40,000 वर्षं जुनं बूमरँग सापडलं, काय होतं याचं वैशिष्ट्य?

हे बूमरँग अशा भागात सापडलं जिथे दगडं, प्राण्यांची हाडं आणि काही मानवी हाडं होती.

फोटो स्रोत, Maciej Biernacki

फोटो कॅप्शन, हे बूमरँग अशा भागात सापडलं जिथे दगडं, प्राण्यांची हाडं आणि काही मानवी हाडं होती.
    • Author, हेलन ब्रिग्ज
    • Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी

'बूमरँग' हा शब्द आपल्याला नवीन नाही. बहुतांशवेळा राजकारणाबाबत बोलताना या शब्दाचा वापर आपण ऐकला असेल.

अनेकवेळा राजकारणी एकमेकांवर आरोप करतात. जेव्हा त्यांनी केलेल्या आरोप त्यांच्याचकडे तीव्र स्वरूपात परत येतात तेव्हा अमूक गोष्ट त्यांच्यावर बूमरँग झाली असं म्हटलं जातं.

बूमरँग हे एक असे शस्त्र आहे की ते फेकले आणि त्याने लक्ष्यभेद केला नाही तर पुन्हा फेकणाऱ्याच्या हातात ते येतं.

'जंगलबुक' या कार्टुनमध्ये मोगली हे पात्र बूमरँग वापरताना आपल्याला दिसले आहे.

तर हे बूमरँग नेमकं आहे काय? आणि ते कसं काम करतं, हे आपण पाहू.

बूमरँग हे हजारो वर्षांपासून वापरलं जाणारं शस्त्र किंवा साधन म्हणता येईल. म्हणजे ते शस्त्र जर एका दिशेला फेकलं तर ते पुन्हा फेकणाऱ्याकडे परत येतं. या शस्त्रावरूनच राजकारणात 'बूमरँग' हा शब्द वापरला जातो.

प्रचंड कौशल्यानं बनवलेलं 40 हजार वर्षे जुनं शस्त्र

संशोधकांनी विचार केला त्यापेक्षा पूर्वीपासून बूमरँगचा वापर होत होता. हे शस्त्र हजारो वर्षांपूर्वीपासून वापरले जाते. यावरुन त्या काळातला मानव किती हुशार आणि कल्पक होता हे आता नव्यानं समोर आलं आहे.

हे शस्त्र 1985 मध्ये पोलंडमधल्या एका गुहेत सापडलं होतं. आता संशोधकांना ते तब्बल 40,000 वर्षे जुनं असावं, असं वाटतं.

पुरातत्व शास्त्रज्ञ सांगतात की, हे शस्त्र प्रचंड कौशल्याने बनवलेलं असून ते एक मॅमथच्या (मोठ्या हत्तींसारखा प्राणी) सुळ्यापासून (टस्क) तयार केलं गेलं आहे.

संशोधकांनी सांगितलं की, या बूमरँगचा आकार पाहता ते फेकल्यावर हवेत उडाले असेल, पण फेकणाऱ्याकडे परत आले नसेल.

संशोधकांचं म्हणणं आहे की, हे बूमरँग शिकार करण्यासाठी वापरले जात असावे, पण त्याचा सांस्कृतिक किंवा कलात्मक उपयोगही असू शकतो. कदाचित ते एखाद्या धार्मिक विधीमध्येही वापरलं जात असेल.

मॅमथच्या सुळ्यांपासून बनवलेला बूमरँग

मॅमथच्या सुळ्यापासून बनवलेले हे बूमरँग दक्षिण पोलंडमधील ओब्लाझोवा नावाच्या गुहेत सापडले.

सुरूवातीला असं वाटत होतं की, हे बूमरँग सुमारे 30,000 वर्षं जुने आहे. परंतु, तिथे सापडलेल्या मानव आणि प्राण्यांच्या हाडांवर केलेल्या नव्या आणि अधिक विश्वासार्ह रेडिओकार्बन तपासणीनुसार त्याचं वय 39,000 ते 42,000 वर्षांदरम्यान असल्याचं समोर आलं आहे.

"हे जगातले सर्वांत जुने बूमरँग आहे आणि असा आकार आणि इतक्या लांबीचे पोलंडमध्ये सापडलेले हे जगातील एकमेव बूमरँग आहे," असं इटलीतील बोलोग्ना विद्यापीठाच्या डॉ. साहरा तालामो यांनी सांगितलं.

हा हत्तीच्या सुळ्यापासून (हस्तीदंत) बनवलेले बूमरँग वाकलेले आहे आणि त्याचा आकार बेसबॉलच्या बॅटसारखा आहे.

फोटो स्रोत, Talamo et al., 2025, PLOS One, CC-BY 4.0

फोटो कॅप्शन, हे हत्तीच्या सुळ्यापासून (हस्तीदंत) बनवलेले बूमरँग वाकलेले आहे आणि त्याचा आकार बेसबॉलच्या बॅटसारखा आहे.

त्या म्हणाल्या की, हा शोध मानवाच्या वागणुकीविषयी 'अतिशय महत्त्वाची माहिती' देतो, विशेषतः 42,000 वर्षांपूर्वी जगणाऱ्या होमो सेपियन्स जातीच्या मानवाने प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरता येईल अशी 'इतकी परिपूर्ण वस्तू' तयार केली होती, हे त्याच्या ज्ञानाचं चांगलं उदाहरण आहे.

हे बूमरँग चांगल्या अवस्थेत सापडले आहे. त्यावरच्या खुणांवरून असं दिसतं की, ते वापरण्यापूर्वी घासून गुळगुळीत केले गेले होते आणि ते उजव्या हाताने वापरणाऱ्या व्यक्तीसाठी तयार केला होते.

आदिवासी संस्कृतीशी संबंधित शस्त्र

बूमरँग सामान्यतः ऑस्ट्रेलियातील आदिवासी संस्कृतीशी संबंधित आहेत.

मात्र, ऑस्ट्रेलियाबाहेर इतर ठिकाणी सापडलेल्या काही दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंवरून लक्षात येतं की, बूमरँग वेगवेगळ्या खंडांमध्येही वापरले जात होते.

ऑस्ट्रेलियात सापडलेले आतापर्यंतचा सगळ्यात जुने बूमरँग सुमारे 10,500 वर्षांपूर्वीचे आहे आणि ते लाकडापासून बनवलेले आहे.

परंतु, ऑस्ट्रेलियातील नॅशनल म्युझियमनुसार, तिथे बूमरँगचे सगळ्यात जुने चित्ररूप पुरावे सुमारे 20,000 वर्षांपूर्वीच्या भित्तीचित्रांमध्ये दिसून येते.

पोलंडच्या दक्षिणेकडील सीमेवरील ओब्लाझोवा गुहेचे प्रवेशद्वार.

फोटो स्रोत, Talamo et al., 2025, PLOS One, CC-BY 4.0

फोटो कॅप्शन, पोलंडच्या दक्षिणेकडील सीमेवरील ओब्लाझोवा गुहेचे प्रवेशद्वार.

डेन्मार्क आणि जर्मनीतील जटलंड नावाच्या द्वीपकल्पात सुमारे 7,000 वर्षांपूर्वीचा लाकडी बूमरँग सापडले आहे. तसेच नेदरलँड्समध्ये सुमारे 2,000 वर्षांपूर्वीचा ओक लाकडाचे एक बूमरँग सापडले आहे, जे फेकल्यावर परत येतो.

पोलंड, इटली, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडममधील शास्त्रज्ञांच्या टीमने केलेले हे संशोधन प्लॉस वन या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)