'मुलांनी बाॅल मारला, माझं नाक रक्तबंबाळ झालं आणि मी बेशुद्ध पडले,' या मुलींनी फुटबाॅल खेळणं का थांबवलं?

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मुलींच्या खेळाला काही महत्त्व नाही त्यांच्यालेखी. इथल्या मुलांना वाटतं की मैदान त्यांचच आहे आणि इथे मुलींनी खेळू नये. त्यांनी घरी बसावं," 22 वर्षीय शबनम शेख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिल्या.
फुटबाॅलच्या परवानाधारक कोच असलेल्या शबनम शेख यांनी अशी प्रतिक्रिया देण्याचं कारण म्हणजे त्या मुंबईतील ज्या मैदानावर मुलींना फुटबाॅलचं प्रशिक्षण देत होत्या ते त्यांना बंद करावं लागलं.
म्हणजे थोडक्यात मुंबईतल्या एका सार्वजनिक मैदानावर जिथे मुली दोन वर्षांपासून फुटबाॅल खेळत होत्या त्यांना आता आपला खेळ थांबवावा लागला आहे.
मुंबईतील मानखुर्द-मंडाला ही एक मोठी झोपडपट्टी असलेली वस्ती आहे.
अत्यंत चिंचोळ्या गल्ल्या, अंधारमय खोल्या आणि इतर सर्वत्र घाणीचं साम्राज्य, दुर्गंधी असा हा परिसर.
इथे राहणाऱ्या मुली शालेय शिक्षण तर घेत आहेत पण याव्यतिरिक्त त्यांनी घरातून बाहेर पडावं इतकंही सुरक्षित वातावरण नाही आणि त्यांना तेवढं स्वातंत्र्यही नाही असं त्या सांगतात.
या अशा परिस्थितीत 22 वर्षीय शबनम, आपल्या वडिलांच्या मदतीने फुटबाॅल खेळायला शिकली.
'परचम' नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आणि त्यांच्या एका उपक्रमाअंतर्गत गेली सात वर्षं शबनम फुटबाॅल खेळत आहे.

"सात वर्षांपूर्वी मला माझ्या वडिलांनी फुटबाॅल खेळणार का असं विचारलं त्यावेळी हा खेळ काय असतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं. मला घराबाहेर जाता येईल आणि मैदानावर खेळता येईल या विचारानेच मला स्वतंत्र झाल्यासारखं वाटत होतं. मी लगेच होकार दिला आणि काही वर्षांनी मी फुटबाॅलची लायसन्स कोच सुद्धा बनले." असं शबनम सांगते.
शबनमकडे पाहून मंडाला इथल्या इतर काही कुटुंबियांनी आपल्या घरातल्या मुलींनाही फुटबाॅल शिकण्याची परवानगी दिली.
"वडील आणि भावाचा नकार होता पण मी विचार केला की माझ्या मुलीला मी काहीच शिकवलं नाही तर माझ्यासारखं तिलाही कायमचं बंद दाराआड रहावं लागेल म्हणून मी माझ्या मुलीला पाठवलं," सुनीता गौतम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.


सुनीता गौतम 25 वर्षांपासून या झोपडपट्टीत राहतात. त्यांची मुलगी दीपमाला नववीत शिकत आहे आणि ती दोन वर्षांपासून फुटबाॅल शिकत आहे.
दीपमालासारख्या 14-15 वर्षांच्या जवळपास 40-45 मुली शबनम यांच्याकडून फुटबाॅलचं प्रशिक्षण घेत आहेत.
परंतु जून महिन्यापासून म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून या मुलींना त्यांच्या नेहमीच्या मैदानावर फुटबाॅल खेळता येत नाहीये.
'त्यांनी मुद्दाम बाॅल मारला आणि मी बेशुद्ध पडले'
सुनीता गौतम यांच्यासारखाच विचार करत घरातल्या पुरुषांचा नकार पचवत अनेक पालकांनी आपल्या मुलींना टीशर्ट, शाॅट्स आणि शूज घालण्याची परवानगी देत मुलांप्रमाणेच मोकळ्या मैदानात खेळायला पाठवलं.
शबनम यांच्याअंतर्गत मुलींची एक मोठी फुटबाॅल टीमच मानखुर्दसारख्या गरीब, गुन्हेगारी आणि असुरक्षित पार्श्वभूमीवर असलेल्या भागात तयार झाली. पण 31 मे रोजी या मुलींच्या हिमतीला ब्रेक लागला.
मानखुर्दजवळील देवनार येथील मुंबई महानगरपालिकेच्या मैदानावर या शबनम आणि या मुली जवळपास दररोज दोन तास फुटबाॅलचा सराव करत होत्या.
"या मैदानावर दररोज गर्दुल्ले, नशा करणारी मुलं असतात. इतरही वेळेस अनेकदा आम्हाला त्यांचा त्रास झालाय. कधी मुलींच्या मागे फिरणार, त्यांच्या जवळ नशा करणार, धूर सोडणार, शेरेबाजी करणार हे नित्याचे झाले होते. पण तरी आम्ही आमचा खेळ खेळत होतो कारण आधीच आम्हाला परवानगी दिली जात नाही. आम्ही अशा तक्रारी रोज केल्या असत्या तर आम्हाला कधीच शिकता आलं नसतं," शबनम सांगते.

त्या पुढे सांगतात,"31 मे 2024 रोजी काही मुलं फुटबाॅल खेळण्याच्या जागेवर आले. ते तिकडे क्रिकेट खेळत होते. त्यांचा बाॅल सारखा मुलींजवळ येत होता. आम्ही त्यांना सांगितलं, की तुम्ही इकडे खेळू नका आम्हाला बाॅल लागतोय. तेवढ्यात माझ्या छातीला बाॅल लागला. आम्ही घाबरलो आणि पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला फोन लागले नाहीत. त्यानंतर 100 नंबरवरती काॅल केला. मी फोनवर बोलत असतानाच एक बाॅल जोरात माझ्या नाकाला लागला आणि मी बेशुद्ध पडले,"
शबनमचं नाक रक्तबंबाळ झालं होत. त्या जागीच बेशुद्ध पडल्या. मुलींनी त्यांना उचललं आणि रिक्षात बसवलं. घरी फोन केले आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं.
पोलिसांसोबत मुली पुन्हा मैदानावर आल्या पण तोपर्यंत ती मुलं तिथून निघून गेली होती.

शबनमला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यावर समजलं की नाक फ्रॅक्चर झालं आहे. त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. दोन महिने शबनम यांच्यावर उपचार सुरू होते.

या घटनेमुळे शबनमसह सर्वच मुलींना धक्का बसला आणि मुलींच्या कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी पाठवणं बंद केलं.
या प्रकरणी देवनार पोलिसांनी दोन मुलांविरोधात खेळताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
'मुलींवर कोणी दबाव टाकू नये पण आता भीती वाटते'
आम्ही मानखुर्द मंडालाच्या वस्तीत पोहोचलो त्यावेळी तिथे सगळ्यांची दैनंदिन कामे सुरू होती. बाजारपेठ गजबजलेली होती.
बाजारातही छोटी दुकानं, त्याबाहेर उभी असलेली मुलं, काही गर्दुल्ले तर काही ठिकाणी गराज, लोखंडी साहित्य, मटण शाॅप, आणि छोटे कारखाने सुरू होते.
कुठल्याच ठिकाणी हा परिसर मुलींसाठी सुरक्षित वाटत नव्हता. "आमच्या मुली लहान होत्या तेव्हा काही वाटत नव्हतं. पण आता शाळेतून त्यांना आणताना, सोडताना आम्हालाही भीती वाटते. वाटेत कोणीही काहीही बोलतं, नशा केलेली मुलं असतात. इथे सुरक्षित वातावरण नाही. म्हणून मुलींना सोडायला भीती वाटते. पण तरी मी विचार केला की मुलींना असं बंद खोलीत नको ठेवायला. त्यांनाही मुलांप्रमाणे खेळण्याचा, शिकण्याचा अधिकार आहे." सुनीता गौतम सांगत होत्या.
सुनीता यांचं घर इथल्याच एका गल्लीत आहे. अगदी दहा बाय दहाची खोली. त्यातही पूर्ण अंधारच.

घराबाहेर पाण्याची एक टाकी आणि काही कपडे होते. तिथेच बाजूला एक फुटबाॅल होता. त्याला बरेच दिवस त्यांची मुलगी दीपमालाने हातही लावला नव्हता.
आम्ही पोहचलो त्यावेळी त्यांची मुलगी नुकतीच शाळेतून परत आली होती.
सुनीता सांगत होत्या, "मुला-मुलींमध्ये फरक करू शकत नाही. मुलीही पुढे जायला हव्यात. आम्ही तर शिकलो नाही. आमच्यासारख्या मुली राहू नयेत बंद खोलीत म्हणून मी पाठवलं. माझ्या मुलीवर कोणी दबाव टाकू नये. तिला जे खेळायचं आहे खेळायला मिळावं. तिकडे खेळायला जात होती तर काही मुलं बाहेरून तिकडे खेळायला येत होती. मुलं बॉल मारत होते. दीदीला जोरात लागलं. मुलींना लागलं असतं तर म्हणून घाबरून आम्ही पाठवत नाहीय. जीव वाचला तर पुढे जाऊन खेळू शकतील ना."
हीच भीती इतर मुलींच्या पालकांमध्येही आहे. शबनमसुद्धा या धक्क्यातून अजून सावरलेली नाही

शबनम सांगतात,"पालक घाबरले आहेत. मुलीही घाबरल्या आहेत की दिदीसोबत झालं तर आमच्यासोबत पण हे होऊ शकतं. पालकांनाही वाटायला लागलं की मुलींसोबत असं होऊ शकतं. मुलीही येत नाहीयेत आता. आम्ही खूप मेहनतीने मुलींना बाहेर काढलं घराच्या. आणि अशा छोटाशा कारणामुळे त्या पुन्हा घराच्याआत गेल्या, आता पुन्हा घराबाहेर पडायला मिळेल की नाही माहिती नाही."
या घटनेच्या निमित्ताने शबनम यांनी त्यांचा अनुभव सांगितला जेव्हा त्यांनी नुकतीच खेळायला सुरुवात केली होती.
"मी स्लम भागातून येते. मुस्लीम वस्तीत राहते. मुस्लीम समाजात मुलींना घराबाहेर पडण्याची फारशी परवानगी मिळत नाही. मी हिजाबमध्ये राहणारी मुलगी होते.
मौलानाही खूप काही बोलायचे. माझी वडील म्हणायचे की माझी मुलगी आहे मी तिला शिकवणार.
मी माझ्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे जी शाळेव्यतिरिक्त कामासाठी घरातून बाहेर पडले. काहीतरी नवीन शिकले.
या मुलींनाही घरातल्या वडील आणि भावांच्या परवानगीशिवाय घेऊन जाता येत नव्हतं. पण आम्ही बदलाला सुरुवात केली होती,"

फुटबॉल संदर्भातील या बातम्या नक्की वाचा :

शासनाची मुलींना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नाही का?
या घटनेच्या पोलीस तक्रारीनंतर बीएमसीच्या त्या मैदानावर पोलिसांची एक गाडी असावी अशी मागणी शबनम आणि मुलींची आहे.
"पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवली तरच आम्ही खेळू शकतो. ते मैदान अजिबात सुरक्षित नाही. एरव्हीही तिकडे मुलं नशा करतात, गर्दुल्ले फिरत असतात. तरीही पोलीस काही कारवाई करत नाहीत. पोलिसांची गाडी काही दिवस आली पण पुन्हा बंद झाली." अशी शबनम यांची तक्रार आहे.
'परचम' या संस्थेअंतर्गत काही वर्षांपूर्वी मुंब्रा, वांद्रे, मानखुर्द या भागात गरीब मुलींसाठी काही शैक्षणिक उपक्रम, सुटकेस लायब्ररी आणि काही क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले होते.
या उपक्रमाअंतर्गतच शबनम फुटबाॅल शिकली आणि नंतर आपल्या परिसरातील इतर मुलींनाही खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
परचम संस्थेच्या कार्यकर्त्या फहरत सांगतात, "पोलिसांनी लवकर कारवाई करायला हवी होती. मुलींना खेळासाठी, शिकण्यासाठी सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची आहे."
या प्रकरणी आम्ही देवनार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांची भेट घेतली.

बीबीसी मराठीशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांनी सांगितलं, “आमच्याकडे फुटबॉल खेळणाऱ्या मुली आल्या होत्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसंच मैदानाजवळ त्या खेळत असताना पोलिसांची गाडी असेल असंही आम्ही सांगितलं आहे.आम्ही त्यांना संरक्षण देत आहोत. आम्ही तिकडे गाडीही पाठवायला तयार आहोत. पालक मुलींना पाठवत नसतील तर आम्ही बैठक घ्यायला तयार आहोत, असंही आम्ही सांगितलं आहे.”
पोलिसांनी सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं असलं तरी या निमित्ताने मुंबईसारख्या शहरात मैदानांवर मुलींच्या खेळण्याचं स्वातंत्र्य आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर असल्याचं समोर आलं आहे.
अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या या मुलींसाठी घराबाहेर पडून असं खुल्या आकाशात खेळणं, ही त्यांच्यासाठी स्वातंत्र्य अनुभवण्याची एक संधी देखील आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











