You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सनातन संस्था: कोण आहे संस्थापक, संस्थेत काय काम केलं जातं आणि संस्थेवर कोणते आरोप झाले ?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या झाली होती. आज 10 मे रोजी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
या निकालात सनातन संस्थेचे कार्यकर्ते विक्रम भावे, वकील संजीव पुनाळेकर आणि डॉ. वीरेंद्र तावडे निर्दोष असल्याचं सिद्ध झालं आहे.
या निकालानंतर नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे दाभोलकर यांनी म्हटले आहे.
सनातन संस्थेच प्रवक्ते चेतन राजहंस यांनी या निकालावर समाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून काढलेल्या या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रकरणातील काही संशयित हे महाराष्ट्रीतील सनातन संस्थेशी निगडित होते.
संशयाची सुई सनातन संस्थेवर आल्यापासून सनातन संस्था अनेकवेळा चर्चेत आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात आणखी तीन हत्या झाल्या त्यातही सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या लोकांचा सहभाग असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले होते.
ही सनातन संस्था नेमकी काय आहे, काय काम करते आणि या संस्थेतील लोक संशयाच्या भोवऱ्यात कसे अडकले हे आपण या लेखातून पाहू.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरुद्ध सनातन संस्था
सनातन संस्था ही 'ईश्वरी राज्या'च्या निर्मितीसाठी आणि हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी काम करते, असं त्यांच्या संकेतस्थळावर लिहिण्यात आलेलं आहे. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी ही संस्था स्थापन केली आहे.
गेल्या तीन दशकांपासून, आधी 'सनातन भारतीय संस्कृती संस्था' या नावानं आणि नंतर 'सनातन संस्था' हे नाव धारण करुन ही संघटना काम करत आहे.
सनातन संस्थेशी संलग्न असलेल्या व्यक्तीला 'साधक' म्हटलं जातं. या साधकांचं ध्येय 'परात्पर गुरुं'नी ( डॉ. जयंत बाळाजी आठवले) सांगितलेल्या मार्गावर चालणं आणि मोक्षप्राप्ती करणं हे असते. सनातन संस्थेच्या निर्मितीपासून संस्थेचे मुखपत्र 'सनातन प्रभात' प्रकाशित केलं जातं.
या वृत्तपत्रातून साधकांसाठी वेळोवेळी सूचना येत असतात. त्या शिवाय संस्थेची शेकडो पुस्तके आहेत, नियमितपणे त्यांच्या बैठका, सत्संग होतात त्यातून साधकांना सूचना दिल्या जातात.
'सनातन प्रभात' वाचल्यानंतर असं लक्षात येतं की हिंदू धर्माशी निगडित असलेली तत्त्वं यांचा प्रचार प्रसार या वृत्तपत्रातून तर केलाच जातो. त्याचबरोबर हिंदूच्या हितांचं रक्षण व्हावं ही भूमिका सातत्याने मांडली जाते.
दहशतवाद, डाव्या चळवळींमुळे हिंदू समाजाचे विघटन होतं, ऱ्हास होतो तसेच पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे तरुण पिढी भरकटत असल्यामुळे धर्माचरण हेच सर्व उन्नतीचे साधन आहे, अशी भूमिका सनातन संस्था या वृत्तपत्रातून मांडताना दिसते.
तर दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्य आहे. ज्या गोष्टी विज्ञानबाह्य आहेत, विज्ञानाचा ज्या गोष्टींना आधार नाही अशा गोष्टींतून कुणाची फसवणूक होत असेल, श्रद्धेच्या नावाखाली बुवाबाजी-जादूटोणा होत असेल तर त्याला विरोध करणे, समाजात या विषयी जागृती करणे असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य आहे. या चळवळीचे नेतृत्व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलं होतं.
या दोन्ही संस्थांची विचारधारा परस्परविरोधी आहेत, एकाच काळात दोन्ही संस्थांचे कार्य राज्यात सुरू झालं, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात या संस्थांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे.
'सनातन संस्था ही समाजात धार्मिकतेचे स्तोम माजवते, विज्ञानबाह्य गोष्टींना चालना देते,' असं अंनिस म्हणतं तर 'अंनिस हे ईश्वरविरोधी आहेत, धर्मविरोधी आहेत' असं सनातन संस्थेचं म्हणणं आहे.
'अंनिस केवळ हिंदूंच्याच चालीरिती आणि परंपरांवर टीका करत असते, इतर धर्मांबाबत ते सोयीस्करपणे मौन बाळगतात' असा आरोप देखील सनातनने केला आहे. तर आम्ही सर्व धर्मातील अवैज्ञानिक गोष्टींविरोधात बोलतो असं अंनिसचं म्हणणं आहे, पण राज्यातील बहुतांश लोक हे हिंदूच आहेत, त्यांचीच धर्माच्या नावाखाली फसवणूक होताना दिसते त्यामुळे याच गोष्टींची चर्चा होते असं स्पष्टीकरण अंनिस देतं. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी देखील यावर अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे.
दोन्ही संस्थांमधील विरोध तीव्र होण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे जादूटोणाविरोधातला कायद्याचा प्रस्ताव.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा विषय लावून धरला होता, तर सनातन संस्थेचा या कायद्याला विरोध होता.
राज्यभरात अनेक ठिकाणी जादूटोण्यामुळे लोकांचे बळी जातात, आर्थिक आणि मानसिक शोषण होतं तेव्हा अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी, यासाठी हा कायदा यावा अशी दाभोलकर आणि अंनिसची भूमिका होती.
तर, हा कायदा हिंदूविरोधी आहे आणि यामुळे हिंदूना धर्मपालन करणेच अवघड होईल अशी भूमिका घेत सनातनने तीव्र विरोध केला होता.
अनेक वर्षांच्या संघर्षांनतर हा कायदा विधिमंडळात मंजूर झाला होता. पण तो पाहण्यासाठी डॉ. दाभोलकर जिवंत नव्हते. ऑगस्ट 2013 मध्ये त्यांची हत्या झाली आणि डिसेंबर 2013 मध्ये हा कायदा मंजूर झाला.
'महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम 2013' असे या कायद्याचे नाव आहे.
या कायद्याविरोधात सनातनसोबतच इतर कडव्या हिंदुत्ववादी संघटना या लढ्यात उतरल्या. या संघटना 'सनातन संस्थे'च्या नेतृत्वात येणार नाहीत त्यावेळी सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांसोबत समन्वय असावा या हेतूने 'हिंदू जनजागृती समिती'ची स्थापना करण्यात आली.
हिंदू जनजागृती समितीत असणारे बहुसंख्य साधक हे सनातनशी संलग्न आहेत. हिंदू जनजागृतीचे प्रमुख हे डॉ. चारुदत्त पिंगळे हे आहेत. त्यांच्या संकेतस्थळांवर डॉ. आठवले यांचे संदेश आपल्याला वाचायला मिळतात.
जादूटोणाविरोधी कायद्यामुळे सनातन संस्था आणि अंनिसमध्ये तीव्र मतभेद झाले आणि ही लढाई केवळ वैचारिक न राहता कायदेशीर लढाईदेखील बनली.
सनातनविरोधी खोटा प्रचार केला म्हणून सनातनने अंनिस, डॉ. दाभोलकर आणि इतर कार्यकर्त्यांविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीच्या 16 केसेस टाकल्या होत्या, असं हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदेंनी बीबीसी मराठीला सांगितले.
सनातन संस्थेचं नाव प्रकरणात कसं आलं?
सनातन संस्था ही केवळ अध्यात्मिक जागृती करणारी संस्था आहे असा दावा सनातन संस्थेनी नेहमी केला आहे. पण अनेक हिंसाचारांच्या घटनात सनातन संस्थेचे साधक सहभागी असल्याचं तपासात आढळलं आहे.
एटीएस, सीबीआय सारख्या तपास यंत्रणा जेव्हा कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे यांच्या हत्यांचा तपास करू लागल्या होत्या तेव्हा त्यात काही नावं, जागा यांचा वारंवार उल्लेख होऊ लागला होता. जसं की दाभोलकरांच्या हत्या प्रकरणानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे यांना गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणानंतर करण्यात आलेल्या तपासानंतर अटक करण्यात आली.
या प्रकरणांचा परस्पर संबंध कसा आहे याबाबत नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं होतं की "2015 साली पानसरेसरांवर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर कलबुर्गी आणि 2017 साली गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. गौरी लंकेश यांच्या केसमध्ये परशुराम वाघमारे नावाच्या शूटरला अटक झाली. त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यावरुन 2018 साली नालासोपाऱ्यात वैभव राऊत याच्याकडे शस्त्रसाठा सापडला." (वैभव राऊत देखील सनातनशी संबंधित आहेत.)
"त्याचा तपास करताना शरद कळस्करपर्यंत महाराष्ट्र एटीएस पोहोचले. हे चार खून आणि नालासोपाऱ्याची केस या पाच प्रकरणांत काही लोक समान आहेत. चार्जशीटमध्ये उल्लेख केलेला आहे की डॉ. दाभोलकरांची हत्या ही एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे. डॉ. तावडे 2016 सालीच पकडले गेले आहेत. त्यानंतरही खून झाले आणि नालासोपाऱ्यात शस्त्र सापडली," असं मुक्ता दाभोलकर सांगतात.
या साधकांशी आपला संबंध आहे परंतु त्यांच्या कृत्याशी आपला कुठलाही संबंध नाही. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचे सनातन संस्थेनी म्हटले होते. सनानतन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर निर्दोष सुटले आहेत.
2008 साली ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या आवारात एक बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात दोषी आढळलेले विक्रम भावे हे नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात संशयित होते, त्यांची निर्दोष सुटका झाली आहे.
या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाहीये, केवळ सनातनशी त्यांचा संपर्क आल्यामुळेच तेच दोषी आहेत या पूर्वग्रहातूनच त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला अशीच भूमिका सनातनचे प्रवक्ते मांडतात.
2009 मध्ये मडगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. त्यात संस्थेचे साधक मलगोंडा पाटील यांचा या स्फोटात मृत्यू झाला होता. बॉम्ब हा दुसऱ्या ठिकाणी फोडायचा होता पण तिथे ठेवण्याआधीच तो फुटला आणि त्यात मलगोंडा पाटील यांचा मृत्यू झाला असं तपास यंत्रणांनी म्हटलं होतं.
नलगोंडा पाटील हे सनातनचे साधक असल्याची गोष्ट सनातन संस्थेनी मान्य केली होती. पण 'हा तपासच पूर्वग्रहातूनच झाल्यामुळे सनातनवरच आरोप ठेवण्यात आले, उलट आमचा एक साधक मृत्युमुखी पडला याचं कुणाला सोयरसुतक नाही,' असं संस्थेनी म्हटलं होतं.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सनातनचेच नाव का आले ? असा प्रश्न रमेश शिंदेंना विचारला असता, त्यांनी उत्तर दिले की "सनातन आणि अंनिसची लढाई ही कायदेशीर होती. वैयक्तिक कधीच नव्हती. घटनात्मक मार्गानेच पेच सोडवण्यावर आमचा भर होता आणि आता देखील आहे. म्हणूनच तर आम्ही न्यायालयात गेलो. त्यांच्याविरोधात आमच्या 16 केसेस होत्या. यातूनच सनातनचे नाव पुढे आले."
शिंदे पुढे सांगतात, "तपास पूर्ण करुन गुन्हेगार शोधला जातो, जसे पुरावे मिळतात त्यानुसार गुन्हेगारानं काय केलं? हे ठरवलं जातं, परंतु या ठिकाणी आधी आम्हीच गुन्हेगार आहोत हे निश्चित करण्यात आलं आणि त्यानुसार पुरावे गोळा करण्यात आले."
आपल्या उत्तराच्या समर्थनार्थ रमेश शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर केलेल्या विधानाचा दाखला दिला. शिंदे सांगतात, "पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं की महात्मा गांधींची नथुराम गोडसेनी हत्या केली होती. त्याच प्रवृत्तीच्या लोकांनी दाभोलकरांची हत्या केली आहे."
'त्यांच्या या विधानानेच तपास कोणत्या दिशेने जावा हे त्यांनी सुचवले होते', असे रमेश शिंदे सांगतात.
पृथ्वीराज चव्हाणांनी दिला होता सनातन संस्थेच्या बंदीचा प्रस्ताव
सनातन ही विघटनवादी संस्था असल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालावी असा विचार तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.
"सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 2011 मध्ये बंदीचा प्रस्ताव पाठवला होता. पण तो प्रस्ताव केंद्रातच अडकल्याचेही त्यांनी नंतर सांगितले होते. 2013 मध्ये आम्ही जवळपास 1000 पानांची माहिती केंद्राकडे पाठवली होती पण त्याचं पुढे काय झालं हे कळलं नाही," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाबरोबर बोलताना म्हटलं होतं.
पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा हा प्रस्ताव पाठवला तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, मग तेव्हाच हा प्रस्ताव का मंजूर करण्यात आला नाही असा प्रश्न एबीपी माझाने चव्हाण यांना विचारला होता.
त्याचे उत्तर देताना त्यांनी म्हटले होते की, "सनातनवर महाराष्ट्रात बंदी घालण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवला होता, पण देशव्यापी बंदी घालायची असल्यास एक पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते."
"कर्नाटक असेल वा इतर राज्यात ही संस्था काय काम करते हे पाहणं देखील आवश्यक होतं. आम्हाला केंद्राकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची आम्ही उत्तर दिली. 2013 मध्ये 1000 पानांचे डॉसिअर आम्ही पाठवले होते. पुढे या माहितीचं काय झालं आम्हाला माहीत नाही," असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं.
'पण सनातन ही विघटनवादी संस्था आहे तिच्यावर बंदी घालावी याची मागणी आम्ही खूप आधीच केली होती,' याचा पुनरुच्चार चव्हाण यांनी केला.
वीरेंद्र तावडे कोण आहेत?
या प्रकरणातील मुख्य सुत्रधार हे डॉ. वीरेंद्र तावडे आहेत असं तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर सांगितले आहे. वीरेंद्र तावडे हे सनातनचे साधक आहेत. वीरेंद्र तावडे हे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात आरोपी आहेत, दाभोलकर प्रकरणात ते निर्दोष सुटले आहेत.
वीरेंद्र तावडे हे साताऱ्याचे आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात त्यांनी सनातन संस्थेचा प्रचार करण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडेच कोल्हापूर जिल्हा संघटकाची जबाबदारी देण्यात आली होती.
वीरेंद्र तावडे यांना जून 2016 मध्ये अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, सारंग अकोलकर, शरद काळसकर, सचिन अंदुरे आरोपी होते. संशयितांचे वकील संजीव पुनाळेकर यांनीच पिस्तुल नष्ट करुन खाडीत टाकण्याचे सुचवले होते असा आरोप पुनाळेकर यांच्यावर होता. त्यांना या प्रकरणात अटक झाली होती.
तावडे, अंदुरे, काळसकर आणि भावे यांच्यावर न्यायालयाने भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), 34 नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले होते.
आता विक्रम भावे, पुनाळेकर आणि तावडे निर्दोष सुटले असून अंदुरे आणि काळसकर यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सारंग अकोलकर फरार आहे.
वैभव राऊत यांना नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या घरातून एटीएसने स्फोटकं जप्त केली होती. राऊत हे जामिनावर बाहेर आहेत.
संजीव पुनाळेकर यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याबद्दल सीबीआयवर केस टाकली होती.
सनातन संस्थेच्या साधकांचे आरोपपत्रात नाव आल्यानंतर सनातनवर सातत्याने चर्चा झाली आहे.
सनातनच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या समर्थनांवर, कपडे-अन्न कसे असावे या त्यांच्या प्रचारावर टीका करण्यात आली. ही टीका का झाली आणि त्यावर सनातनने काय प्रत्युत्तर दिले हे आपण आता पाहू. त्याआधी आपण पाहू सनातनची स्थापना कशी झाली.
सनातनची स्थापना कशी झाली?
सनातन संस्थेची स्थापना ही डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी केली. सनातन संस्थेचे आधीचे नाव सनातन भारतीय संस्कृती संस्था होते. पुढे ते बदलून सनातन संस्था असे ठेवण्यात आले. डॉ. आठवले हे वैद्यकीय उच्च पदवीधर आहेत.
सनातनच्या संकेतस्थळानुसार 'डॉ. आठवले यांनी 1964 मध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही काळ मुंबईतील रुग्णालयात सेवा प्रदान केली आणि नंतर ते संमोहन उपचार पद्धती शिकण्यासाठी ब्रिटनमध्ये गेले. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ज्ञ होते. पण ते मुंबईला परतले आणि त्यांनी देशातील शेकडो डॉक्टरांना संमोहन उपचार पद्धती शिकवली.'
सनातनच्या संकेत स्थळावर पुढे म्हटले आहे की "डॉ. आठवले यांनी 15 वर्षं प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काही रुग्ण हे औषधोपचारांनी बरे होत नाहीत तर संतांकडे गेल्यावर, तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यावर बरे होतात. त्यामुळे अध्यात्मशास्त्र हे उच्च प्रतीचे शास्त्र आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. इंदूरचे भक्तराज महाराज यांच्याकडून त्यांनी गुरूमंत्र घेतला आणि आपल्या अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली."
पुढे त्यांनी संस्थेची स्थापना केली. संकेतस्थळानुसार डॉ. आठवले सर्व साधकांना संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला अशा विविध कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करावी याचे मार्गदर्शन करतात. कलेसाठी कला नाही, तर ईश्वर प्राप्तीसाठी कला हे त्यांचे तत्त्व आहे.
'ज्या साधकांची अध्यात्मिक पातळी' 61 टक्क्यांच्या पुढे गेली त्यांची संतपदाकडे वाटचाल सुरू होते आणि 70 टक्क्यांच्या वर झाली की त्यांना संस्थेकडून संत घोषित केले जाते. डॉ. आठवले हे त्या व्यक्तीची पातळी किती झाली आहे हे ठरवतात. त्यातही साधनेनुसार दोन प्रकार असतात, एक 'व्यष्टी' म्हणजे वैयक्तिक साधना करणारे आणि दुसरे 'समष्टी' म्हणजे समूहात साधना करणारे साधक. व्यष्टी संतांची संख्या 100 हून अधिक आहे तर आतापर्यंत सनातनने 84 साधकांना समष्टी संत घोषित केले आहे.
'संत' घोषित झाल्यावर एक सोहळा केला जातो आणि 'त्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले' यांना मानसवंदना करुन करुन त्या व्यक्तीच्या नावाची घोषणा केली जाते. ज्या व्यक्तीला 'संत' घोषित केले जाते त्यांच्या नावापुढे 'पूज्य' लावले जाते.
'या संतांच्याच कार्याच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची स्थापना केली जाणार आहे,' असे डॉ. आठवले यांचे म्हणणे आहे.
सनातनच्या धर्मप्रसाराचा मुख्य उद्देश आहे, ईश्वरी राज्याची स्थापना करणे आणि त्यासाठी हिंदू राष्ट्राची निर्मिती. आपल्या संकेतस्थळांवर त्यांनी हिंदू राष्ट्राविषयीचे आपले विचार मांडले आहे.
सनातन आणि हिंदूराष्ट्र
सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती संस्था या दोन्ही संस्था डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेतूनच सुरू झाल्या आहेत. दोन्ही संस्था या हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी कार्यरत असल्याचा दावा करतात.
"सनातन ही अध्यात्मिक मार्गदर्शन करणारी संस्था आहे तर हिंदू जनजागृती संस्था ही 'फ्रंटल ऑर्गनायजेशन' आहे. या द्वारे हिंदूंचे संघटन करणे, त्यांच्या समस्या सोडवणे हा मुख्य उद्देश आहे," असं हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी बीबीसी मराठीला सांगितले.
रमेश शिंदे पुढे सांगतात, "हिंदू जनजागृतीमध्ये सर्व पंथातील, जातीचे लोक आहेत. वेगवेगळ्या उपासना पद्धतीचे लोक आहेत. मी अध्यात्मिक मार्गदर्शन सनातन संस्थेकडून घेतो आणि कार्य हिंदू जनजागृती समितीच्या मार्फत करतो."
"हिंदू जनजागृती समितीमध्ये विविध देवी-देवतांना मानणारे आणि त्यांची उपासना करणारे लोक आहेत. त्यांचे अध्यात्मिक गुरूही वेगळे असतात तर सनातनमध्ये सर्वांचे गुरू हे परमपूज्य डॉ. जयंत आठवले असतात," असं ते सांगतात.
'केवळ सनातनच नाही तर जी व्यक्ती स्वतःला हिंदू म्हणवून घेते, त्यांच्या सहकार्यासाठी आम्ही तत्पर आहोत,' असं ते सांगतात.
सनातन संस्था ही टोकाच्या हिंदुत्वाचा प्रचार करते, या व्यवस्थेत मुस्लीम, बौद्ध, जैन पारशी यांना काय स्थान आहे? असे विचारल्यावर रमेश शिंदे यांनी सांगितले की "छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते आमचे आदर्श आहेत. त्यांच्या राज्यात कुणाचा पंथ किंवा कुणाची उपासना पद्धती वेगळी आहे म्हणून छळ झाला नाही तीच व्यवस्था आम्हाला अपेक्षित आहे."
हिंदू राष्ट्र स्थापनाचे उद्दिष्ट..
सनातन संस्थेच्या वेबसाईटवर संस्थेचं हे उद्दिष्ट दिलं आहे - 'समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांद्वारे सर्वच दृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे.'
'परात्पर गुरू डॉ. आठवले यांचे विचारधन खंड -2, 'हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा' या पुस्तकात लिहिलं आहे की '...डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम 1998 या वर्षी भारतात वर्ष 2023 मध्ये 'ईश्वरी राज्य' म्हणजे 'हिंदुराष्ट्र' स्थापित होईल असा विचार द्रष्टेपणाने मांडला होता.
'स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकर गुरूजी आदी थोर पुरुषांनीही हिंदुराष्ट्राचा विचार प्रखरपणे मांडला. दुर्दैवाने स्वयंभू हिंदुराष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि हिंदुराष्ट्र ही तेजस्वी संकल्पना झाकोळली गेली,' असं डॉ. आठवले यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
हिंदू राष्ट्राचा विचार प्रखरपणे मांडणे ही सनातनची भूमिका आहे, हे सनातनचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांच्या विचारांवरुन स्पष्ट होते.
सनातन संस्थेची बाजू
बीबीसी मराठीने सनातन संस्थेची या संस्थेच्या कामाचे स्वरूप, हिंदू राष्ट्र, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण यावर काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा निकाल लागण्यापूर्वीच बीबीसी मराठीने सनातन संस्थेचे प्रवक्ते यांच्याकडून संस्थेसंबंधित प्रश्नावली पाठवली होती.
सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बीबीसी मराठीला व्हॉटसअप द्वारे बीबीसीने पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली होती.
यात त्यांनी म्हटले की, "भारत हे अनादिकाळापासून हिंदु राष्ट्र होते. या हिंदु राष्ट्राचा गुणधर्म सर्वसमावेशकता आहे. या देशात शक आले, हूण आले, कुशाण आले आणि भारतीय बनले. पारसी आले, यहुदी आले. त्यांना भारताने सर्वप्रथम आश्रय दिला.
"आज टाटा हे पारसी म्हणून नाही, तर भारतीय उद्यमी म्हणून प्रसिद्ध आहेत. येथे अरबी आले, युरोपी आले, तर भारतीय संस्कृतीचे ध्वजवाहक बनले. शिवछत्रपतींच्या हिंदु राष्ट्रात सर्व धर्मपंथांचे कल्याण झाले, हा इतिहास आहे. दुसरे असे की, हिंदू राष्ट्रात कोणाचे काय स्थान असावे, असे विघटनवादी विचार (सनातन संस्था) देत नाही, तर अध्यात्माधारित जीवनशैली आणि राष्ट्ररचना कशी असावी, याची चर्चा (सनातन संस्था) करते," असं राजहंस सांगतात.
निकालावर सनातनची भूमिका
10 मे च्या निकालानंतर बीबीसी मराठीने सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांची प्रतिक्रिया घेतली. या निकालावर त्यांनी समाधान व्यक्त केले. सुरुवातीपासूनच हिंदुत्ववाद्यांना गोवण्याचा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे त्यांनी म्हटले.
हत्येच्या काही तासांतच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य करुन तपासाची दिशा भरकटवली होती. या प्रकरणात सनातनचे साधक वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना अकारण त्रास भोगावा लागला.
सचिन अंदुरे आणि शरद काळसकर या दोन हिंदुत्ववाद्यांना जन्मठेप देण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की ते निर्दोष असतील. त्यांचे नातेवाईक उच्च न्यायालयात जाऊन दाद मागतील, असे राजहंस यांनी म्हटले.
सनातनची कार्यपद्धती आणि उद्देश
सनातन संस्थेच्या पुस्तकांमध्ये हिंदूराष्ट्र 2023 साली स्थापन होईल असे सांगण्यात आले होते तर त्याबद्दल काय मत आहे असे विचारले असता, चेतन राजहंस सांगतात की "राममंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा हा हिंदू राष्ट्राच्या स्थूल निर्मितीचा क्षण मानला जाईल, त्यानुसार आमच्या दृष्टीने 22 जानेवारी 2024 पासून अध्यात्माधारित हिंदू राष्ट्राला स्थुलातून प्रारंभ झाला आहे."
"राममंदिर हे राष्ट्रमंदिर आहे, अशी भारतीय जनमानसांत मान्यता मिळत आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांनीही रामलला प्राणप्रतिष्ठेचा दिवस, हा ‘न्यू डिवाईन इंडिया’चा (नव्या आध्यात्मिक राष्ट्राचा) प्रारंभ आहे, असे म्हटले होते. एक प्रकारे सनातनचे उद्दिष्ट प्राप्तीच्या जवळ जात आहे," असं राजहंस सांगतात.
नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपांसदर्भात चेतन राजहंस म्हणतात, की "या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांशी आमचा कुठलाही संबंध नाही, आम्ही आध्यात्मिक माणसे आहोत. आतंकवादी नाही !"
सनातन संस्थेच्या साधकांचे आरोपपत्रात नाव आल्यानंतर सनातनवर सातत्याने चर्चा झाली आहे.
सनातनच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या समर्थनांवर, कपडे-अन्न कसे असावे या त्यांच्या प्रचारावर टीका करण्यात आली. ही टीका का झाली आणि त्यावर सनातनने काय प्रत्युत्तर दिले हे आपण आता पाहू. त्याआधी आपण पाहू सनातनची स्थापना कशी झाली.
सनातन आणखी काय काय शिकवते ?
सनातन संस्था त्यांच्या साधकांना अनेक गोष्टी शिकवते. सकाळी उठल्यावर दात कसे घासावे इथपासून रात्री कसे झोपावे इथपर्यंत सगळ्या गोष्टींचे सल्ले ही संस्था देते. सनातनच्या अधिकृत वेबसाइटवरचे काही सल्ले:
- नग्न न होता अंघोळ करा. नसता वाईट शक्तींचा त्रास होऊ शकते.
- उभ्याने लघवी करू नये.
- शौचास जाऊन आल्यानंतर हात मातीने घासून स्वच्छ करावेत. टॉयलेट पेपर वापरू नये.
अनेक ठिकाणी हे सल्ले देताना सनातन संस्थेने त्यामागची कारणं देण्याचा प्रयत्न केला आहे. उदा.
रात्रीच्या वेळी आरशात पहाणे निषिद्ध आहे कारण आरशातील प्रतिबिंबावर वातावरणातील प्राबल्यदर्शक वाईट शक्ती लगेचच आक्रमण करू शकतात.
निर्जीव ब्रशने दात घासण्यापेक्षा सजीव बोटाने दात स्वच्छ केल्यास शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर लाभ होतो.
श्राद्धाच्या दिवशी दात घासू नयेत कारण तेव्हा पूर्वजांचे लिंगदेह पृथ्वीच्या कक्षेत येऊन संबंधित वास्तूत भ्रमण करत असतात. त्यावेळी तेज तत्त्वात्मक लहरींची तीव्रता घटू नये म्हणून जेवल्यानंतरही चूळ भरू नये.
पण सनातनच्या या सल्ल्यांना तज्ज्ञांनी विरोध केला आहे. दातांबद्दलच बोलायचं झालं तर श्राद्धाच्या दिवशी दात घासू नये, ही अंधश्रद्धा आहे, असं डेंटिस्ट सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना 2018 साली बोलताना डॉ. रविंद्र जोशी म्हणाले, "बोटाने हिरड्यांना थोडाफार मसाज होतो, पण दात साफ होत नाहीत. दोन दातांमधले कण साफ करण्यासाठी ब्रश आवश्यक आहे. अंघोळ करणं जितकं आवश्यक तितकंच रोज दात घासणं. गेलेल्या व्यक्तीपेक्षा जिवंत व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे."
सनातन संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध करतानाही असे तर्क देण्याचा प्रयत्न केला आहे:
'हेअर ड्रायरने केस वाळवू नयेत कारण ड्रायरच्या ध्वनीकडे वायुमंडलातील वाईट शक्तींच्या लहरी आकृष्ट होऊन केसांच्या मुळांत संक्रमित झाल्याने देह अल्प काळात रज-तमाने युक्त बनतो.'
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुऊ नयेत कारण त्या कपड्यांतून त्रासदायक स्पंदने वायुमंडलात प्रक्षेपित होऊ लागतात.
सनातनच्या वेबसाईटप्रमाणेच 'सनातन प्रभात' या मुखपत्रातूनही असे विचार मांडले जातात. हे अवैज्ञानिक आहेत, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत असतो. पण ते कसे बरोबर आहे याचे समर्थन पुन्हा आपल्याला त्यांच्या वेबसाइटवर वाचायला मिळते.
सनातनच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुषांसाठी नियम वेगळे आहेत. जी गोष्ट पुरुषांसाठी वाईट ती स्त्रियांसाठी चांगली आहे, हे सांगताना त्यांनी जो तर्क दिला आहे, तो अनेकांसाठी समजणं कठीण आहे.
पुरुषांनी केस वाढवू नयेत कारण ते रजोगुणाचे प्रतीक आहेत.
स्त्रियांनी केस वाढवावेत कारण त्यांच्या देहातून रजोगुणाच्या साहाय्याने लांब केसांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या तेजतत्त्वात्मक ऊर्जेचा उपयोग करून शक्तिलहरींचे वायुमंडलात वेगवान प्रक्षेपण करणे शक्य होते.
त्या शक्तीलहरींमुळे वायुमंडलातील रज-तमाचे उच्चाटन होते. या शक्तितत्त्वात्मक कार्याचे प्रतिक, तसेच देहातील रजोगुणाच्या कार्याला पोषक आणि पूरक म्हणून स्त्रीने केस वाढवावेत.
'सनातन आणि क्षात्रधर्माचा प्रचार'
या व्यतिरिक्त सनातनकडून विविध ठिकाणी शिबिरे घेतली जातात, क्षात्रधर्माचा प्रचार करण्यासाठी किंवा क्षात्रतेजाला उत्तेजन देणे, आत्मसंरक्षण, या अंतर्गत सनातन संस्थेची शिबिरे चालतात.
पत्रकार धीरेंद्र झा यांनी 'शॅडो आर्मीज' या पुस्तकात एक प्रकरण सनातन संस्थेवर लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की 'सनातन संस्थेच्या 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' पुस्तिकेत बंदूक कशी चालवावी याबाबत सदस्यांना मार्गदर्शन केले गेले आहे. ते असेही म्हणतात की गोळी चालवण्यासाठीचे लक्ष्य हे दुर्जन असावे. संस्थेचे प्रकाशित साहित्य पाहिल्यास स्पष्ट होते की 'दुर्जन' याचा अर्थ विवेकवादी (Rationalists), मुस्लीम, ख्रिश्चन आणि जो कोणी हिंदूविरोधी मानला जातो तो.'
पुढे धीरेंद्र झा लिहितात, 'आठवले यांच्या 'क्षात्रधर्म साधना' या पुस्तिकेनुसार, 'पाच टक्के साधकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. योग्य वेळी ईश्वर कोणत्या तरी माध्यमातून शस्त्र उपलब्ध करून देईल.' पुस्तिकेत पुढे असेही म्हटले आहे, 'एखाद्याला गोळी झाडण्याचा अनुभव नसला तरी चालेल. तो जेव्हा देवाचे नामस्मरण करत गोळी झाडेल तेव्हा दैवी नामस्मरणातील अद्भुत शक्तीनं गोळी नक्कीच लक्ष्याचा अचूक भेद घेईल."
या पुस्तकातील मजकुराबाबत आणि धीरेंद्र झा यांच्याबाबत विचारले असता हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे सांगतात की 'धीरेंद्र झा हे केवळ निवडक आणि संदर्भाविरिहत मजकूर घेऊन उल्लेख करतात.'
'सनातन संस्थांच्या प्रगत स्वसंरक्षण शिबिरांचा तपास यंत्रणांनी विपर्यास केला,' असे सनातनच्या वेबसाइटवर देखील म्हटले आहे.
गेल्या अकरा वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून आता सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर हे निर्दोष असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. या खटल्याच्या निमित्ताने राज्यातील सामाजिक-धार्मिक वातावरण ढवळून निघाले होते.