सूर्यापेक्षा जास्त वय, सेकंदाला 61 किमी प्रवास; आजवर पाहिलेल्या सर्वात जुन्या धूमकेतूबद्दल जाणून घ्या

फोटो स्रोत, ESO/O. Hainaut
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
संशोधकांनी अवकाशात अशी एक गोष्ट टिपलीय जी कदाचित जगातला सर्वात जुना धूमकेतू असू शकतो.
3I/Atlas हे त्या 'Interstellar Object' चं नाव. इंटरस्टेलर ऑब्जेक्ट म्हणजे काय? 3I/Atlas काय भानगड आहे?
आणि हा आजवर पाहिला गेलेला सर्वात जुना धूमकेतू असू शकण्याचं कसं लक्षात आलं?
Interstellar या शब्दाचा अर्थ होतो आपल्या आकाशगंगेतील म्हणजे Milky Way Galaxy च्या दोन ताऱ्यांदरम्यान स्थित असलेली वा प्रवास करणारी वस्तू.
आता ज्या 3I/Atlas जा शोध लागलाय ही आजवरची अशी तिसरीच वस्तू वा Object आहे जे आपल्या सौरमालेच्या बाहेरून आल्याचं स्पष्ट झालंय आणि हा 3I/Atlas आपल्या सौरमालेपेक्षा 3 अब्ज वर्षं जुना असण्याची शक्यता असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या टीमने म्हटलंय.
युकेच्या रॉयल अॅस्टॉनॉमिकल सोसायटीच्या राष्ट्रीय बैठकीमध्ये या शोधाचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला.
या 3I/Atlas या वेग पाहता सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावाखाली नसून, तो सात अब्ज वर्षांपेक्षा जुना असण्याची शक्यता असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठाचे खगोल शास्त्रज्ज्ञ मॅथ्यू हॉपकिन्स यांनी म्हटलंय.
मॅथ्यू हॉपकिन्स यांनी तयार केलेल्या मॉडेलच्या आधारे या 3I/Atlas चा शोध लावण्यात आलाय.
धूमकेतूला नाव कसं देतात?
धूमकेतूंना त्यांचा शोध लावणाऱ्यांवरून सहसा नावं दिली जातात. या धूमकेतूच्या नावातला I म्हणजे Interstellar.
तो आजवरचा तिसरा इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे म्हणून 3. याचा शोध लावला चिलीमधल्या अॅटलास सर्व्हे टेलिस्कोपने म्हणून - 3I/Atlas.
3I/Atlas चा वेग किती आहे?
1 जुलै 2025 ला चिलीमधल्या अॅटलास सर्व्हे टेलिस्कोपने या 3I चा शोध लावला, तेव्हा तो सूर्यापासून 67 कोटी किलोमीटर्सच्या अंतरावर होता.
म्हणजे पृथ्वी आणि गुरू ग्रहामध्ये जितकं अंतर आहे, साधारण तितकं अंतर. सध्या हा 3I/Atlas फक्त प्रचंड मोठ्या टेलिस्कोपनीच पाहता येतोय. आणि आता तो नेमक्या कोणत्या मार्गाने प्रवास करतोय याचा शोध लावण्याची आणि त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची स्पर्धा जगभरातल्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये लागलेली आहे.
31 हा प्रचंड वेगाना प्रवास करत आहे. याचा वेग ताशी 2,21,000 किलोमीटर्स म्हणजेच 61 किमी प्रति सेकंद इतका आहे.
आणि जसजसा हा 3I सूर्याच्या जसा जवळ येईल, तसा त्याचा वेग वाढेल.
मग हा 3I आला कुठून? तर आकाशगंगा म्हणजे Milky Way Galaxy चा - Thick Dish म्हटला जाणारा एक भाग आहे.
म्हणजे सूर्य आणि बहुतेक तारे ज्या भागात आहेत त्याच्या वर आणि खाली फिरणारे हा अर्वाचीन तारे आहेत.
मॅथ्यू हॉपकिन्स यांच्या मते हा 3I देखील याच थिक डिशमधून आला असावा.
आणि तो साधारण फिरतोय कसा? तर या खालच्या फोटोमध्ये आकाशगंगेचा टॉप व्ह्यू आहे. 3I चा अंदाजित मार्ग हा लाल रंगाच्या वतुर्ळांमध्ये दिलाय. तर सूर्याचा मार्ग पिवळ्या वर्तुळांमध्ये आहे.

फोटो स्रोत, Matthew Hopkins
या 3I/Atlas ची निर्मिती जुन्या ताऱ्याभोवती झाली असावी आणि पाण्याच्या बर्फापासून तो तयार झाला असावा असं हे संशोधन करणाऱ्या टीमला वाटतंय.
म्हणूनच पुढच्या काळात जेव्हा 3I/Atlas सूर्याच्या दिशेने आणखी जवळ येईल तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचा पृष्ठभाग तापेल आणि वाफ आणि धुळीचे लोट - फवारे निर्माण होतील. यातूनच धूमकेतूसारखी चमकणारी शेपूट तयार होण्याचीही शक्यता आहे. या 3I चा आकार किती मोठा आहे, तो कसा आहे - याबद्दलचं संशोधन केलं जातंय.
ऑक्टोबर 2025 च्या अखेरपर्यंत 3I/Atlas सूर्यापासून 21 कोटी किलोमीटर्सच्या अंतरावर येईल. म्हणजे साधारण मंगळाच्या कक्षेच्या आत. त्यानंतर तो सूर्याच्या जवळ गेल्याने पाहता येणार नाही. पण डिसेंबर 2025 पर्यंत तो सूर्याच्या पलीकडच्या बाजूस जाईल आणि त्याचं पुन्हा निरीक्षण करता येईल.
या संशोधनाचे सह-लेखक प्रा. क्रिस लिंटॉट सांगतात, "ही गोष्ट आकाशगंगेच्या त्या भागातून आलेली आहे जी आपण यापूर्वी कधीही जवळून वा तपशीलात पाहिलेली नाही. हा धूमकेतू आपल्या सौरमालेपेक्षा जुना असल्याची 66% शक्यता आहे.
"निर्मितीपासूनच या interstellar space मध्ये म्हणजे दोन ताऱ्यांच्या मधल्या अंतराळात भरकट असावा. जेव्हा एखाद्या ताऱ्याची निर्मिर्ती होते तेव्हाच त्याच्या आजूबाजूला interstellar objects ची निर्मिती होत असते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
यापूर्वीची इंटरस्टेलर ऑब्जेक्ट्स
3I/Atlas पूर्वी अशाप्रकारचे फक्त दोन इंटरस्टेलर ऑब्जेक्ट्स पाहण्यात आले होते.
पहिला 2017 मध्ये शोध लावण्यात आलेला 1I/'Oumuamua. दुसऱ्या ताऱ्यापासून आपल्या ताऱ्याच्या - म्हणजे सूर्याच्या दिशेने सौरमालेत आल्याचं नोंदवलं जाणारी ही पहिली वस्तू होती.
2019 मध्ये खगोलशास्त्रज्ञ जेनाडी बोरीसोव्ह यांनी शोध लावला 2I/Borisov चा. हा शोध लागलेला पहिला इंटरस्टेलर कॉमेट - दोन ताऱ्यांच्या मध्ये प्रवास करणारा धूमकेतू होता.
हा 3I/Atlas धूमकेतू सौरमालेच्या अगदी आतवर येणार असला, तरी पृथ्वीला त्यापासून काहीही धोका नाही. हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येणार नाही.
2025 च्या शेवटच्या महिन्यांमध्ये 3I/Atlas साध्या टेलिस्कोप्सनी पाहता येऊ शकेल. शिवाय चिलीमध्ये नव्याने सुरू झालेला वेरा रुबिन टेलिस्कोप जेव्हा दक्षिण गोलार्धातल्या रात्रीच्या आकाशाचे तपशील टिपणं सुरू करेल तेव्हा या 3I/Atlas ची अधिक माहिती तर मिळेलच. पण सोबतच आणखीही नवीन इंटरस्टेलर ऑब्जेक्ट्सचा शोध लागण्याची संशोधकांना अपेक्षा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











