अवनी लेखरा: दोन पॅरालिंपिक सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिप्ती पटवर्धन
- Role, क्रीडा प्रतिनिधी
'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर 2024' या पुरस्कार सोहळ्यामध्ये अवनी लेखराला 'बीबीसी पॅरा स्पोर्ट्सवूमन'चा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
भारतीय क्रीडा क्षेत्रानं मागील काही वर्षात चांगलीच प्रगती केली आहे.
छोट्या छोट्या शहरातून येऊन अनेक खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपल्या देशाची मान उंचावली आहे. त्यातीलच एक नाव आहे, अवनी लेखरा.
विकलांग असूनही कठोर सराव आणि जबरदस्त इच्छाशक्ती दाखवत नेमबाजीत जागतिक स्तरावर तिनं आपला ठसा उमठवला आहे.
अवनीनं वयाच्या 13 व्या वर्षीच क्रीडापटू बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारताचा एकमेव वैयक्तिक खेळातील ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राचं आत्मचरित्र तिच्या वाचण्यात आलं होतं. त्यातूनच तिला क्रीडापटू होण्याची प्रेरणा मिळाली.
पुढं जाऊन आपणही याच क्षेत्रात आदर्श अशी कामगिरी करू असं लेखराला त्यावेळी वाटलं नव्हतं.
23 वर्षीय लेखरा 2020 च्या टोकियो पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने 10 मीटर एअर रायफल एसएच 1 इव्हेंटमध्ये हे पदक मिळवलं. कोरोना महामारीमुळे 2020 मधील ही स्पर्धा 2021 मध्ये घेण्यात आली होती.
लेखरानं अंतिम फेरीत 249.6 चा स्कोअर नोंदवत जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. हा एक नवीन पॅरालिंपिक विक्रम ठरला होता.
बरोबर तीन वर्षांनी म्हणजे पॅरिसमधील 2024 च्या पॅरालिंपिकमध्ये लेखरानं पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. दोन सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला पॅरालिंपियन बनली.
या स्पर्धेत तिनं टोकियोमधील स्वतःचा पॅरालिंपिक विक्रमही मोडीत काढला.
सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या एका सत्कार सोहळ्यात लेखरानं पॅरिस गेम्सपूर्वी आपण शारीरिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत नव्हतो, असं सांगितलं.
लेखरा त्यावेळी म्हणाली की, "नुकतीच माझ्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाली होती. मी अंथरुणावर खिळून होते. त्यातून बाहेर येण्यासाठी मानसिक शक्तीची गरज होती. त्याचबरोबर शारीरिक ताकद पुन्हा मिळवण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता होती. ही पॅरालिंपिक स्पर्धा मागील स्पर्धेपेक्षा माझ्यासाठी खूप कठीण होती."
पण त्यानंतर, शारीरिक आव्हानांवर मात करणं हे लेखराच्या सुवर्ण पदकापर्यंतच्या प्रवासाचं मुख्य केंद्र ठरलं.


संकटांवर मात करत शूटींगमध्ये अव्वल
2012 मध्ये, लेखरा कुटुंबाचा एक मोठा कार अपघात झाला होता.
या दुर्घटनेत अवनीच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. अपघातामुळे कंबरेपासून खाली तिला अर्धांगवायू झाला. सहा महिने ती अंथरुणात खिळून पडली होती. त्यानंतर तिच्या आयुष्यातील आणखी खडतर लढाई सुरू झाली.
अवनीला सर्व काही नव्यानं शिकावं लागलं. अगदी बसण्यासारख्या साध्या गोष्टीसुद्धा. भावनिकदृष्ट्या पुन्हा उभं राहण्यासाठी तिला जास्त वेळ लागला. कारण तिनं स्वतःला जगापासून दूर केलं होतं.
दोन वर्षांनी, जेव्हा कुटुंबाला वाटलं की ती पुन्हा शाळेत जाण्यास तयार आहे, तेव्हा त्यांना विकलांग विद्यार्थ्यांना घेण्यासाठी तयार असलेल्या किंवा त्यासाठी सक्षम अशा शाळा शोधण्यास अडचण आली.
2015 मध्ये, अवनीच्या वडिलांनी तिला घरी न बसता खेळांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. तिनं स्वीमिंग, तिरंदाजी आणि अॅथलेटिक्सचा पर्यांय पडताळून पाहिले. पण अखेरीस रायफल शूटिंगमध्येच तिला आपलं ध्येय सापडलं.

फोटो स्रोत, Getty Images
टोकियोमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर ती म्हणाली की, "एका उन्हाळ्याच्या सुट्टीत, माझ्या वडिलांनी मला शूटिंग रेंजवर नेलं."
"त्यावेळी मला एक वेगळीच जाणीव झाली. मी काही शॉट्स मारले, आणि ते ठीक होते. खेळात लक्ष केंद्रित करणं आणि सातत्याची आवश्यकता असते, आणि नेमबाजीमध्ये मला हेच आवडतं."
नेमबाजीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अवनीनं शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुलांबरोबर स्पर्धा केली.
व्हीलचेअरवरील स्पर्धक म्हणून उपस्थितांचं लक्ष तिच्याकडेच असायचं. त्यामुळं अवनी काही प्रमाणात अस्वस्थ व्हायची. तरीही तिनं आपलं ध्येय कायम ठेवत खूप लवकर यात प्रगती केली.

फोटो स्रोत, Getty Images
2017 च्या पॅरा स्पोर्ट्स वर्ल्ड कपमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात तिनं रौप्य पदक जिंकलं. तिचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय पदक होतं.
स्लोव्हाकियाची व्हेरोनिका वाडोविकोव्हा ही त्या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती होती. व्हेरोनिका त्यावेळची पॅरालिंपिक चॅम्पियन होती.
नोव्हेंबर 2022 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अवनीनं सांगितलं की, या इव्हेंटनंतर तिने पॅरालिंपिक सुवर्ण पदकावर लक्ष केंद्रित केलं.
ती म्हणाली, "त्या दिवशी, मला असं वाटलं की मी सुवर्ण पदक जिंकू शकले असते. जर मी इथं येऊ शकते, माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करू शकते, व्हील चेअरवर जगभर प्रवास करू शकते आणि हे (रौप्य पदक) जिंकू शकते, तर मी पॅरालिंपिकमध्येही पदक मिळवू शकते. तेव्हापासून मला खूप प्रेरणा मिळाली."
पॅरालिंपिक पोडियमपर्यंतचा प्रवास
पॅरालिंपिक सुवर्णपदक जिंकण्याचं लक्ष्य ठेवल्यानंतर, अवनीनं एक वर्षानंतर ऑलिंपिक नेमबाज शुमा शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू केलं.
हा निर्णय तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.
शिरूर यांनी अवनीला शुटींग कौशल्यांना मूलभूत गोष्टींकडे वळवलं. तिला प्रतिस्पर्ध्यांच्या बरोबरीची रायफल मिळवून दिली. अवनीच्या शंका दूर करून तिच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं.
पॅरिस गेम्सनंतर, शिरूर यांच्या लक्षात आलं की अवनीसारख्या पॅरा अॅथलीटसाठी स्वतंत्रपणे फिरणं किती कठीण आहे. कारण सार्वजनिक ठिकाणं व्हीलचेअरसाठी अनुकूल नसल्यामुळं अनेक अडचणी येत असत.

फोटो स्रोत, Getty Images
सुवर्ण पदकाच्या शोधात असलेल्या अवनीला इतर अडचणींनाही तोंड द्यावं लागलं. ती 2018 च्या पॅरा आशियाई गेम्समध्ये पदक जिंकू शकली नाही आणि कोविड-19 च्या लॉकडाउन दरम्यान तिला घरातच सराव करावा लागला.
टोकियो गेम्सपूर्वी, तिला पाठीच्या दुखापतीमुळे काही महिने सरावापासून विश्रांती घ्यावी लागली होती. तिला फिजिओथेरपीची आवश्यकता होती. पॅरिस गेम्सपूर्वीही तिच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाली होती.
पण या सर्व अडचणी अवनीला पॅरालिंपिकमध्ये सर्वात यशस्वी भारतीय महिला होण्याच्या तिच्या ध्येयापासून रोखू शकल्या नाहीत.
तिच्या अदम्य इच्छाशक्तीचं सर्वांत चांगलं वर्णन कदाचित तिच्या एक्स अकाउंटच्या कव्हर फोटोवर असलेल्या एका वाक्यात आहे: "तुमच्याकडे चांगले पत्ते आलं तर डाव खेळणं हे आयुष्य नाही तर जे पत्ते तुमच्या हाती आहेत त्याच्या मदतीने तुम्हाला चांगला डाव खेळता आला पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











