तुम्हाला इतका थकवा का येतोय? जाणून घ्या या थकव्याची कारणं आणि त्यावर उपाय

फोटो स्रोत, Getty Images
आजकाल बरेचसे लोक थकलेले, दुःखी, निराशेच्या गर्तेत बुडालेले दिसतात. असे कित्येक लोक आहेत जे त्यांची नेहमीची कामं करूनच खूप थकतात. त्यामुळे इतर कोणत्या गोष्टी करण्याची उर्मीच त्यांच्यात राहत नाही.
लहानसहान कामं करणं देखील त्यांच्यासाठी कंटाळवाणं होऊन जातं. त्यांच्या शरीरात त्राणच उरलेलं नाहीये असं वाटतं. जगण्यात एक जडपणा येऊन जातो.
आता ब्रिटनच्या अॅना कॅथरीना शॅफनर यांचंच उदाहरण घ्या. त्यांना नेहमी थकवा आलेला असतो. शरीरात काही ताकदच उरलेली नाही असं त्यांना सतत जाणवायचं.
अॅना घरकाम करूनच इतक्या थकायच्या की ऑफिस मध्ये जाऊन काम करणं त्यांच्यासाठी खूप अवघड झालं होतं
अॅना सांगतात की, त्या जेव्हा जेव्हा आपला थकवा दूर करण्यासाठी बसायच्या तेव्हा तेव्हा हातात फोन घ्यायला विसरायच्या नाहीत.
जणू काही त्यांचा थकवा दूर करणारी एखादी टीप त्यांच्या मेलवर येणार आहे. अॅना सांगतात की, त्यांना बेजार झाल्यासारखं वाटायचं. सर्व आशा अपेक्षांचा भंग झालाय असं वाटायचं.
आज जगात असे कित्येक लोक आहेत ज्यांची अवस्था अॅनासारखी झाली आहे. यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. जसं की गायिका मारिया कॅरी ...
हा थकव्याचा आजार आता बळावलाय. लोक म्हणतात की, या नव्या युगातला एक रोग आहे.
आज टीव्हीवर अनेक वादविवाद सुरू असतात. यात असं म्हटलं जातंय की, हा आजार आपल्यासाठी विनाशकारी ठरेल.
पण हे खरं आहे का? की मग ही तात्पुरती सुस्ती आहे? हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे का?

फोटो स्रोत, Alamy
अॅना शॅफनर ब्रिटनच्या केंट विद्यापीठात वैद्यकशास्त्राच्या इतिहासकार म्हणून काम करतात. त्यांनी या थकव्याचं मूळ शोधून काढायचं ठरवलं.
यातून एक पुस्तक जन्माला आलं. या पुस्तकाचं नाव आहे 'एग्जॉशन : ए हिस्ट्री' (Exhaustion: A History). हे पुस्तक खूपच मनोरंजक आहे.
या पुस्तकात मानवी थकवा, शरीरात ताकद नसणे आणि मानसिक थकवा कसा ओळखायचा याविषयी डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ञांना मार्गदर्शन करण्यात आलंय.
आजच्या जगात थकवा ही एक गंभीर समस्या आहे यात शंका नाही. आणि आरोग्यासाठी हा थकवा खूप हानिकारक ठरू शकतो.
जर्मनीतील डॉक्टरांचं सर्वेक्षण केल्यानंतर असं आढळून आलं की, सुमारे पन्नास टक्के डॉक्टरांना थकवा जाणवतो.
यापैकी बऱ्याच जणांना नेहमीच थकल्यासारखं, सुस्तपणा जाणवतो. त्यांना कामात अजिबात रस वाटत नाही. कामाचा विचार मनात येताच शरीरातील ताकद संपलेली असते.
पण एका सर्वेक्षणानुसार, स्त्रिया आणि पुरुष त्यांचा थकवा वेगळ्या पद्धतीने हाताळतात.

फोटो स्रोत, Alamy
पुरुष थकव्यामुळे खूप जास्त सुट्ट्या घेतात. त्यांच्या तुलनेत स्त्रिया थकव्याचा सामना करण्यासाठी कमी सुट्ट्या घेतात.
अॅना शॅफनर सांगतात की, काम न करण्याच्या या प्रकाराकडे लोक वेगवेगळ्या पद्धतीने बघतात.
काही लोक याला श्रीमंतांची डोकेदुखी असल्याचं म्हणतात. एका जर्मन वृत्तपत्रानुसार श्रीमंत लोकांनी नैराश्याला हे एक नवं नाव दिलंय.
जेव्हा त्यांना काम करायचं नसतं तेव्हा ते त्याला बर्नआउट म्हणतात. यशस्वी लोकांना आपण नैराश्याचे बळी ठरलोय हे दाखवून द्यायचं नसतं.
त्यामुळेच ते बर्नआउट हा शब्द वापरतात. दुसरीकडे जे अपयशी ठरतात त्यांना नैराश्याचे बळी ठरवलं जातं.
पण तज्ञ सांगतात की, नैराश्य आणि थकवा या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. नैराश्यात असताना लोकांचा आत्मविश्वास कमी होतो.
किंवा ते स्वतःचा द्वेष करू लागतात. त्याचवेळी थकवा आलेल्या लोकांना असं वाटत नाही. त्यांचं स्वतः बद्दलचं मत तेच असतं.

फोटो स्रोत, Alamy
अॅना शॅफनर म्हणतात की, थकवा असताना राग येणं म्हणजे कामाच्या वातावरणाविरुद्ध बंड करणं होय.
अॅना सांगतात त्याप्रमाणे बर्नआउट आणि थकवा यात खूप फरक आहे. थकव्यामुळे लोकांना जास्त वेळ काम करावंसं वाटत नाही.
काही लोक म्हणतात की आधुनिक सभ्यतेच्या या वातावरणात काम करायला मानवी मन तयार नाहीये.
लोकांवर अधिकाधिक काम करण्याचा, नवीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दबाव असतो.
काही लोकांना तर आपण या कामासाठी सक्षम आहोत हे सिद्ध करावं लागतं.
म्हणजेच तुमच्यासाठी रोजचा संघर्ष पुढ्यात वाढून ठेवलेला असतो. तुमच्यावर कामाचा, काहीतरी नवीन करण्याचा दबाव असतो. यातून दडपण, तणाव निर्माण होतो. आणि तणावामुळे थकवा येतो.
अनेक लोकांवर कामाव्यतिरिक्त घरातील परिस्थितीचं दडपण असतं. प्रत्येक वेळी काही ना काही आव्हानं येतच असतात.

फोटो स्रोत, Alamy
पण आयुष्याचं चक्र कधीच कोणासाठी थांबत नाही. अशातच त्या व्यक्तीला विश्रांतीची संधी मिळत नाही. विश्रांती मिळाली नाही की अजिबात ताजंतवानं वाटत नाही.
मग आपला मेंदू चालत नाही. आपल्या शरीराला चालवणारी बॅटरी पूर्णपणे रिचार्जच होऊ शकत नाही.
पण अॅना यांनी जेव्हा थकव्याच्या इतिहासावर संशोधन केलं तेव्हा त्यांना आढळून आलं की प्राचीन काळातही मानवांना या आजाराचा सामना करावा लागला होता.
याचा सर्वात पहिला उल्लेख रोमन डॉक्टर गॅलेन यांनी केलेला आढळतो.
ग्रीक डॉक्टर हिप्पोक्रेट्स आणि गॅलेन या दोघांना असं वाटायचं की मन आणि शरीराच्या रोगांचं मूळ रक्त, पित्त आणि कफ प्रकृतीमध्ये सापडू शकतं.
शरीरात काळ्या रंगाचं पित्त जमा झालं म्हणजे मेंदूच्या मज्जातंतूंचा मार्ग बंद झाल्याचं मानलं जात होतं.
आज मेंदू थकून जात आहे. मात्र या मीमांसेला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये.
पण जेव्हा केव्हा थकवा जाणवतो तेव्हा मनावर दडपण आल्याची जाणीव निर्माण होते.

फोटो स्रोत, Alamy
युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माची रुजवात सुरू होती त्या काळात जेव्हा लोक थकवा येत असल्याच्या तक्रारी करायचे तेव्हा त्यांच्यात आध्यात्मिक शक्तीची कमतरता असल्याचं कारण सांगितलं जायचं.
थकवा आलेले लोक धर्मापासून दुरावलेत असं मानलं जात होतं. त्या काळातील एक ख्रिस्ती धर्माप्रचारक इव्हॅग्रियस पॉन्टिकस यांनी लिहून ठेवलंय की, त्यांना दुपारच्या वेळी भूतप्रेत दिसायचे.
त्यानंतर ते खिडकीजवळ बसून राहायचे. त्यांना काहीच करावंसं वाटायचं नाही.
त्यांच्या मते, त्यांच्या मनातील धार्मिक विश्वास आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे या गोष्टी घडत होत्या.
अशाच एका ख्रिस्ती धर्माप्रचारकाचा किस्सा आहे. ते नेहमीच आपल्या मित्रमंडळींशी गप्पा मारण्यात मश्गूल असायचे. त्यांना कोणतही काम करू वाटायचं नाही.
आजकाल काही लोकांना थकवा जाणवतो म्हणून ते मोबाईलमध्ये व्यग्र असतात. असेच लोक पूर्वीही असल्याचं अॅना सांगतात.
आज डॉक्टर या आजाराला 'न्यूरास्थेनिया' म्हणतात.
त्यांच्या मते, मेंदूतून येणारे विद्युत संकेत शरीराच्या इतर भागात जातात. ज्या व्यक्तीच्या नसा कमकुवत झालेल्या असतात त्यांच्यापर्यंत हे संकेत जाऊ शकत नाहीत.

फोटो स्रोत, Thinkstock
त्यामुळेच त्यांना काही करावंसं वाटत नाही. ऑस्कर वाइल्ड, चार्ल्स डार्विन, थॉमन मॅन आणि व्हर्जिनिया वुल्फ यांसारखे अनेक प्रसिद्ध लोक 'न्यूरास्थेनिया'ला बळी पडले होते.
युरोपातील औद्योगिक क्रांतीमुळे समाजात काही बदल झाले. या बदलामुळे लोक या आजाराला बळी पडल्याचं डॉक्टरांचं म्हणणं होतं.
त्यांच्या नाजूक नसामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देत होते. तसं पाहिलं तर खूप कमी देशांनी 'न्यूरास्थेनिया' या आजाराला मान्यता दिली आहे.
पण चीन आणि जपानमधील डॉक्टर त्याचा भरपूर वापर करतात. शिवाय हे नैराश्याचं दुसरं नाव असल्याचंही सांगतात.
त्यामुळे आता हे तर स्पष्ट आहे की, लोकांना शतकानुशतके कंटाळा, वातावरणाचा कंटाळा आणि बेजार झाल्याचं जाणवतं आहे.
मानवी विकासाच्या वेगवेगळ्या कालखंडात त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण थकवा हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालाय.
मध्ययुगात दुपारच्या वेळी भुतप्रेत दिसायचे. कारण 20 व्या शतकात भांडवलशाहीच्या विकासाबरोबरच लोक शोषणाला देखील बळी पडले होते.

फोटो स्रोत, Getty Images
आणि आजही आपल्याला थकवा येण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत हे आपण समजून घेत नाही.
बऱ्याचदा हा थकवा अचानक निघून जातो. आपल्याला त्याची लक्षणेसुद्धा जाणवत नाहीत.
आपल्याला थकवा आजूबाजूच्या वातावरणामुळे जाणवतोय की आपल्याच वागणुकीचा परिणाम आहे हेही आपल्याला कळत नाही.
कदाचित या सर्वांची सांगड घालूनच थकव्याचं रहस्य उलगडत असेल. आपल्या भावना, आपल्या विश्वासांचा आपल्यावर खोलवर परिणाम होतो.
भावनिक वेदनांमुळे आपल्याला त्रास होतो हे देखील आपल्याला माहीत असतं.
बऱ्याचदा तर या त्रासामुळे आपल्याला फीट येते. थकव्यामुळे डोळ्यांसमोर अंधार दाटतो.
अॅना शॅफनर सांगतात की, एखादा आजार मानसिक आहे की शारीरिक हे खात्रीने सांगता येत नाही. हे दोन्हींच मिश्रण देखील असू शकतं.
कधीकधी तर थकव्यामुळे आपण इतके बेजार होऊन जातो की आपलं शरीर सुन्न होऊन जातं. आता हा तुमचा विचार असू शकतो किंवा सत्य देखील असू शकतं.
अॅना यांच्या मते, आज खूप साऱ्या लोकांना थकवा जाणवतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही समस्या आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहे.
कामाच्या अधिक संधी उपलब्ध झाल्याने लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहेत. त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे.
मग या कामाचा ताण येतो. तणावामुळे थकवा येतो आणि शरीरातील शक्ती संपू लागते.
अॅना यांना वाटतं की, वारंवार मेल तपासणे, सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करणे यामुळेही आपण थकतो.
त्यांच्या मते, नवीन तंत्रज्ञानामुळे जीवन सोपं झालंय तसंच त्यामुळे अनेक समस्याही उद्भवल्या आहेत.
आजकाल लोक आपल्या ऑफिसचं ओझं, दडपण मनात घेऊन घरी जातात. सतत मेल चेक करून ते स्वतःला त्या दडपणाची आठवण करून देतात. मग यामुळे थकवा येणार हे निश्चित आहे.
थकवा आणि कंटाळा घालवण्यासाठी कोणताही ठोस उपाय सापडलेला नाहीये. काही लोक मानसोपचार तज्ञांची मदत घेतात. काही लोक सुटी घेऊन हा थकवा दूर करतात.
तेच, काही लोक कुटुंब-मित्र-नातेवाईकांसह वेळ घालवून थकवा दूर करतात.
अॅना म्हणतात की, तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे थकता आणि कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला काम करण्याची उमेद मिळते हे तुम्हाला माहिती असायला हवं.
काही लोक खेळ खेळून थकवा दूर करतात. पण आपल्याला काम आणि आराम या दोन्ही गोष्टींमध्ये एक लक्ष्मण रेषा ओढावी लागेल.
या संदर्भातील अभ्यास करून स्वतः अॅनाला ही मदत मिळाली आहे.
म्हणजे प्रत्येकाला थकवा येण्यामागचं कारण वेगळं आहे. तुम्हाला एकट्यालाच ही आजार झालेला नाहीये. पण हा आजार दूर करण्यासाठी तुम्ही तुमचा तुमचा पर्याय निवडू शकता हे देखील तितकंच खरं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








