बांग्लादेशात हिंदू तरुणाची जमावाकडून मारहाण करून हत्या, सरकारनं काय म्हटलं?

विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशची राजधानी ढाकामधल्या अनेक भागात हिंसाचार उफाळून आला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशची राजधानी ढाकामधल्या अनेक भागात गुरुवारी (18 डिसेंबर) हिंसाचार उफाळून आला.

(या बातमीतील काही मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो)

बांगलादेशातल्या मयमनसिंह जिल्ह्यातील भालुका येथे जमावाने एका हिंदू तरुणाला ठार मारलं आहे. धर्माचा अपमान केल्याचा आरोप ठेवत जमावानं मारहाण करून त्याला ठार केलं.

ही घटना भालुका उपजिल्ह्यातील दुबालिया पाडा येथे घडल्याचं पोलिसांनी बीबीसी बांगलाला सांगितलं आहे.

भालुका पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर रिपन मिया यांनी बीबीसी बांगलाला माहिती देताना सांगितलं, "या युवकाला मारहाण करुन गतप्राण केल्यावर त्याचं प्रेत एका झाडाला बांधण्यात आलं आणि आग लावली." या मृताचं नाव दीपचंद दास होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

या युवक एका कपड्याच्या एका स्थानिक कारखान्यात काम करत होता आणि त्याच परिसरात भाड्याच्या खोलीत राहात होता असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

भालुका पोलीस ठाण्याचे ड्युटी ऑफिसर रिपन मिया म्हणाले, "गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजता काही लोकांनी त्याला पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप करत पकडलं आणि त्याला मारहाण केली. नंतर त्याच्या प्रेताला आग लावून दिली."

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थिती नियंत्रणात आणली, असं हे अधिकारी म्हणाले. या युवकाचं शव मयमनसिंह वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

रिपन मिया यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं, "आम्ही त्यांच्या नातलगांना शोधत आहोत, जर त्यांनी येऊन तक्रार दिली तर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल."

शरीफ हादी उस्मान यांच्या मृत्यूनंतर हिंसाचार

विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशची राजधानी ढाकामधल्या अनेक भागात गुरुवारी (18 डिसेंबर) हिंसाचार उफाळून आला. हादी हे गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित नेते होते.

बीबीसी बांगलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर ढाक्यातील धानमंडी, शाहबागसह अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.

जमावाने गुरुवारी (18 डिसेंबर) रात्रभर अनेक ठिकाणी हल्ले केले. यामध्ये बांगलादेशातील दोन प्रमुख वर्तमानपत्रांच्या ऑफिसचा पण समावेश आहे.

बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी रात्री 11:20 वाजता देशाला संबोधित केलं. लोकांनी संयम बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवा तसंच अपप्रचाराला बळी न पडण्याचं आवाहन केलं.

बांगलादेश

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुहम्मद युनूस यांनी शनिवारी (20 डिसेंबर) एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

दुसरीकडे इन्कलाब मंचने एक फेसबुक पोस्ट लिहित म्हटलं की, उस्मान हादीचे नातेवाईक शुक्रवारी (19 डिसेंबर) त्यांचा मृतदेह सिंगापूरहून बांगलादेशला घेऊन येतील.

गेल्या शुक्रवारी हादी यांना ढाकामधल्या एका मशिदीतून बाहेर पडताना गोळी मारण्यात आली. गोळी डोक्यात लागल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले होते.

15 डिसेंबरला त्यांना एअरलिफ्ट करून उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, "सिंगापूर जनरल हॉस्पिटल आणि नॅशनल न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण जखमांमुळे 18 डिसेंबर 2025 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सिंगापूर प्रशासन त्यांचा मृतदेह ढाक्याला पाठवण्यासाठी बांगलादेश हाय कमिशनला मदत करत आहे.

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान, जमात-ए-इस्लामी आणि एनसीपीसह (नॅशनल सिटिझन्स पार्टी) अनेक पक्षांच्या नेत्यांनी हादी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड

उस्मान हादीच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर आंदोलक रस्त्यावर उतरले.

आंदोलकांनी ढाक्यामधील प्रोथोम आलो आणि डेली स्टार या वर्तमानपत्रांची ऑफिस, धानमंडी 32 इथलं शेख मुजीब यांचं घर आणि छायानाट संस्कृती भवनवर हल्ला केला, तोडफोड केली आणि इमारतींना आग लावली.

त्याचबरोबर चटगाव, राजशाही आणि अन्य ठिकाणीही हल्ले केले.

ढाका पोलिसांनी बीबीसी बांगलाला सांगितलं की, धनमंडी 32 मधे तोडफोडीच्या घटना झाल्या आहेत. बांगलादेशचे संस्थापक राष्ट्रपती शेख मुजीबूर रहमान यांचं इथे निवासस्थान होतं. नंतर तिथं संग्रहालय करण्यात आलं. 5 ऑगस्ट 2024 नंतर इथे दोन वेळा तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.

आंदोलकांनी ढाक्यामधील प्रोथोम आलो आणि डेली स्टार या वर्तमानपत्रांच्या ऑफिसेसची तोडफोड केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आंदोलकांनी ढाक्यामधील प्रोथोम आलो आणि डेली स्टार या वर्तमानपत्रांच्या ऑफिसेसची तोडफोड केली.

गुरूवारी दुपारीही तिथे तोडफोड झाली आणि जेसीबी मशीनचाही वापर केला गेला.

गुरूवारी (18 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास शेकडो लोकांनी दैनिक प्रोथोम आलो आणि नंतर द डेली स्टारच्या कार्यालयावर हल्ला केला, तोडफोड केली आणि आग लावली.

त्यावेळी दोन्ही वर्तमानपत्राचे अनेक पत्रकार इमारतीच्या आतच अडकले होते.

नंतर लष्कर, पोलिस आणि बीजीबीचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोरांना तिथून हटविण्यात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि इमारतीच्या आत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.

या वर्तमानपत्रांचं कामकाज शुक्रवारी (19 डिसेंबर) थांबविण्यात आलं. या दोन्ही माध्यमांच्या ऑनलाइन सेवाही जवळपास ठप्प झाल्या आहेत.

भारतीय उच्चायुक्तालयावरही दगडफेक

गुरूवारी रात्री देशातील इतर भागांमधेही आंदोलन आणि विरोध प्रदर्शन झालं.

उस्मान हादी यांचे समर्थक आणि वेगवेगळ्या राजकीय तसंच विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ढाक्यामध्ये तसंच ढाक्याबाहेरही इतर ठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.

गुरूवारी रात्री देशातील इतर भागांमधेही आंदोलन आणि विरोध प्रदर्शन झालं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, गुरूवारी रात्री देशातील इतर भागांमधेही आंदोलन आणि विरोध प्रदर्शन झालं.

चटगावमध्ये अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन झाले. तिथे भारतीय सहायक उच्चायुक्तांच्या निवासस्थानाच्या समोरही मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की, गर्दीने उच्चायुक्तालयावरही दगडफेक केली.

त्याशिवाय अवामी लीग सरकारमधील माजी शिक्षा मंत्री मोहिबुल हसन चौधरी नौफेल यांच्या घराचीही तोडफोड करून आग लावण्यात आली.

काय म्हणाले मोहम्मद युनूस?

गुरुवारी (18 डिसेंबर) रात्री उशिरा मोहम्मद युनूस यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं की,"या निर्घृण हत्येत सामील असलेल्या सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर न्यायालयात आणून जास्तीत जास्त शिक्षा दिली जाईल. या प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही."

"देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात आपण अडकू नये. चला, आपण सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही, न्याय आणि जनतेच्या हक्कांसाठी ठोस पावलं उचलूया."

हादी यांच्या मृत्यूची बातमी येताच गुरुवारी (18 डिसेंबर) सायंकाळपासून मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर जमू लागले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हादी यांच्या मृत्यूची बातमी येताच गुरुवारी (18 डिसेंबर) सायंकाळपासून मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर जमू लागले होते.

युनूस पुढे म्हणाले की, "मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उस्मान हादी हे पराभूत शक्ती आणि फॅसिस्ट दहशतवाद्यांचे शत्रू होते. त्यांचा आवाज दाबण्याचा आणि क्रांतिकारकांना घाबरवण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल. भीती, दहशतीने किंवा रक्तपात करून या देशातील लोकशाहीच्या प्रगतीला कोणीही अडवू शकणार नाही."

मृत हादी यांच्या पत्नी आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी सरकार घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

हादी उस्मान कोण होते?

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात हिंसक विद्यार्थी आंदोलन झालं होतं. हादी उस्मान या आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते.

ते शेख हसीना विरोधी 'इन्कलाब मंच'चे सदस्य होते. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीसाठी ते संभाव्य उमेदवारही होते. हल्ला झाला त्यावेळी ते ढाका-8 मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होते.

उस्मान हादी यांच्यावर गेल्या आठवड्यात शुक्रवारी गोळी झाडण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उस्मान हादी यांच्यावर गेल्या आठवड्यात शुक्रवारी गोळी झाडण्यात आली होती.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनावेळी इंकलाब मंच चर्चेत आला होता.

या गटाला कट्टरपंथी संघटना म्हटलं जातं आणि अवामी लीगला कमकुवत करण्याच्या प्रयत्नांत हा गट आघाडीवर राहिला आहे.

विद्यार्थी आंदोलनात सहभाग असूनही, यूनुस सरकारने हा मंच बरखास्त केला आणि त्यांना राष्ट्रीय निवडणुका लढवण्यावर बंदी घातली होती.

भारतविरोधी वक्तव्यं

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील अनेक नेते भारताविरोधात आक्रमक वक्तव्यं करताना दिसत आहेत.

बुधवारी (17 डिसेंबर) बांगलादेशच्या नॅशनल सिटीझन पार्टीचे (एनसीपी) दक्षिण विभागाचे प्रमुख हसनत अब्दुल्ला यांनी भारताच्या उच्चायुक्तांना देशाबाहेर काढायला हवं होतं, असं म्हटलं होतं.

जर बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तर भारतातील ईशान्येकडील 'सेव्हन सिस्टर्स' राज्यांना वेगळं केलं जाईल असा इशारा हसनत अब्दुल्ला यांनी दिला होता.

यानंतर भारताने दिल्लीतील बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांना बोलावून, ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.

शेख हसीना 5 ऑगस्ट 2024 पासून भारतात राहत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेख हसीना 5 ऑगस्ट 2024 पासून भारतात राहत आहेत.

शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यापासून बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत.

अलीकडच्या काही महिन्यांत बांगलादेशचे नेते भारताविरुद्ध वारंवार अशा प्रकारचे आरोप करताना दिसत आहेत.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर, बांगलादेशच्या निर्मितीत भारताची भूमिका काय होती यावर मोठी चर्चा सुरू आहे. बांगलादेशातील अनेक नेते भारताच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

सध्या शेख हसीना या भारतात आश्रयास आहेत. त्यांचा मुलगा सजीब वाझीद जॉय यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार इस्लामिक राजवट आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)