You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रयान 3 : चंद्रावर पुन्हा रात्र सुरू; प्रज्ञान रोव्हर जागं होण्याच्या आशा मावळल्या
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, नवी दिल्ली
चंद्रावर आता पुन्हा रात्र सुरू होतेय, त्यामुळे प्रज्ञान रोव्हर जागे होण्याचा आशा मावळल्या असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
प्रज्ञानशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी आणखी प्रयत्न केले जातील का, याविषयी मात्र इस्रोने काही स्पष्टीकरण दिलं नाहीये.
चंद्रावरची मागची रात्र संपल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी विक्रम लॅंडर पुन्हा जागा होईल अशी आशा व्यक्त केली जात होती.
पण तसं घडल्याचं दिसत नाही.
चंद्रावरची एक रात्र म्हणजे पृथ्वीरचे 14 दिवस असतात. या दरम्यान चंद्रावर उणे तापमान असते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळचे तापमान रात्री -200 अंश ते -250 अंश सेल्सियस (-328F ते - 418F) पर्यंत खाली जाते.
त्यानंतर उपकरण पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी असते असं सांगण्यात येत आहे.
चंद्रयान-3 मोहिमेच्या प्रज्ञान रोव्हरनं जे अपेक्षित होतं तेच केलं, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी आधीच म्हटलं आहे.
प्रज्ञान रोव्हरला आता स्लीप मोडमधून बाहेर काढण्यात अपयश आलं तरी हरकत नाही, असंही ते म्हणाले.
पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एस. सोमनाथ यांनी गुरुवारी (28 सप्टेंबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
प्रज्ञान रोव्हर सध्या स्लीप मोडमध्ये आहे. इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांच्या माहितीनुसार, "चंद्रावरील प्रचंड थंडीमुळं प्रज्ञान रोव्हरचं इलेक्ट्रॉनिक सर्किट खराब झालं नसेल, तरच स्लीप मोडमधून तो बाहेर येईल. चंद्रावरील तापमान उणे 200 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं होतं."
ते म्हणाले, "रोव्हर स्लीप मोडमधून बाहेर आला नाही, तरी काही फरक पडत नाही कारण त्यानं जे अपेक्षित होतं ते केलं."
याआधी चंद्रावर दिवस उजाडल्यानंतर त्यांनी चंद्रयान-3 मिशनच्या लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञान यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही सिग्नल मिळाला नाही, असं इस्रोनं गेल्या सांगितलं होतं.
सप्टेंबर महिन्यात दोघांनाही स्लीप मोडवर ठेवण्यात आलं होतं.
'गोठवणा-या थंड रात्रीनंतर प्रज्ञान रोव्हर जागा होणं अवघड'
चंद्रावरील गोठवणा-या थंड रात्रीनंतर प्रज्ञान रोव्हर जागे होण्याची शक्यता "प्रत्येक तासागणिक कमी होत आहे", असं देशभरातील अंतराळ शास्त्रज्ञांतर्फे बीबीसीला सांगितलं.
परंतु चंद्रावरील दिवस संपेपर्यंत ते प्रयत्न करत राहतील, असंही ते म्हणाले.
चंद्रावरचा एक दिवस हा पृथ्वीवरच्या 14 दिवसांइतका लांब असतो.
इस्रोने शुक्रवारी सांगितले की, नवीन चंद्र दिवस सुरू झाल्यानंतर लँडर आणि रोव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु कोणतेही संकेत मिळाले नाहीत.
प्रग्यान रोव्हरला आपल्या पोटात घेऊन विक्रम लँडरने ऑगस्टमध्ये चंद्राच्या क्वचित एक्सप्लोर केलेल्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पाऊल ठेवलं. विविध माहिती आणि छायाचित्रे गोळा करण्यात दोन आठवडे घालवल्यानंतर त्यांना चंद्रावरील रात्रीच्या काळात 'स्लीप मोड'मध्ये ठेवण्यात आले होते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने सांगितले होते की, 22 सप्टेंबरच्या सुमारास चंद्रावर विक्रम लँडर उतरलेल्या भागात सूर्योदय होईल तेव्हा बॅटरी रिचार्ज होतील आणि उपकरणे पुन्हा कार्यरत होतील अशी आशा आहे.
शुक्रवारी इस्रोने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले की, "विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच राहतील". तेव्हापासून कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही.
इस्रोचे माजी प्रमुख एएस किरण कुमार यांनी सोमवारी सकाळी बीबीसीला सांगितले की, "विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होण्याच्या शक्यता प्रत्येक तासागणिक कमी होत आहे".
"लँडर आणि रोव्हरमध्ये असे अनेक घटक आहेत जे चंद्रावरील अतिथंड तापमानात टिकले नसतील," ते म्हणाले, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळचे तापमान रात्री -200 अंश ते -250 अंश सेल्सियस (-328F ते - 418F) पर्यंत खाली जाते.
"जोपर्यंत लँडरवरील ट्रान्समीटर चालू होत नाही तोपर्यंत आमच्याकडे कोणतीही संपर्क यंत्रणा नाही. ती जिवंत आहे हे आम्हाला सांगावे लागेल. इतर सर्व उप-प्रणाली काम करत असल्या तरी आम्हाला ते कळण्याचा कोणताही मार्ग नाही,", असंही ते पुढे म्हणाले.
इस्रोच्या प्रवक्त्यांनी सांगितले की लँडर आणि रोव्हरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चंद्रयान-3 मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश बनून भारताने इतिहास घडवला.
अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर भारत एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे.
चंद्रावरील लँडिगचे नियोजन अतिशय काळजीपूर्वकपणे चांद्र दिवसाच्या सुरुवातीशी जुळवून करण्यात आले होते जेणेकरून विक्रम आणि प्रग्यान यांना काम करण्यासाठी दोन आठवडे सूर्यप्रकाश मिळू शकेल.
अंतराळ संशोधन संस्थेने त्यांच्या हालचाली आणि निष्कर्ष व त्यांनी घेतलेल्या छायाचित्रांचे नियमितपणे अपडेट दिले आहेत.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना झोपवताना इस्रोने सांगितले की, दोघांनीही त्यांना दिलेली सर्व कामे पूर्ण केली आहेत, परंतु पुढच्या चंद्र दिवसाच्या सुरूवातीस ते पुन्हा जागे होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.
तज्ञांनी चीनच्या Chang'e4 लँडर आणि Yutu2 रोव्हरची उदाहरणे देताना सांगितले की ही दोन्ही सूर्योदयाबरोबर अनेक वेळा जागे झाले होते.
परंतु "विक्रम आणि प्रग्यान शीतनिद्रेतून जागे झाले नाहीत, तर ते भारताचे कायमस्वरूपी दूत म्हणून चांद्रभूमीवर राहतील, असे इस्रोनो सर्वांच्या उंचावलेल्या आशांना शांत करताना म्हटले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)