किंग कोब्रा बद्दलच्या 'या' अज्ञात गोष्टींचा झाला उलगडा, काय सांगतं नवं संशोधन? वाचा

    • Author, के. सुबागुनम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सापाबद्दल जगभरातील माणसांमध्ये नेहमीच समजापेक्षा गैरसमजच अधिक दिसून आले आहेत. सापांबद्दल एकंदरीतच फारशी माहिती नसणं हे त्यामागचं एक कारण आहे.

सर्पदंशाच्या भीतीमुळे सापांपासून मानवजात तशी फटकूनच वागत आली आहे. त्यातही साप जर किंग कोब्रा सारखा धडकी भरवणारा साप असेल तर मग विचारायलाच नको.

किंग कोब्रासारख्या महत्त्वाच्या सापाबद्दल देखील आपल्याला अजूनही फारसं माहित नाही हीच बाब एका ताज्या संशोधनातून अधोरेखित झाली आहे. किंग कोब्रा वरच्या या नव्या संशोधनाविषयी...

किंग कोब्रा हा साप त्याच्या अत्यंत प्राणघातक विषासाठी ओळखला जातो. दीर्घकाळापासून या सापाविषयी माणसाला एकीकडे भीती वाटत आली आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्याविषयी तितंकच आकर्षण देखील वाटत आलं आहे.

मात्र आता प्रसिद्ध उभयसृपशास्त्रज्ञ (herpetologist) (सरपटणारे प्राणी आणि उभयचरांचे तज्ज्ञ) डॉ. गौरी शंकर यांनी किंग कोब्राबाबत एक अत्यंत महत्त्वाचा शोध लावला आहे.

डॉ. गौरी शंकर यांना आढळून आलं की प्रत्यक्षात किंग कोब्राच्या चार वेगवेगळ्या प्रजाती आहेत.

तसं पाहता डॉ. गौरी शंकर यांच्या शोधाची सुरूवात एका भीतीदायक अनुभवानं झाली. 2005 मध्ये एका किंग कोब्रानं त्यांना दंश केला होता. त्यामुळे ते जवळपास मृत्यूच्या दारात पोहोचले होते.

मात्र या भयंकर अनुभवानंतर त्यांच्या मनात किंग कोब्राबद्दल आणखी कुतूहल निर्माण झालं.

जुन्या रहस्याची झाली उकल

1836 मध्ये सर्वात आधी किंग कोब्राबद्दल विज्ञान जगताला माहित झालं होतं. डेन्मार्कचे संशोधक थियोडोर एडवर्ड कँटर यांनी किंग कोब्राबद्दल जगाला सर्वात आधी सांगितलं होतं.

मात्र अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे की किंग कोब्रा सापाची एकच नाही तर चार वेगवेगळ्या प्रजाती आहेत.

डॉ. एस आर गणेश हे किंग कोब्रावर संशोधन करणाऱ्या डॉ. गौरी शंकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमचे प्रमुख सदस्य आहेत.

त्यांनी सांगितलं की आम्हाला किंग कोब्रा सापाबद्दल अधिक माहिती नाही. कारण हे साप ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये राहतात त्या परिसरांवर आम्ही जास्त संशोधन केलेलं नाही.

मात्र या शोधामुळे भविष्यात किंग कोब्राविषयी आणखी माहिती मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. किंग कोब्रासंदर्भातील अनेक रहस्यं उघड होणं अद्याप बाकी आहे. हा शोध म्हणजे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याच्या दिशेनं पडलेलं एक पाऊल आहे.

चार वेगवेगळ्या प्रजाती

"या संशोधनातून ही बाब लक्षात आली की किंग कोब्राबद्दल अधिक चांगल्या पद्धतीनं जाणून घेण्यासाठी त्यांचा अभ्यास करत राहणं आवश्यक आहे, यामुळे या आकर्षक सापाविषयी आणखी माहिती समोर येऊ शकेल."

-डॉ. मनोज, अँटी व्हेनम एक्सपर्ट

संशोधकांच्या टीमनं अनेक भागातील 200 हून अधिक किंग कोब्राच्या जीनोम (डीएनए) चा अभ्यास करून या चार प्रजातींचा शोध लावला आहे. त्या प्रजाती अशा आहेत,

- ओफियोफॅगस कलिंगा: भारताच्या पश्चिम घाटात आढळतात.

- ओफियोफॅगस हन्ना: पूर्व पाकिस्तान, उत्तर भारत आणि ईशान्य भारतात आढळतात.

- ओफियोफॅगस बंगारस: भारत आणि चीनमध्ये आढळतात.

- ओफियोफॅगस साल्वाटाना: इंडो-मलेशिया आणि फिलीपाईन्समधील लूजॉन द्वीपसमूहात आढळतात.

अॅंटी-व्हेनम एक्सपर्ट डॉ. मनोज म्हणतात की या शोधामुळे दीर्घ काळापासून असलेल्या गैरसमजांना आव्हान मिळतं आणि किंग कोब्रा सापाबद्दल अधिक चांगल्या पद्धतीनं जाणून घेण्यास मदत होते.

डॉ. मनोज सध्या आयसीएमआर बरोबर रसेल वायपर (घोणस) या अत्यंत विषारी सापाच्या दंशापासून बचाव करण्यासाठी एक खास औषध बनवण्यावर काम करत आहेत.

ते म्हणाले, "या संशोधनातून ही बाब लक्षात आली की किंग कोब्राबद्दल अधिक चांगल्या पद्धतीनं जाणून घेण्यासाठी त्यांचा अभ्यास करत राहणं आवश्यक आहे, यामुळे या आकर्षक सापाविषयी आणखी माहिती समोर येऊ शकेल."

एका नव्या प्रजातीचा शोध

कित्येक शतकांपासून असं मानलं जात होतं की भारतात किंग कोब्राची एकच प्रजाती आढळते. त्याचं नाव ओफियोफॅगस हन्ना असं आहे.

मात्र डॉ. गौरी शंकर आणि त्यांच्या टीमनं दहा वर्षे किंग कोब्रावर संशोधन केलं. त्यांच्या या संशोधनातून समोर आलं की किंग कोब्राची एक खास प्रजाती आहे. ती प्रजाती फक्त पश्चिम घाटात आढळते.

ओफियोफॅगस कलिंगा असं त्या प्रजातीचं नाव आहे. या प्रजातीचे किंग कोब्रा फक्त पश्चिम घाटातच सापडतात. जगात इतरत्र कुठेही ही प्रजाती आढळत नाही.

कर्नाटकातील स्थानिक लोक किंग कोब्राला ज्या नावानं संबोधतात त्या नावावरून "कलिंगा"

हे नाव घेण्यात आलं आहे.

किंग कोब्रा च्या या प्रजातीला "कलिंगा" हे नाव देऊन संशोधकांनी स्थानिक संस्कृती आणि तिथे राहणाऱ्या लोकांसाठी सापाचं जे महत्त्व आहे त्याबद्दल आदर दर्शविला आहे.

डॉ. शंकर म्हणतात, "उत्तर कन्नड सारख्या भागात राहणारे समुदाय किंग कोब्राला घाबरत नाहीत. ते किंग कोब्रा चा आदर करतात."

"कारण किंग कोब्रा इतर सापांना खातात. यात विषारी सापांचादेखील समावेश असतो. या इतर सापांना खाऊन किंग कोब्रा लोकांसाठी तो परिसर सुरक्षित करण्यास मदत करतात."

ते या मुद्द्यावर भर देतात की ओफियोफॅगस कलिंगा या प्रजातीच्या शोधातून ही बाब लक्षात येते की अजूनही अनेक गोष्टी कळायच्या बाकी आहेत आणि ज्या गोष्टींविषयी चांगली माहिती आहे, त्याविषयी देखील बरीच माहिती समोर यायची बाकी आहे.

किंग कोब्राविषयीच्या या शोधातून हे देखील लक्षात येतं की वैज्ञानिक संशोधन आणि निसर्गाला वाचवण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये स्थानिक लोकांचे मुद्दे गांभीर्यानं ऐकण्याची किती आवश्यकता आहे.

याच प्रकारे, फिलीपाईन्स मधील लुजॉन द्वीप समूहात सापडणाऱ्या किंग कोब्राच्या प्रजातीचं नाव "साल्वाटाना" ठेवण्यात आलं आहे. हे नाव तिथल्या स्थानिक लोकांद्वारे वापरण्यात येतं.

डॉ. शंकर म्हणतात, "यानंतर जगभरातील लोकांना किंग कोब्रासाठी स्थानिक लोक ज्या नावाचा वापर करतात, त्या नावाबद्दल कळेल. यामुळे सापांना वाचवण्यासाठी नवे मार्ग शोधण्यास मदत होऊ शकते."

सर्पदंशापासून बचाव करण्यासंदर्भातील आव्हानं

भारतात चार खूपच विषारी साप आहेत. या चार सापांना "बिग फोर" असं म्हटलं जातं. हे साप म्हणजे भारतीय कोब्रा, भारतीय क्रेट (मण्यार), रसेल वायपर (घोणस) आणि सॉ-स्केल्ड वायपर.

भारतात सर्पदंशामुळे होणारे बहुतांश मृत्यू याच विषारी सापांनी चावल्यामुळे होतात.

डॉ. एन एस मनोज आयसीएमआर मध्ये वैज्ञानिक आहेत आणि युनिव्हर्सल स्नेकबाईट एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत.

त्यांच्या मते, देशात सर्पदंशामुळे होणारे जवळपास 90 टक्के मृत्यू याच चार सापांमुळे होतात.

भारतात सर्पदंशावर उपचार करण्यासंदर्भातील एक मोठी समस्या म्हणजे यासाठी पुरेशी औषधं उपलब्ध नाहीत.

भारतात बहुतांश वेळा एकाच प्रकारच्या औषधाचा वापर केला जातो. हे औषध या चारही विषारी सापांनी चावल्यानंतर उपचार करण्यासाठी वापरलं जातं.

मात्र वेगवेगळ्या सापांनी चावल्यावर त्यावर उपचार करण्यासठी खास वेगळं औषध उपलब्ध नाही. किंग कोब्राच्या दंशाबद्दल सांगायचं तर त्याबाबतीत परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते.

डॉ. गौरी शंकर म्हणतात की भारतात किंग कोब्रा चावल्यावर त्यावर उपचार करण्यासाठी कोणतंही विशेष असं औषध उपलब्ध नाही.

भारतात जी औषधं उपलब्ध आहेत ती आणि अगदी थायलंडहून येणारी औषधंदेखील अनेकदा फारशी प्रभावी ठरत नाहीत.

डॉ. शंकर यांना किंग कोब्रा चावल्यानंतर त्यावर उपचार करताना आलेल्या आव्हानांबद्दल त्यांनी सांगितलं.

ते म्हणतात, "सुदैवानं किंग कोब्रानं खूप धोकादायकरित्या दंश केला नव्हता आणि त्यामुळे माझ्या नर्व्हस सिस्टम ला (मज्जासंस्था) कोणत्याही प्रकारचा अपाय झाला नव्हता."

"मात्र तरीदेखील मला खूप आजारी असल्यासारखं वाटत होतं. भारतातील आणि थायलंडहून आणलेल्या अशा दोन्ही औषधांचा प्रभाव माझ्या शरीरावर दिसत नव्हता."

"औषधं प्रभावी ठरत नसल्यामुळे डॉक्टरांनी विषावर उपचार करण्याऐवजी सर्पदंशाच्या लक्षणांवर उपचार करण्यावर भर दिला. ज्याप्रमाणे कोरोनाच्या संकटकाळात सुरुवातीच्या दिवसांमध्ये डॉक्टर रुग्णांच्या लक्षणांवर उपचार करायचे, हे तसंच आहे."

डॉ. शंकर ठामपणे सांगतात, "आपल्याला प्रत्येक प्रकारच्या सर्पदंशावर उपचार करण्यासाठी विशेष औषधांची आवश्यकता आहे. जेणेकरून सर्पदंशावर चांगल्या प्रकारे उपचार करता यावेत."

मात्र किंग कोब्रा चावण्याचे प्रकार 'बिग फोर' सापांनी चावण्याइतके सामान्य नाहीत. मात्र डॉ. गौरी शंकर यांना वाटतं की किंग कोब्राच्या दंशावर उपचार करण्यासाठी एका विशेष औषधाची आवश्यकता आहे.

यामुळे लोकांच्या मनातील किंग कोब्राची भीती कमी होईल आणि किंग कोब्राला देखील संरक्षण मिळेल.

याशिवाय जगभरात किंग कोब्राच्या चार वेगवेगळ्या प्रजातींचा शोध लागल्यामुळे लक्षात आलं आहे की सापाचं विष ही खूपच गुंतागुंतीची गोष्ट आहे.

त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक प्रकारच्या सर्पदंशासाठी विशेष औषधांची आवश्यकता आहे.

विशेष अँटी व्हेनमची आवश्यकता

सापाच्या विषाचा प्रभाव नष्ट करणाऱ्या औषधांची निर्मिती करणं खूपच गुंतागुंतीचं आणि खर्चिक काम असतं.

जागतिक आरोग्य संघटना सातत्यानं सर्वात विषारी सापांनी चावल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना संपवणाऱ्या औषधांची निर्मिती करण्यास प्राधान्य देतं आहे.

भारतात "बिग फोर साप" चावल्यामुळे खूपच जास्त धोका निर्माण होऊ शकतो. मात्र किंग कोब्रा चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या त्या तुलनेत कमी आहे.

डॉ. मनोज आणि डॉ. गणेश यांच्या मते, "याच कारणामुळे किंग कोब्राच्या विषावर उपचार करण्यासाठीचं औषध तयार करण्यास प्राधान्य देण्यात आलेलं नाही."

अलीकडेच किंग कोब्राच्या अनेक प्रजातींचा शोध लागल्यामुळे आणि विशेषकरून ओफियोफॅगस कलिंगा प्रजातीच्या शोधामुळे एका विशिष्ट प्रकारच्या औषधाच्या आवश्यकतेकडे लक्ष वेधलं गेलं आहे.

डॉ. शंकर या गोष्टीवर भर देतात की सध्या भारतात पॉलीव्हॅलेंट अॅंटी व्हेनम आणि थायलंडचं मोनोव्हॅलेंट अॅंटी व्हेनम ही दोन औषधं उपलब्ध आहेत. मात्र ही दोन्ही औषधं या खास प्रजातीच्या सापाच्या विषावर उपचार करण्यासाठी उपयुक्त नाहीत.

ही समस्या दूर करण्यासाठी ओफियोफॅगस कलिंगा सापाच्या विषावर उपचार करण्यासाठी एक मोनोव्हॅलेंट अॅंटी व्हेनम औषध विकसित केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.

याव्यतिरिक्त लोकांमध्ये सापांबद्दल असलेली भीती आणि त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज यामुळे अनेकदा साप मारले जातात.

डॉ. शंकर यांना वाटतं की विशेषकरून किंग कोब्राच्या प्रजातींसाठी प्रभावी मोनोव्हॅलेंट अॅंटी व्हेनम औषध तयार केल्यामुळे त्यांच्याविषयी असलेली भीती दूर केली जाऊ शकते. त्यातून सापांचं संरक्षण करण्यास चालना मिळू शकते.

ते म्हणाले, "त्या सापांपासून कोणताही धोका नाही, हे लक्षात आल्यानं, कदाचित लोक सापांचा आदर करू लागतील. त्यामुळे आपण भविष्यात अशी परिस्थिती तयार करू शकतो जिथे माणूस आणि साप शांततेनं जगू शकतील."

हे औषध विकसित करण्यासाठी येणारा खर्च कमी कसा करता येईल आणि औषधाची निर्मिती करण्याची पद्धत कशा प्रकारे सोपी करता येईल, यावर डॉ. मनोज भर देतात.

यामुळे किंग कोब्राच्या नव्या प्रजातीबरोबरच सापांच्या वेगवेगळ्या प्रजातींसाठी मोनोव्हॅलेंट अॅंटी व्हेनम विकसित करण्यास मदत होईल.

कोब्रा आणि किंग कोब्रामधील फरक

कोब्रा आणि किंग कोब्रा या दोन्ही सापांविषयी बोलताना अनेकदा कोब्रा असंच म्हटलं जातं. प्रत्यक्षात या दोन्ही सापाच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या दोन्ही सापांचा वावर, अधिवास, अन्न आणि वागण्यात फरक असतो.

प्रजाती

कोब्रा नाजा प्रजातीचे असतात. तर किंग कोब्रा ओफियोफॅगस प्रजातीचे असतात.

अधिवास

कोब्रा अनेकदा शेतांमध्ये आणि शहरी भागांशिवाय मानवी वस्त्या असलेल्या परिसरात देखील आढळतात. तर किंग कोब्रा मात्र बहुतांश वेळा घनदाट जंगल, डोंगराळ भाग आणि विरळ मानवी वस्ती असलेल्या भागात आढळतात.

प्रजनन

कोब्रा त्यांच्या अंड्यांचं रक्षण करतात. मात्र ते घरट्यामध्ये अंडी देत नाहीत. त्याउलट किंग कोब्रा अंड्यांसाठी खास प्रकारचं घरटं तयार करतात आणि त्यात अंडी घालून त्यांचं रक्षण करतात.

अन्न

कोब्रा मुख्यत: उंदीर, खार, पक्षी, बेडूक यासारखे छोटे प्राणी खातात. तर किंग कोब्रा सापांनाच खातात. यात कोब्रा, मण्यार, घोणस सारख्या इतर विषारी सापांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या सापांचा समावेश आहे.