You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रावर जपानचं यान पुन्हा जागं, हे यश भारतासाठी का महत्त्वाचं?
जपाननं चंद्रावर उतरवलेलं यान पुन्हा जागं झाला आहे. चंद्रावरच्या रात्रीतल्या प्रचंड थंडीतही या लँडरनं तग धरून ठेवल्याचं जपानची अंतराळसंस्था जॅक्सानं जाहीर केलं आहे.
जपानचं हे यश भारतासाठीही महत्त्वाचं आहे, कारण भारतीय अंतराळ संस्था इस्रो आणि जपान नजिकच्या भविष्यात एकमेकांच्या साथीनं एकत्रित चांद्र मोहिमा आखणार आहेत.
तुम्हाला आठवत असेल, तर भारताच्या चंद्रयान 3 चा विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर चंद्रावरच्या रात्रीनंतर (पृथ्वीवरचे साधारण दोन आठवडे) पुन्हा काम करू शकले नव्हते.
याचं कारण म्हणजे चंद्रावर दिवस आणि रात्रीच्या तापमानात प्रचंड तफावत असते.
पण जॅक्साचं लँडर या रात्रीनंतर पुन्हा जागं झालं आहे. "काल रात्री स्लिम ला आम्ही एक संदेश पाठवला आणि त्यावर आम्हाला प्रतिक्रिया मिळाली आहे," असं जॅक्सानं जाहीर केलं.
अर्थात चंद्रावर सध्या मध्यान्ह असल्यानं स्लिम वरच्या उपकरणांचं तापमान प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे या लँडरसोबतचा संपर्क तुर्तास बंद करण्यात आल्याचं जॅक्सानं म्हटलं आहे.
तापमान कमी झाल्यावर पुन्हा यान सुरू करण्याची योजना सध्या आखली जाते आहे.
संपर्क बंद करण्यापूर्वी यानानं काढलेला एक फोटो जॅक्सानं सोशल मीडिया वेबसाईट 'एक्स' वर पोस्ट केला आहे.
19 जानेवारी 2024 रोजी जॅक्सानं त्यांच्या 'स्मार्ट लँडर फॉर इनव्हेस्टिंग मून' अर्थात स्लिम मोहिमेअंतर्गत मून स्नायपर नावाचं यान चंद्राच्या विषुववृत्तानजीकच्या प्रदेशात उतरवलं होतं.
चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग करणारा जपान हा अमेरिका, सोव्हियत युनियन, चीन आणि भारत या देशानंतर पाचवा देश ठरला होता.
पण जॅक्साची ही मोहिम अडचणींनी भरलेली होती.
याचं कारण म्हणजे, सुरुवातीला SLIM मोहिमेचं 'मून स्नाइपर' चंद्रावर उतरलं, असं आकड्यांवरून स्पष्ट होत होतं, मात्र त्यानंतर लँडरचा पृथ्वीवरील अवकाश केंद्राशी संपर्कच होत नव्हता.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रावरून मून स्नाइपर हा सिग्नल पाठवू लागला आणि त्याची खात्री पटल्यानंतरच अखेर स्लिमचं सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्याचं जपानने जाहीर केलं. एका पत्रकार परिषदेत (भारतीय वेळेनुसार) शुक्रवारी, 19 डिसेंबरच्या रात्री उशिरा ही घोषणा करण्यात आली.
2023च्या सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आलेली स्लिम हे यान चंद्राच्या विषुववृत्ताजवळच्या शिओली नावाच्या एका विवराजवळ उतरणं अपेक्षित होतं.
मात्र, चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर यानाचा एक महत्त्वाचा भाग, यानावर सौर ऊर्जा निर्माण करणारी यंत्रणा कार्यान्वित झाली नाही, ज्यामुळे या यानाचं काम यानातील बॅटरीवरच सुरू होतं.
जपानच्या JAXA अंतराळ संस्थेने म्हटलंय की ते अजूनही बराच डेटा गोळा करत आहेत, आणि त्यांच्याकडेही सर्व प्रश्नांची उत्तरं नाहीत.
म्हणजे या मोहिमेला संमिश्र यश मिळालं असलं तरी जपानच्या आतापर्यंतच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं जाणकार सांगतात.
चंद्रावर कुठलंही यान लँड करणं खूप अवघड असतं. 21व्या शतकातल्या दहापैकी चार मोहिमांनाच आतापर्यंत यश आलं होतं, तर इस्रायलला एकदा आणि जपानला दोन वेळा अपयश आलं होतं. याशिवाय 2022 मध्ये iSpace नावाच्या एका खासगी कंपनीची Hakuto-R ही मोहीम अपयशी ठरली होती.
बीबीसीचे विज्ञान प्रतिनिधी जॉनथन ॲमोस यांच्यामते जपानच्या स्लिम मोहिमेला यशस्वी म्हणावंच लागेल, कारण सुरुवातीची काही यंत्रणा जसं की नवीन बारीक नेव्हिगेशन टेक्नॉलॉजीचं परीक्षण यशस्वी ठरलं आहे. आणि हेच तंत्रज्ञान आता पुढच्या मोहिमांसाठीही जपान वापरू शकेल.
याशिवाय या यानासोबत दोन लहान रोव्हर होते आणि इतर काही यंत्र होती, जी चंद्रावर लँडिंगसोबतच नियोजितरीत्या यानापासून वेगळी झाली आहेत. मात्र यानातील बॅटरीतील ऊर्जा पुरेपर्यंत जपानला सौर ऊर्जेचे पॅनल सुरू करणं गरजेचं आहे.
या दशकाच्या अखेरीस मानवाला चंद्रावर पुन्हा पाठवण्याच्या मोहिमांसाठी आता जपानही एक महत्त्वाचा भागीदार बनला आहे.