You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अपोलो : यानाचा मार्ग चुकला, ते पृथ्वीपासून लांब गेलं आणि तीन अंतराळवीर अंतराळात अडकले
- Author, रुचिता पुरबिया
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
11 एप्रिल 1970 ला अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं तीन अंतराळवीरांना चंद्रावर पाठवलं होतं. ही मोहीम यशस्वी ठरली असती तर ती चंद्रावर मानव पाठवण्याची नासाची तिसरी यशस्वी मोहीम ठरली असती.
मे 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि इतरांसह अपोलो 11 यान चंद्रावर उतरल्यानंतरची ही तिसरी मानवी चंद्रमोहीम होती. विशेष म्हणजे एका वर्षामध्ये नासानं लागोपाठ दोन वेळा क्रू लँडिंग यशस्वी केलेलं होतं.
अपोलो 11 च्या मानवी चंद्र मोहिमेच्या यशानंतर मात्र लोकांचा चंद्र मोहिमेबद्दलचा उत्साह कमी व्हायला लागला होता. अंतराळ संशोधनासाठी वापरला जाणारा देशाचा पैसा वापरून गरीबी किंवा शिक्षण यावर अधिक चांगल्या पद्धतीनं खर्च करता येऊ शकणार नाही का? असा प्रश्न लोक उपस्थित करू लागले होते.
त्यामुळे लोकांना ते पाहण्यातही काही रस नसल्यानं अपोलो-13 मिशनचं लाईव्ह ब्रॉडकास्टही करण्यात आलं नव्हतं.
पण 13 एप्रिल रोजी सर्वकाही बदलून गेलं.
नेमकं असं काय घडलं की, मिशन पाहण्याची इच्छाही नसलेले लोक टीव्हीसमोर बसून अपोलो-13 मधील अंतराळवीरांच्या सुखरुप परतण्यासाठी प्रार्थना करू लागले होते.
तीन जणांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानात स्फोट
या यानामध्ये तीन कमांडर होते. जेम्स लॉवेल, लुनार मॉड्युल पायलट फ्रेड हाइस आणि कमांड मॉड्युल पायलट जॉन जॅक स्विगर्ट.
या मोहिमेत चंद्रावर पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार होते. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 13 एप्रिल रोजी अपोलो-13 पृथ्वीपासून 3,21,869 किलोमीटरचा प्रवास करून चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचत होतं.
अंतराळ यानात थेट प्रक्षेपण करण्यासाठी कॅमेरे लावलेले होते. कमांडर लॉवेल यांच्या पत्नी हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नासाच्या कार्यालयात गेल्या होत्या.
"तो दिवस संपत आला होता. आम्ही झोपायला जाणारच होतो तेवढ्यात स्फोटाचा आवाज आला.”
तो एका मोठ्या स्फोटाचा आवाज होता असं फ्रेड हाइस यांनी नंतर याबाबत बोलताना सांगितलं होतं.
सकाळी 09:08 वाजता लॉवेल ऑक्सिजन टँक चेक करत होते, त्यावेळी त्यांना अचानक एक मोठा स्फोट ऐकू आला.
जेम्स लॉवेल म्हणाले, "दोन ऑक्सिजन टँक होते त्यापैकी एकाचा स्फोट झाला होता. मी खिडकीतून पाहिलं तर स्फोटानंतरचे अवशेष अंतराळामध्ये अत्यंत वेगानं तरंगताना दिसत होते. दुसऱ्या टँकचंही यात नुकसान झालं होतं."
अंतराळ यानाचं आणखी काय नुकसान झालं हे समजू शकलं नव्हतं.
फक्त एकच ऑक्सिजन टँक शिल्लक होता. तोसुद्धा लीक होऊ लागला होता. त्यामुळं यान चंद्रापर्यंत पोहोचून परत पृथ्वीपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं.
दर सेकंदाला यान अनेक किलोमीटर लांब जात होतं. काही तासांमध्ये यानाचा मार्ग चुकला आणि ते पृथ्वीपासून एवढ्या लांबच्या अंतरावर निघून गेलं की एक नवा विक्रम झाला.
आतमध्ये असलेले अंतराळवीर पृथ्वीपासून एवढ्या दूरच्या अंतरावर होते की, सर्वात लांबच्या अंतराचा तो विक्रम बनला होता. आजवर तो विक्रम कायम आहे.
आता अडचण अशी होती की, ऑक्सिजन कमी होता आणि तो संपण्यापूर्वी तिन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणायचं होतं.
अंतराळ यान पृथ्वीवर परत कसे आणणार?
अपोलो-13 यानामध्ये एक कमांड मॉड्युल, ओडिसी नावाचे सर्व्हिस मॉड्युल आणि अॅक्वारियस नावाचं लुनार मॉड्युल होतं.
एक असा महत्त्वाचा निर्णय व्हायचा होता की, यान पृथ्वीवर सुरक्षितपणे पोहोचणार की नाही आणि ते कोणत्या मार्गाने पृथ्वीवर परतणार.
याचा सर्वांत खात्रीशीर मार्ग म्हणजे यानाची दिशा पृथ्वीकडं बदलणं हा होता. पण तसं करण्यासाठी ओडिसी सर्व्हिस मॉड्युलचं मेन इंजिन सुरू करावं लागणार होतं. पण ते स्फोटामुळं बंद झालं होतं. इंजिनला नुकसान पोहोचलं आहे किंवा नाही, हे कुणालाही माहिती नव्हतं.
यानामध्ये इंधन म्हणून ऑक्सिजन होतं त्यामुळं इंधनाचीही कमतरता होतीच.
पृथ्वीवर पोहोचण्याचा दुसरा मार्ग काहीसा लांबच्या पल्ल्याचा होता. तो म्हणजे चंद्राच्या भोवती चक्कर मारून पृथ्वीवर परतण्याचा.
यासाठी इंजिन लागणार नव्हतं पण ते पृथ्वीवर परत येण्यासाठी चार ते पाच दिवस लागणार होते आणि हा मोठा धोका होता. यानात तीन लोकांसाठी पुरेसं पाणी आणि ऑक्सजन शिल्लक नव्हते हेही तेवढंच खरं होतं.
नासाच्या फ्लाइट डायरेक्टरनं दुसरा लांबचा मार्ग निवडला होता.
हा निर्णय म्हणजे तुलनेनं सुरक्षित असला तरी त्यात अनेक अडचणी आणि आव्हानं होती. लुनार मॉड्युल केवळ दोन अंतराळवीरांना जवळपास 20 तासांसाठी सामावून घेण्यासाठी डिझाईन केलेलं होतं. पण आता या तीन अंतराळवीरांनी या मॉड्युलमध्ये चार ते पाच दिवस बसावं अशी अपेक्षा केली जात होती.
लुनार मॉड्युलचे इंजिन पुन्हा पुन्हा सुरू करता येतील असे डिझाईन केलेले नव्हते. शिवाय इंजिन सुरू करण्यासाठी इंधनही जळणार होतं.
ऊर्जेची बचत व्हावी आणि पुरवठा सुरू राहावा म्हणून अंतराळवीरांना हिटर्ससह गरजेची नसणारी उपकरणं बंद करण्यास सांगण्यात आलं होतं. कारण वीज बचत अधिक गरजेची होती. पण लुनार मॉड्युलला हीट शिल्ड नव्हतं. त्यामुळं ते पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकेल का? याबाबत शंका होती.
हिटिंगसाठी काही नसल्यामुळं केबिनमधील तापमान वेगानं खाली घसरू लागलं. काही खाद्यपदार्थ खराब होऊ लागले होते.
लुनार मॉड्युलला थंड होण्यासाठी पाण्याची गरज असल्यानं क्रूनं पाण्याचा वापर कमी केला. त्यामुळं लुनार मॉड्युलला पाण्याचा पुरवठा करता आला.
पृथ्वीवर परत येत असताना क्रूनं पुन्हा सर्व्हिस मॉड्युलमध्ये प्रवेश केला आणि इंजिन सुरू केले.
इंजिन सुरू होते, तेव्हा त्याला बर्न म्हटलं जातं. नव्या दिशेला जाण्यासाठी ते पहिल्यांदाच सुरू करण्यात आलं होतं.
याच्या मदतीनं ते चंद्राच्या दुसऱ्या बाजूला पोहोचले, ही चंद्राची लांबची बाजू होती. ते पृथ्वीपासून एवढ्या अंतरावर होते की, ते जगातले पहिले मानव बनले.
त्यांच्या सर्वात दूरच्या केंद्रावर ते पृथ्वीपासून 4 लाख किलोमीटर अंतरावर होते.
जर ते याच मार्गावर राहिले तर ते प्रक्षेपणाच्या 153 तासांनंतर पृथ्वीवर परत पोहोचू शकले असते. एवढ्या काळानंतर ते पृथ्वीवर पोहोचले असते तर अंतराळवीरांकडं केवळ एका तासाचं अतिरिक्त अन्न, पाणी आणि ऑक्सिजन शिल्लक असता. शिवाय हे अंतरही खूप धोकादायक होतं.
नासाच्या पृथ्वीवरील टीमच्या मते हे अंतर खूप कमी होतं, त्यामुळं अंतराळवीरांना दुसऱ्या वेळी इंजीन सुरू (बर्न) करण्यास सांगण्यात आलं.
लुनार मॉड्युलच्या दृष्टीनं दुसऱ्यांचा इंजिन बर्न करणं योग्य असेल का? हे ठरवण्यासाठी मिशन कंट्रोल इंजिनीअर्सनं काही गणितं केली होती. दुसऱ्यांदा इंजिन बर्न केले तेव्हा ही गणितं योग्य ठरली. त्यामुळं यानाचा वेळ 153 तासांवरून 143 तासांवर आला होता. 11 तासांचा मोठा कालावधीही त्यामुळं मिळाला.
एकापाठोपाठ एक धक्के
अंतराळवीरांनी हार मानण्याच्या आधीच आणखी एक नवी समस्या निर्माण झाली होती. ती म्हणजे कार्बन डायऑक्साईडची उच्च घनता.
यानामध्ये ऑक्सिजन टँकबरोबरच कार्बन डायऑक्साईड काढण्यासाठी लिथियम हायड्रॉक्साईच्या कॅन होत्या.
लिथियम हायड्रॉक्साईडच्या कॅनचा असा वापर केला जातो की, त्याची कार्बन डायऑक्साईडबरोबर प्रतिक्रिया होऊन त्यापासून लिथियम कार्बोनेट तयार होतं.
पण याठिकाणी एक समस्या होती. ती म्हणजे लिथियम हायड्रॉक्साईचे कंटेनर फक्त दोन अंतराळवीरांना दोन दिवस पुरतील एवढेच होते.
पण याठिकाणी तीन लोक होते आणि त्यांना चार दिवस काढायचे होते.
एक चांगली बाब म्हणजे कमांड मॉड्युलमध्येही काही डबे होते. पण त्याचे फिल्टर चौकोनी होते तर लुनार मॉड्युलचे गोल आकारातील होते.
आता संशोधकांकडे या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी 24 तास होते. अंतराळवीरांनी पृथ्वीवरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या आसपासच्या प्रत्येक गोष्टीबाबत माहिती दिली. त्यात प्लास्टिक बॅग, जाड पेपर या सर्वांचा समावेश होता.
कार्बन डायऑक्साईडची पातळी पुन्ही कमी करण्यासाठी, एकापाठोपाठ एक सूचना देऊन त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून नवीन उपकरणं तयार केली जात होती.
कमांडर लॉवेल यांनी त्यांच्या ‘लॉस्ट मून’ या पुस्तकात म्हटलं की, "ते नवीन उपकरण परफेक्ट नसलं तरी कामी आलं होतं."
मूत्रविसर्जनामुळे अंतराळयानाची दिशा बदलू शकते?
अंतराळवीरांना एका दिवसात 200 मिलीपेक्षा अधिक पाणी प्यायचं नाही अशा सूचना दिलेल्या होत्या. कारण त्यांनी जास्त पाणी प्यायलं आणि लघवी केली तर त्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळं यानाची दिशा बदलण्याची शक्यता होती.
त्यामुळं त्यांना कमी पाणी प्यावं लागलं. या तिघांचं एकूण 14 किलो वजन कमी झालं होतं. हाइस यांना इन्फेक्शनही झालं होतं.
चार दिवसांनी जेव्हा अपोलो 13 यान पृथ्वीच्या कक्षेत, तेव्हा अंतराळवीरांना लक्षात आलं की त्यांना पुन्हा एकदा इंजिन सुरू करावं लागणार आहे.
वाफ अंतराळ यानाच्या बाहेर पडत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यामुळं यानाची दिशा भरकटली होती. परिणामी असं घडलं होतं.
कमांडर लॉवेल यांनी लुनार मॉड्युल तिसऱ्यांदा सुरू केलं आणि यान पुन्हा मार्गावर आलं.
अशा प्रकारे फक्त एक वेळा सुरू करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेलं लुनार मॉड्युलचं इंजिन हे सुदैवानं तीन वेळा यशस्वीरित्या बर्न करण्यात आलं होतं.
आता अंतराळ यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार होतं.
अखेरचा क्षण
सगळ्या जगाच्या उत्सुकतेनं भरलेल्या नजरा टीव्ही चॅनल्सवर रोखलेल्या होत्या.
हे अंतराळयान जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल तेव्हा ते या ठिकाणची उष्णता सहन करू शकेल का? आतमध्ये असलेले अंतराळवीर वाचू शकतील का? असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये होते.
कमांड मॉड्युलने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच त्याचा संपर्क तुटला होता.
संपर्क तुटणं ही सामान्य बाब होती. कारण एअर आयन्स (चार्ज्ड अॅटम्स) ध्वनी लहरींना रोखतात आणि पृथ्वीवरील नासाचे कर्मचारी आणि अंतराळातील अंतराळवीर यांच्यातील संपर्क तुटत होता.
सामान्यपणे हा संपर्क दोन किंवा तीन मिनिटांसाठी जात असतो.
तीन मिनिटं होऊन गेली होती, पण दुसऱ्या बाजूने काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. सर्वांच्याच मनात काहीतरी सुरू होतं.
तीन मिनिटांनंतर दहा सेकंद गेले, 30 सेकंद, 60 सेकंद.
चार मिनिटांनंतरही यानाशी कोणताही संपर्क झाला नाही. अंतराळवीरांबरोबर नेमकं काय घडलं हे कुणालाही माहिती नव्हतं.
अखेर 4 मिनिट 27 सेकंदांनंतर सगळीकडं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि एकच उत्साह पसरला. टीव्हीवर अपोलो-13 चं मुख्य पॅराशूट स्पष्टपणे दिसत होतं.
अंतराळवीर सुखरुप परतल्यानंतर तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी म्हटलं होतं की, "मी ही मोहीम यशस्वी झाल्याचं जाहीर करतो. अंतराळ संशोधन हा सुरुवातीपासूनच एक जोखीम असलेला विषय राहिलेला आहे."
टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांनीही अखेरच सुटकेचा निःश्वास टाकला होता.
तिन्ही अंतराळवीर बचावले होते.
पॅराशूट अगदी हळूवारपणे पॅसिफिक महासागरात पडलं होतं.
चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी 1961 मध्ये जगाला एक वचन दिलं होतं. एका दशकामध्ये चंद्रावर मानव पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
केनेडी यांच्या भाषणामुळं नासाच्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी मार्गदर्शन मिळालं आणि 20 जुलै 1969 ला कमांडर नील आर्मस्ट्राँग अपोलो -11 यानाच्या लुनार मॉड्युलमधून चंद्रावर उतरले तेव्हा त्यांचं हे लक्ष्य पूर्ण झालं होतं.
अपोलो -13 मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ चंद्राच्या पृष्ठभागाची पाहणी आणि अभ्यास एवढाच नव्हता तर चंद्राच्या वातावरणात काम करण्यासाठी मानवी क्षमता विकसित करणं हादेखील त्याचा उद्देश होता.
अपोलो-13 चा उद्देश फ्रा माऊरो भागात उतरणं हा होता.
यानामध्ये झालेल्या स्फोटामुळं अपोलो-13 लँडिंग न करताच चंद्राच्या कक्षेत जावं लागलं. त्यामुळं फ्रा माऊरो साइटची जबाबदारी अपोलो-14 मिशनला देण्यात आली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)