भोला चक्रीवादळानं बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला बळ दिलं आणि दक्षिण आशियाचा नकाशाच बदलला

1970 सालच्या त्या चक्रीवादळात दोन ते तीन लाख जण मारले गेले आणि लाखो बेघर झाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1970 सालच्या त्या चक्रीवादळात दोन ते तीन लाख जण मारले गेले आणि लाखो बेघर झाले.

नोव्हेंबर 1970. बंगालच्या उपसागरात एक शक्तिशाली चक्रीवादळ घोंघावत होतं आणि लवकरच ते भोला बेटाच्या किनाऱ्यावर धडकलं. त्या वादळानं दोन दिवसांत हजारोंचा बळी घेतला, प्रचंड नुकसान केलं आणि पुढे जाऊन दक्षिण आशियाचा नकाशाच बदलला.

भोला बेट दक्षिण शाहबाझपूर म्हणूनही ओळखलं जातं. हे बेट आजच्या बांगलादेशात आहे. पण 1970 साली जेव्हा हे चक्रीवादळ धडकलं, तेव्हा बांगलादेशच अजून अस्तित्वात आला नव्हता.

पण अनेक तज्ज्ञांच्या मते पूर्व पाकिस्तानमधून बांगलादेशच्या निर्मितीच्या मागणीला नवं बळ या भोला बेटावरच्या चक्रीवादळानंच दिलं होतं.

कारण चक्रीवादळानंतर लोकांना मदत पुरवताना पाकिस्तान सरकारनं घेतलेली भूमिका पूर्व पाकिस्तानच्या जनतेला उदासीनतेची वाटली.

इथल्या जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष आणखी वाढला. त्याची परिणती गृहयुद्धात झाली आणि बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. ही त्याच चक्रीवादळाची कहाणी आहे.

मध्यरात्रीचा प्रलय

त्या काळी चक्रीवादळांना नाव दिलं जात नसे. त्यामुळे हे चक्रीवादळ ज्या भोला बेटावर धडकलं, त्याच्या नावानं, 'ग्रेट भोला सायक्लोन' म्हणून ओळखले जातं.

जागतिक हवामान संस्थेच्या नोंदींनुसार या चक्रीवादळादरम्यान वाऱ्याचा कमाल वेग काहीवेळा ताशी 224 किलोमीटर पर्यंत पोहोचला.

म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं तर हे एक अती अतीतीव्र चक्रीवादळ किंवा सुपर सायक्लोन होतं.

जगातल्या सर्वात विनाशकारी वादळांमध्ये या चक्रीवादळाचा समावेश केला जातो.

Bhola Cyclone Satellite Image

फोटो स्रोत, NOAA

फोटो कॅप्शन, 12 नोव्हेंबर1970 रोजीचं चक्रीवादळाचं उपग्रहानं टिपलेलं दृश्य.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

12 आणि 13 नोव्हेंबर दरम्यानच्या रात्री हे वादळ किनाऱ्याला धडकलं. भोला बेटासोबतच आसपासच्या अनेक लहान बेटांवर त्यावेळी जणू प्रलयच आला.

गंगेच्या मुखाजवळच्या या प्रदेशातला बराचसा भाग इतका सखल आहे की समुद्राची पातळी एखाद्या मीटरनं वाढली, तरी तो पाण्याखाली जाऊ शकतो.

1970 साली चक्रीवादळ धडकलं, त्या रात्री तर किनारी भागात भरतीच्या लाटांनी 10 ते 33 फूट उंची गाठली.

या चक्रीवादळात नेमके कितीजण मारले गेले, याची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही. पण साधारण तीन लाख ते पाच लाख जण मारले गेल्याचं जागतिक हवामान संस्था सांगते.

ब्रिटनच्या 'द गार्डियन' वृत्तपत्राचे पत्रकार हॉवर्ड व्हिटन यांनी त्यावेळी या बेटाला भेट दिली आणि परिस्थितीचं वर्णन केलं आहे.

"वादळ मध्यरात्री आलं. रेडिओवर वादळाचा इशारा ऐकला होता, त्यामुळे लोक जागे होते. पण भरतीच्या लाटेचा इशारा नव्हता," असं इथे बचावलेल्या चौधरी कमाल यांनी हॉवर्ड व्हिटन यांना सांगितलं.

मनपूरा परिसरात 22 हजार जणांपैकी 16 हजार जणांचा मृत्यू झाल्याचं ते लिहितात.

चक्रीवादळ आणि लाटांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोतही नष्ट झाले होते. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत अनेकजण पाण्याची कमतरता, उपासमार आणि रोगराईमुळे मृत्युमुखी पडले.

पाकिस्तानी सरकारची उदासीनता

त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल खादिम हुसेन राजा यांनी हेलिकॉप्टरनं परिस्थितीची पाहणी केली होती. आपल्या पुस्तकात ते अन्न आणि कपड्यांसाठी मदतीची हाक देणाऱ्या लोकांचं वर्णन करतात.

चक्रीवादळासोबत उसळलेल्या लाटांनी भोला बेटावरचा बराच मोठा भाग उध्वस्त केला.

फोटो स्रोत, Express Newspapers/Getty Images

फोटो कॅप्शन, चक्रीवादळासोबत उसळलेल्या लाटांनी भोला बेटावरचा बराच मोठा भाग उध्वस्त केला.

राजा यांनी या पुस्तकात त्यावेळी सरकारच्या भूमिकेवरही टीका केली आहे. ते लिहितात की त्यांनी पूर्व पाकिस्तानच्या त्यावेळच्या राज्यपालांना लष्कराच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू करण्याचा सल्ला दिला होता, पण राज्यपालांनी लष्कराला सहभागी करून घेण्यास नकार दिला.

चक्रीवादळानंतर पाकिस्तानी सरकारने कोणती ठोस पावलं उचलील नाहीत. इतकंच काय तर पश्चिम पाकिस्तानातून कोणता मंत्री किंवा केंद्रिय सरकारमधला कोणी बडा नेता त्या भागात गेला नाही.

पाकिस्तानचे तेव्हाचे लष्करशाह राष्ट्राध्यक्ष याहया खान यांनी आधी पूर आलेल्या प्रदेशात भेट देण्याची इच्छाही दर्शवली नाही.

चक्रीवादळ आलं, त्यावेळी याहया खान चीनच्या दौऱ्यावर होते आणि दोन दिवसांनी ते ढाक्यात परतले. पण तिथून ते थेट पश्चिम पाकिस्तानात परतले.

याहया खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, याहया खान

मग पूर्व पाकिस्तानमध्ये संताप वाढल्यावर याह्या खान 26 नोव्हेंबर रोजी, म्हणजे वादळानंतर १४ दिवसांनी, भोला इथे पोहोचले.

त्यावेळी मदतकार्याबाबत सगळे समाधानी असल्याचं याहया खान म्हणाले, मात्र लोक मदतीसाठी आक्रोश करत होते.

तेव्हा एका परदेशी पत्रकाराने त्याविषयी विचारलं असता, याहया खान म्हणाले, "लोक टीका करतात याची मला पर्वा नाही. माझे काम करणे हेच माझे उद्दिष्ट आहे."

मेजर जनरल राजा यांनी लिहिल्याप्रमाणे याहया खान यांनी हेलिकॉप्टरने 10 हजार फूट उंचीवरून पाहणी केली होती. त्यामुळे खरी परिस्थिती न पाहता त्यांनी प्रशासनाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला. प्रशासनानं त्यांना खरी माहिती दिलीच नाही.

साहजिकच जनतेचा संताप आणखी वाढला आणि महिनाभरातच झालेल्या निवडणुकीत हा संताप बाहेर पडला.

राजकीय पडसाद आणि बांगलादेशची निर्मिती

पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनता आधीच पश्चिम पाकिस्तानकडून मिळणाऱ्या वागणुकीवर नाराज होती. या नाराजीला भाषिक वाद, असमानता, सांस्कृतिक अन्याय, वर्णद्वेष अशा अनेक गोष्टींची पार्श्वभूमी होती.

त्यात भोला चक्रीवादळानंतर इस्लामाबादनं दाखवलेल्या उदासीनतेनं या अविश्वासावर शिक्कामोर्तब केलं.

भोला बेटावर आरोग्य केंद्रात कॉलरावरील गोळ्या घेण्यासाठी जमलेले लोक. चक्रीवादळानंतर या भागात आजारांच्या प्रादुर्भाव वाढला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भोला बेटावर आरोग्य केंद्रात कॉलरावरील गोळ्या घेण्यासाठी जमलेले लोक. चक्रीवादळानंतर या भागात आजारांच्या प्रादुर्भाव वाढला.

याहया खान यांनी भोलाकडे पाठ फिरवली होती, पण अवामी लीगचे मुजीबुर रहमान 14 नोव्हेंबरलाच पीडित जनतेच्या मदतीसाठी तिथे पोहोचले.

'बंगबंधू' म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर आधीच लोकप्रिय होते.

त्यांचे जवळचे सहकारी आणि अवामी लीगचे ज्येष्ठ नेते तौफेल अहमद तर भोला बेटाचे रहिवासी होते आणि तिथून निवडणूकही लढवत होते. चक्रीवादळाच्या वेळी अहमद तिथेच होते आणि असंख्य मृतदेह पाहून गोंधळूनच गेले होते.

चक्रीवादळ आणि निवडणुकीच्या आठवणींविषयी त्यांनी लिहिलं आहे की मुजीबूर स्वतः मदतकार्यात उतरले आणि त्यांनी अहमद यांनाही मदतीसाठी काम करायचा आदेश दिला.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीची निवडणूक काही आठवड्यांवर येऊन ठेपली होती. पाकिस्तानात झालेली ती पहिली थेट सार्वत्रिक निवडणूक होती.

7 डिसेंबर 1970 रोजी मतदान झालं, अवामी लीगने पूर्व पाकिस्तानमधल्या 169 पैकी 167 जागा जिंकून प्रचंड मोठा विजय मिळवला.

प्रचारादरम्यान भाषण करताना शेख मुजीबुर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रचारादरम्यान भाषण करताना शेख मुजीबुर.

नॅशनल असेंब्लीत बंगाली लोकांना मिळालेलं बहुमत याहया खान आणि झुल्फिकार अली भुट्टो यांना रुचलं नाही.

त्यामुळे निकाल लागला तरी सभागृहाचं अधिवेशन त्यांनी लांबवलं. मग ऑपरेशन सर्चलाईट सुरू केलं, ज्याची परिणती पुढे गृहयुद्धात झाली, भारतही त्यात ओढला गेला आणि सरतेशेवटी बांगलादेशची स्थापना झाली. दक्षिण आशियातल्या सीमारेषा- नकाशा पुन्हा एकदा बदलला.

रवी शंकर, बीटल्स आणि कॉन्सर्ट फॉर बांगलादेश

भोला चक्रीवादळ आणि पाठोपाठ युद्धामुळे त्यावेळी बांगलादेशात मोठं मानवी संकट निर्माण झालं होतं.

पत्रकार अँथनी मास्करेन्हस यांच्यासारख्यांनी बांगलादेशात 'नरसंहार' होत असल्याचं लिहिलं.

प्रसिद्ध सितारवादक रवी शंकर अशा बातम्यांनी अस्वस्थ झाले होते. त्याचं कुटुंब मूळचं पूर्व बंगालमधलं होतं. त्यामुळे तिथल्या लोकांच्या मदतीसाठी काहीतरी करायचं त्यांनी ठरवलं.

जॉर्ज हॅरिसन आणि रवी शंकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॉर्ज हॅरिसन आणि रवी शंकर

रवी शंकर यांनी त्यांचा मित्र आणि पॉप ग्रुप बीटल्सचा सदस्य जॉर्ज हॅरिसनला त्या विषयी संगितलं, आणि त्यातूनच पुढे 'कॉन्सर्ट फॉर बांगलादेश' जन्माला आली. हॅरिसननं 'बांग्ला देश' हे गीतही लिहिलं.

एखाद्या मानवी संकटात मदतीसाठी निधी उभा करण्यासाठी सेलिब्रिटींनी एकत्र येऊन कॉन्सर्ट करण्याचा एक नवा पायंडा त्या कॉन्सर्टनं घातला.

हवामान बदल आणि बांगलादेश

भोला चक्रीवादळ आलं, तेव्हा ती शतकातली एखादीच ठरावी अशी दुर्घटना मानली गेली होती. पण त्यानंतरच्या काळातही सुपर सायक्लोन दर्जाच्या चक्रीवादळांनी बांगलादेश आणि भारताला झोडपून काढलं.

मात्र सुधारलेलं तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवण्याची नवी साधनं यांमुळे हवामानाचा – विशेषतः चक्रीवादळांचा अंदाज लावणं आता तुलनेनं सोपं झालं आहे.

भोला चक्रीवादळानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं अशा संकटांचा सामना करण्यासाठी ठराव पास केले. त्यातूनच जागतिक हवामान संस्थेनं चक्रीवादळांचा अभ्यास आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॉपिकल सायक्लोन प्रोग्रॅमची स्थापना केली.

या प्रदेशात आता चक्रीवादळांचा सामना करणारी, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणारी आणि मदत पोहोचवणारी यंत्रणाही तयार झाली आहे आणि बांगलादेश त्यात आघाडीवर आहे.

पण हवामान बदलामुळे चक्रीवादळांची ताकद वाढते आहे तसं विनाशाचं सावट गहिरं होत आहे. म्हणूनच भोला चक्रीवादळासारख्या आपत्तींचा अभ्यास करत राहणं अनेकांना गरजेचं वाटतं

(या लेखासाठी बीबीसी बांग्लाच्या लेखातून माहिती घेतली आहे. )

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)