अस्खलित इंग्रजीचा प्रभाव आणि IT कंपनीचा सेटअप, अशी झाली 38 लॅपटॉपची चोरी

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

एखाद्या चित्रपटात किंवा वेबसिरिजमधील प्रसंग वाटावा अशी फसवणुकीची घटना नागपूरमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघा जणांना अटक केल्याची माहिती दिली आहे.

दिल्लीतील एक जोडी नागपुरात आली. त्यांनी अस्खलित इंग्रजी बोलून आयटी कंपनी स्थापन करत असल्याचं भासवलं आणि तब्बल 38 लॅपटॉपची चोरी करुन ते पुन्हा ट्रेनने पसारही झाले. त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्यावर चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

'बंटी और बबली' चित्रपटाप्रमाणेच वेगवेगळे फंडे वापरुन फसवणूक करणारी ही टोळी असल्यामुळे त्यांचे नाव देखील 'बंटी आणि बबली' पडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

ही टोळी नागपूर पोलिसांच्या कचाट्यात कशी सापडली? आजपर्यंत त्यांनी किती रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे? पाहूयात.

चोरी करुन पसार

चोर वेगवेगळे फंडे वापरून फसवणूक वा चोरीसाठी प्रयत्न करताना दिसतात. अशा स्वरूपाच्या अनेक घटना आजपर्यंत उघड झाल्या आहेत.

नुकताच नागपूरमध्येही अशीच एक चोरीची घटना उघड झाली आहे. नागपूरमधील बजाज नगर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना 16 नोव्हेंबरला अटक केली आहे. अनिता शर्मा आणि पवन कुमार अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

नागपूरमधून तब्बल 36 लॅपटॉपची चोरी करुन हे दोन्हीही चोर पुरीला जाणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसमधून पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी बौद्ध गयामधून त्यांना 16 नोव्हेंबरला अटक केली.

काय होता चोरीचा फंडा?

बजाजनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांनी या दोन्ही आरोपींनी चोरीसाठी वापरलेली युक्ती झालेला एकूण घटनाक्रम बीबीसी मराठीला सांगितला.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिता शर्मा आणि पवन कुमार हे दोन्हीही आरोपी 17 ऑक्टोबरला नागपुरात आले होते.

त्यांनी नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरामध्ये एक फ्लॅट भाड्यानं घेतला. इथं आम्हाला आयटी कंपनी स्थापन करायची आहे, अशी बतावणी त्यांनी घरमालकाला केली.

आयटी कंपनी स्थापन करण्यासंदर्भातील सर्व चर्चा घरमालकासोबत केली आमची कंपनी तुमच्यासोबत भाडेकरार करेल, असंही वचन त्यांना दिलं असं पोलिसांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

या सविस्तर चर्चेनंतर त्यांनी त्या फ्लॅटमध्ये नव्या आयटी कंपनीचं सेट-अप उभं करायलादेखील सुरुवात केली. विशेष म्हणजे यातील आरोपी महिला अनिता शर्मा ही अत्यंत अस्खलित आणि प्रभावी इंग्रजी बोलत असल्यामुळे घर मालकालाही त्यांच्या कोणत्याही गोष्टीबाबत कसलीही शंका आली नाही.

आपल्या एकूण वागणुकीचा, भाषेचा आणि पेहरावाचा प्रभाव पाडत या दोघांनी घरमालकाला विश्वासात घेतलं.

याच विश्वासाचा फायदा घेत आरोपींनी घरमालकाला त्यांच्या परिचयामधील कोणी लॅपटॉप दुकानदार असल्यास त्याच्याशी संपर्क साधण्याची विनंती करुन दिली.

घरमालकानेही आपल्याच मित्राचा पत्ता त्यांना देऊ केला.

अस्खलित इंग्रजीची छाप आणि 'ऑफिशियल' चोरी

नव्या आयटी कंपनीच्या स्थापनेचा बनाव आणि वेशभूषा आणि भाषेचा प्रभाव टाकत हे दोन्हीही 'बंटी-बबली' आरोपी अजय मते या लॅपटॉप दुकानदाराकडे गेले.

त्यांनी आपल्या नव्या कंपनीच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 38 लॅपटॉप्सची ऑर्डर दुकानदार अजय मते यांना दिली. त्यांनी हे नवेकोरे लॅपटॉप्स नव्याने उभे राहत असलेल्या ऑफिसमध्ये पाठवायला सांगितले.

दुकानदार आणि या घटनेतील तक्रारदार अजय मते यांनी पैशांची विचारणा केली. तेव्हा या आरोपींनी आमच्या कंपनीकडून थेट तुमच्या खात्यामध्येच तुम्हाला पैसे पाठवले जातील, असं सांगितलं.

ही महिला सफाईदारपणे इंग्रजी बोलत असल्यानं आणि ऑफिसचं सेटअप तयार करत असल्यानं दुकानदारालाही घर मालकाप्रमाणेच विश्वास बसला.

या बातम्याही वाचा:

त्यांनी मिळालेल्या या मोठ्या ऑर्डरप्रमाणे, त्यांच्या नव्या ऑफिसमध्ये लॅपटॉप पोहोचवले आणि त्यांना सगळ्या लॅपटॉप्सचं बिल सोपवलं.

हे बिल कंपनीला पुढे पाठवल्याचा इमेलदेखील या आरोपींनी दुकानदार अजय मते यांना दाखवला. त्यामुळे, अद्यापही अजय मते त्यांच्यावर व्यवहारातला विश्वास ठेवूनच होते.

सायंकाळच्या सुमारास त्यांनी पुन्हा एकदा या दोन्ही आरोपींना पैशांसाठी फोन केला मात्र, आता त्या दोघांचाही फोन बंद येत होता.

इथेच, आपण फसवले गेल्याची जाणीव दुकानदार अजय मते यांना झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं.

38 लॅपटॉप्स आणि फरार होण्याचा अयशस्वी प्रयत्न

दोन्हीही आरोपींनी हे नवेकोरे 38 लॅपटॉप्स आपल्या 6 बॅग्समध्ये भरले होते आणि ते रेल्वेने दिल्लीला पसार झाले होते.

त्यांनी आपल्या मोबाइलमधील सिमकार्ड सुद्धा फेकून दिलं होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत संपर्क होत नव्हता.

हा सगळा प्रकार 17 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवसांत घडला.

त्यांच्यासोबत काही केल्या संपर्क होत नसल्यानं दुकानदार अजय मते यांनी 23 ऑक्टोबरला बजाज नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपींचे मोबाइल फोन ट्रेस केले. तसेच, इतर काही तांत्रिक बाबींच्या सहाय्यानं त्यांनी आरोपींचा शोध घेतला.

सुरुवातीला आरोपींचं लोकेशन गाझियाबाद असल्याचं दिसत होतं. त्यामुळे नागपूर पोलिसांची एक टीम गाझियाबादला पोहोचली.

पण, हे आरोपी रेल्वेने पुरीकडे निघाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांना बौद्ध गया इथून अटक करण्यात आली.

टोळीची कार्यपद्धती आणि आरोपींचा खुलासा

निवडणुकीच्या काळात त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

निवडणूक संपताच पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी घेऊन आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

या चौकशीदरम्यान आरोपी अनिता शर्मा उडवाउडवीची उत्तरं देत होती. आम्हाला एका कंपनीनं लॅपटॉप घ्यायला सांगितलं असून मला अधिक माहिती नसल्याचं तिनं सुरुवातीला पोलिसांना सांगितलं.

आरोपींना दुकानदार अजय मते यांच्यासमोर हजर केलं असता त्यांनी या दोघांनाच लॅपटॉप विकल्याचं स्पष्ट केलं.

या टोळीत फक्त हे दोघेच नसून आणखी दोन जणांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकूणच या टोळीमध्ये, एक महिला आणि तीन पुरुष असे चार आहेत. नागपुरात मात्र या दोघांनीच लॅपटॉपची चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

15 लाखांचे लॅपटॉप गाझियाबादला विकले

लॅपटॉप कोणाला विकले याबद्दल पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला.

या दोन्ही चोरांनी नागपुरातून चोरी केलेले 38 लॅपटॉप कमी किमतीमध्ये गाझियाबादमधील चोर बाजारात विकले होते.

या चोर बाजारमधील दुकानदाराने "इतक्या कमी किंमतीमध्ये लॅपटॉप का विकत आहात", असं विचारलं असता "आम्ही थेट कंपनीतूनच माल आणतो, त्यामुळे कमी किंमतीत विकतो," असं उत्तर या आरोपींनी त्याला दिलं.

त्यांनी चोरलेल्या लॅपटॉपची एकूण किंमत 15 लाख रुपये आहे.

त्यापैकी 12 लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहेत.

याआधीही केली 35 लाख रुपयांच्या लॅपटॉपची चोरी

या टोळीवर वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशमधील नोएडा इथंही गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी नोएडामध्येही ऑफिसच्या बहाण्यानं तब्बल 35 लाख रुपयांचे 84 लॅपटॉप लंपास केले होते.

पण, गुन्हा दाखल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती.

याचाच फायदा घेत या आरोपींनी ऑक्टोबर महिन्यात नागपुरातून लॅपटॉप चोरले. त्यांनी दिल्लीतही असाच गुन्हा केला असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

ऐशोरामासाठी चोरीचा मार्ग

पण, यातून मिळालेल्या या पैशांचं आरोपींनी काय केलं? ते कशासाठी चोरी करतात? याबद्दलही पोलिसांनी माहिती दिली आहे.

लॅपटॉप चोरीमधून मिळालेले पैसे टोळीतील सर्वजण आपसांत वाटून घेत. त्यानंतर या पैशांमधून ते देश-विदेशात महागडे पर्यटन करत.

तसेच उच्च दर्जाचं जीवन जगता यावं, मौज-मजा करता यावी, यासाठी ते चोरी करत असून सगळा पैसा त्यातच खर्च करत.

आरोपी अनिता शर्मा या महिलेला 6 भाषा येत असून ती प्रभावीपणे इंग्रजी बोलून, गोड बोलून अनेक दुकानदारांची फसवणूक करत असल्याचं समोर आले आहे.

ट्रॅव्हल कंपनीची फसवणूक टळली

अनिता शर्मा आणि पवन कुमार या दोन्ही आरोपींनी विमानाच्या तिकीटासाठी पुण्यातील एका ट्रॅव्हल कंपनीलादेखील फोन केला होता.

नागपुरात आमची कंपनी स्थापन होत असून आमचे सगळे कर्मचारी दिल्लीवरून नागपुरात येणार असून सध्या दोन दिवस येणं-जाणं करतील असं सांगत किमान 40 तिकीटं त्यांच्याकडून मागवली होती.

पण, या ट्रॅव्हल कंपनीला या आरोपींनी आधी पैसे दिले नसल्यामुळे त्या कंपनीने तिकीट सुद्धा पाठवले नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक टळली, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)