कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी समोर आलेल्या आहेत?

कुरुलकर

फोटो स्रोत, Getty Images

डीआरडीओतले वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना 4 मे 2023 रोजी अटक झाली होती. पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटिव्ह (पीआयओ) च्या हस्तकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील शासकीय गुपिते पुरवण्याचा आरोपाखाली दशतवाद विरोधी पथकाने त्यांना अटक केली होती. प्रदीप कुरुलकर यांना पुणे न्यायासयाने आता 29 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत असून, आतापर्यंतच्या तपासात काही धक्कादायक बाबी उघड झालेल्या आहेत.

यातच इंडियन एअर फोर्स म्हणजेच भारतीय वायुदलातील एका कर्मचाऱ्याचा यामध्ये उल्लेख आल्याने खळबळ उडाली.

या प्रकरणात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी बाबी समोर आलेल्या आहेत, याचा आढावा घेऊया.

प्रदीप कुरुलकर, डीआरडीओ, हनी ट्रॅप

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, प्रदीप कुरुलकर

प्रदीप कुरुलकर आणि वायुदलातील अधिकारी एकाच महिलेच्या संपर्कात?

प्रदीप कुरुलकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेले फोन, लॅपटॉप, कॉम्प्यूटर दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

यापुढच्या तपासातून दहशतवाद विरोधी पथक बँगलोरमधल्या एका एअर फोर्सच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलं.

प्रदीप कुरुलकर, हनी ट्रॅप, भारत, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

प्रदीप कुरुलकरांना ज्या आयपी एड्रेसवरुन संपर्क करण्यात आला होता, त्याच आयपी ऍड्रेसवरून एअरफोर्सच्या या कर्मचाऱ्याला संपर्क केला गेला होता असं दहशवाद विरोधी पथकाच्या तपासातून समोर आलं.

या कर्मचाऱ्याचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय आणि त्याच्याकडूनही काही गोपनीय माहिती पीओआयच्या हस्तकासोबत शेअर केली गेली होती का, यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने या कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवून घेतला.

त्याने गोपनीय किंवा संवदेनशील माहिती शेअर केली आहे का, यासंदर्भात तपास सुरु असल्याचं दहशतवाद विरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“एटीएस अधिकारी- तो कर्मचारी त्याच पीआयओ च्या संपर्कात होता. काही गोष्टींमधून ही बाब समोर आली. त्यामुळे आम्ही पुढची पावलं उचलली. पण त्यांने काही गोपनीय माहिती शेअर केलीये का याचा तपास सुरु आहे. तो कर्मचारी बंगलोरमध्ये पोस्टेड आहे. हा कर्मचारी कुरुलकरांच्या नाही तर पीआयओच्या त्या हस्तकाशी संपर्कात होता. त्याच्यावर अजून गुन्हा दाखल केलेला नाहीये,” असं त्या अधिकाऱ्याने बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

दहशतवाद विरोधी पथक एअर फोर्समधल्या त्या कर्मचाऱ्यापर्यंत कसं पोहोचलं, याची काही माहिती वृत्तपत्रांमधील बातम्यांमधून समोर आलेली आहे. त्यात पाकिस्तान ऑपरेटिव्हचा नंबर कुरुलकरांनी ब्लॉक केला होता. पण त्यानंतर तिने दुसऱ्या नंबरवरुन मेसेजकरुन ‘मला ब्लाँक का केलं’ असं विचारणारा मेसेज केला, असं म्हटलं आहे.

या नंबरमुळे दहशतवाद विरोधी पथक एअर फोर्समधील या कर्मचाऱ्या पर्यंत पोहोचल्याचं लोकसत्ताने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे.

कुरुलकरांना जाळ्यात ओढण्यासाठी ज्या मोडस आपरेंडीचा वापर करण्यात आला तिच पद्धत या वायुदलातील कर्मचाऱ्याला जाळ्यात ओढण्यासाठी वापरली असावी असा प्राथमिक अंदाज दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

प्रदीप कुरुलकर डीआरडीओ गेस्ट हाऊसवर महिलांना भेटायचे?

दहशतवाद विरोधी पथकाने असा दावा केला की, डीआरडीओच्या गेस्ट हाऊसवर प्रदीप कुरुलकर काही महिलांना भेटले. या महिला कोण आणि त्यांच्या या प्रकरणाशी काय संबध आहे याचा तपास अजून सुरू असल्याचं तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलं.

यासोबतच, कुरुलकर यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा तपास करुन पीओआयकडून वापरलेल्या आंतरराष्ट्रीय नंबर आणि त्यावरुन केलेल्या काॅल्सच्या रेकाॅर्डचा तपास करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

दहशतवाद विरोधी पथक काही मुद्द्यांचा सखोल तपाल करणार आहे. यामध्ये आरोपीने कार्यालयीन गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी शेअर केली का याचा तपास करण्यात येणार आहे.

आरोपीने पीआयओला दिलेली गोपनीय माहिती ही देशाच्या सुरक्षिततेस बाधा आणणारी असल्याने या माहितीसंदर्भात सखोल तपास केला जाईल.

प्रदीप कुरुलकर, डीआरडीओ, हनी ट्रॅप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

कुरुलकर हे परदेशात गेल्याचं दिसून आल्याने तेव्हा ते पीआयओला इतर देशात भेटले का याची पडताळणी केली जाईल.

याशिवाय दहशतवाद विरोधी पथकाने प्रदीप कुरुलकर यांची पाॅलिग्राफ टेस्ट करण्यासंबंधी कोर्टाकडे परवानगी मागितल्याची बातमी काही वृत्तसंस्थांकडून देण्यात आली आहे.

एबीपी माझ्याच्या बातमी असं म्हटलेलं आहे की, कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तहेराला नक्की काय-काय सांगितलं आहे, त्यांच्याशी किती लोक संपर्कात होते,पैशांची देवाणघेवाणही झाली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पॉलिग्राफ टेस्टमधून मिळेल, असं एटीएसला वाटतंय.

प्रदीप कुरुलकर कोण आहेत?

कुरुलकर हे डीआरडीओ मधील एक नामवंत शास्त्रज्ञ मानले जातात. कुरुलकर यांचा जन्म 1963 साली झाला. त्यांनी सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री (बीई) पूर्ण केल्यानंतर 1988 मध्ये ते सीव्हीआरडीई, अवडी येथे डीआरडीओमध्ये रुजू झाले.

पुढे त्यांनी आयआयटी कानपूरमधून पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधील प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केले. क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी उपकरणे, प्रगत रोबोटिक्स आणि लष्करी वापरासाठीचे मोबाइल मानवरहित प्रणालीचे डिझाइन यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे.

प्रदीप कुरुलकर, डीआरडीओ, हनी ट्रॅप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

कुरुलकर यांनी डीआरडीओमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केलं आहे. डीआरडीओच्या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण आणि ग्राउंड सिस्टीम्सच्या निर्मितीच्या त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. डीआरडीओच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र मिशन शक्ती च्या प्रक्षेपकाची निर्मिती कुरुलकर यांच्या नेतृत्वात झाली होती.

कुरुलकर यांना 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी सायन्स डे पुरस्कार, 2002 मध्ये उत्कृष्टतेसाठी डीआरडीओ अग्नि पुरस्कार, आकाश प्रोजेक्टसाठी 2008 मध्ये पथदर्शी संशोधन आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी डीआरडीओ पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे.

कुरुलकर हे पुढच्या काही महिन्यांमध्ये निवृत्त होणार होते. पण त्याआधीच हा सगळा घटनाक्रम समोर आला.

प्रदीप कुरुलकरांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असलेल्या संबंधांवरुन विरोधकांची टीका

प्रदीप कुरुलकर यांना अटक झाल्यावर सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल झाला. त्यामध्ये प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) शी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला. या फोटोमध्ये कुरुलकर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात भाषण करताना दिसत आहेत. (या फोटोची शहानिशा बीबीसी मराठीकडून करण्यात आलेली नाही.)

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत कुरुलकरांवरुन आरएसएसवर निशाणा साधला आहे. व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये प्रदीप कुरुलकर असं सांगत आहेत की त्यांचं कुटुंब 4 पिढ्यांपासून आरएसएससोबत जोडलं गेललं आहे. तसेच यामध्ये कुरुलकर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमोर एका कार्यक्रमात भाषण करताना दिसत आहेत.

प्रदीप कुरुलकर, डीआरडीओ, हनी ट्रॅप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रदीप कुरुलकर

त्यांच्या ट्वीटमध्ये मल्लिकार्जून खर्गे म्हणतात की, “जे लोक आल्यादिवशी आम्हा भारतीयांना पाकिस्तानात जा असं म्हणून धमकी देतात तेच आता पाकिस्तानची हेरगिरी करताना पकडले गेले आहेत. हीच ‘मी देशाला वाकू देणार नाही’ असं म्हणणाऱ्यांच्या राष्ट्रभक्तीची सत्यता आहे.”

प्रदीप कुरुलकरांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. संबंधित यंत्रणांनी कोणत्याही दबावास बळी न पडता सदर व्यक्तीची कठोर चौकशी करून त्याच्याबाबत सर्व पुरावे गोळा करून त्यास जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही मागणी या आंदोलनात करण्यात आली.

विरोधकांच्या टिकेवरचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत उत्तर अजून समोर आलेलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)