ताजुद्दीन अहमद: अंगावरच्या कपड्यांनिशी भारतात आले होते, अखेरच्या क्षणी बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी पाणीदेखील दिलं नाही

फोटो स्रोत, TAJUDDINAHMAD.ORG
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तो 25 मार्च 1971 चा दिवस होता. त्या दिवशी पाकिस्तानी सैन्यानं ढाक्यामध्ये ऑपरेशन सर्चलाईट सुरू करताच, अवामी लीगचे सरचिटणीस ताजुद्दीन अहमद आणि ढाक्यातील एक नामवंत वकील अमीरुल इस्लाम भूमिगत झाले.
हे दोघेही पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत निवडून आलेले सदस्य होते. पुढील दोन दिवस हे दोघेजण ढाक्यातील लालमटिया परिसरात होते.
शेख मुजीबुर रहमान यांच्या धानमंडीतील निवासस्थानापासून हे ठिकाण फार लांब नव्हतं.
त्यानंतर या दोघांनी भारतीय सीमेकडे जाण्यास सुरुवात केली. लागोपाठ तीन दिवस पायी चालत आणि बैलगाडीतून प्रवास करत ते कुश्तिया जिल्ह्याचा जो भाग भारतीय सीमेला लागून आहे, तिथे पोहोचले.
तिथे आधीच ठरलेल्या ठिकाणी या दोघांची भेट बंगाली ऑफिसर तौफिक इलाही चौधरी यांच्याशी झाली.
30 मार्चला चौधरी यांनी सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना संदेश पाठवला.
तो असा होता, "मुजीब यांचे जवळचे लोक, अवामी लीगचे दोन वरिष्ठ नेते, सीमेजवळ पोहोचले आहेत. जर त्यांचं स्वागत सरकारी पाहुण्यांप्रमाणे करण्यात आलं, तर त्यांना भारताच्या पंतप्रधानांना भेटायची इच्छा आहे."
सीमा सुरक्षा दल किंवा बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती बीएसएफचे महानिरीक्षक (आयजी) गोलक मजूमदार यांना दिली.
मजूमदार यांनी लगेचच ही माहिती दिल्लीतील त्यांचे वरिष्ठ अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांना दिली.
न्यू मार्केटमधून विकत घेतले कपडे
ताजुद्दीन अहमद आणि अमीरुल इस्लाम ही दोघं जेव्हा तिथे पोहोचले, तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. साहजिकच त्यावेळेस कोलकात्यातील (तेव्हाचं कलकत्ता) सर्व हॉटेल आणि दुकानं बंद झाली होती.
अचानक कराव्या लागणाऱ्या प्रवासाची व्यवस्था म्हणून रुस्तमजी यांच्याकडे कपड्यांचं एक किट नेहमीच तयार असायचं.
रुस्तमजी यांनी त्यातून पायजमे काढले आणि ते पाहुण्यांना घालण्यासाठी दिले.

फोटो स्रोत, BSF
मग मजूमदार यांनी सर्वांसाठी स्टोव्हवर ऑमलेट बनवलं. दुसऱ्या दिवशी एका माणसाला कोलकात्यातील न्यू मार्केटमध्ये पाठवण्यात आलं.
तिथून ताजुद्दीन अहमद आणि त्यांच्या सहकाऱ्यासाठी कपड्यांची खरेदी करण्यात आली.
रुस्तमजी यांची इच्छा होती की, या पाहुण्यांसाठी सर्वोत्तम कपडे विकत घेण्यात यावेत. कारण ते त्यांच्या देशाचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटणार होते.
ताजुद्दीन यांनी घेतली इंदिरा गांधीची भेट
दुसऱ्या दिवशी रुस्तमजी यांच्यासोबत ताजुद्दीन अहमद, एका विशेष विमानानं दिल्लीला गेले.
स्टेट्समनचे माजी प्रतिनिधी मानश घोष यांनी 'बांगलादेश वॉर रिपोर्ट फ्रॉम ग्राऊंड झिरो' हे पुस्तक लिहिलं आहे.

फोटो स्रोत, TAJUDDINAHMAD.ORG
त्यात ते लिहितात, "इंदिरा गांधी यांनी ताजुद्दीन अहमद यांना सल्ला दिला की आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता मिळण्यासाठी बांगलादेशच्या सरकारचा शपथविधी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर होणं आवश्यक आहे."
"...आणि हा शपथविधी समारंभ अशा ठिकाणी झाला पाहिजे, ज्यावर बांगलादेशच्या स्वातंत्र्य सैनिकांचं नियंत्रण असेल."
इंदिरा गांधी यांनी तिथे उपस्थित असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना, विशेषतः रुस्तमजी यांना सूचना दिल्या की ताजुद्दीन अहमद आणि त्यांच्या प्रस्तावित सरकारला आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात याव्यात.
काळजीवाहू पंतप्रधान म्हणून घेतली शपथ
असं ठरवण्यात आलं की नादिया जिल्ह्याला लागून असलेलं बैद्यनाथताल हे ठिकाण हंगामी सरकारच्या शपथविधी समारंभासाठी निवडण्यात यावं.
17 एप्रिल 1971 ला कोलकात्यात सर्व परदेशी पत्रकारांना गोळा करण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की एका विशेष कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी त्यांना एका अज्ञात ठिकाणी नेण्यात येणार आहे.
कोलकात्याहून जवळपास 60 कारचा ताफा बैद्यनाथतालच्या दिशेनं निघाला.

मीनाजपूरमधून अवामी लीगचे खासदार प्राध्यापक युसूफ अली यांनी माइकवर जाहीर केलं की बांगलादेश आता एक स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक आहे.
त्यांनीच सैयद नजरुल इस्लाम यांना काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आणि ताजुद्दीन अहमद यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून शपथ दिली.
दुसऱ्याच दिवशी या ऐतिहासिक घटनेची बातमी जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली.
अवामी लीगच्या नेत्यांची नाराजी
ताजुद्दीन अहमद यांचा जन्म 23 जुलै 1925 ला ढाक्यापासून 62 किलोमीटर अंतरावरील दरदरिया गावात झाला होता.
ते अवामी लीगच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. ताजुद्दीन अहमद यांना अवामी लीगचं 'इंटलेक्चुअल पॉवर हाऊस' म्हटलं जायचं.
ताजुद्दीन अहमद अर्थशास्त्राचे बुद्धिमान विद्यार्थी होते. साठच्या दशकात ते अनेकदा शहरात सायकलवरून फिरत असत. ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायचे.
सहासूत्री आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना तीन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात राहावं लागलं होतं.

फोटो स्रोत, TAJUDDINAHMAD.ORG
इंदिरा गांधींबरोबर झालेली ताजुद्दीन अहमद यांची ऐतिहासिक भेट अवामी लीगच्या काही लोकांना आवडली नव्हती.
मानश घोष यांनी 'मुजीब्स ब्लंडर्स' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "मुजीबचे पुतणे आणि मुजीब वाहिनीचे प्रमुख शेख फजलुल हक मोनी यांनी ताजुद्दीन अहमद यांच्या नेतृत्वाला उघडपणे आव्हान देत प्रश्न विचारला होता की ते (ताजुद्दीन) कोणत्या अधिकारानं अवामी लीगचे नेते म्हणून इंदिरा गांधींना भेटण्यास गेले होते."
"ताजुद्दीन यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने त्यांनी ताजुद्दीन यांचे पक्षांतर्गत स्पर्धक असलेल्या मुश्ताक अहमद यांच्याशी हातमिळवणी केली होती. अर्थात या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं वैचारिक साम्य नाही."
ताजुद्दीन आणि मुश्ताक यांच्यातील संघर्ष
सप्टेंबर 1971 मध्ये मुश्ताक अहमद बांगलादेशच्या प्रतिनिधी मंडळाला घेऊन संयुक्त राष्ट्रसंघात जाणार होते. त्यावेळेस ताजुद्दीन अहमद यांनी त्यांना पदावरून हटवलं होतं.
ताजुद्दीन यांच्या या निर्णयासाठी मुश्ताक यांनी त्यांना कधीच माफ केलं नाही. नंतर हीच गोष्ट ताजुद्दीन यांच्या हत्येचं कारणदेखील ठरली.
बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात ते कोलकात्याच्या 8, थिएटर रोडवरील त्यांच्या कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या एका छोट्या खोलीत राहायचे.
ते साध्या खाटेवर झोपायचे. त्यांच्याकडे मोजकेच कपडे होते. ते कपडे स्वत:च धूत असत.
ताजुद्दीन अहमद यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खोटा प्रचार
16 डिसेंबरला बांगलादेश स्वतंत्र झाला. त्याच्या सहा दिवसांनी म्हणजे 22 डिसेंबरला ताजुद्दीन अहमद त्यांच्या मंत्रिमंडळासह भारतीय हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टर्सनं ढाक्यात पोहोचले होते.
विमानतळावरुन त्यांच्या कारचा ताफा ढाक्यातील गव्हर्नमेंट हाऊसमध्ये गेला होता.
ताजुद्दीन यांच्या अनुपस्थितीत, धानमंडीमधील त्यांचं दुमजली घर पाकिस्तानी सैन्यानं लुटलं होतं.
त्यांच्या घराची तोडफोड देखील झाली होती. सुरुवातीच्या काळात ताजुद्दीन अहमद यांनी गव्हर्नमेंट हाऊसमध्ये राहूनच बांगलादेशचं सरकार चालवलं होतं.
ताजुद्दीन यांना या गोष्टीची कल्पना होती की शेख मुजीब यांच्यासारखा करिश्मा त्यांच्याकडे नाही. तसंच शेख मुजीब यांना जनतेचा जो पाठिंबा होता, तसा पाठिंबादेखील ताजुद्दीन यांना नव्हता.

फोटो स्रोत, TAJUDDINAHMAD.ORG
पक्षातील शेख मोनी आणि मुश्ताक अहमदसारखे त्यांचे स्पर्धक अशा बातम्या पसरवू लागले होते की बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर ताजुद्दीन खूपच महत्त्वाकांक्षी झाले आहेत.
शेख मुजीब यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका होऊन त्यांनी परतावं अशी ताजुद्दीन यांची इच्छा नाही.
मानश घोष लिहितात, "या अपप्रचारामुळे ताजुद्दीन इतके दु:खी झाले की त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी नूरुल कादेर यांना सांगितलं की, बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझा मृत्यू झाला असता तर खूप बरं झालं असतं."
"त्यामुळे निदान, मुजीब भाईंवरील माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या खोट्या कहाण्या तरी मला ऐकाव्या लागल्या नसत्या.
मुजीब यांनी ताजुद्दीन यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं
9 जानेवारीला शेख मुजीब यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका झाली आणि ते ढाक्यात आले.
त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी लाखो लोकांबरोबर ताजुद्दीन अहमददेखील विमानतळावर आले होते.
मुजीब यांना पाहताच ताजुद्दीन यांनी त्यांची गळाभेट घेतली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
शेख मुजीब यांना लवकरात लवकर बांगलादेशचं पंतप्रधान व्हायचं होतं.

फोटो स्रोत, TAJUDDINAHMAD.ORG
मानश घोष लिहितात, "शेख मुजीब यांना जेव्हा विमानतळावरून फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून ढाका शहरात नेण्यात येत होतं, त्यावेळेस ते ताजुद्दीन यांच्या कानात कुजबुजले होते की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे."
"दुसऱ्या दिवशी सकाळीच ते लुंगी आणि कुर्ता घालून ताजुद्दीन यांच्या घरी पोहोचले. तिथे गेल्यावर ते ताजुद्दीन यांना म्हणाले की त्यांनी त्यांना पंतप्रधानपदाचा भार देण्याची तयारी करावी."
"या बदलाबद्दल ढाक्यात सर्वत्र संशयाचं वातावरण होतं. लोक दबक्या आवाजात विचारत होते की देशाचा पंतप्रधान बदलण्याची इतकी घाई का आहे? इतकी घाई लोकांच्या पचनी पडत नव्हती."
ताजुद्दीन झाले अर्थमंत्री
अर्थात, शेख मुजीब यांच्या इच्छेनुसार ताजुद्दीन यांनीदेखील पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास उशीर केला नाही. शेख मुजीब यांनी पंतप्रधानपदाची भार स्विकारला. त्यानंतर त्यांनी ताजुद्दीन अहमद यांना अर्थमंत्री केलं.
ताजुद्दीन यांची प्रतिष्ठा लक्षात घेऊन शेख मुजीब त्यांना उप-पंतप्रधान बनवतील अशी अनेकजणांना आशा होती. मात्र तसं काही घडलं नाही.
अर्थमंत्री म्हणून ताजुद्दीन नव्यानं स्वतंत्र झालेल्या देशाच्या पुनर्उभारणीत गढून गेले. 1974 मध्ये त्यांनी केलेल्या अमेरिका दौऱ्याची खूप चर्चा झाली होती.
सैयद बदरुल अहसन यांनी 'ग्लोरी अँड डिस्पेयर द पॉलिटिक्स ऑफ ताजुद्दीन अहमद' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात अहसन यांनी लिहिलं आहे की, "जागतिक बँकेचे अध्यक्ष रॉबर्ट मॅकनामारा यांनी जेव्हा ताजुद्दीन यांना विचारलं की जागतिक बँक बांगलादेशच्या कोणत्या गरजा पूर्ण करू शकते."
"त्यावर कोणताही संकोच न करता ताजुद्दीन यांनी उत्तर दिलं होतं की शेती करण्यासाठी त्यांना बैल हवे आहेत आणि नांगराला बांधण्यासाठी दोऱ्यांची आवश्यकता आहे."

फोटो स्रोत, TAJUDDINAHMAD.ORG
शेख मुजीब आणि ताजुद्दीन यांच्यातील दरी वाढतच चालली होती. 26 ऑक्टोबर 1974 ला बांगलादेशचे कॅबिनेट सचिव तौफिक इमाम, दोन लिलाफे घेऊन तादुद्दीन अहमद यांच्या कार्यालयात आले.
मानश घोष लिहितात, "एका लिलाफ्यात मुजीब यांचं पत्र होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की राष्ट्रीय हित लक्षात घेऊन तुम्हाला तात्काळ राजीनामा देण्यास सांगण्यात येतं."
"दुसऱ्या लिलाफ्यात टाईप करण्यात आलेला राजीनामा पाठवला आहे. तुम्ही त्यावर सही करून हे पत्र घेऊन येणाऱ्याला द्यावं."
ते वाचून ताजुद्दीन अहमद यांनी हसत त्या राजीनाम्यावर सही केली आणि ते कॅबिनेट सचिवांना दिलं.
ताजुद्दीन अहमद यांचा राजीनामा जबरदस्तीनं घेण्याकडे बांगलादेशात येणाऱ्या संकटाची चाहूल म्हणून पाहिलं गेलं.
ताजुद्दीन यांना अटक
15 ऑगस्ट 1975 ला शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या कुटुंबासह हत्या करण्यात आली. खंदाकार मुश्ताक अहमद बांगलादेशचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. तर ताजुद्दीन अहमद यांना त्यांच्याच घरात नजरकैद करण्यात आलं.
ताजुद्दीन अहमद, सैयद नजरुल इस्लाम, कॅप्टन मंसूर अली आणि ए.एच. कमरुज्जमा यांनी खंदाकार मुश्ताक अहमद यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला. त्यानंतर या सर्वांना ढाका सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं.

फोटो स्रोत, TAJUDDINAHMAD.ORG
सलिल त्रिपाठी यांनी 'द कर्नल हू वूड नॉट रिपेंट' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, "2-3 नोव्हेंबर, 1975 च्या रात्री, बांगलादेशात लष्करानं बंड करत सत्ता हाती घेतली. त्यावेळेस बंग भवनमधून तुरुंगाचे महानिरीक्षक (इन्स्पेक्टर जनरल) मोहम्मद नूरुज्जमा यांना फोन आला की सैनिकांच्या गणवेशात काहीजण ढाका तुरुंगात येतील. त्यांना तुरुंगात असणाऱ्या राजकीय कैद्यांकडे नेण्यात यावं."
ताजुद्दीन अहमद यांचा दुर्दैवी शेवट
काही क्षणातच मोस्लेउद्दीन यांच्या नेतृत्वाखाली काळे कपडे घातलेले सैनिक ढाका तुरुंगात पोहोचले.
सलिल त्रिपाठी लिहितात, "चार कैद्यांना जागं करून इतर कैद्यांपासून वेगळं करण्यात आलं. ताजुद्दीन आणि नजरुल एका खोलीत सहा कैद्यांसह होते. त्या दोघांना, मंसूर अली आणि कमरुज्जमा यांना दुसऱ्या खोलीत नेण्यात आलं."
"जेलर अमीनुर रहमान यांना सांगण्यात आलं की त्यांनी या कैद्यांची ओळख पटवावी. हे सर्व पाहून नेमकं काय होतं आहे, हे ताजुद्दीन यांच्या लक्षात आलं. त्यांनी जेलरकडे नमाज पढण्याची परवानगी मागितली. जेलरनं त्यांना ती परवानगी दिली."
"ताजुद्दीन यांचा नमाज पढून होताच कॅप्टन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या चौघांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली."

फोटो स्रोत, TAJUDDINAHMAD.ORG
अवामी लीगचे हे चारी नेते जमिनीवर कोसळले. या हत्या तुरुंगाच्या आत तुरुंगाधिकाऱ्यांच्या समोर करण्यात आल्या होत्या.
या चौघांना मारुन सैनिक परत गेल्यानंतर तुरुंगातील स्टाफनं बंग भवनवर फोन करून सांगितलं होतं की ताजुद्दीन अहमद आणि कॅप्टन मंसूर अली जिवंत आहेत. ते पाणी मागत आहेत.
मानश घोष लिहितात, "मुश्ताक यांनी आदेश दिला की सैनिकांनी पुन्हा तुरुंगात जाऊन ते सर्व जिवंत आहेत की मृत याची खातरजमा करावी. सैनिक पुन्हा तुरुंगात गेले आणि त्यांनी ताजुद्दीन आणि मंसूर अली यांची हत्या केली."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











