'मी बायसेक्शुअल आहे, ते माझ्याही आधी नेटफ्लिक्सला कसं कळलं?'

    • Author, एली हाऊस
    • Role, बीबीसी लाँग फॉर्म ऑडिओ

बीबीसीच्या पत्रकार एली हाऊस यांना आपण समलैंगिक असल्याचं समजलं. पण नेटफ्लिक्सला हे आधीपासूनच कळलेलं होतं, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आलं. पण हे नेमकं कसं घडलं? वाचा त्यांच्याच शब्दांत :

मी त्यावेळी विद्यापीठात द्वितीय वर्षात शिकत होते. त्यावेळी मला असं जाणवलं की, मी बायसेक्शुअल आहे. पण नेटफ्लिक्स या OTT कंपनीला याबाबत माझ्या आधीही कळलं होतं का, असं मला त्यावेळी वाटलं.

विशेष म्हणजे, त्यावेळी मला एक बॉयफ्रेंडही होता. तो कित्येक वर्षांपासून माझ्या सोबत होता. मी स्ट्रेट आहे, असंच मला पूर्वीपर्यंत वाटत होतं. खरं सांगायचं तर माझ्या कुमारवयात डेटिंग वगैरे माझ्या प्राधान्यक्रमात कुठेच नव्हतं.

त्यावेळी मी तासनतास नेटफ्लिक्स पाहत घालवायचे. नंतर मला समलैंगिक किंवा बायसेक्शुअल पात्रे असलेल्या सिरीज, चित्रपट यांची शिफारस (रिकमेंडेशन) जास्त प्रमाणात मिळू लागली.

आश्चर्याची बाब म्हणजे, माझ्याच वयाच्या, माझ्यासारखीच पार्श्वभूमी असलेल्या, माझ्यासारखेच चित्रपट पाहण्याचा इतिहास असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनी मात्र या सिरीज कधीच पाहिलेल्या नसत. इतकंच काय, तर त्यांना त्या सिरीज-चित्रपटांचे रिकमेंडेशन्सही कधी आले नव्हते.

या दरम्यान, एक सिरीज माझ्या काळजात घर करून राहिली. 'यू, मी, हर' (You, Me, Her) असं त्या शोचं नाव होतं.

एका मोठ्या शहरातील उपनगरीय भागात राहणाऱ्या एका जोडप्याची ती कहाणी होती. पुढे ते त्यांच्या नात्यात एका तिसऱ्या व्यक्तीलाही प्रवेश देतात.

या सिरीजमध्ये समलैंगिक समुदायातील अनेक पात्रे होती. टीव्हीवरील पहिली पॉलीरोमँटिक कॉमेडी सिरीज म्हणून ही सिरीज ओळखली जाते.

फक्त नेटफ्लिक्सच नव्हे, तर इतर काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील मला त्याच प्रकारच्या रिकमेंडेशन मिळू लागल्या.

स्पॉटीफायने मला एक 'सॅफिक' नामक प्लेलिस्ट सुचवली. या शब्दाचा अर्थ होतो, महिलेचं महिलेप्रति असलेलं प्रेम.

यानंतर काही महिन्यांनी मला माझ्या टिकटोक अॅपच्या फिडमध्येही बायसेक्शुअल पात्रांचे व्हीडिओ दिसू लागले.

काही महिन्यांनी मला लक्षात आलं की मी स्वतःच एक बायसेक्शुअल आहे.

पण माझ्या आधी या सगळ्या प्लॅटफॉर्म्सना त्याची कशी माहिती होती? या प्लॅटफॉर्म्सनी असं काय ओळखलं की जे मला सुरुवातीला ओळखता आलं नव्हतं?

प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी

नेटफ्लिक्स या व्हीडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचे जगभरात 22 कोटींपेक्षाही जास्त वापरकर्ते आहेत.

या अॅपवर विविध प्रकारच्या जॉनरमधील (हॉरर, थ्रिलर, कॉमेडी, ड्रामा, फॅमिली) हजारो चित्रपट आणि सिरीज पाहण्यास उपलब्ध आहेत.

पण हे सगळे जॉनर्स लोक नेहमी पाहतातच असं काही नाही. नेटफ्लिक्सच्या पाहणीनुसार, एक साधारण प्रेक्षक महिन्याला जास्तीत जास्त सहा जॉनरमधील सिरीज किंवा चित्रपट पाहतात.

आपल्या प्रेक्षकांना कशा प्रकारचा मजकूर पाहायला आवडतो, याची अॅप नोंद ठेवत असतो. या गोष्टी लक्षात घेऊनच नेटफ्लिक्स प्रेक्षकांना आपल्या बाजूने रिकमेंडेशन देत असतो.

या नेटफ्लिक्सचं अल्गोरिदम असं संबोधलं जातं. अल्गोरिदमचं हे नेटवर्क प्रेक्षकांच्या होम पेजवर कोणत्या प्रकारचा मजकूर समोर दिसायला हवा, हे ठरवत असतं.

उदाहरणार्थ, 'यू, मी, हर' ही LGBTQ + जॉनरची सिरीज आपल्या प्रेक्षकाने पाहिल्याचं नेटफ्लिक्सच्या लक्षात येताच तो तशा प्रकारचे पात्र असलेले इतर चित्रपट आणि सिरीज रिकमेंड करणं सुरू करतो.

एकूण काय, तर आपल्या प्रेक्षकाला आपल्या कंटेंटसोबत जास्तीत जास्त वेळ जोडून ठेवण्यासाठी, त्यांनी आपल्या अॅपवर जास्तीत जास्त वेळ गुंतून राहावं, यासाठी हे अल्गोरिदम काम करतं.

नेटफ्लिक्सचे माजी प्रमुख टॉड येलीन यांचा एक व्हीडिओ कंपनीच्या वेबसाईटवर आहे.

यामध्ये ते म्हणतात, "डेटा हा एक मोठा डोंगर आहे. स्टोरी टेलिंगचं भविष्य हेच आहे. मशीन लर्निंगचं तंत्र वापरून आम्ही कोणत्या प्रकारचा कंटेट लोकांना पुरवायचा हे ठरवतो."

पण, या प्लॅटफॉर्म्सना आपल्या वापरकर्त्यांबाबत काय-काय माहिती आहे? ही माहिती ते कशा पद्धतीने मिळवतात?

युकेच्या डेटा प्रायव्हसी कायद्यानुसार, एखाद्या संस्थेकडे आपल्याबाबत कोणती माहिती आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे.

अनेक स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया कंपन्यांनी ही माहिती लोकांना देण्यासाठी एक स्वयंचलित यंत्रणा तयार केली आहे.

यापैकी 8 मोठ्या प्लॅटफॉर्मच्या पोर्टलवरून मी माझी वैयक्तिक माहिती डाऊनलोड करून घेतली.

फेसबुक साईट मी भेटी देत असलेल्या वेबसाईट्सची नोंद ठेवत असल्याचं मला दिसून आलं. यामध्ये लँग्वेज-लर्निंग टूलपासून ते हॉटेल लिस्टिंग साईट्सचा समावेश होता. तसंच माझ्या लोकेशनसंदर्भातील माहितीमध्ये त्यांच्याकडे माझ्या घरच्या पत्त्याचे कोऑर्डिनेट (अक्षांश आणि रेखांश स्वरुपात ठिकाणाची ओळख) असल्याचं मला दिसलं.

तर, इन्स्टाग्रॅमकडे माझा रस असलेल्या विविध प्रकारच्या 300 विषयांची यादी होती. याच माहितीच्या मदतीने ते माझ्यासमोर जाहिराती देतात.

नेटफ्लिक्सकडे मी पाहिलेल्या प्रत्येक ट्रेलर, चित्रपट आणि सिरीजची यादी होती.

इतकंच नव्हे, तर ते मी स्वतःहून सुरू केले, की ऑटो-प्ले पद्धतीने आपोआप लागले, याचा तपशीलही होता.

पण माझ्या लैंगिक ओळखीबाबत त्यांच्याकडे एखादी माहिती आहे, याचा कोणताही पुरावा मला आढळून आला नाही.

नेटफ्लिक्सने मला याबाबत सांगितलं की वापरकर्त्याने पाहिलेला कंटेंट हाच त्यांना रिकमेंडेशन देण्यासाठीचा मूळ आधार आहे.

तर, यासंदर्भात बीबीसीशी बोलताना स्पॉटिफायने म्हटलं, "आम्ही वापरकर्त्यांच्या आवडीनिवडीबाबत माहिती ठेवतो. पण त्यामध्ये लैंगिक ओळखीबाबतच्या कोणत्याच माहितीचा समावेश नाही. त्याशिवाय, आमचं अल्गोरिदम आमच्या वापरकर्त्याच्या लैंगिक ओळखीसंदर्भात कोणतेही अंदाज लावत नाही, हेसुद्धा आम्हाला स्पष्ट करायचं आहे.

इतर प्लॅटफॉर्म्सचंही याबाबत अशाच प्रकारचं धोरण असल्याचं मला समजलं.

अल्गोरिदम आणि आवडीनिवडी

युनिव्हर्सिटी ऑफ केंम्ब्रिजमध्ये कॉम्प्युटेशनल सोशल सायकोलॉजी या विषयात पी. एच. डी. करत असलेले ग्रेग सेरापिओ-गार्सिया यांच्याशी आम्ही याबाबत चर्चा केली.

ग्रेग म्हणतात, "नेटफ्लिक्सला कुणीच आपण गे असल्याचं स्वतःहून सांगत नाही. पण प्लॅटफॉर्मला आपल्या वापरकर्त्याच्या सवयीवरून त्याला समलैंगिक कंटेंटमध्ये रस असल्याचं निदर्शनास येतंच. त्याच माहितीच्या आधारे नेटफ्लिक्स किंवा इतर प्लॅटफॉर्मचं अल्गोरिदम त्यांना समान कंटेंटचं रिकमेंडेशन करतं."

त्यांच्या मते, "आपण हे कंटेंट स्वतःहून शोधतो की नाही. किंवा समोर आल्यानंतर किती वेळाने त्यावर क्लिक करतो, किती आवडीने पाहतो, हेसुद्धा ते विचारात घेतात. आपण सलग कोणता शो पाहतो, कोणता शो मध्यातून सोडून देतो, ही माहिती महत्त्वाची ठरते.

याचा अर्थ, माझ्या बाबतीत मी आधीपासून पाहत असलेल्या कंटेंटनुसार नेटफ्लिक्सने मला ते रिकमेंडेशन दिले नाहीत. तर मी मी ते कशा प्रकारे पाहत होते, याचाही त्यांनी विचार केलेला असावा.

याबाबत जगभरातील LGBTQ+ समुदायातील लोकांशी चर्चा करताना एक गोष्ट मला लक्षात आली की याबाबत त्यांची मतमतांतरे आहेत.

काहींना आपल्याला अशा प्रकारची रिकमेंडेशन आल्याचं आवडतं. तर काहींच्या मते, हा आपल्या खासगीपणाचा भंग आहे, असंही त्यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)