‘तृतीयपंथी आहे म्हणून सेक्सवर्कर व्हावं, भीक मागावी? छे... मी मेहनत करूनच कमावणार’

- Author, तुलसी प्रसाद रेड्डी नंगा
- Role, बीबीसीसाठी
“तृतीयपंथी आहे म्हणून मी काय सेक्स वर्करच व्हावं किंवा भीकच मागावी? छे.. मी मेहनत करून कमावू शकतेच ना. मी पडेल ते काम करण्यासाठी तयार आहे. मला कुणी बाथरुम धुण्याचं, कचरा साफ करण्याचंही काम दिलं तरी मी ते आनंदाने करेन.”
आंध्र प्रदेशच्या मेदनपल्ली येथील मार्केटयार्डात मजूरकाम करणाऱ्या ट्रान्सजेंडर भानूच्या तोंडचं हे वाक्य. गेल्या सहा वर्षांपासून भानू येथे टोमॅटोंचे कॅरेट उचलण्याचं काम करत आहे.
पैसे कमावण्याच्या इतर कोणत्याही मार्गावर विश्वास न ठेवता मेहनत करण्यावरच माझा विश्वास आहे, असं भानू नेहमीच ठामपणे सांगताना दिसते.
आईसाठी कमावतेय
21 वर्षीय भानूचं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. ती आपल्या आई-वडिलांसह मेदनपल्लीच्या कनिकिली तोटा येथे राहायची. त्यांच्या कुटुंबात भाऊ आणि वहिनीसुद्धा आहेत. पण ते दोघेही दुसऱ्या एके ठिकाणी वेगळे राहतात.
सहा महिन्यांपूर्वी भानूच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे आता आपल्या घराची जबाबदारी पूर्णपणे तिच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
आपल्या लैंगिकतेविषयी कळल्यानंतर भानू खरंतर घर सोडून आपल्यासारख्या ट्रान्सजेंडर समुदायातील व्यक्तींसोबत राहण्यासाठी गेली होती. पण तिला भीक मागणं किंवा शरीरविक्रीचं काम करणं आवडत नाही.

वडील होते तोपर्यंत ठिक होतं. पण वडिलांच्या जाण्याने घरात एक रितेपण आलं. त्यामुळे आईची मदत करण्याचा निर्णय तिने घेतला.
ती म्हणते, “मी आता टोमॅटो मार्केटमध्ये मजुरी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मी शेतमजुरीचं कामही केलेलं आहे.”
शरीरविक्रय आजिबात करणार नाही
भानू सांगते, “ट्रान्सजेंडर बनले असले तरी मी शरीरविक्रीचं काम बिलकुल करणार नाही. हे काम करून आपल्या आरोग्याचं नुकसान करून घेण्यापेक्षा सन्मानाने मेहनत करून मी माझं पोट भरेन.”

ती पुढे म्हणाली, “मला अनेकांचे फोन येतात. पण मी त्यांच्याकडे जात नाही. मी माझ्या आईसाठी इथे थांबले आहे. खरं तर मार्केटमध्ये काम करताना मला अनेक अडचणी येतात. पण तरी मी हे काम करत राहीन. सेक्सवर्क मी मुळीच करणार नाही.”
विरोध झुगारला
एक ट्रान्सजेंडर म्हणून आपल्या आयुष्यात भानूला खूप अपमान सहन करावा लागला आहे. प्रत्येक टप्प्यावर लोकांची बोलणी, टोमणे यांच्याशी तिची गाठ पडायची. कॉलेजमध्ये तर आपलं जगणंही अवघड करण्यात आलं होतं, असं ती सांगते.
भानूने सांगितलं, “कॉलेजमध्ये प्रत्येकजण माझी चेष्टा करायचे. अरे हा मुलगा मुलीसारखा वागतो, हा हिजडा आहे, असं म्हणत माझी टिंगलटवाळी केली जायची. तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. मी खूप रडायचे. घरीही मला समजून घेणारं कुणी नव्हतं. शेवटी मला शिक्षण सोडून घरी बसावं लागलं.”

घरातही सुरुवातीच्या काळात खूप विरोध आणि अपमान सहन करावा लागला. कुठे जायचं नाही, कुणाला आपल्या भावनांविषयी बोलायचं नाही, असं म्हणत माझ्यावर निर्बंध आणले गेले.
अशा प्रकारे सर्वच बाजूंनी कोंडी झाल्यामुळे भानूने अखेर घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कुणाच्याही विरोधाला न जुमानता एखाद्या मुलीप्रमाणे राहू लागले.
“मी नंतर साडी नेसू लागले. एखादा मुलगा आवडला तर मी त्याच्याशी बिनधास्त बोलायचे. त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचे. पण माझ्याशी मैत्री करण्यासाठी कोणताही मुलगा पुढे येत नसे. त्याच्या घरी रागावतील अशी भीती त्यांना असायची.”
सहकाऱ्यांकडूनच सेक्स वर्कसाठी दबाव
पुढे भानूने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या काही सहकारी ट्रान्सजेंडरसोबत ती विजयवाडा येथे गेली.
लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेकजण आपलं नाव बदलतात. पण भानूने आपलं पूर्वीचंच नाव पुढे कायम ठेवलं.
शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. पण त्यानंतर तिला लोकांकडून खूप वाईट अनुभव येऊ लागले. यापैकी काही तिच्याच समुदायातील ट्रान्सजेंडरकडूनही अनुभव आले होते.

लिंगबदल होताच भानूला सेक्स वर्क करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पुढे काही दिवसांनी वडील आजारी पडले, तेव्हाही तिच्या मागे हाच तगादा लावण्यात येत होता.
ती म्हणते, “ट्रान्सजेंडर समुदायात अनेक चांगली माणसे आहेत. मेदनपल्लीतील ट्रान्सजेंडर प्रमुख चांदनीने माझी खूप मदत केली. तिनेच मला वडिलांच्या उपचारासाठी मदत केली.”
भानूला हिजडा म्हणवून घेणं, भीक मागणं किंवा जबरदस्तीने शरीरविक्रय व्यवसाय करणं आदी गोष्टी आवडत नसल्याने ती एक मजूर म्हणून काम करू लागली.
ती सांगते, “मी सुरुवातीला काम करत असताना अनेकांनी माझी चेष्टा सुरू केली. एका टोमॅटो व्यापाऱ्याकडे काम मागण्यासाठी गेल्यानंतर मला पाहून ग्राहक येणार नाहीत, असं म्हणत त्यांनी मला कामावर घेतलं नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर एका व्यापाऱ्याने मला काम दिलं.”
“आता कुणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी माझं काम करते. माझ्या अडचणी मला माहीत आहेत, म्हणून मी काम करणं सोडणार नाही.”
वैवाहिक जीवनातही अडचणी
भानूचं कॉलेजवयात असताना एका मुलावर प्रेम होतं. पण त्याच्याकडून तिला धोका मिळाला.
नंतर तिने दुसऱ्या एका व्यक्तीशी लग्न केलं. सुरुवातीला तिचं वैवाहिक आयुष्य छान सुरू होतं, पण आता त्यामध्ये अडचणी येत आहेत.

ती म्हणते, “माझं लग्न झालं आहे. पण माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे लक्ष नाही. पूर्वी सगळं नीट होतं, पण तो आता माझी काहीच काळजी करत नाही. यापूर्वीही मला एका मुलाकडून धोका मिळालेला आहे. पण आयुष्य असंच असतं. त्यांच्यासोबतच्या चांगल्या आठवणी जगून झाल्या. आता मी माझ्या आईची काळजी घेईन.”
नवा मित्रपरिवार
भानूच्या दिलखुलास स्वभावामुळे आता तिला मार्केट यार्डात चांगला मित्रपरिवार मिळाला आहे.
ती म्हणते, “मार्केटमध्ये आता मला सगळे खूप चांगलं ओळखतात. इथे माझे काही मित्रही झाले आहेत. मी एखाद्या दिवशी कामावर आले नाही, तर ते मला आवर्जून विचारतात. कामावर असताना मला घरची आठवण येत नाही. मला माझं आयुष्य अशाचप्रकारे आनंदाने घालवायचं आहे.”

भानूला कामावर ठेवणारे व्यापारी राजू म्हणतात, “भानू आमच्याकडे काम मागण्यासाठी आली त्याच वेळी तिची अडचण आम्हाला समजली. त्यामुळे आम्ही तिला कामावर ठेवून घेतलं.”
“भानूची विचारसरणी इतरांसारखी नाही. तिला मेहनत करून कमाई करायची आहे. आम्हालाही तिची तळमळ समजू शकते. इथे भानूला दररोज एक हजार रुपये कामासाठी मिळतात. यातून तिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चांगली मदत होत आहे.”
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








