा कारभार आटोपला, त्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचा ध्वज घेऊन एक यान चंद्रावर उतरलं आहे.

त्यामुळे नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी ‘अमेरिका आज चंद्रावर परतली आहे’ अशा शब्दांत मोहिमेचं वर्णन केलं आहे.

नासाचा खासगी ‘डिलिव्हरी पार्टनर’

या मोहिमेचं आणखी एक वेगळेपण म्हणजे केवळ हे यानच नाही तर यानाला अवकाशात पोहोचवणारं रॉकेटही खासगी कंपनीच्या मालकीच्या होतं. तसंच यानाचं नियंत्रणही कंपनीनं केलं होतं.

प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटनं 15 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेच्या केप कॅनाव्हराल इथून या यानाचं प्रक्षेपण केलं होतं. फाल्कन 9 हे एक रियुजेबल रॉकेट आहे, म्हणजेच ते पुन्हा पुन्हा वापरता येतं. यानाला प्रक्षेपित केल्यावर रॉकेटचं बूस्टर सुरक्षितरित्या पृथ्वीवर परततं.

नासानं या कंपन्यांना रॉकेट आणि लँडर यानांची निर्मिती करण्याचं कंत्राट दिलं होतं. त्यामागेही एक कारण आहे.

सध्या नासा माणसाला पुन्हा चंद्रावर नेण्याच्या अंतराळ कार्यक्रमावर काम करत आहे. ‘आर्टेमिस’ नावानं हा कार्यक्रम ओळखला जातो.

अमेरिकेला येत्या काही वर्षांत चंद्रावर आपला तळ उभारायचा आहे. सध्या जसे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊन राहतात, तसे या तळावर राहू शकतील आणि तिथून पुढच्या मोहिमांवर जातील अशी ही योजना आहे.

असा तळ उभारला, तर तिथे सामानाची ने-आण करण्यासाठी नासाला इंट्यूटिव्ह मशीन्स आणि स्पेस एक्स सारख्या कंपन्या मदत करू शकतील.

त्याशिवाय चांद्र मोहिमांमध्ये एकमेकांशी सहकार्य करता यावं, यासाठी एक आंतरराष्ट्रीय करारही नासाच्या पुढाकारानं अलीकडेच केला गेला.

आर्टेमिस अकॉर्ड नावानं हा करार ओळखला जातो आणि 2023 साली भारतानंही त्यावर स्वाक्षरी केली आहे.

एकूण 35 देश या करारात सहभागी झाले आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाची चांद्रमोहिम इतरांसाठीही महत्त्वाची ठरू शकते.

ओडिसियस चंद्रावर किती दिवस काढेल?

खरं तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यान उतरवणं सोपं नसतं. भारताच्या चंद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर उतरताना अखेरच्या क्षणी कोसळलं होतं.

ओडिसियसलाही अखेरच्या क्षणी अडचणींचा सामना करावा लागला. यानाची उंची आणि वेग मोजणारे रेंजिग लेसर्स योग्य पद्धतीनं काम करेनासे झाले. पण नासानं यानासोबत पाठवलेल्या एका उपकरणतले लेसर्स काम करत होते आणि त्याच्या मदतीनं इंट्यूटिव्ह मशीन्स कंपनीला यान चंद्रावर उतरवण्यात यश आलं.

यान चंद्रावर उतरलं तेव्हा त्यातून काही काळ अजिबात कुठलाच सिग्नल मिळत नव्हता. यानाशी संपर्क साधण्यात काही मिनिटं लागली. त्यामुळे यानाच्या स्थितीविषयी चिंता निर्माण झाली. पण काही तासांतच ओडिसियस व्यवस्थित उभा असून माहिती आणि चित्रं पाठवत असल्याचं इंट्यूटिव्ह मशीन्सनं जाहीर केलं.

ओडिसियस यानातून नासानं आपली सहा वेगवेगळी वैज्ञानिक उपकरणं घेऊन चंद्रावर पाठवली आहेत. ही उपकरणं चंद्राच्या पृष्ठभागाची पाहणी करतील.

चंद्रावर यान उतरताना उडणारी धूळ कशी काम करते याचा अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे. ओपोलो मोहिमांदरम्यान अंतराळवीरांना या धुळीचा त्रास जाणवला होता. त्यांच्या उपरकणांमध्ये चंद्रावरची धूळ जमा व्हायची. तसा त्रास टाळायचा तर या धुळीचा अभ्यास करणं गरजेचं आहे.

त्याशिवाय सहा व्यावसायिक उपकरणंही या यानावर आहेत. त्यात एंब्री रिडल एरोनॉटिकल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कॅमेऱ्याचा समावेश आहे. त्याशिवाय चंद्राच्या वेगवेगळ्या कला दाखवणारे स्टेनलेस स्टीलचे 125 गोल असलेली एक कलाकृतीही यानाच्या एका बाजूला लावली आहे. अमेरिकन कलाकार जेफ कून्स यांनी ते शिल्प तयार केलं आहे.

चंद्रावर उजेड आणि रात्र मिळून एक पूर्ण दिवस हा पृथ्वीवरच्या साधारण 28.3 दिवसांएवढा असतो, हे चंद्रयान 3 मोहिमेच्या वेळी वाचल्याचं तुम्हाला आठवत असेल. म्हणजे तिथे 14 दिवस उजेड आणि 14 दिवस रात्र असते.

ओडिसियस चंद्रावर साधारण मध्यान्हीच्या वेळेस उतरलं आहे, त्यामुळे पुढचे साधारण आठवडाभर ते काम करू शकेल, असं तज्ज्ञ सांगतात.