रशियाचा जेम्स बॉंड : जो दारू प्यायचा नाही, अनेक जणींशी संबंध ठेवायचा नाही आणि ज्याला बायकोही होती

रशियाचा जेम्स बाँड

फोटो स्रोत, Alamy

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

पाश्चिमात्य देशांमधल्या गुप्तहेर जगतावर जेम्स बाँडने राज्य केलं, म्हणजे निदान तिथल्या पडद्यावरच्या गुप्तहेरांच्या दुनियेचा तो अनभिषिक्त सम्राट होता.

नंतर जेम्स बाँडचे फॅन साऱ्या जगात पसरले. पण रशियाचं आणि पश्चिमेतल्या देशांचं हाडवैर होतं. तिथेही हे जेम्स बाँडचं लोण पोचलं का? की त्यांचा बाँड कोणी वेगळाच होता?

त्या गुप्तहेराचं नाव होतं मॅक्स ऑटो व्हॉन स्टर्लिट्झ. म्हणजे हे नाव तो वापरायचा. खरं नाव कोणालाही माहीत नव्हतं.

पण सोव्हियत युनियनचा हा जेम्स बाँड पाश्चात्यांच्य गुप्तहेरापेक्षा खूप वेगळा होता. त्याला बायकांच्या मागे फिरण्यासाठी किंवा चित्रविचित्र यंत्र वापरण्यासाठी वेळ नव्हता. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्याने बर्लिनमधल्या आपल्या कामाला समर्पित केलं होतं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने जर्मन उच्चाधिकाऱ्यांच्या वर्तुळात प्रवेश मिळवला होता. तो नाव बदलून तिथे गुप्तपणे राहायचा आणि हेरगिरी करायचा.

मुळात हे मॅक्स ऑटो व्हॉन स्टर्लिट्झ नावच जर्मन आहे. त्याचं रशियन नाव कधीही समोर आलं नाही. काही लोक म्हणतात की तो दंतकथा होता, तर काही लोकांना ठाम वाटतं की तो त्याच्या कामात इतका उत्तम होता की त्याच्याविषयी खरी माहिती कधीच जगासमोर आली नाही.

आणि हेच तर सार्थक असतं ना गुप्तहेराच्या आयुष्याचं – त्याने गुप्त राहाणं.

मग लोकांना याची कुणकुण कशी लागली?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एका रशियन कादंबरीमुळे. ही कादंबरी खरं तर रशियाचं प्रमुख वृत्तपत्र प्रावदामध्ये तुकड्या तुकड्यांनी प्रकाशित झाली. या कादंबरीचं इंग्रजी नाव आहे – सेव्हन्टीन मोमेंट्स ऑफ स्प्रिंग.

या पुस्तकाचा काळ होता 1945, म्हणजे दुसरं महायुद्ध संपतानाचा आणि ठिकाण होतं बर्लिन.

1945 च्या सुमारास रशियाची रेड आर्मी एका बाजूने बर्लिनकडे सरकत होती तर दुसऱ्या बाजूने मित्रराष्ट्रांच्या फौजा सरकत होत्या.

तेव्हाच आपल्या कांदबरीचा हिरो मॅक्सिम मॅक्सिमोवीच इसायेव्ह गुप्तपणे बर्लिनमध्ये राहात होता. त्याने मॅक्स ऑटो व्हॉन स्टर्लिट्झ हे जर्मन नाव घेतलं होतं. त्याला बर्लिनमधली सत्ता उलथवून टाकायची होती.

याच कांदबरीवर सत्तरच्या दशकात एक रशियन सीरियल आली. ती तुफान हिट झाली.

बीबीसीच्या विटनेस हिस्ट्री या कार्यक्रमात बोलताना या सीरियलमध्ये मुख्य पात्राची पत्नी साकारणाऱ्या अभिनेत्री इलोनारा शाकशोवा म्हणतात की, “रोज संध्याकाळी रस्ते ओस पडायचे. लोक कामावरून धावत पळत घरी यायचे आणि त्यांना पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार याची उत्सुकता असायची.”

1973 साली आलेला याचा पहिला एपिसोड जवळपास 8 कोटी लोकांनी पाहिला असं म्हणतात. स्टर्लिट्झ हे पात्र लोकांच्या मनात अजरामर झालं.

व्याचेस्लाव्ह तिखोनोव्ह

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, व्याचेस्लाव्ह तिखोनोव्ह यांनी सेव्हन्टिन मोमेंट्स ऑफ स्प्रिंगमध्ये मॅक्स ऑटो व्हॉन स्टर्लिट्झ या गुप्तहेराची भूमिका साकारली होती

स्टर्लिट्झचं कर्तृत्व पाश्चात्य जगातल्या जेम्स बाँडपेक्षा कमी नव्हतं. तो नाझी अधिकाऱ्यांच्या उच्च वर्तुळात वावरायचा. कोणाला त्याच्यावर संशय आला नव्हता. तो नाझी सैन्याचे युद्धाचे प्लॅन्सची माहिती रशियाला द्यायचा.

त्याला पुढे काय करायचं याबद्दल मॉस्कोचे अधिकारी सांगायचे.

त्याचे अनेक कारनामे या 12 भागांच्या सीरियलमध्ये दिसले.

कधी त्याने जर्मन अणुप्रकल्प निकामी केला तर कधी त्याने नाझी जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकेत चाललेली शांतता चर्चा फिसकटवली. (प्रत्यक्षात या तीन देशांमध्ये कधी शांतता चर्चा झालीच नव्हती.)

पण या सीरियलमधली लक्षात राहाणारी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या नाझी अधिकाऱ्यांसोबत चालणारे त्यांचे बुद्धीभ्रमाचे खेळ. इतर हिरोंसारखंच स्टर्लिट्झ न पण आपल्या मातृभूमीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. आपल्या देशात, आपल्या बायकोकडे परत येण्याची अतीव इच्छा असूनही राष्ट्रप्रेमासाठी तो कधी पर आला नाही हेही यात दाखवलं आहे.

आणि म्हणून अनेक समीक्षकांना, अभ्यासकांना हा रशियन गुप्तहेर जेम्स बाँडपेक्षा वेगळा वाटतो. तो बाँडसारखे माकडचाळे करत नाही, आणि त्याला काही मुल्यंही आहेत ज्यावर तो तडजोड करत नाही.

तो दारू पित नाही. तो अनेक बायकांशी संबंध ठेवत नाही. त्याला एक बायको आहे आणि तिच्यावर त्याचा खूप जीव आहे. तरीही तो तिच्यापासून मातृभूमीच्या प्रेमामुळे लांब राहातोय. दहा वर्षं त्याने जर्मनीत काढलीयेत, याकाळात त्याचा अनेक सुंदर स्त्रियांशी संपर्क झाला पण तरीही तो बायकोशी एकनिष्ठ आहे.

टनच्या दूतावासाबाहेर हेरगिरी करणारा हेर

फोटो स्रोत, JULIA QUENZLER

फोटो कॅप्शन, 2023 च्या फेब्रुवारी महिन्या बर्लिनमध्ये असलेल्या ब्रिटनच्या दूतावासाबाहेर हेरगिरी करणाऱ्या एका हेराला अटक झाली होती

या सीरियलमध्ये एक प्रसंग आहे. स्टर्लिट्झची बायको लपून छपून बर्लिनमध्ये येते. पण त्याला तिच्याशी बोलायची परवानगी नाहीये. एका रस्त्यांच्या दोन बाजूला असणाऱ्या दोन कॅफेमध्ये हे नवराबायको बसतात आणि फक्त एकमेकांकडे बघत राहातात. सहा मिनिटं. तेवढाच त्यांचा संवाद. आणि मग एक अक्षरही न बोलता आपआपल्या वाटेने निघून जातात.

या मालिकेत आणखी एक पात्र आहे. गेस्टेपो अधिकारी हाईनरिच म्युलर. त्याला कल्पना आलीये की जर्मनीत कोणीतरी सोव्हियत हेर घुसलाय, पण तो कोण आहे याचा छडा लागत नाहीये. पूर्ण मालिकाभर स्टर्लिट्झ आणि म्युलरचा उंदीर-मांजराचा पाठशिवणीचा खेळ सुरू राहातो.

मालिकेच्या शेवटी म्युलरला कळतं की स्टर्लिट्झच हेर आहे. स्टर्लिट्झलाही माहिती असतं की तो जास्त काळ राहिला तर पकडला जाणार पण तो राष्ट्रप्रेमासाठी आपल्या वाटेला जी शिक्षा येईल ती स्वीकारायला तयार असतो.

म्युलर आणि स्टर्लिट्झच्या नात्यातली आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे या दोघांचा आयुष्याबदद्ल रंगणारा संवाद. जेम्स बाँड कुठल्यातरी शत्रूशी (त्याचे शत्रू बहुतांश वेळा रशियनच असतात) तत्वज्ञानच्या गप्पा मारतोय, आयुष्याचा अर्थ शोधतोय असं चुकूनहील सापडणार नाही. आणि बाँड आवडणारे असा पिक्चर पाहात बसणार नाहीत.

बर्लिनची भिंत पडली तेव्हा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बर्लिनची भिंत पडल्यानंतर पूर्व जर्मनीतल्या अनेक लोकांना अश्रू अनावर झाले आणि त्याबरोबरच रशियाचा युरोपमधला हस्तक्षेप संपला

पण रशियन साहित्यात आणि कलाकृतीत जीवनाचं क्षणभंगूर असणं, आयुष्याचा अर्थ अशा गोष्टींचं भलमोठं चित्रण आढळतं, मग त्यांचा बाँड तरी यापासून कसा लांब राहील?

रशियाचा बाँड स्टर्लिट्झ जर्मनीच्या रस्त्यांवरून फिरताना सामान्य लोकांशी संवाद साधतो, त्यांचे प्रश्न जाणून घेतो. हळूहळू त्याच्या लक्षात येतं की इथले नागरिकही नाझी राजवटीला त्रस्त आहेत.

कम्युनिझमचा पोलादी पडदा आवळला गेल्यानंतर सोव्हियत रशियाच्या कोणत्याही कलाकृतीत, साहित्यात किंवा अगदी सामान्य लोकांच्या बोलण्यात युरोपियन देशांच्या नागरिकांबद्दल सहानुभूती आढळत नाही. ती दुर्मिळ भावना सेव्हन्टिन मोमेंट्स ऑफ स्प्रिंगमध्ये आढळते.

जेम्स बाँडच्या पाश्चत्य फॅन्ससाठी रशियाच्या स्टर्लिट्झचं असं लांबच लांब फिरायला जाणं, तत्वज्ञानावर गप्पा मारणं, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेणं आकलनाच्या पलीकडचं आहे आणि अर्थात बोरिंगही.

अमेरिकेतले अभ्यासक एरिक जेन्स यांनी म्हटलं होतं की स्टर्लिट्झ (इसायेव्ह) ला जरी रशियाचा जेम्स बाँड म्हणत असते तरी या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये काडीचंही साम्य नव्हतं. तो काही 007 बाँड सारख्या बालिश, कार्टूनिश गोष्टी करायचा नाही.

व्लादिमीर पुतीन त्यांच्या तरुण वयात बर्लिनमध्ये काम करत होते
फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतीन त्यांच्या तरुण वयात बर्लिनमध्ये काम करत होते

याच कारण विशद करताना ते म्हणतात, “सोव्हियत लोकांनी द ग्रेट पेट्रिऑटी वॉर या युद्धात खूप लोक गमावली, खूप हिंसा अनुभवली. त्यामुळे त्यांच्या समाजाने जेम्स बाँडसारखा अतिहिंसक नायक मान्य केलाच नसता. त्यांना असा नायक हवा होता जो त्याच्या चातुर्याने आणि बुद्धीमत्तेने जिंकतो. कोणताही काल्पनिक रशियन हेर, भले तो क्रेमलिनने मान्य केलेला असो किंवा सामान्य रशियन लोकांच्या मनातला असो, तो जेम्स बाँडसारखा विचित्र असू शकत नाही.”

अभिनेत्री इलोनारा शाकशोवा म्हणतात की, “या सीरियलने हेरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. गुप्तहेरांना आमच्या समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली आणि युद्धोत्तर पिढीत राष्ट्रवाद जागवला.”

खरं म्हणजे ही मालिका तत्कालीन केजीबीचे प्रमुख युरी आंद्रोपॉव यांच्या आदेशावरून बनवली गेली होती. शिकलेल्या, तरुण युवकांना केजीबीकडे (रशियाची गुप्तहेर संस्था) आकर्षित करून घेणं हा या मालिकेचा हेतू होता.

आंद्रोपॉव यांनी स्वतः या मालिकेचे भाग प्रसारित होण्याआधी पाहिले, त्यात जे दाखवलं आहे ते अप्रुव्ह केलं आणि मगच ती मालिका प्रसारित झाली. आंद्रोपॉव यांचा उजवा हात म्हणून काम पाहाणाऱ्या एका व्यक्तीने या संपूर्ण मालिकेच्या शुटिंग दरम्यान काय होतंय यावर लक्ष ठेवलं तर दोन केजीबी हेरांनी मालिकेदरम्यान मदत केली.

त्यांची खोटी नावं या मालिकेच्या श्रेयनामावलीत आहेत.

पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

असं म्हणतात की व्लादिमीर पुतीन यांच्यावरही स्टर्लिट्झ (इसायेव्ह)चा प्रचंड प्रभाव होता. खरं तर त्याच्यामुळेच पुतीन केजीबीत आले.

जेव्हा ही मालिका प्रसारित झाली तेव्हा पुतीन 21 वर्षांचे होते आणि त्यानंतर दोनच वर्षांत त्यांनी केजीबी जॉईन केलं आणि गंमत म्हणजे स्टर्लिट्झ सारखंच त्यांचंही पोस्टिंग जर्मनीत होतं.

1991 मध्ये पुतीन यांनी केजीबी सोडलं होतं आणि त्यावेळी ते सेंट पीटर्सबर्गच्या महापौरांसाठी काम करत होते. त्यावेळी सेव्हन्टीन मोमेंट्स ऑफ स्प्रिंगवर एक डॉक्युमेंट्री आली होती. तेव्हा या मालिकेतली काही भाग पुर्नचित्रित करून या डॉक्युमेंट्रीत दाखवण्यात आले होते.

अशाच एका पुर्नचित्रित भागात आपल्याला पुतीन दिसतात. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा जाहीर कबुली दिली होती की ते केजीबासाठी गुप्तहेर म्हणून काम करायचे.

या पुर्नचित्रित भागात स्टर्लिट्झच्या ऐवजी आपल्याला पुतीन गाडी चालवत पुन्हा बर्लिनच्या दिशेन निघालेत असं दिसतं. पण यावेळी गाडी रशिनय व्होल्गा असते.

पुतीन यांच्या तोंडी एक संवादही आहे. तो असा, “आपल्या देशात आता हुकुमशाही यावी असं अनेकांना वाटेल. पण समस्या आपलं सरकार, पोलीस, सैन्याचा नसून आपल्या मानसिकतेचा आहे. आपल्याला वाटतं पोलादी पडद्यामागे आपलं आयुष्य सुखाचं असेल पण तसं नाहीये.”

पुतीन यांच्या तोंडी हा संवाद घातलाय त्याचंही एक कारण आहे. याच्या दोनच वर्ष आधी बर्लिनची भिंत तुटली आणि सोव्हियत रशियाचा युरोपमधला हस्तक्षेप आणि राज्य संपलं.

पुतीन

फोटो स्रोत, getty images

1991 सालीच सोव्हियत रशियाचं विघटन झालं. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गार्बोचेव्ह यांनी हळूहळू जगासाठी रशियाची दारं किलकिली केली. त्यानंतरची काही वर्षं रशियातला खूप मोठ्या स्थित्यंतराचा काळ होता. त्यावेळी जुना काळ पाहिलेल्या अनेक नागरिकांना असं वाटत होतं की पोलादी पडदा आणि त्यातून येणारी बंधनं परत आली पाहिजेत.

ओपिनियन पोल्समधून दिसतं होतं की मतदारांना आता पुढचा राष्ट्राध्यक्ष तरुण, रशियन वंशाचा, सैन्य दलात काम केलेला आणि मुख्य म्हणजे दारू न पिणारा हवा. स्टर्लिट्झसारखाच.

इकोनॉमिस्ट मासिकाचे रशिया आणि पूर्व युरोप भागाचे संपादक अकार्डी ऑस्ट्रोव्हस्की त्यांच्या ‘द इन्वेन्शन ऑफ रशिया’ या पुस्तकात लिहितात, “रशियाच्या लोकांचा लिबरल विचारसरणीवरून विश्वास उडाला होता. संपूर्ण देश नव्याने स्टर्लिट्झ शोधत होता.”

ते पुढे नमूद करतात की 1999 साली कॉमेरसान्ट या वृत्तपत्रात एक पोल घेतला गेला. त्यात असं विचारलं होतं की चित्रपट/मालिकेतली कोणती व्यक्तिरेखा रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष व्हावी असं तुम्हाला वाटतं?

दुसऱ्या महायुद्धात रशियाचं नेतृत्व करणारे मार्शल झुकॉव्ह पहिल्या नंबरवर आले तर स्टर्लिट्झचा नंबर दुसरा होता. या पेपरने आपल्या पुरवणीत स्टर्लिट्झचा फोटो छापून हेडलाईन दिली - 2000 चे राष्ट्राध्यक्ष.

मार्च 2000 मध्ये पुतीन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. त्या आधी त्यांनी काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. हा योगायोग खचितच नव्हता.

पुतीन

फोटो स्रोत, getty images

रशियन जनतेला स्टर्लिट्झ हवा होता जो त्यांना पुतीनच्या रुपाने सापडला.

माध्यमांमधून पुतीन यांच्या जर्मनीतल्या कार्यकाळाच्या कथा रशियन जनतेसमोर येत राहिल्या, आजही येतात.

असाच एक किस्सा बर्लिनची भिंत पडल्यानंतरचा.

5 डिसेंबर 1989 चा दिवस होता. स्थळ – जर्मनीमधलं ड्रेस्डेन. बर्लिनची भिंत पडल्याला काही आठवडे लोटले होते. पूर्व जर्मनीमधून साम्यवाद मरत चालला होता.

अचानक ड्रेस्डेनचं मुख्यालय स्टासीवर लोकांचा जमाव चालून आला. पूर्व जर्मनीतले गुप्त पोलीस अचानक काही करेनासे झाले.

मग आंदोलनकर्त्यांपैकी काही लोक रस्त्याच्या पलिकडे गेले. तिथे एक मोठं घर होतं. हे घर म्हणजे केजीबीचं स्थानिक मुख्यालय होतं.

जमाव येताना पाहून गेटवरचा गार्ड तातडीने आत पळाला आणि आतून एक अधिकारी बाहेर आला.

या जमावात असलेले सिंगफ्राईड डॅनाथ बीबीसीशी बोलताना म्हणतात, “हा अधिकारी चणीला लहान होता आणि चिडलेला होता. तो ओरडला आणि म्हणाला चुकूनही आत येण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या कॉम्रेड्सच्या हातात शस्त्र आहेत आणि वेळ पडली तर वापराची परवानगीही.”

हे एकून तो जमाव निघून गेला.

पण त्या केजीबी अधिकाऱ्याला माहिती होतं की परिस्थिती कधीही चिघळू शकते. त्याने तातडीने रेड आर्मी रणगाड्यांच्या मुख्यालयात फोन केला आणि अतिरिक्त कुमक मागवली.

तिथून जे उत्तर आलं ते तो आयुष्यभर विसरला नाही.

त्या अधिकाऱ्यानेच याचं नंतर वर्णन केलंय.

त्याला फोनवर उत्तर मिळालं, “आम्ही मॉस्कोच्या आदेशाशिवाय काहीही करू शकत नाही आणि मॉस्को शांत आहे.”

‘मॉस्को शांत आहे’ या उत्तराने त्याला इतकं छळलं की नंतर तोच ‘मॉस्को’ झाला. या अधिकाऱ्याचं नाव होतं व्लादिमीर पुतीन.

पुतीन यांचा संबंध अनेकदा स्टर्लिट्झशी जोडला गेला, विशेषतः ते सत्तेत आल्यानंतर.

हा वरचा प्रसंग पुतीन यांना एका सच्च्या राष्ट्रप्रेमी अधिकाऱ्याच्या रुपात दर्शवतो, ज्याची मातृभूमीवरची सत्ता कधी ढळत नाही, स्टर्लिट्झसारखीच.

आजही स्टर्लिझला रशियन समाजात मानाचं स्थान आहे. तो खरा होता की काल्पनिक होता हे माहीत नसतानाही स्टर्लिझची जादू प्रत्यक्ष जीवनात वारंवार पाहायला मिळते.

डिसेंबर 2007 साली जेव्हा अभिनेत्री इलोनारा शाकशोवा 70 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांना रशियन गुप्तहेर संस्थेकडून खास भेट मिळाली. रशियाच्या इतिहासात कधीही कोणत्याही व्यक्तीला रशियन गुप्तहेर संस्थेने कोणतंही गिफ्ट दिलेलं नव्हतं.

या गिफ्टचं कारण? कारण शाकशोवा यांनी स्टर्लिट्झची पत्नी पडद्यावर साकारली होती.

आजही सेव्हन्टिन मोमेंट्स ऑफ स्प्रिंग दरवर्षी रशियन टेलिव्हिजनवर दाखवली जाते. जेव्हा 2009 मध्ये स्टर्लिट्झ साकारणाऱ्या अभिनेत्याचा, व्याचेस्लाव्ह तिखोनोव्ह यांचा मृत्यू झाला तेव्हा रशियन गुप्तहेर संस्थेने त्यांच्या कुटुंबाला शोकसंदेश पाठवला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.