पाकिस्तानातून उपचारासाठी भारतात आली आणि सैनिकांच्या हेरगिरी प्रकरणात सापडली 'ही' व्यक्ती

लाभशंकर ‘आयव्हीएफ’ (IVF) उपचारासाठी पाकिस्तानातून भारतात आलेले.

फोटो स्रोत, V BHATI / GETTY

फोटो कॅप्शन, लाभशंकर महेश्वरी ‘आयव्हीएफ’ (IVF) उपचारासाठी पाकिस्तानातून भारतात आलेले.
    • Author, भार्गव पारीख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातून भारतात येऊन नागरिकत्व मिळवलेल्या या व्यक्तीला ‘एटीएस’ने अटक केलेय.

गुजरातमधील तारापूर येथील एका मुलीशी लग्न केलेले एक पाकिस्तानी व्यावसायिक अनेक वर्षे निपुत्रिक होते आणि अनेक वर्षांपूर्वी आपल्या पत्नीसह ते पाकिस्तानातून आयव्हीएफ उपचार घेण्यासाठी गुजरातला आले होते.

त्यानंतर सासरच्यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून त्यांनी किराणा मालाचं दुकान सुरू केलं. मात्र, भारतात आल्यानंतरही त्यांना अपत्य होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारांची गरज भासू लागली.

बाप होण्याच्या आशेने उपचारासाठी आलेल्या लाभशंकर माहेश्वरी यांनी भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पाकिस्तानी गुप्तहेर बनून भारतीय जवानांचे फोन हॅक केल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे.

आणंद जवळच्या तारापूर या छोट्याशा गावात तेल आणि धान्य विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राठी कुटुंबातील अनेक नातेवाईकांपैकी काही पाकिस्तानात तर काहीजण भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर भारतात स्थायिक झाले.

लाभशंकर महेश्वरी यांचा विवाह तारापूर येथील एका व्यावसायिकाच्या मुलीशी झाला होता.

'पाकिस्तानला जायचे होते पण व्हिसा मिळाला नाही'

मूळचे पाकिस्तानचे आणि आता भारतीय नागरिकत्व असलेले, पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी मोहीम राबवणारे डॉ. ओम महेश्वरी बीबीसीशी बोलताना म्हणाले, " वाजपेयी सरकारच्या काळात जेव्हा भारत-पाकिस्तान संबंध सुधारत होते, तेव्हा अनेक पाकिस्तानी नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी दीर्घकालीन व्हिसावर भारतात येत होते.

"त्यावेळी लग्नानंतर बराच काळ निपुत्रिक राहिलेले पाकिस्तानातील सवाई गावात राहणारे लाभशंकर महेश्वरी आपल्या पत्नीसह भारतात आले. इथे त्यांनी आयव्हीएफ उपचार घेतले पण मूल झालं नाही.

“एकीकडे वैद्यकीय उपचारासाठी पैसे खर्च झाले आणि दुसरीकडे ते पाकिस्तानातून आलेले असल्याने त्यांना इथे कोणताही व्यवसाय करता आला नाही. त्यामुळे हातातील पैसे संपले. पण सासरचे लोक आर्थिक मदत करत होते."

पोलीस अधिकारी

फोटो स्रोत, V.BHATI

फोटो कॅप्शन, पोलीस अधिकारी

ते पुढे म्हणाले, “इथे सलग तीन वर्षं उपचार केल्यानंतरही मूल झालं नाही. 2002 साली त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तानात परतण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला पण त्यांना व्हिसा मिळाला नाही.

"दुसरीकडे, त्यांचा इथल्या व्यवसायात देखील जम बसू लागलेला. म्हणून त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि 2005 मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं.

"त्यानंतर ते घाऊक किराणा व्यवसायात गेले आणि तेव्हापासून आमच्या संपर्कात नव्हते.”

2022 मध्ये पाकिस्तानचा दौरा

आनंद जवळच्या तारापूरमध्ये लाभशंकर यांच्यासोबत किराणा मालाचा व्यापार करणारे जयेश ठक्कर यांनी बीबीसीला सांगितलं की, "पूर्वी लाभशंकर आपल्या सासऱ्यांसोबत कमिशनवर घाऊक धान्याचा व्यवसाय करायचे. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी तारापूर चौकडीजवळ माधव किराणा नावाचं घाऊक मालाचं दुकान सुरू केलं.

"इथे व्यवसात त्यांचा चांगलाच जम बसला होता, पण आई-वडील हयात असल्यामुळे त्यांना पाकिस्तानला जायचं होतं.”

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

त्यांनी पुढे सांगितलं, "कोरोनादरम्यान त्यांचं थोडंफार नुकसान झालं. त्यांचा एक चुलत भाऊ कृणाल राठी याने तेल आणि धान्यात भेसळ करण्यास सुरुवात केली.

"त्यांच्यावर भेसळीचा गुन्हाही दाखल झालेला. या काळात त्यांना त्यांची पाकिस्तानातील मालमत्ता विकून ते पैसे गुजरातमधील व्यवसायात गुंतवायचे होते. म्हणून त्यांनी पुन्हा पाकिस्तान व्हिसासाठी अर्ज केला आणि 2022 मध्ये ते 45 दिवसांसाठी पाकिस्तानात गेले. पण ते पाकिस्तानी गुप्तहेर असतील याची आम्हाला कल्पना नव्हती."

लष्कराच्या जवानांची हेरगिरी केल्याचा आरोप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय सैनिकांची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानातून अटक करण्यात आलेल्या लाभशंकर यांच्याबद्दल बोलताना गुजरात दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक ओ. पी. जाट यांनी बीबीसीला सांगितलं की, "2005 मध्ये भारतीय नागरिकत्व घेतल्यानंतर लाभशंकर महेश्वरी यांनी भारतीय जवानांची हेरगिरी केली. 2022 मध्ये पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज केला. पण जेव्हा त्यांचा व्हिसा मंजूर झाला नाही, तेव्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये राहणा-या आपल्या मावशीचा मुलगा किशोर रामवानी याला फोन केला आणि व्हिसा लवकर मिळावा यासाठी मदत मागितली.

"पाकिस्तानी दूतावासातील एका व्यक्तीशी संपर्क साधण्यास त्यांना सांगितलं गेलं आणि त्यांना व्हिसा मिळाला. त्यानंतर त्यांची बहीण आणि भावजयांच्या पाकिस्तानच्या व्हिसाची व्यवस्थाही याच व्यक्तीने केली."

त्यांनी पुढे सांगितलं, "यादरम्यान, पाकिस्तान दूतावासातील एक ओळखीची व्यक्ती जामनगरमधील मोहम्मद सकलेनकडे गेली आणि मोहम्मद सकलेनने जामनगरमधून स्वत:च्या नावाने सिमकार्ड विकत घेतलं.

"सिमकार्ड जामनगरच्या असगर मोदींच्या फोनमध्ये अॅक्टिव्हेट झालेलं. त्यांची बहीण आणि भावजय पाकिस्तानात परतताना लाभशंकरने ते सिमकार्ड पाकिस्तानला पाठवलेलं.”

प्राध्यापक निलय मेस्त्री

फोटो स्रोत, V.BHATI

फोटो कॅप्शन, प्राध्यापक निलय मेस्त्री

पोलीस अधीक्षक जाट पुढे म्हणाले, "भारतीय क्रमांक असलेलं सिमकार्ड पाकिस्तानला पाठवल्यानंतर, लाभशंकरने दिलेल्या सिमकार्डमध्ये त्यांनी व्हॉट्सअॅप सक्रिय केलं. पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी व्हॉट्सअॅपचा ओटीपी दिला.

"मग ते भारतीय लष्कराच्या जवानांना फोन करत. अशा जवानांना फोन करत ज्यांची मुलं सैनिकी शाळेत शिकत आहेत आणि शाळेचे नवीन नियम किंवा शिष्यवृत्तीसाठीचे फॉर्म भरण्यासाठी एपीके फाइल पाठवत. फाइल आधीच रिमोट ॲक्सेस ट्रोजन नावाच्या मालवेअर व्हायरसने कोड केलेली असे.

"याशिवाय, भारतीय लष्कराच्या जवानांना ‘हर घर तिरंगा’ अभियानाची लिंक असलेली अशाच प्रकारची एपीके फाईल पाठवण्यात आलेली. तीसुद्धा रिमोट ॲक्सेस ट्रोजन व्हायरसने प्री-कोड केलेली.

"हा व्हायरस लष्करातील जवानाच्या फोनमध्ये शिरल्यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट, फोटो आणि हालचाली कळत. अशा प्रकारे त्यांनी कारगिल सीमेवर कार्यरत असलेल्या जवानाच्या मोबाइलमध्ये रिमोट ॲक्सेस ट्रोजन व्हायरस टाकला, ज्याच्या आधारे भारतीय लष्कराचं खाजगी संभाषण पाकिस्तानपर्यंत पोहोचत होतं.”

'रिमोट ॲक्सेस ट्रोजन व्हायरसच्या मदतीने हॅकिंग'

या संदर्भात गुजरात एटीएसने आर्मी इंटेलिजन्ससोबत संयुक्त कारवाई करत लाभशंकर महेश्वरीला तारापूर येथून अटक केली.

या व्हायरसची फाइल आतापर्यंत त्यांनी भारतीय लष्करातील काही जवानांना पाठवली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमधील सायबर सिक्युरिटीचे सहाय्यक प्राध्यापक निलय मिस्त्री यांनी बीबीसीला सांगितलं, "रिमोट ॲक्सेस ट्रोजन व्हायरसमध्ये, तुम्हाला तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर मूळ वेबसाइट किंवा एपीके फॉरमॅटमध्ये अॅडवेअरसारखे मालवेअर मिळते.

"अ‍ॅडवेअर तुमच्या फोनचा सर्व डेटा एकत्रित करतो आणि तो कमी जागा व्यापणा-या फाईल फॉरमॅटमध्ये पाठवतो, त्यामुळे तुमचा मोबाइल कमीत कमी इंटरनेट डेटाचा वापर करतो आणि हे तुमच्या लक्षातही येत नाही.”

मिस्त्री पुढे म्हणाले, "हे पॅसिव्ह ट्रोजन आहे आणि आणखी एक सक्रिय ट्रोजन आहे ज्यामध्ये फोनवरील कोणत्याही ॲक्टिव्हिटीची फाईल तयार करून ताबडतोब पाठवली जाते, ज्याला स्क्रीन मिररिंग म्हणतात. म्हणजेच, फोनवरील कोणतंही व्हॉट्सअॅप चॅट किंवा व्हिडिओ किंवा उघडलेले इतर संदेश त्याच वेळी दुसरी व्यक्तीही पाहू शकते.

"या प्रकारच्या लिंकसह कोड केलेला आणि एम्बेड केलेल्या रिमोट अॅक्सेस ट्रोजन व्हायरसमुळे आम्हाला केवळ फोनमधील तपशीलच कळत नाही तर कोणत्याही अंतरावरावरून फोनची सुरू असलेली हालचाल देखील पाहता येते."

लाभशंकर माहेश्वरी

फोटो स्रोत, V.BHATI

फोटो कॅप्शन, लाभशंकर माहेश्वरी

दरम्यान, गुजरात दहशतवादविरोधी पथकाने लाभशंकर महेश्वरीला तारापूर न्यायालयात हजर केलं आणि सरकारी वकील एम. एच. राठोड यांनी 14 कलमी तपासासाठी कोठडीची मागणी केलीय.

पोलीस कोठडीच्या मागणीसह ते म्हणाले, "लाभशंकरच्या फोनमध्ये अनेक क्रमांक आहेत. ते कोणाशी बोलत होते, त्यांनी देशविरोधी माहिती कोणाला दिली होती? याशिवाय त्यांना सिमकार्ड देणारे लोक मोकाट आहेत, त्याची चौकशी होणं बाकी आहे."

लाभशंकर कोणत्या पाकिस्तानी एजंटच्या आणि गुजरातमधील कोणत्या पाकिस्तानी लोकांच्या संपर्कात होते, याचा तपास करण्यासाठी त्यांनी मागितलेल्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा सात दिवसांची कोठडी देण्यात आलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)