‘उपचारांचं आश्वासन देत माझ्यावर 7 वेळा शस्त्रक्रिया केली; पण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं'

- Author, ल्युसी अॅडम्स
- Role, बीबीसी स्कॉटलंड सोशल अफेअर्स कनस्पाँडन्ट
लीन सदरलँड अवघ्या 21 वर्षांची असताना त्यांना मायग्रेनचा त्रास होत होता. त्यावेळी स्कॉटलंडमधील एका डॉक्टरनं तिला शस्त्रक्रिया करून बरं करण्याचं आश्वासन दिलं.
तिला सांगण्यात आलं की, तुला काही दिवस रुग्णालयात राहावं लागेल. उपचाराअंती या आजारातून बरं होण्याची 60 टक्के शक्यता आहे. काही दिवस नव्हे, तर काही महिने ती रुग्णालयात राहिली आणि या दरम्यान डॉ. सॅम एल्जामेल यांनी तिच्यावर सातवेळा शस्त्रक्रिया केली.
डॉ. सॅम एल्जामेल हे यूकेतील राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (NHS) टायसाईडमधील न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख होते. एल्जामेल हे अनेक वर्षांपासून रुग्णांना धोक्यात टाकत होते. आरोग्य विभागानंही त्यांच्या या गोष्टीकडे अक्षरश: दुर्लक्ष केलं होतं.
NHS टायसाईडच्या दाव्यानुसार, एल्जामेल यांच्याबाबत त्यांना 2013 च्या जून महिन्यापासूनच कळलं आणि त्यानंतर त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. मात्र, NHS व्हिसलब्लोअरनं बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, 2009 सालापासूनच आरोग्य विभागाला एल्जामेलबद्दल माहित होतं.
टायसाईडमध्ये एल्जामेल यांच्या हाताखाली काम केलेल्या तीन डॉक्टरांशी बीबीसी स्कॉटलंडनं बातचित केली. हे तिघेही म्हणाले की, एल्जामेल हे दादागिरी करत असत, रुग्णांना इजा पोहोचवण्याची जणू त्यांना परवानगीच होती, असं ते वागत.
आरोग्य विभागात जबाबदारीबाबतच्या पारदर्शकपणात अत्यंत कमतरता होती. परिणामी एल्जामेल हे स्वत:ला ‘ईश्वर’ समजू लागले होते. कारण ते या विभागातील संशोधनासाठी आर्थिक निधी गोळा करत असत.
आरोग्य विभागानं बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, ते स्कॉटीश सरकारच्या मदतीनं एल्जामेल यांच्या हाताखाली उपचार घेतलेल्या प्रत्येक रुग्णाची स्वतंत्रपणे तपासणी करत असून, तोवर कुठल्याही विशिष्ट अशा प्रकरणावर भाष्य करू शकत नाहीत.
‘मी त्याची गिनीपिग होते’
2011 साली शस्त्रक्रिया होण्यापूर्वी लीन सदरलँड पूर्णवेळ काम करत होती. तसंच, देशात आणि देशाबाहेरही मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जात होती. मात्र, मायग्रेनच्या त्रासानं उचल खाल्ली आणि तिच्या आयुष्यानं कलाटणीच घेतली.
सॅम एल्जामेल हे स्कॉटलंडमधील प्रतिष्ठित न्युरोसर्जन म्हणून गणले जात. त्यांनीच तिला सांगितलं की, तुझ्या या आजारावर मी चांगले उपचार करू शकेन.
एक शस्त्रक्रिया होईल आणि त्यानंतर घरी परतता येईल. म्हणजेच काही दिवसांचाच प्रश्न असेल, असं तिला सांगण्यात आलं.

दबाव कमी करण्यासाठी कवटीचा काही भाग काढून टाकला जाईल आणि तिथं होणारी जखम भरून काढण्यासाठी नव्या प्रकारचं गोंद वापरलं जाईल, असं तिला सांगण्यात आलं.
लीन सदरलँड यांनी बीबीसीला सांगितलं की, दुर्दैवानं कवटीचा जो भाग काढून टाकण्यात आला, तिथं नीट उपचार केले नाहीत. जखम उघडीच राहिली. त्यामुळे ती जखम फुटली आणि मेंदूतील द्रव माझ्या मानेच्या मागच्या भागातून बाहेर पडू लागलं.”
लीन सांगतात की, दुसऱ्या दिवशी रुग्णालयातील बेड माझ्या पाठीतून निघणाऱ्या द्रवाने अक्षरश: भिजला होता.
जेव्हा लीन बाथरूममध्ये जाण्यासाठी उठल्या आणि जाऊ लागल्या, तेव्हा त्या कोलमडून पडल्या. त्यावेळी पाठीतून निघणाऱ्या ते द्रव फरशीवर सर्वत्र पसरलं. नर्सन तिथं इशारा देणारा सूचना फलक लावला.
लीन सांगतात की, या प्रकारानंतर माझी आई धावतच एल्जामेल यांना शोधत रुग्णालयाच्या कॉरिडोरच्या भागात गेली आणि त्यांना झाला प्रकार तिनं सांगितलं. त्यानंतर मला पुन्हा शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आलं.
लीन सदरलँड यांनी महिन्यांमागून महिने रुग्णालयात घालवले. दरम्यान तिला मेंदूज्वर होऊन तिला हायड्रोसेफलस झाला. एल्जामेल यांनी तिला चार लंबर पंक्चर देण्याचे आदेश दिले. खरंतर तिच्या मेडिकल नोटमध्ये म्हटलं होतं की, लंबर पंक्चर तिला देऊ नये.

एव्हाना लीन सदरलँड यांना कळलं की, एल्जामेल हे ते गोंद संशोधनाचा भाग म्हणून वापरत आहे.
“तो माझ्यावर प्रयोग करत होता. तो तेच करत होता. गोंद वापरण्याचं इतर कुठलंच कारण असू शकत नाही. तो माझ्यावर प्रयोगच करत होता. मी त्याची गिनीपिग होती,” असं लीन सदरलँड म्हणतात.
लीन पुढे म्हणतात की, “त्याच्याकडे माझ्या शरीराचं पूर्ण नियंत्रण होतं. तो स्वत: ईश्वर असल्यासारखं माझ्या शरीराशी वागत होता. NHS ने मला सातवेळा त्याच्याकडे सोपवलं होतं”
जेव्हा लीन यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी याबाबत काळजी व्यक्त केली, तेव्हा तिला सांगण्यात आलं की, एल्जामेल यांनी तिचा जीव वाचवला आहे. तिच्यापासून हे लपवण्यात आलं की, एल्जामेल यांची चौकशी सुरू आहे आणि नंतर त्यांची हकालपट्टीही करण्यात आली.
बीबीसीचं यासंदर्भातील वृत्तांकनं पाहिल्यानंतर लीन यांच्या लक्षात आलं की, ती एकटी नाहीय.
एक-दोन नव्हे, 100 रुग्णांना नुकसान
लीन सदरलँड आता 33 वर्षांच्या आहेत. सतत वेदना सहन करत त्या जगतायेत. चालण्यासाठी त्यांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. पाठीच्या कण्यातून निघणारा द्रव रोखण्यासाठी एक ट्यूब टाकण्यात आलीय.
“सर्वकाही बदललंय. मला पोलीस अधिकारी बनायचं होतं. पण ते स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही,” असं लीन म्हणतात.
“तुम्हाला हवं तसं करिअर न मिळणं, तुम्हाला हवी तशी लाइफस्टाइल न मिळणं, मुलं होऊ न शकणं, या सर्व गोष्टींशी मानसिक संघर्ष करत जगू पाहतेय,” असं त्या म्हणतात.
माझी काहीही चूक नसताना बऱ्याच गोष्टी हिरावल्या गेल्या, असं त्या म्हणतात.
एल्जामेल यांनी नेमकं काय केलंय, याची चौकशी लीन सदरलँड यांच्यासह सुमारे 100 रुग्णांनी केलीय.

लीनसह या सर्व रुग्णांना एल्जामेल यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई कुठल्याच प्रकारे भरून काढता येऊ शकत नाही. मात्र, या सगळ्यांना वाटतं की, आरोग्य विभागाच्या जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे, पारदर्शकता वाढली पाहिजे. जेणेकरून इतर कुठलाही डॉक्टर कधीच कुठल्या रुग्णाला असं नुकसान पोहोचवणार नाही.
लीन म्हणतात, बीबीसी स्कॉटलंडवर बातमी पाहिल्यानंतर लक्षात आलं की, “एल्जामेलनं अनेक रुग्णांना नुकसान पोहोचवलंय. आधी वाटत होतं, मी एकटीच आहे, पण माझ्यासारखे आणखी 99 जण असे आहेत, हे नंतर कळलं.”
त्या हतबलतेनं म्हणतात की, एल्जामेल रक्तानं माखलेले हात धुवून घरी जात कसा होता, हे कळत नाही.
व्हिसलब्लोअर
NHS टायसाईडनं एल्जामेल यांची अंतर्गत आणि बाह्य चौकशी केल्यानंतर 2013 साली निलंबित केलं. एळ्जामेल हे आता लिबियात काम करतात.
सर्वप्रथम एल्जामेल यांच्यासोबत काम करणारे तिघेजण बीबीसीशी बोलले.
मार्क (नाव बदललं आहे) म्हणतात की, “मी आता बोलतोय, कारण आरोग्य विभागानं यातून अजूनही धडा घेतलेला दिसत नाहीय. मी त्याही वेळी आवाज उठवला होता. पण मला गप्प केलं गेलं. त्यांच्या टीमचा भाग असल्याची लाज वाटते. पण मी त्यावेळी काहीच करू शकत नव्हतो. कारण मी तिथं कनिष्ठ होतो.”
आम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला होता, असंही मार्क सांगतात.
ते पुढे म्हणतात की, “नर्स, वरिष्ठ डॉक्टर आणि मॅनेजर्सना तर 2009 च्या सुमारासच कळलं होतं की, एल्जामेल रुग्णालयाचं काम सोडून इतर खासगी ठिकाणी काम करतात आणि तेही जेव्हा त्यानं रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करणं अपेक्षित आहेत.”
प्रशिक्षण नसलेल्या कनिष्ठ डॉक्टरांच्या जबाबदारीवर रुग्णांना अनेकदा एल्जामेल यांनी सोडलं होतं, असं मार्क सांगतात.
“वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात नसताना कनिष्ठ डॉक्टरला रुग्णांना हाताळू देणं, हे निष्काळजीपणाचं आहे. NHS टायसाईडनं डंडीमध्ये अशा बऱ्याच गोष्टींवर पांघरून टाकलंय,” असंही मार्क म्हणतात.
तसंच, हा सर्व प्रकार आरोग्य विभागापर्यंत पोहोचला होता, असंही ते सांगतात.
‘त्यांना कुणीही हात लावू शकत नव्हतं’
मार्क सांगतात की, एकदा एल्जामेल यांच्या अख्त्यारित येणाऱ्या रुग्णावर कनिष्ठ डॉक्टरनं सर्जरी केली आणि त्याच्या हातून चूक झाली. परिणामी रुग्णाच्या पाठीच्या कण्याला कधीही भरून निघणार नाही, असं नुकसान झालं.
त्यावेळी काय केलं गेलं असेल, तर झाला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचं मार्क म्हणतात.
तिन्ही डॉक्टर म्हणतात की, एल्जामेल हे रुग्णाचे एक्स-रे काढू देत नसत. कारण एकतर ते खूप अहंकारी होते आणि दुसरं म्हणजे, अशानं त्यांचे पैसे वाचत.
एल्जामेल यांनी चुकीच्या पद्धतीने रुग्णावर उपचार केल्यानं 70 हून अधिक रुग्णांना मणक्याचा कायमचा त्रास सुरू झालाय, असे ते सांगतात.
एल्जामेल यांना ‘कुणीही हात लावू शकत नव्हतं’, कारण ते संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून आरोग्य विभागासाठी निधी आणत असत.

NHS टायसाईडचे प्रवक्ते म्हणतात की, “NHS टायसाईडचे वैद्यकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी हे कॅबिनेट सेक्रेटरी आणि स्थानिक टायसाईड एमएसपींना एप्रिलमध्ये भेटले. त्यांनी एल्जामेल यांनी उपचार केलेल्या रुग्णांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
“या चर्चेत असं ठरलं की, एल्जामेल यांनी उपचार केलेल्या सर्व रुग्णांशी थेट संपर्क करून, त्यांना सर्व तऱ्हेचा आधार देण्यासाठी एनएचएस टायसाईड आरोग्य विभाग आणि सरकारसोबत काम करेल.”
मात्र, “विशिष्ट कुठल्या रुग्णावर आणि त्याच्यावरील उपचारावर खासगीपणाच्या कारणास्तव आता आम्ही काही भाष्य करू शकत नाही. आम्ही लीन सदरलँड यांना एनएचस टायसाईडच्या पेशंट रिस्पॉन्स टीमशी संपर्क करण्याचं आवाहन करतो,” असंही प्रवक्ते म्हणाले.











