‘ते म्हणले श्रीराम म्हणा; आम्ही म्हणलो, राम बी आमचा, अली बी आमचा...आमची काय चूक?’

फोटो स्रोत, nitin nagarkar
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
"संघटनेचे लोक येणार आहेत माहीत होतं. पोलिसांनी सांगितलं घरात बसा दुकान उघडू नका. आम्ही त्यांना आसरा दिला, सहकार्य केलं. पाऊस होता म्हणून रेनकोट दिले. नंतर ते परत आले त्यांनी हल्ला केला.
ते म्हणाले 'श्रीराम म्हणा'. आम्ही म्हणालो की, राम बी आमचा आणि अली बी आमचा. आम्ही भेदभाव करत नाही. आम्ही काय केलंय?"
विशाळगडच्या घटनेच्या दोन दिवसांनंतरही रेश्मा प्रभुलकरांचा आक्रोश थांबत नाही. भेटणाऱ्या प्रत्येकालाच त्या आम्ही काय केलंय ज्यामुळे आमच्या वाटेला ही परिस्थिती आली हा प्रश्न विचारतात. प्रभुलकरांच्या दुकानातली आग अजूनही विझली नाही.
छत्रपती संभाजीराजेंनी विशाळगडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी रविवारी 14 जुलैला मोर्चाची घोषणा केली. पण, या मोर्चातल्या कार्यकर्त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात तोडफोड केली.
दुचाकी, चारचाकी अशा वाहनांसह घरातल्या सामानाची नासधूस केली. धान्य ठेवायचे पिंप सुद्धा फोडले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख याठिकाणी होते. त्यांच्यासमोरच हा सगळा हिंसाचार घडला. पण, पोलीस बघ्याची भूमिका घेत होते, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
याच हिंसाचारात प्रभुलकरांचं घर जळालं. या छोटेखानी घरात रेश्मा आणि त्यांची सासू कपडे, बांगड्या अशा वस्तूंचं दुकान चालवायच्या. हल्ला झाला तेव्हा दोघीही मुलांसोबत घरातच होत्या. हल्लेखोर इतके आक्रमक होते की, त्यांना घाबरून जीव वाचविण्यासाठी मुलांसोबत जंगलात पळून गेल्याचं त्या सांगतात.
मोर्चेकऱ्यांनी नाव घेऊन घेऊन घरांची तोडफोड केल्याचं ग्रामस्थ सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना इथलेच तय्यबअली नाईक म्हणाले, “देख देख के टार्गेट किया. नाव घेऊन दुकानं, घरं फोडत होते. हे याचं घर हे फोडा असं सांगत होते. आमच्या गावात असं वातावरण नव्हतं. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. हे सगळे लोक बाहेरून आलेले होते.’’
प्रभुलकरांच्या जळालेल्या दुकानाच्या पुढं तय्यबअली यांचं छोटसं हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे साधी पत्र्याची शेड आहे. पण, मोर्च्यातील कार्यकर्त्यांनी त्याचीही तोडफोड केली. आता ही नासधूस कशी सावरायची हे त्यांना समजत नाही.
मोर्चेकऱ्यांनी फक्त तोडफोडच केली नाहीतर तिथं ठेवलेल्या मुलांची पिगी बँक फोडून त्यातलेही पैसे नेल्याचं नाईक सांगतात.

फोटो स्रोत, nitin nagarkar
गजापूरमधल्या प्रत्येकाची स्थिती प्रभुलकर आणि तय्यबअली यांच्यासारखीच आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणि चेहऱ्यावर एकच प्रश्न आहे की आता हे सावरायचं कसं?
घराच्या दर्शनी भागातल्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. शिवाय आत स्वयंपाक घरापर्यंत जाऊन सामानाची नासधूस केली. वर्षभरासाठी साठवून ठेवलेलं धान्य फेकण्यात आलं. ताटं, पाण्याच्या टाक्या, इलेक्ट्रिक मीटर, घरावर लावलेल्या डिश टीव्हीच्या छत्र्या सगळ्यांची तोडफोड केली. कपाटं, गाद्यांचंही नुकसान झालं.
इतकंच नाहीतर लहान मुलांच्या खेळण्यातल्या गाड्या आणि सायकल सुद्धा तोडफोड झालेल्या अवस्थेत अनेकांच्या घराबाहेर पडून आहेत.

फोटो स्रोत, bbc
आकडेवारीनुसार इथं सुमारे 42 घरांचं नुकसान झालंय. अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची नासधूस झाली आहे. दोन घरं आणि हॅाटेलांची जाळपोळ झाली आहे. प्रत्यक्षात इथलं प्रत्येकच घर तुटलेलं, फोडलेलं दिसतं.
आम्ही मुलांना घेऊन जंगलात लपून बसलो म्हणून वाचलो असं इथले प्रत्येक जणच सांगतात. सकाळी साडेअकराला सुरू झालेली तोडफोड संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असल्याचा दावाही ते करतात. संध्याकाळी घरी परतलेल्या लोकांना ना खायला अन्न ना अंगावर घालायला कपडा उरलाय.
याप्रकरणी संभाजीराजे छत्रपतींवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी पडवळ आणि बंडा साळोखेंवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
त्याचबरोबर 400 ते 500 अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
विशाळगड नुकसान
- घरे प्रापंचिक साहित्य आणि हॉटेल- 42
- दुचाकी वाहने - 28
- चारचाकी वाहने- 20
- सार्वजनिक मालमत्ता- 2
- एकूण- 92
- अंदाजे रक्कम- 2 कोटी 85 लाख
(पंचनाम्यातील आकडेवारीनुसार)
‘डॉक्टर काय हिंदू-मुस्लीम बघून औषधं देत होते का?’
गजापूरमध्येच डॉक्टरांचं एक बंद घर दिसलं. घराकडे बघताच या घराचं दगडफेकीनं झालेलं नुकसान दिसतं.
‘या डॉक्टरांच्या घरावर आधी दगडं मारली. त्यानंतर फावड्याने त्यांच्या घरातली औषधं बाहेर काढली आणि त्यालाही आग लावली.
हल्लेखोरांनी खूप नुकसान केलं. हे डॅाक्टर काय हिंदू मुस्लिम बघून औषधं देत होते का?’
स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या हल्ल्याचं वर्णन करत डॉक्टरांच्या शेजारी मुस्कान महालदार संतप्त सवाल करत होत्या.

फोटो स्रोत, nitin nagarkar
अतिक्रमणाच्या नावाखाली घरांची तोडफोड करण्यात आली. पण, गजापूरमधल्या लोकांना आपणच जमीन दिल्याचं स्थानिक रहिवासी आणि माजी सरपंच संजय पाटील सांगतात.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना त्यांनी म्हटलं, "विशाळगड पायथ्याला माझा हॉटेलचा धंदा चालत होता. या लोकांना काहीच आधार नव्हता. मी सरपंच म्हणून काम करत होतो तेव्हा लोक पूर्णपणे निराधार होते. त्या कुटुंबांनी उदरनिर्वाह कशावर करायचा म्हणून माझा हॉटेलचा व्यवसाय होता तो यांना दिला."
विशाळगडावर मात्र ग्रामपंचायतीचे लाभार्थी सोडून इतरांनाच जागा देऊन व्यवसाय उभारू दिल्याचं ते सांगतात.
विशाळगड परिसरात नेमकं काय घडलं?
विशाळगडावरच्या अतिक्रमणांचा वाद जुना आहे. पण ही अतिक्रमणं काढली का जात नाहीत असा प्रश्न उपस्थित करत छत्रपती संभाजीराजेंनी 'चलो विशाळगड' मोहिमेची घोषणा केली. आधी 13 जुलैला ही मोहीम होणार होती.
संभाजीराजे छत्रपतींनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार पन्हाळगडचा वेढा भेदून छत्रपती शिवाजी महाराज 13 जुलै 1660 ला विशाळगडावर सुखरुप पोहोचले होते. याचं औचित्य साधून विशाळगड अतिक्रमण मुक्त करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. नंतर ही तारीख बदलून 14 जुलैला विशाळगडावर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता तुळजाभवानीचं दर्शन घेऊन छत्रपती संभाजीराजे विशाळगडाकडे निघणार होते.
सकाळी ते निघाले सुद्धा. पण त्या आधीच अनेक लोक मोठ्या संख्येने विशाळगडावर पोहोचले होते. यापैकी काही लोकांना खाली अडवण्यात आलं आणि तिथंच वादाची ठिणगी पडली. संभाजी राजे पोहोचण्याच्या आधीच इथं तोडफोड सुरु झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले तरुण भारतचे पत्रकार बाळासाहेब उबाळे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचं वर्णन करतात.

फोटो स्रोत, nitin nagarkar
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "घोषणा केल्याप्रमाणे संभाजीराजे निघाले. साधारण 9 वाजता ते पावनखिंडीजवळ पोहोचले. तिथून पुढे केंभुर्णेवाडीला थांबले. तिथून पायी गडाकडे निघाले. दीडच्या सुमारास त्यांनी तिथे पोहोचून ठिय्या आंदोलन सुरु केलं. त्यावेळी एक संतप्त जमाव खाली येत होता. त्यांनी गडावर तोडफोड केली होती. संभाजीराजे पायथ्याशी बसले असताना शेजारी हा जमाव तोडफोड करत होता. साधारण 3 वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.
"राजेंनी प्रशासनासोबत चर्चा केली. त्यांना आश्वासन मिळाल्यावर राजे परतले. तेव्हा परतण्याच्या मार्गावरही तोडफोड सुरूच होती. पोलिस, आरडीसी, एसपी सगळे तिथं होते. तोडपोड सुरू असता पोलीस फक्त काठ्या घेऊन उभे होते. केसालाही धक्का लागला तर बघा, अशा धमक्या जमावातले लोक पोलीस प्रशासनाला देत होते.’’
हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका
कोल्हापुरातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या अतिक्रमणांचा प्रश्न गेली अनेक वर्ष मांडला आहे. मात्र संभाजीराजे छत्रपतींना आपला पाठिंबा नसल्याचं ते सांगतात. विशाळगड प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक बोलावली होती.
बीबीसी मराठीशी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील म्हणाले, "सनदशीर मार्गाने अतिक्रमण निघणार होतं. मंत्रीमहोदयांनी 11 जुलैला बैठक घेतली. 12 जुलैला अॅडव्होकेट जनरल सोबत चर्चा झाली. त्यानंतर ते यावर मत मांडणार होते. त्यांचं ओपनियन 15 जुलैला आलं. त्यानंतर अधिकृतरित्या अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली. या बैठकीवर संभाजीराजेंनी बहिष्कार घातला. ते आधीच गडावर कशासाठी गेले? हे अनधिकृत बांधकाम आज ना उद्या हटवलं जाणारच होतं ना.
"पण, आता तोडफोडीच्या प्रकरणात लोक अडकले आहेत. 24 जणांना अटक झाली आहे. प्रशासनाने आतापर्यंत कारवाईचा पवित्रा घेतला नव्हता. अतिक्रमण हटवत असताना इतकी जहाल भूमिका घेण्याची गरज होती का? आम्हांला कळलं त्यानुसार जे लोक आधी पोहोचले त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात आम्ही आलो अशी भूमिका घेतली होती. त्यांना प्रशासनाने परवानगी दिली. हे 8-10 लोक होते. संभाजीराजेंना संघर्ष करायचा होता. त्यांनी जाहीर भूमिका घेतली की मला अडवून दाखवा."

फोटो स्रोत, nitin nagarkar
"बहिष्कार म्हणून तुम्ही प्रशासनाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यांनी याविषयात भूमिका घ्यायच्या आधीच पालकमंत्र्यांनी बैठक लावली होती. 136 अनधिकृत बांधकामं आहेत त्यात दर्गा आणि मशिदीचं बांधकाम नाही. पण त्याचं अतिरिक्त अनधिकृत बांधकाम हटवलं गेलं पाहिजे अशी मागणी मंत्रीमहोदयांनी केली. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी काही कारवाई केली नाही,’’ कुंदन पाटील पुढे सांगतात.
"राहुल गांधी म्हणतात हिंदू हिंसक आहे आणि त्याच लाईनवर इथं माजी पालकमंत्री (सतेज पाटील) या प्रकरणात बोलतायत. हे नेमकं काय आहे याचा काही संबंध आहे का? याचाही तपास व्हावा,’’ अशी मागणी कुंदन पाटील करतात.
‘गजापुरात अतिक्रमणाचा विषय नाही तरी मुस्लीम समाजावर अत्याचार’
दुसरीकडे मुस्लिम संघटनांच्या वतीने देखील अतिक्रमणं काढायला पाठिंबा देण्यात आला आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणं सोडून इतर बांधकामं काढायला हरकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दि मोहमेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गनी आजरेकर याविषयी बोलताना म्हणाले, "संभाजीराजेंना ही दंगल होणार याची पूर्ण कल्पना आम्ही दिली होती. त्यांनाच काय त्यांच्या पूर्ण टीमला दिली होती. असं हे व्हॅाट्सॲप फेसबुकवर येतंय. दर्गा मस्जिद छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वापासून आहे. तेव्हापासून त्यांचे संवर्धन जतन झालंय. संभाजीराजेंनी सांगितलं होतं की दर्ग्याच्या मस्जिदचा विषय नाही तर जी 156 अतिक्रमणं आहेत ती काढा. ती हिंदूंची आहेत आणि मुस्लिमांची आहेत. त्याला कोणाचाही विरोध नव्हता. अतिक्रमण काढू नये असं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं."

फोटो स्रोत, nitin nagarkar
"गजापूरच्या मुस्लिमवाडीत जी घटना घडली ती पुर्वनियोजित होती. याला येणारे जे लोक होते ते शिवभक्त नाहीत. तिथं पुरुष कमी होते. त्यामुळे तिथं अडवणुकीचा कुठलाही प्रकार घडला नाही. चार पाच तास दंगल सुरु होती. एसपी म्हणाले मी त्यांना थांबवलं, माझ्या हाताला लागलं, पायाला लागलं हे खोटं आहे. कारण एसपींच्या कमरेला बंदूक असते ती काय प्लॅस्टिकची नसते. काठी घेऊन पोलिस उभे होते. 15-20 पोलिस होते त्यांना काढण्यात आलं आणि 2 पोलिसांना ठेवण्यात आलं. तीन तासांमधे कोल्हापूर जिल्ह्यातून फोर्स जाऊ शकत नाही का? तिथं जे दंगल करत होते त्यातल्या कोणाला त्यांनी अटक केलं ? नंतर कारवाई करताय. एसपींनी एकाला ही धरलं नाही. एसपींनी कोणाच्या सांगण्यावरून हे केलं? यामागे कोण याची चौकशी व्हायला पाहिजे," असं गनी आजरेकर यांनी म्हटलं.
दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विशाळगड बाबत बोलताना म्हणाले, "अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्याठिकाणी मागणी होती. अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची भावना आहे. त्यादृष्टीने त्या ठिकाणी सरकारच्या वतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. आत्ता जी परिस्थिती तयार झाली आहे त्यात शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे.”
शाहू महाराज विरुद्ध संभाजीराजे
याप्रकरणात खासदार छत्रपती शाहू महाराज विरुद्ध माजी खासदार संभाजीराजे छत्रपती असा पिता-पुत्रामधला संघर्ष देखील पाहायला मिळतो आहे. संभाजीराजे छत्रपतींनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.
इतकंच नाही तर आपण शिवभक्तांच्या पाठीशी आहोत असं म्हणत अटक झालेल्या शिवभक्तांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी शाहूवाडी पोलिस स्टेशनही गाठलं. गुन्हा दाखल झाला असेल तर मला अटक करा अशी मागणी त्यांनी केली.
तर शाहू महाराजांनी याबाबत भूमिका घेत घटनेचा निषेध तर केलाच शिवाय ते गजापूरमध्ये लोकांची विचारपूस करुन मदत देण्यासाठीही पोहोचले होते.

फोटो स्रोत, nitin nagarkar
घटनास्थळी जाण्यास पत्रकारांना बंदी
ही तोडफोड झाली त्यावेळी कोल्हापुरातले पत्रकार तिथं गेले होते. मात्र, त्यांना शूट करु नका अशा धमक्या देण्यात आल्याचं ते सांगतात. पण घटना झाल्यानंतर मात्र दोन दिवस पत्रकारांना जवळपास 20 किलोमीटर अलिकडेच अडवलं जात होतं.
पत्रकारच नव्हे तर मदत घेऊन निघालेल्या छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना देखील पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर फक्त 15 जणांना जाण्याची परवानगी दिली.
अखेर आम्ही जाणार अशी भूमिका पत्रकारांनी घेतल्यानंतर शेवटी स्वतःची वाहनं न नेण्याच्या अटीवर त्यांना गजापूरपर्यंत सोडण्यात आलं. पत्रकारांची अडवणूक कशासाठी? असा सवाल देखील विचारला जातोय.
हिंसाचारानंतर शाहू महाराजांनी काय म्हटलं?
कोल्हापूरचे खासदार आणि संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.
त्यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘’विशाळगड इथले अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरात अशी घटना घडली हे क्लेशदायी आहे. संभाजीराजेंनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. परंतु, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हिंसाचार झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.’’

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत शाहू महाराज म्हणाले, ‘’विशाळगड प्रश्न गांभीर्यानं घेऊन माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणावी अशा सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना दिल्या होत्या. पण, राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. सरकारनं अतिक्रमण हटवण्यासाठी रविवारी जे आदेश दिले ते यापूर्वीच दिले असते तर अशी घटना घडली नसती.’’
इतकंच नाहीतर विशाळगडावरील अतिक्रमण दुजाभाव न करता सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनानं करावी, अशी मागणीही शाहू मराजांनी केली. तसेच आज मंगळवारी शाहू महाराज विशाळगड परिसराला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत सतेज पाटील देखील असणार आहेत.
शाहू महाराजांनी निषेध करताच संभाजीराजेंनी काय म्हटलं?
शाहू महाराज यांनी संभाजीराजेंवर नाराजी व्यक्त करत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. याबद्दल संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली.
‘’शाहू महाराज माझे वडील आणि कोल्हापूरचे खासदार आहेत. तसेच ते सर्वांचे महाराज आहेत. त्या नात्याने त्यांनी निषेध नोंदवला. मी त्यांच्या भूमिकेचा स्वीकार करतो. पण, त्यांनी माझी भूमिका काय होती? हे खासदार म्हणून प्रशासनाला सांगावं,’’ अशी विनंतीही संभाजीराजेंनी शाहू महाराजांना केली.
‘’माझं आणि महाराजांचं याविषयावर बोलणं झालं होतं. आपण कोल्हापूरला प्रशासनासोबत बैठक लावू, असं त्यांनी मला सांगितलं. पण, हा विषय वरिष्ठ पातळीवर सुटू शकतो, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचं ठरलं होतं. पण, राज्य शासनाने मला चर्चेसाठी बोलावलं नाही. त्यामुळे शाहू महाराजांनी प्रशासन आणि राज्य सरकारवर ओढलेले ताशेरे अगदी बरोबर आहेत’’, असंही संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, इथं सगळ्यांचे अतिक्रमण हटवले जात आहेत. पहिलं अतिक्रमण हिंदू व्यक्तीचं निघालं आहे. त्यामुळे या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम असा जातीय रंग देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.












