पेरूमध्ये सापडलं 3,500 वर्षांपूर्वीचं शहर; पुरातत्व शास्त्रज्ञांना आणखी काय मिळाली माहिती?

पेनिको हे असं या शहराचं नाव असून ते तब्बल 3500 वर्षे जुनं शहर आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पेनिको हे असं या शहराचं नाव असून ते तब्बल 3500 वर्षे जुनं शहर आहे.
    • Author, जेसिका रॉन्सली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पेरूच्या उत्तर बरांका प्रांतात एका प्राचीन शहर सापडल्याची घोषणा पुरातत्वशास्त्रज्ञांनी केली आहे.

पेनिको हे असं या शहराचं नाव असून ते तब्बल 3500 वर्षे जुनं शहर आहे. पूर्वी ते एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं.

अँडीज पर्वत आणि अमेझॉन खोऱ्यात राहणाऱ्या लोकांशी पॅसिफिक किनारपट्टीलगत राहणाऱ्या सुरुवातीच्या समुदायांना जोडणारं हे एक प्रमुख व्यापारी केंद्र बनलेलं होतं.

हे ठिकाण लिमाच्या उत्तरेस सुमारे 200 किमी अंतरावर आहे. ते समुद्रसपाटीपासून 600 मीटर (1,970 फूट) उंचीवर आहे.

तज्ज्ञांना वाटतं की या शहराची स्थापना अंदाजे इ. स. पूर्व 1,800 ते 1,500 या दरम्यानच्या काळात झाली असावी. हा तोच काळ होता जेव्हा पश्चिम आशिया आणि आशियामधील सुरुवातीच्या संस्कृतींचा उदय होत होता.

पेरूच्या उत्तर बरांका प्रांतात एका प्राचीन शहराचा शोध लावल्याची घोषणा पुरातत्वशास्त्रज्ञांनी केली आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पेरूच्या उत्तर बरांका प्रांतात एका प्राचीन शहराचा शोध लावल्याची घोषणा पुरातत्वशास्त्रज्ञांनी केली आहे.

संशोधकांचं असं म्हणणं आहे की या शहराच्या शोधामुळे आपल्याला 'कॅरल संस्कृती'चं काय झालं, हे समजण्यास मदत होईल.

कॅरल संस्कृती म्हणजे काय?

कॅरल ही अमेरिकेतील सर्वात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते. संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या ड्रोन व्हीडिओमध्ये या शहराच्या मध्यभागी असलेल्या डोंगराच्या वरच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार रचना असल्याचं दिसून येतंय. या रचनेच्या सभोवताली दगड आणि मातीच्या इमारतींचे इतर अवशेष आहेत.

संशोधकांनी आठ वर्षे या ठिकाणी काम केलं आहे. त्यांच्या या संशोधनादरम्यान त्यांना 18 वास्तू संरचना सापडल्या आहेत. यामध्ये धार्मिक मंदिरं आणि राहत्या घरांचाही समावेश आहे.

या प्राचीन शहरातील इमारतींच्या आत त्यांना धार्मिक वस्तू सापडल्या. तिथे त्यांना मानव आणि प्राण्यांच्या मातीच्या शिल्पाकृती तसेच, त्यांना मणी आणि शंखांपासून बनवलेले हारदेखील सापडले आहेत.

कॅरल ही अमेरिकेतील सर्वात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कॅरल ही अमेरिकेतील सर्वात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पेनिको हे प्राचीन शहर ज्या ठिकाणी कॅरलची संस्कृती उभी राहिलेली आहे, त्या ठिकाणाजवळच आहे. कॅरल ही अमेरिकेतील सर्वात जुनी अशी ज्ञात संस्कृती आहे. कॅरल संस्कृतीची स्थापना 5,000 वर्षांपूर्वी म्हणजेच सुमारे इसवीसन पूर्व 3,000 मध्ये झाली होती. ती पेरूच्या सुपे व्हॅलीमध्ये स्थित होती.

कॅरल संस्कृतीमध्ये 32 स्मारकं आढळलेली आहेत. यामध्ये मोठ्या पिरॅमिड-आकाराच्या संरचनांचाही समावेश आहे. कॅरलमध्ये प्रगत सिंचन शेती होती आणि लोक संघटित शहरी वस्त्यांमध्ये राहत होते.

कॅरल सुरुवातीच्या इतर संस्कृतींशी संपर्क न करता स्वतःहून विकसित झालेली संस्कृती असावी, असं तज्ज्ञांना वाटतं. त्या काळातील सुरुवातीच्या इतर संस्कृत्यांमध्ये भारत, इजिप्त, सुमेरिया आणि चीनमधील संस्कृत्यांचा समावेश होतो.

डॉ. रूथ शॅडी या पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी पेनिकोवरील नवीन संशोधनाचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी 1990 च्या दशकात कॅरलमधील उत्खननाचंही नेतृत्व केलेलं होतं. त्या म्हणाल्या की, हा नवा शोध खूप महत्त्वाचा आहे.

हवामान बदलामुळे नष्ट झालेल्या कॅरल संस्कृतीचं नेमकं काय झालं, हे समजून घेण्यास हे पेनिकोमधील नवं संशोधन आपल्याला नक्कीच फायद्याचं ठरू शकेल.

डॉ. रूथ शॅडी या पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी पेनिकोवरील नवीन संशोधनाचं नेतृत्व केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉ. रूथ शॅडी या पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी पेनिकोवरील नवीन संशोधनाचं नेतृत्व केलं आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेशी संवाद साधताना डॉ. शॅडी यांनी म्हटलं की, "पेनिको समुदाय व्यापारासाठी उत्तम ठरेल, अशा ठिकाणी वसलेला होता. ते असं एक ठिकाण होतं जिथे लोक वस्तूंची देवाणघेवाण करू शकत होते. त्यांच्या भौगोलिक ठिकाणावरुन लक्षात येतं की, ते किनारपट्टी, उंच प्रदेश आणि जंगलातील लोकांशीही व्यापार करत होते."

गुरुवारी या नव्या संशोधनाबाबतचे निष्कर्ष शेअर करण्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयात काम करणारे पुरातत्वशास्त्रज्ञ मार्को माचाकुए यांनी या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. त्यांनी सांगितलं की पेनिको ही महत्त्वाची संस्कृती आहे, कारण ती कॅरल संस्कृतीचंच एक प्रतिरूप आहे. पेरूमध्ये अमेरिकेतील अनेक महत्त्वाची पुरातत्वीय स्थळे सापडलेली आहेत. यामध्ये अँडीज पर्वतरांगांमधील माचू पिचूचा इंका किल्ला तसेच मध्य किनाऱ्यावरील वाळवंटात काढलेल्या गूढ आणि गहन वाटणाऱ्या नाझ्का रेषांचादेखील समाविष्ट आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)