ताली : गौरी सावंत म्हणतात की मला समाजाने आई म्हणून स्वीकारलं, ट्रान्सजेंडर म्हणून नाही

गौरी सावंत यांच्या भूमिकेत सुश्मिता सेन

फोटो स्रोत, SUSHMITA SEN

    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गौरी सावंत यांच्या आय़ुष्यावर आधारित 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी' या वेब सीरिजचा प्रीमिअर 15 ऑगस्टला जिओ सिनेमावर होत आहे. आज (7 ऑगस्ट) या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अभिनेत्री सुश्मिता सेन गौरी सावंत यांची भूमिका साकारत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून क्षितीज पटवर्धन यांनी याची कथा लिहिली आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सुश्मिता सेनने म्हटलं की, “श्रीगौरी सावंत या अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा असामान्य असा जीवन प्रवास दाखवण्याची मला संधी मिळाली, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

ही भूमिका पहिल्यांदा माझ्याकडे आली, तेव्हा मनात चटकन ‘हो’ आलं होतं. पण अधिकृतपणे या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी मला सहा महिने लागले. या प्रकल्पासाठी मी वाचन, अभ्यास करून पूर्णपणे तयार असायला हवं हे मला माहीत होतं.”

बीबीसी मराठीने गौरी सावंत यांच्याशी संवाद साधून त्यांचा संघर्ष जाणून घेतला होता. तालीच्या निमित्ताने गौरी सावंत यांचा हाच प्रवास पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

लाल रेष

LGBTQIA+ समुदायातील व्यक्ती मूल दत्तक घेऊन त्याचं पालकत्व उत्तमपणे करू शकते हे गौरी सांवत यांनी दाखवून दिलं आहे. गौरी सांवत या ट्रान्सजेंडर (पारलिंगी) व्यक्ती आहेत आणि एका मुलीच्या आई आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने त्यांना मातृत्वाबद्दल काय वाटतं आणि आई म्हणून त्यांचा प्रवास कसा आहे त्याविषयी...

ट्रान्सजेंडर (पारलिंगी) व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना मातृत्वाने भरपूर आनंद दिलाय.

त्यांच्या मते, मातृत्व म्हणजे एक प्रकारचं वर्तन वा स्वभाव आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेचं लक्षण असणाऱ्या नितीनियमांना त्यांनी धक्का दिलाय.

त्या सुरूवातीलाच स्पष्ट करतात- “माझं कुटुंब तुमच्यासारखं एका साच्यात बांधलं गेलेलं कुटुंब नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

गौरी (पूर्वीचं नाव गणेश) यांचं मूळ घर रत्नागिरीचं. वडिलांची पोलीसमध्ये नोकरी असल्याने सावंत कुटुंब पुण्यात राहत होतं. आईचं छत्र नकळत्या वयातच हरपलं.

आईच्या मृत्यूनंतर गणेशचा मोठा आधार गेला. आपण वेगळे आहोत याची जाणीव किशोरवयात व्हायला लागली आणि घरात खटके उडू लागले. अखेर वयाच्या 16 व्या वर्षी गौरी यांनी घरातले 60 रुपये उचलले आणि पुणे सोडलं... तडक मुंबईचा रस्ता धरला. त्या तृतीयपंथी पारंपरिक समुदायाचा भाग झाल्या.

त्यांनी 2000 साली ‘सखी चार चौघी’ ही संस्था स्थापन केली, उद्देश एकच होता की ट्रान्स व्यक्तींना या संस्थेच्या माध्यामातून मदतीचा हात द्यायचा. कौन्सिलिंग ही पहिली पायरी होती.

अनेक ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर म्हणून काम करतात, तिथे त्यांना शोषणाला सामोरं जावं लागतं. स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, हक्क व्यवहारात आणण्यासाठी मदत कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केलं जायचं.

गौरी सावंत

फोटो स्रोत, Gauri Sawant

फोटो कॅप्शन, गौरी सावंत

दत्तक घेण्यासाठी कोर्टात

आयुष्याच्या याच टप्प्यावर गौरी यांच्या आयुष्यात गायत्री आली. गायत्री ही त्यांची मुलगी.

“एचआयव्ही पॉझिटिव्ह सेक्स वर्कर महिलांसोबत काम सुरू असायचं. अशाच एका गरोदर महिलेशी ओळख झाली होती. पाच-सहा वर्षांनंतर कळलं ही तिचा एड्समुळे मृत्यू झालाय. मला कळलं की तिची लहान मुलगी आहे आणि ती अनाथ झाली आहे. आणि नकळत तिचं पालकत्व माझ्याकडे आलं. पण ट्रान्सजेंडर असल्याने तिला दत्तक घेणं हे सोपं नव्हतं."

गौरी सावंत महिलांसोबत

ट्रान्सजेंडर हक्कांविषयीचा दशकभराचा अनुभव गाठीशी घेऊन गौरी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली ती ट्रान्सजेंडर व्यक्तीला दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा म्हणून. या खेरीज NALSA म्हणजेच नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथोरिटीनेमध्ये ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांविषयी याचिका दाखल केली गेली. त्यानंतर 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने भारतात ट्रान्सजेंडर व्यक्तींना ‘तिसरं लिंग’ म्हणून मान्यता दिली.

गौरी सांवत यांनी सुप्रीम कोर्टात ही कायदेशीर लढाई लढल्यानंतर हे यश मिळालं. आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या जगण्याचा मार्ग सुकर व्हायला सुरूवात झाली.

आता देशात मतदार म्हणून नोंदणी व्हायला सुरूवात झाली आहे, नोकरीसाठी भरती सुरू आहे. प्रशासन, कॉर्पोरेट रोजगाराच्या, बिझनेसच्या, राजकारणाच्या नव्या संधी येऊ पाहात आहेत. हे गेल्या 9 वर्षांमधल्या यशाचे टप्पे आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्ती ‘हिजडा’ समुदायाशिवायची आपली ओळख बनवण्यासाठी संघर्ष करतेय.

गौरी विक्सच्या जाहिरातीत

फोटो स्रोत, VICKS

फोटो कॅप्शन, गौरी विक्सच्या जाहिरातीत

भारतात 2018 साली विक्सच्या जाहिरातीने त्यांची ओळख लोकांपर्यंत पोहचवली. शिकण्यासाठी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलीला प्रवास करून सोडायला जाणारी ट्रान्सजेंडर आई अनेकांना भावली.

तिचं प्रेम, मुलीसाठीची धडपड, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हे सगळं गौरी सावंत यांच्या रिअल स्टोरीचा भाग होता.

ती सेक्स वर्क करू नये म्हणून...

खऱ्या आयुष्यातल्या मुलीसोबत म्हणजेच गायत्रीसोबतचं आई म्हणून नवं नातं विणणं हे गौरी यांच्यासमोरचं आव्हान होतं. त्या सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने गायत्रीला स्वीकारणं त्यांना फार कठीण गेलं नाही, पण गायत्रीला अवघड गेलं असावं त्या सांगतात.

“गायत्री तेव्हा 4-5 वर्षांची होती. तिने तिच्या जन्मदात्री आईला पाहिलं होतं. इतकी लहान असूनही ती तशी समंजस होती. तिने मला आई म्हणावं म्हणून मी काहीच फोर्स केला नाही. पण अगदी तीन-चार महिन्यात तिने मला आई म्हणून हाक मारायला सुरूवात केली होती. ती माझ्या बाजूला पोटावर हात टाकून बिलगून झोपायची, तिने आत्मविश्वासाने मारलेली मिठी अनुभवल्यानंतर मला आई झाल्याचं समाधान मिळत होतं.”

गौरी सावंत

“तिला घडवताना माझ्यासमोर तीनच गोष्टी होत्या. गायत्रीसाठी तिच्या आजूबाजूचं वातावरण सुरक्षित ठेवायचं. दुसरं, तिला स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभं करणं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे- तिने सेक्स वर्कमध्ये न जाणं.”

सेक्स वर्कर महिलांचं दुःख त्या पाहात होत्या. एकदा देहविक्रय करताना त्याच खोलीत महिलेच्या शेजारी असणारं बाळ त्यांनी पाहिलं आणि आईच्या अगतिकतेने त्यांना अस्वस्थ केलं. सेक्स वर्कर महिलांच्या मुलांसाठी काही तरी करण्याची बीजं त्या घटनेने त्यांच्या मनात रुजली.

कुटुंबं संकुचित नकोत...

पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीला त्या छेद देतात. सर्वसाधारणपणे समाजात कुटुंबाची व्याख्या परिपूर्ण या शब्दाशी जोडली जाते. सुंदर माझं घर याची व्याख्या आई-वडील आणि मुलं, सुना याच्या पलिकडे जात नाही. गौरी यांना हे मान्य नाही.

“मी अशी वेगळी आई आहे की जी माझ्या तृतीयपंथी गुरूंसोबत राहते. त्यांनी मला मुलगी म्हणून स्वीकारलंय. माझ्या चेल्यांनी मला आई म्हणून स्वीकारलंय. आमच्यासारखे आम्ही फरसाणासारखे आहोत. त्याच्यातला एक भाग माझी दत्तक मुलगी गायत्री आहे आणि संस्थेतील इतर मुलं आहेत. आई-वडील आणि दोन मुलं असं चौरस कुटुंब आमचं नाही.

"आमचं कुटुंब हे वैश्विक आहे, जिथे सपोर्ट सिस्टम स्ट्राँग आहे. मॉरल सपोर्ट आहे. आणि विश्वासावर बांधलेले आपापसातले धागे आहेत. मातृत्वाचा हा वारसा मला माझ्या आईकडून मिळाला असावा. कारण आमच्याकडे पुण्यात घरी गावातून शिकायला आलेली खूप मुलं असायची आणि आई त्यांची जबाबदारी घ्यायची ”

गौरी सावंत आणि सुश्मिता सेन

फोटो स्रोत, Gauri Sawant

फोटो कॅप्शन, गौरी सावंत आणि सुश्मिता सेन

मातृत्व हे केवळ procreation म्हणजेच मूल जन्माला घातल्याने मिळत नाही. गर्भाशय असणं, लग्न झालेलं, स्त्री असणं याच्याशी मातृत्वाचा काहीही संबंध नाही, जगातली कोणतीही व्यक्ती आई होऊ शकते. असं त्या ठामपणे सांगतात.

आजीचं घर कसं आहे?

“टाळ्या वाजवून थकलेले, उतारवयातले तृतीयपंथीय यांच्यासाठी काही करावं असं मनात होतं. या एका अर्थाने गोधडीची उब असलेल्या आज्याच होत्या. त्यातूनच आजीचं घर हे लहान मुलांसाठीचं डे केअर सेंटर उभं राहिलं. सेक्स वर्कर महिला कामावर असताना मूल सांभाळायला कुठे ठेवायचं हा प्रश्न त्यातून सुटू शकला. अगदी सुरक्षित ठिकाणी त्यांना ठेवणं शक्य झालं.”

तिथे येणाऱ्या लहान मुली भविष्यात सेक्स वर्कमध्ये जाऊ नये ही जबाबदारी घेणं, हा आजीच्या घराचा उद्देश आहे.

गौरी सावंत

फोटो स्रोत, Getty Images

समाजाबद्दल एक आक्षेप गौरी नोंदवतात. समाज तिसरं लिंग म्हणून स्वीकारतोय का या प्रश्नावर बोलताना त्या तीव्र नाराजी व्यक्त करतात. जगभरात अनेक देशांमध्ये फिरल्यानंतर लोक खूप कौतुकाने भेटतात.

“जगाने मला आई म्हणून स्वीकारलंय, लोक म्हणतात आम्ही तुमची जाहिरात पाहिली, मुलाखत ऐकली, तुम्ही छान काम करताय. त्यांच्याशी कनेक्ट होताना जाणवतं की तुम्ही मला आई म्हणून स्वीकारलंय पण ट्रान्सजेंडर म्हणून स्वीकारलंय का? हा मोठा प्रश्न आहे.”

अजूनही लोकांना ट्रान्सजेंडर व्यक्तींसोबत काम करताना लाज वाटते याविषयी त्यांना दुःख आहे.

सरसकट लैंगिकतेसोबत मला आणि माझ्या समुदायालाही या समाजाने स्वीकारायला हवं, असं त्या म्हणतायत.

भारतात ट्रान्सजेंडर व्यक्तींची संख्या 4 लाख 88 हजार असल्याचं, 2011च्या भारतीय जनगणनेच्या आकडेवारीतून पुढे आलं. पण हा आकडा कमी असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. LGBTQIA+ समुदायातील व्यक्तीला समान हक्क मिळवून द्यायचे असतील तर तशी धोरणं सरकारने आखली पाहिजे अशी मागणी होतेय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)