ताण आलाय? मन शांत करायचंय? आपल्याच शरीरातल्या 'या' शांततेच्या 'बटणा'बद्दल जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रुथ क्लेग
- Role, हेल्थ अँड वेलबिईंग रिपोर्टर
"कधी वाटतं का, की सगळं बंद करून शांत बसावं? तुमच्या शरीरातला एक मज्जातंतू 'Vagus Nerve' यात मदत करू शकतो."
हा मज्जातंतू म्हणजे शरीरातला एक सुपरहायवे आहे. तो मेंदूपासून तुमच्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत माहिती पोहोचवतो. अनेकांना त्याचं अस्तित्वही माहीत नसतं आणि तो 'ट्रेन' करावा लागतो हे तर आपल्यासाठी अजूनच नवं आहे.
सोशल मीडियावर Vagus Nerve वर अनेक टिप्स दिसतात. तो आपल्याला बरं करणे, उत्तेजित करणे, 'रीसेट' करणे, हे सगळं तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी आहे, असं सांगितलं जातं.
कानात रबरच्या ब्रशसारख्या वस्तूने चोळणे, डोळ्यांची हालचाल, शरीरावर टॅपिंग करणे किंवा वजनदार जाकीट घालून गुळण्या करणे अशा अनेक विचित्र वाटणाऱ्या पद्धती Vagus Nerve 'ट्रेन' करण्यासाठी सुचवल्या जातात.
तरुणांमध्ये तणाव आणि बर्नआउट वाढत असल्यामुळे अशा पोस्ट्सना लाखो व्ह्यूज मिळत आहेत.
हे उपाय विचित्र वाटू शकतात, पण खरंच हा मज्जातंतू 'ट्रेन' करता येतो का? आणि त्याने तणाव कमी होतो का?

फोटो स्रोत, Alamy
हे जाणून घेण्यासाठी मी स्टॉकपोर्ट मधल्या एका छोट्या, मेणबत्त्यांनी उजळलेल्या स्टुडिओत पोहोचले. तिथे आम्ही एकत्र बसून मोठ्याने 'हमिंग' केलं. (हमिंग म्हणजे एका लयीत गुणगुणण्यासारखा आवाज.
या गुंजारवासारख्या आवाजाचा उपचारासाठी उपयोग केला जातो. योगासनात भ्रामरी करताना जो आवाज निर्माण केला जातो तसाच हा आवाज काढला जातो.
'हमिंग' Vagus Nerve ला उत्तेजित करतं आणि हृदयाची गती कमी करतं असं सांगितलं गेलं. आणि खरंच, मला थोडं शांत वाटायला लागलं. शरीरात कंपन जाणवत होतं आणि मेंदू थोडा शांत झाला होता.
या सोमॅटिक्स वर्गात योग प्रशिक्षक एरियन कोलाइन या सौम्य हालचाली, श्वसन, झुलणे आणि डोलणे यांचा वापर करून मार्गदर्शन करत होत्या.

फोटो स्रोत, @cariad.connection
त्या सोशल मीडियावरच्या सगळ्या उपायांवर विश्वास ठेवत नाहीत. पण त्यांच्या या पद्धतीत श्वसन, डोळ्यांची हालचाल आणि टॅपिंग यांचा वापर केला जातो.
त्या सांगतात, "ही एक प्रक्रिया आहे, हा काही झटपट होणारा उपाय नाही." शरीराशी जोडून घेऊन आपली मज्जासंस्था शांत करता येते, असा यामागचा सिद्धांत यात आहे.
काही वैज्ञानिकांना हे फारच सरधोपट वाटतं, पण काहींना हे उपाय व्यग्र आणि तणावपूर्ण जगात थोडी शांतता देतात असं वाटतं.
आता आपण साराबद्दल माहिती घेऊ. ती माझ्याजवळच चटईवर पडून होती, गेल्या वर्षभरापासून ती या वर्गात येते. ती म्हणते, "पहिल्या सत्रानंतर मी रडले. असं वाटलं की पहिल्यांदाच माझा मेंदू बंद झाला."
ती मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झगडते आणि म्हणते की हे सत्र म्हणजे "मेंदूचं फ्लॉसिंगच" आहे. (फ्लॉसिंग म्हणजे दातामधल्या फटीमधले अन्नकण किंवा प्लाक काढून टाकणे. इथं मेंदूमध्ये साचून राहिलेल्या रोगट भावना, मळभ काढून टाकणे अशा अर्थी मेंदूचं फ्लॉसिंग हा शब्दप्रयोग वापरला गेला आहे.)

फोटो स्रोत, Xander
तिचा जोडीदार झांडर म्हणतो की, यामुळे त्याला स्वतःच्या भावना समजायला लागल्या.
"पुरुष म्हणून आपल्याला भावना समजून घेण्याचं फारसं शिकवलं जात नाही," तो म्हणतो. "मी दीर्घकाळ नैराश्याशी झगडलो, पण आता विचारांना दुरुस्त करत बसण्याऐवजी मनात आलेल्या भावना स्वीकारतो."
"तणाव वाढला की मी कामातून थोडी विश्रांती घेतो... धावायला जातो, डोंगरात फिरतो."
"माझ्या मज्जासंस्थेचं काम कसं आहे हे, समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे."
Vagus म्हणजे लॅटिनमध्ये "विचारणारा". हा मज्जातंतू मेंदूपासून सुरू होतो आणि शरीरातील प्रत्येक महत्त्वाच्या अवयवाशी जोडलेला असतो.
तो 'ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टम'चा भाग आहे. ती प्रणाली श्वास, हृदयाची गती, पचन यासारख्या क्रिया नियंत्रित करते.
ही प्रणाली दोन भागांत विभागलेली आहे :
सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम - जी 'फाईट ऑर फ्लाईट' प्रतिक्रिया देते. (म्हणजे कोणत्याही स्थितीला तोंड देणं किंवा तिच्यापासून पळून जाणं यापैकी एक गोष्ट करणं)
पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम – जी Vagus Nerve च्या मदतीने शरीर शांत करते..
जर हे संतुलन बिघडलं तर समस्या निर्माण होतात. पण आपण स्वतः Vagus Nerve सक्रिय करून हे संतुलन पुन्हा मिळवू शकतो का?
सायकायट्रिस्ट कन्सल्टंट प्रा. हामिश मॅकअलिस्टर विल्यम्स यावर अधिक माहिती देतात.
हे उपकरण Vagus Nerve ला विद्युत सिग्नल पाठवतं आणि मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामिन सारखी रसायनं सोडली जातात. ही रसायनं मूड नियंत्रित करतात.
हे उपकरण युकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा म्हणजे एनएचएसवर काही निवडक रुग्णांसाठी उपलब्ध आहे. पण आता बाह्य उपकरणांची विक्री वाढत आहे. ही उपकरणं कान, मान किंवा छातीवर लावली जातात.
"बाह्य उपकरणांबाबत काही अभ्यास आहेत, पण पुरावे कमी आहेत," असं प्रा. मॅकअलिस्टर विल्यम्स सांगतात.
बाह्य उपकरणांमधून विद्युत सिग्नल त्वचा, स्नायू, चरबी यातून जावं लागतं, त्यामुळे त्याचा परिणाम थेट नसतो.

फोटो स्रोत, @lucylambertco
ल्युसी लॅम्बर्टने बर्नआऊट या समस्येला तोंड दिलंय. हर्बर्ट फ्रॉइडेनबेर्गर यांनी 1974 साली एका शोधनिबंधात 'इमोशनल बर्नआऊट' ही टर्म वापरली.
सतत स्वतःला सिद्ध करण्यासारख्या अनेक कसोट्यांचा ताण असलेल्या व्यावसायिक जीवनामुळे एखाद्याला पराकोटीचा शारीरिक व मानसिक थकवा येणं म्हणजे 'इमोशनल बर्नआऊट' अशी व्याख्या त्यांनी केली होती.
आताच्या काळामध्ये भरपूर आणि दीर्घकाळ ताण आलेला असेल तर त्याला 'इमोशनल बर्नआऊट' म्हटलं जातं. यामुळे जीवनातील आव्हानांशी जुळवून घेता येत नाही अशी भावना मनात तयार होते.
हे ताण निर्माण करणारे घटक फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर आपल्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातून येतात.
आपल्याला या उपकरणांची मदत झा असं ल्युसी सांगते. ती प्राथमिक शाळेत शिक्षिका होती मात्र तणावामुळे तिनं ते काम सोडलं.
"मी इतकी थकले होते की मला या स्थितीबद्दल काही जाणवलंच नाही," असं ल्युसी म्हणते. "एक दिवस सगळं कोसळलं."
वैद्यकीय उपाय अपुरे पडल्यावर तिच्या भावाने एक उपकरण सुचवलं. हे उपकरण मान किंवा कानातून Vagus Nerve ला सिग्नल पाठवतं.
"तणाव वाढला की डोकं दुखायला लागायचं. मग मी हे उपकरण वापरायचे 10 मिनिटं, दिवसातून दोनदा. त्यामुळे डोकेदुखी कमी व्हायची आणि शरीर शांत व्हायचं."
"ही कंपनं काहीतरी करतात," ती म्हणते.

फोटो स्रोत, lucylambertco
हे उपकरण बर्नआऊट दूर करत नाही, पण "खऱ्या उपचारासाठी योग्य अशी पोषक परिस्थिती निर्माण करतं."
डॉ. ख्रिस बार्कर म्हणतात की, ही वैद्यकीय शाखा अजून विकसित होत आहे.
ते म्हणतात. मज्जासंस्थेचं संतुलन बिघडलं की मानसिक आरोग्य, हृदयाची गती, पचन यावर परिणाम होतो पण त्यावर उपाय अजून स्पष्ट नाहीत.
"आपण जे त्रास अनुभवतो ते एका मोठ्या प्रणालीतील असंतुलनाचं लक्षण असू शकतं."
त्यांचं म्हणणं आहे , "भरमसाठ उपाय न करता, तुम्हाला नक्की काय उपयोगी पडतं ते शोधा."
जर हृदय किंवा श्वसनाचे आजार असतील तर अशा उपायांपूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.
आज ल्युसी स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे. त्याचा उपयोग ती इतरांना भावनिक ताकद आणि आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे.
ती अजूनही ते उपकरण वापरते, ध्यान करते आणि स्वतःच्या भावना तपासते.
"हे उपकरण मला विश्रांती घेण्यास भाग पाडतं", असं ती सांगते.
पण तिच्यात झालेला फरक उपकरणांमुळे झाला की विश्रांतीमुळे हे सांगणं कठीण आहे, हे ती मान्य करते.
वैज्ञानिक पुरावे कमी आहेत, पण ल्युसीसाठी हे उपकरण तिच्या स्वशोधासाठी उपयोगी पडलं.
ती म्हणते, "मला मानसिक आरोग्यावर नियंत्रण मिळवायला मदत झाली... आणि हे फार मोठं यश आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











