नाशिकमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारे रामगिरी महाराज नेमके कोण आहेत?

- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, नाशिक
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर तीन जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिन्नरमधील पंचाळे येथील सप्ताहात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
नाशिकच्या येवल्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात, अहमदनगरमधील तोफखाना आणि संगमनेरातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये वक्तव्य, तीन जिल्ह्यांमध्ये तणाव
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर वैजापूर शहरात 15 ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला.
मुस्लीम समाजातील काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले आणि घोषणाबाजी सुरू केली. रात्री आठपासून जमावानं चौकात ठाण मांडलं होतं. यावेळी जमलेल्या जमावानं कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी जमावाची समजूत काढत कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिल्यानं तणाव निवळला.
तर अहमदनगर शहरात धर्मगुरुंनी शांततेचे आवाहन केल्यावर निषेध सभा घेत कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतरही शुक्रवारी नगर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
नाशिकमध्ये मुस्लिम समाजाने येवला आणि मनमाड येथील पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती.
अखेर रामगिरी महाराजांवर येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वादग्रस्त वक्तव्यावरून श्रीरामपुरात निषेध सभा घेण्यात आली, संगमनेर, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातूनही रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर येथे एका समुदायाकडून शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे येथे रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी एक समुदाय मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात समोर जमा झाला होता. त्यानंतर जमावाला पोलिसांनी समजावत परत पाठवले, सिटी चौक परिसरात तणाव होता तर लोकांनी दुकाने बंद ठेवली होती. वैजापूर पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितल्यावर वातावरण निवळले.
सदर घटना नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी घडली असल्याकारणाने संगमनेर पोलिसांनी पुढील तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.
दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांनी या गुन्ह्यांबाबत म्हटलं की, "गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस येईल तेव्हा बघू."


संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री
सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे सदगुरू योगिराज गंगागिरी महाराज 177 वा अखंड हरिनाम सप्ताह महंत रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. येथे त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद झालाय.
17 ऑगस्ट रोजी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधात रोष होता, प्रतिक्रिया उमटत होत्या.
एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आले.

फोटो स्रोत, X/@mieknathshinde
"या राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागता कामा नये," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
"महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संतांच्या आशीर्वादामुळे राज्य कारभार सुरू आहे, म्हणून या महाराष्ट्रात संताच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही," असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.


कोण आहेत रामगिरी महाराज?
रामगिरी महाराज यांचं मूळ नाव सुरेश रामकृष्ण राणे असं आहे. जळगाव जिल्ह्यात जन्म आणि तिथंच शालेय शिक्षण झालं.
1988 साली सुरेश राणे 9 वी वर्गात शिकत असताना स्वाध्याय केंद्रात गीतेचे अध्याय, भावगीते याचे पाठांतर करून ध्यानही करू लागले. दहावी पास झाल्यावर त्यांच्या भावाने त्यांनी ITI करण्यासाठी अहमदनगर येथील केडगाव येथे प्रवेश घेऊन दिला.
मात्र, शिक्षण पुढे सुरू न ठेवता, त्यांनी आध्यात्माच्या क्षेत्रात प्रवेश केला.

फोटो स्रोत, X/@mieknathshinde
2009 मध्ये त्यांनी दीक्षा घेतली आणि गंगागीर महाराज यांचे शिष्य नारायणगिरी महाराज यांना आपले गुरू मानून त्यांच्या सान्निध्यात राहू लागले.
2009 साली नारायणगिरी महाराज यांच्या निधनानंतर रामगिरी महाराज सराला बेटच्या गादीचे वारसदार झाले. यावरू वादही झाले होते. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले.
रामगिरी महाराज हेच या गादीचे वारसदार असल्याचा निकाल कोर्टाने दिला. तेव्हापासून गंगागीर महाराजांती गादी रामगिरी महाराज चालवत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे होणाऱ्या सप्ताहात दरवर्षी लाखो लोक येत असतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान येथे भेट दिली होती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 ऑगस्ट रोजी 177 व्या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला भेट दिली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन











