You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दरोडा टाकण्यासाठी ज्योतिषाकडून मुहूर्त काढला, 1 कोटींची चोरी केली आणि...
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, पुणे
पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात एप्रील महिन्यात दरोड्याची घटना घडली.
देवकाते नगर इथे राहणाऱ्या सागर गोफण यांच्या घरी 24 एप्रिला चार जणांनी दरोडा टाकला आणि यामध्ये तब्बल 1 कोटी 7 लाख 24 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
यानंतर पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला आणि दरोडेखोरांना अटक केली तेव्हा यामागचं वेगळंच सत्य समोर आलं.
दरोडेखोरांनी हा गुन्हा करण्यासाठी मुहूर्त काढला होता आणि त्या ज्योतिष्याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं.
पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात ज्योतिषासह सहा आरोपींना अटक केली आहे.
24 एप्रिल 2023 रोजी नेमकं काय घडलं?
बारामती पोलीस स्टेशन हद्दीत देवकाते नगर इथे सागर शिवाजी गोफणे हे त्यांची पत्नी तृप्ती सागर गोफणे आणि दोन मुलांसह राहतात.
सागर गोफणे हे जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याजवळ भरपूर पैसे असल्याची माहिती एका दरोडेखोराला मिळाली.
21 एप्रील रोजी सागर गोफणे हे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले. 24 तारखेला रात्री 8 वाजता तृप्ती गोफणे आपल्या मुलांसह घरी असताना चार अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घराच्या कंपाउंडच्या भिंतीवरून उड्या मारुन त्यांनी आत प्रवेश मिळवला.
घरात घुसल्यावर या चोरट्यांनी तृप्तीला मारहाण करुन तिचे हातपाय बांधले. तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर घरातला ऐवज लुटायला सुरुवात केली.
घरातली 95 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, 20 तोळे वजनाचे 11 लाख 59 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 35 हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण साधारणपणे 1 कोटी 7 लाख 24 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.
बारामती शहरात भर लोकवस्तीमध्ये रहदारीच्या वेळी ही घटना झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु करत या गुन्हेगारांचा शोध घ्यायला सुरुवात केली.
सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हेगारांना पकडले
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार यांची मदत घेतली. तशी उपाययोजना पोलिसांनी केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास कसा केला गेला यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढून त्यात सविस्तर माहिती दिली.
'गुन्हा करणाऱ्या आरोपींनी आपण पकडले जावू नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली होती. कोणताही मागमूस त्यांनी मागे ठेवला नव्हता.
नेमलेल्या तपास पथकानं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचं वर्णन, पेहराव असे बारकावे तपासले. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याची उकल केली,' असं पोलिसांनी दिलेल्या जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या गुन्ह्यातले आरोपी हे एमआयडीसीमधले मजूर कामगार असल्याची माहिती पुढे आली.
यानंतर संशयित आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं गेलं.
सचिन जगधने (30), रायबा चव्हाण (32), रविंद्र भोसले (27), धनाजी जाधव (35), नितीन मोरे (36) यांना वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
ज्योतिष्याचा सल्ला
आरोपींनी ही चोरी करण्याआधी मुळच्या सातारा जिल्ह्यातल्या फलटणच्या असलेला रामचंद्र वामन चव्हाण (43) याचा सल्ला घेतला होता
चव्हाण यांना ज्यातिष शास्त्र पाहता येत असल्याने त्यांना कटात सामिल करुन घेतलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी मुहूर्त काढला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा केला असं पोलिसांनी सांगितलं. रामचंद्र चव्हाण यांनादेखील अटक करण्यात आली आहे.
या आरोपींकडून आतापर्यंत पोलिसांनी एकूण 76 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये 60 लाख 97 हजाराची रोख रक्कम आणि 15 लाख 35 हजाराचे दागिने यांचा समावेश आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)