डॉ. तात्याराव लहाने : ‘माझ्यावर शस्त्रक्रिया चोरीचा आरोप झाला, आता जेजेमध्ये परत जायची इच्छा नाही’

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईतील नामांकित सर जे जे सरकारी रुग्णालयातील 9 डाॅक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांच्यासह विविध पदांवर काम करणाऱ्या 9 वरिष्ठ डाॅक्टरांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.
तर दुसऱ्याबाजूला राजीनामे दिलेल्या या वरिष्ठ डाॅक्टरांवर आरोप करत नेत्ररोग विभागात काम करणाऱ्या निवासी डाॅक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.
मार्डच्या 28 निवासी डाॅक्टरांनी डाॅ. तात्याराव लहाने आणि डाॅ. रागिणी पारेख यांच्यावर गंभीर आरोप करत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया.
राजीनामा दिलेल्या डाॅक्टरांच्या मागण्या काय आहेत?
1. सर जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर कारवाई व्हावी.
2. निवासी डाॅक्टरांनी भडकवणाऱ्या डाॅ. सार्बिक डे, डाॅ. स्मृती पांडे आणि डाॅ. संस्कृती प्रसाद यांचे पीजी रजिस्ट्रेशन रद्द करून त्यांना समज द्यावी.
3. डाॅ. रागिणी पारेख यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी.
4. सर्व अध्यापकांचे राजीनामे मंजूर करून त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे.
शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप झाल्यानं मी उद्विग्न झालोय - डॉ. लहाने
डॉ. तात्याराव लहाने यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू मांडली.
डॉ. लहाने म्हणाले की, "आजही रुग्णालय प्रशासनाने आमची बाजू ऐकून घेतलेली नाही. रुग्ण तपासणे आणि त्यांची हिस्ट्री लिहिणं निवासी डॉक्टरांना कारकुनी काम वाटतं. एका वर्षापूर्वी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांना काही शस्त्रक्रिया करायला देतो."
"31 तारखेला राजीनामे दिलेले आहेत. तरीही अधिष्ठाता म्हणतात, राजीनामा मिळालेला नाही. त्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे," असं डॉ. लहाने म्हणाले.
डॉ. लहाने म्हणतात की, "आमच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप झाला. हे ऐकून मी उद्विग्न झालो. आम्ही 30 पिढ्या घडवल्या."
आमचा एकेरी उल्लेख करतात, असं म्हणत डॉ. लहाने पुढे सांगतात की, "इथे बसलेले सर्व डॉक्टर प्रत्येकी एका पीजी विद्यार्थ्याला गाईड करतात. तरीही आरोप केला जातो. हे दु:खद आणि क्लेषदायक आहे. गरीब रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडे येतात. आम्ही गेल्या 36 वर्षांपासून त्यांना दृष्टी देत आहोत. आमच्यासमोर त्यांची दृष्टी जाण्यापेक्षा आम्ही राजीनामा दिला. आम्ही कोणाच्याही शस्त्रक्रिया चोरलेल्या नाही. जेजे रुग्णालयात आम्हाला परत जायचं नाही."
"मी 67 वर्षांचा आहे. मी काही नंबर्ससाठी हे करत नाही. सेवा म्हणून करत आहोत. विद्यार्थ्यांना आम्ही माफ केलं. त्यांना आमची गरज असेल तर आम्ही त्याना शिकवू. त्यांच्यावर कारवाईची मागणी नाही. आम्हाला कार्यमुक्त करावं," असंही डॉ. लहाने म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
'आमचा शैक्षणिक आणि मानसिक छळ होतो'
सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डाॅक्टरांना अनुभव मिळावा यासाठी काही वर्षं निवासी डाॅक्टर म्हणून काम करावे लागते. देशभरात सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने विविध विभागांत निवासी डाॅक्टर कार्यरत आहेत.
राज्यातील निवासी डाॅक्टरांची संघटना म्हणजे महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्ड.
सर जे जे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागातील मार्डच्या निवासी डाॅक्टरांनी आपल्या विभागातील वरिष्ठ डाॅक्टरांविरोधात बेमुदत संप पुकारत त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.
या तक्रारीनंतरच या विभागातील 9 वरिष्ठ डाॅक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यात डाॅ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डाॅ. प्रीतम सामंत, डाॅ. शशी कपूर, डाॅ. स्वरंजीत भट्टी, डाॅ. अश्वीन बाफना, डाॅ. दीपक भट, डाॅ. सायली लहाने, डाॅ. हेमालीनी मेहता या डाॅक्टरांचा समावेश आहे.
निवासी डाॅक्टरांनी आपल्या पत्रकार परिषदेत डाॅ. तात्याराव लहाने आणि डाॅ. रागिणी पारेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
निवासी डाॅक्टर म्हणतात, "ते हुकुमशाहीप्रमाणे त्यांचा विभाग चालवतात. तिथे कोणत्याही गाईडलाईन्सचे पालन केले जात नाही. युनीट सिस्टम नाही. बोलताना आमच्याशी, महिला डाॅक्टरांशी आरोपी असल्याप्रमाणे भाषा वापरली जाते."
"पुरुष आणि महिला डाॅक्टरांनी अपमानास्पद वागणूक दिली जाते. शिवराळ भाषेत त्यांच्याशी बोललं जातं," असाही आरोप निवासी डाॅक्टरांनी केला आहे.
"डाॅ. लहाने नीवृत्त असूनही जेजेमध्ये येऊन ते शस्त्रक्रिया करतात. तसंच त्यांचा मुलगाही ज्यांना रुग्णालयात कोणतीही पोस्ट नाही ते सुद्धा शस्त्रक्रिया करतात," असंही निवासी डाॅक्टरांचं म्हणणं आहे.
ते पुढे सांगतात," डाॅ. लहाने यांना पद्मश्री मिळाला, त्यांच्या नावाने गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड जातोय. पण अशी रेकाॅर्ड सिस्टम सुरू केली तर देशासाठी धोका आहे. मग प्रत्येक विभाग प्रमुख रेकाॅर्डचाच विचार करेल."

फोटो स्रोत, Sharadul Kadam/BBC
या संदर्भात मार्डने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही तक्रार केली आहे.
"आमच्या तक्रारीनंतर नेमलेल्या चौकशी समितीचा अहवालही हेच सांगतो. चौकशी समितीने आमच्या बाजूने अहवाल दिला आहे," असा दावाही मार्डच्या डाॅक्टरांनी केला आहे.
तसंच या तक्रारी गेल्या 20-22 वर्षांपासूनच्या आहेत. या विरोधात नेहमी संप होत आलाय, पण राजकीय दबावाखाली संप दाबला जातो. त्यावेळी डाॅ. लहाने स्वतः अधिष्ठाता होते त्यामुळे प्रकरण दाबलं जात होतं, असाही मार्डच्या डाॅक्टरांच्या आरोप आहे.
निवासी डाॅक्टरांना शिकण्याची संधी मिळत नसून शस्त्रक्रिया पाहायला, शिकायला मिळत नाही हा या निवासी डाॅक्टरांचा मुख्य आक्षेप आहे.
"आम्ही पूर्वीच्या काही निवासी डाॅक्टरांशी बोललो. त्यांना सर्जरी शिकण्यासाठी नंतर पुन्हा फेलोशिप कराव्या लागल्या. एक डाॅक्टर इथे 15 वर्षांपासून आहेत त्याना कॅटॅरॅक्ट बेसिक शस्त्रक्रिया पाहायला सुद्धा मिळाली नाही," असंही निवासी डाॅक्टर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
देशातील निवासी डाॅक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेने आणि इंडियन मेडिकल असोसिएशननेही निवासी डाॅक्टरांच्या या तक्रारींची दखल घेतली असून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
डाॅ. तात्याराव लहाने आणि डाॅ. रागिणी पारेख यांचा राजीनामा मंजूर करावा आणि नवीन डाॅक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी निवासी डाॅक्टरांनी केली आहे.
डाॅक्टरांनी राजीनामे का दिले?
जे जे रुग्णालय हे राज्यातील एक नामांकित सरकारी रुग्णालय आहे. राज्यभरातून रुग्ण इथे उपचारासाठी येतात.
या रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाही राज्यात प्रसिद्ध असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील रुग्ण याठिकाणी येतात.
डाॅ. तात्याराव लहाने यांनी गेली अनेक वर्षं या विभागाचं नेतृत्त्व केलं. आता ते निवृत्त असून सरकारच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या अभियानाचे काम पाहत आहेत.
डाॅ. लहाने यांच्यानंतर डाॅ. रागिणी पारेख या त्यांच्या सहकारी या विभागाचं काम पाहत होत्या. परंतु काही दिवसांपूर्वी याच विभागात काम करणाऱ्या 28 निवासी डाॅक्टरांनी डाॅ. लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ डाॅक्टरांविरोधात तक्रारी केल्या आहेत.
या तक्रारीनंतर रुग्णालयाकडून एक चौकशी समिती नेमण्यात आली.
यासंदर्भात आपल्या पत्रात हे 9 डॉक्टर्स म्हणतात, 'नेत्र विभागातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निवासी डाॅक्टरांच्या तक्रारींवर आम्ही सरकारला उत्तर दिलं आहे.
1995 पूर्वी दररोज 30 रुग्ण येणाऱ्या विभागात आज रोज 300 - 400 रुग्ण येत आहेत.
याची दखल घेत केंद्र सरकारने 2008 मध्ये या विभागाला 'विभागीय नेत्रचिकित्सा संस्थेचा' दर्जा दिला. इथे राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येतात.

फोटो स्रोत, Facebook
मोतीबिंदू, काचबिंदू, वैद्यकीय, रॅटीना, लेसिक, बुब्बुळावरील शस्त्रक्रिया, तिरळेपणा, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार, डोळ्यांचा कर्करोग यावर या विभागामार्फत उपचार दिले जातात. अशा गंभीर आजारांवर तज्ज्ञांमार्फत उपचार देणारा हा राज्यातील एकमेव सरकारी विभाग आहे.
गेल्या 28 वर्षांत 692 शिबिरामध्ये 30 लाख रुग्णांवर उपचार केल्याचा दावा या विभागाने केला आहे.'
2016 मध्येही या विभागातील निवासी डाॅक्टरांनी संप पुकारला होता. पण 12 पैकी 11 डाॅक्टरांनी माफी मागून त्यांची तक्रार मागे घेतली होती. त्यावेळीही आमच्यावर अन्याय झाला पण रुग्णांसाठी आम्ही तो सहन केला असं राजीनामा देताना डाॅक्टरांनी म्हटलं आहे.
22 मे रोजी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 28 निवासी डाॅक्टरांनी मार्ड संघटनेमार्फत जेजे रुग्णालयातील अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांच्याकडे तक्रार केली आहे.
यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने नेत्र विभाग प्रमुखांकडे स्पष्टीकरण मागितले. परंतु स्पष्टीकरण देण्यापूर्वीच चौकशी समिती नेमली असा आक्षेपही वरिष्ठ डाॅक्टरांचा आहे.
या समितीवर 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेले डाॅ. अशोक आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरही डाॅक्टरांचा आक्षेप आहे.

फोटो स्रोत, Facebook
राजीनामा दिलेल्या डाॅक्टरांपैकी एक डाॅ. रागिनी पारेख यांनी यापूर्वी एका महिलेच्या छळाप्रकरणात डाॅ. अशोक आनंद यांची चौकशी केली आहे. तसंच त्यांनी डाॅ. लहाने, डाॅ. रणजीत माणकेश्वर, डाॅ. एकनाथ पवार, डाॅ. श्रीमती अभीचंदानी यांच्याविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.
या पार्श्वभूमी डाॅ. आनंद यांची समितीच्या अध्यक्षपदावर केलेली नियुक्ती अधिष्ठात्यांनी आकसबुद्धीने आम्हाला त्रास देण्यासाठी केली आहे असाही आरोप राजीनामा दिलेल्या डाॅक्टरांनी केला आहे.
तसंच अधिष्ठात्यांनी नेत्रचिकित्सा विभागाला गेल्या वर्षभरात कोणतीही मदत केलेली नाही, अशीही डाॅक्टरांची तक्रार आहे.
डाॅ. तात्याराव लहाने हे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या सरकारच्या अभियानावर काम करत आहेत. परंतु रुग्णालयाने त्यांचे वेतन दिलेले नसून उलट शासकीय निवासस्थानासाठी त्यांना सात लाख रुपयांचा दंड द्यायला सांगून निवासस्थान रिक्त करण्यास सांगितलं, असाही आरोप करण्यात आला आहे.
डाॅ. लहाने यांच्या मुलावरही आरोप
डाॅ. लहाने यांचा मुलगा सुमित लहाने यांची जेजे रुग्णालयात कोणत्याही पदावर नियुक्ती नसूनही ते रुग्णावर शस्त्रक्रिया करतात, असा आरोप निवासी डाॅक्टरांनी केला आहे.
या आरोपाला अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, "डाॅ. सुमित लहाने यांची 120 दिवसांची नियुक्ती गेल्यावर्षी मार्च महिन्यात संपली आहे. यानंतर ते आजही या विभागात कार्यरत आहेत हे आम्हाला कळवलं गेलं नाही. ही तक्रार पहिल्यांदाच निवासी डाॅक्टरांकडून आलेली आहे."
"आम्ही अधीक्षकांच्या सुपरविजनअंतर्गत एक समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार एक डाॅक्टर ज्यांची नियुक्ती नसताना ते काम करत होते. कॅटरॅक्टसारखी शस्त्रक्रिया करत होते. तसंच कधीकधी एकटेच निवासी डाॅक्टरांना शिकवत होते. विभाग प्रमुखांच्या संमतीने हे करत असतील तर त्यांच्याकडून आम्ही स्पष्टीकरण मागवू," असं सापळे पुढे म्हणाल्या.
तसंच डाॅक्टरांच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं, "एकही राजीनामा हा सरकारी विहित पद्धतीत नाही. डाॅ. तात्याराव लहाने यांचं पद ग्रँट मेडिकल किंवा जेजे हाॅस्पिटलमध्ये नाही आहे. त्यांची नियुक्ती सचिव कार्यालयातून झाली आहे. त्यांचं मानधन अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयातून येतं."
डाॅ. लहाने यांचा जेजे आस्थापनेशी काहीही संबंध नसल्याने त्यांच्या कार्यालयाला त्यांचा राजीनामा आम्ही पाठवू, असंही डाॅ. सापळे यांनी स्पष्ट केलं.
डाॅ. तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं.
ते म्हणाले, "माझा मुलगा सुमित लहाने त्याची नियुक्ती मार्च 2022 पर्यंत होती, पण काही लहान मुलांच्या डोळ्याच्या कँसरची ट्रिटमेंट बाकी होती त्यासाठी माझ्या सांगण्यावरून तो येत होता. यासाठी गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवणार असतील तरी चालेल. माझ्या मुलाला रुग्णांच्या सेवेसाठी जेलमध्ये पाठवणार असतील तर मी अभिमानाने जाईन."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








