75 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर होऊन गेलेल्या निअँडरथल महिलेचा चेहरा आला समोर, कशी होती ठेवण?

नवीन थ्रीडी मॉडेल

फोटो स्रोत, BBC Studios/Jamie Simonds

    • Author, जोनाथन आमोस, रेबेका मोरेले आणि ॲलिसन फ्रान्सिस
    • Role, बीबीसी सायन्स

75,000 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर होऊन गेलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्हाला भेटता आलं तर? असं काही घडेल यावर विश्वास बसत नाहीये ना? पण विज्ञानाने हा चमत्कार घडवून आणलाय.

शास्त्रज्ञांनी 75,000 हजार वर्षांपूर्वीच्या निअँडरथल महिलेची हुबेहूब प्रतिकृती तयार केलीय. ती महिला आज जर जिवंत असती तर कशी दिसली असती हे सांगणारी एक थ्रीडी प्रतिकृती तयार करण्यात आलीय.

उत्खननात सापडलेल्या एका कवटीच्या मदतीने हे मॉडेल बनवण्यात आलं आहे. छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेली ही कवटी अत्यंत कमकुवत होती. त्यातली हाडं ठिसूळ झाली होती.

शास्त्रज्ञांनी त्याचं वर्णन करताना सांगितलं की 'बुडवलेल्या बिस्किटासारखी' त्या हाडांची अवस्था झाली होती.

त्यामुळे ही कवटी पुन्हा एकत्र करत असताना शास्त्रज्ञांना विशेष काळजी घ्यावी लागली. अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने ही हाडं मजबूत करून त्यांना एकमेकांशी जोडावं लागलं. त्यानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी हे थ्रीडी मॉडेल तयार केलं.

असं काम करणाऱ्यांना पॅलेओआर्टिस्ट म्हणतात. पॅलेओआर्ट ही एक अशी कला आहे जी वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे प्रागैतिहासिक जीवनाचे चित्रण करण्याचा प्रयत्न करते.

जीवाश्मांचा वापर करून त्याकाळातील हुबेहूब प्रतिकृती बनवण्याचं काम हे कलाकार आणि तज्ज्ञ करत असतात.

डॉ एम्मा पोमेरॉय

फोटो स्रोत, BBC Studios/Jamie Simonds

बीबीसी स्टुडिओजने नेटफ्लिक्ससाठी बनवलेल्या 'सिक्रेट्स ऑफ निअँडरथल्स' नावाच्या माहितीपटात हे मॉडेल दिसतं. या माहितीपटात सुमारे 40,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या माणसाच्या पूर्वजांबद्दल नवीन माहिती देण्यात आलीय आणि आत्तापर्यंत आपल्याला त्यांच्याबद्दल किती माहिती आहे याचं परीक्षण करण्यात आलं आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या नवीन प्रारुपामुळे निअँडरथल्सना एक चेहरा मिळालाय. म्हणजे यापुढे कधीही निअँडरथल असा उल्लेख आला तर शास्त्रज्ञांनी बनवलेलं हे प्रारूप त्यांची कल्पना करायला मदत करू शकेल.

केंब्रिज विद्यापीठात या प्रकल्पावर काम करणाऱ्या मानववंशशास्त्रज्ञ डॉ एम्मा पोमेरॉय म्हणतात की, "निअँडरथल्स नेमके कोण होते हे समजून घेण्यासाठी ही महिला आम्हाला नक्कीच मदत करू शकेल असं मला वाटतं. त्यांच्याशी संवाद साधण्यास आम्हाला हिच्यामुळे मोठी मदत होऊ शकेल."

डॉ एम्मा यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, "प्राचीन काळातल्या एखाद्या व्यक्तीचे अवशेष मिळणं आणि त्यावर संशोधन करता येणं हेच मुळात अत्यंत रोमांचक आहे. हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं, पण या महिलेसोबत काम करता येणं हे त्याहूनही खास आहे."

हे मॉडेल ज्या कवटीवर आधारित आहे ती कवटी इराकी कुर्दिस्तानमधील शनिदार नावाच्या गुहेत सापडली. हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे कारण 1950 च्या दशकात किमान 10 निअँडरथल पुरुष, स्त्रिया आणि मुलांचे अवशेष इथे सापडले होते.

2015 मध्ये कुर्दीश अधिकाऱ्यांनी एका ब्रिटीश गटाला इथे संशोधन करण्यासाठी निमंत्रित केलं होतं, तेव्हा त्यांना तिथे एक नवीन सांगाडा सापडला - ज्याला शनिदार झेड (Shanidar Z) असं नाव दिलं गेलं. त्या सांगाड्यात शरीराचा वरचा बहुतांश भाग, पाठीचा कणा, खांदे, हात आणि हात होते.

शनिदार

फोटो स्रोत, Graeme Barker

फोटो कॅप्शन, शनिदार नावाच्या गुहेत 1950 च्या दशकात किमान 10 निअँडरथलपुरुष, स्त्रिया आणि मुलांचे अवशेष सापडले होते.

त्यातील कवटीसुद्धा पूर्णावस्थेत होती पण जवळपास 2सेंटीमीटर जाडीच्या थराखाली ती कवटी दबली होती. कधीकाळी गुहेच्या छतातून कोसळलेल्या खडकामुळे कवटी त्या थराखाली घुसली होती.

केंब्रिजचे प्राध्यापक ग्रॅमी बार्कर हे या उत्खनन मोहिमेचं नेतृत्व करतात. या कवटीबाबत बोलताना ते म्हणाले की, "ती कवटी एखाद्या पिझ्झासारखी सपाट दिसत होती."

"त्या अवस्थेतून आज तुम्हाला दिसणाऱ्या मॉडेलपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल निराश वाटू शकतं तुम्ही ज्या गोष्टी शोधून काढताय त्या क्षुल्लक वाटू शकतात त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचं विलक्षण महत्त्व विसरू शकता."

स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने या कवटीचे तुकडे जोडण्यासाठी त्यांना इंग्लंडला आणलं गेलं. त्यांना गाळाच्या तुकड्यांमध्ये इंग्लंडला घेऊन येणं हे अत्यंत जिकिरीचं काम होतं. त्यानंतर त्या सगळ्या तुकड्यांना स्थिर करणं आणि पुन्हा एकत्र जोडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

एखाद्या किचकट कोड्याप्रमाणे प्रत्येक तुकडा एकमेकांशी जोडावा लागणार होता. ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी पुरातत्व संरक्षकाला जवळपास एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला.

त्यानंतर नव्याने जोडण्यात आलेल्या कवटीचा पृष्ठभाग स्कॅन करण्यात आला. स्कॅन झाल्यानंतर या कवटीची एक थ्रीडी प्रिंट बनवून डच कलाकारांना सुपूर्द केली गेली. ड्रि आणि अल्फोन्स केनिस या दोन कलाकारांनी ही जबाबदारी उचलली. प्राचीन काळातील माणसाची हाडं आणि जीवाश्मांचा वापर करून त्यांच्या प्रतिकृती बनवण्यासाठी हे दोघे जगप्रसिद्ध आहेत.

मूळ सांगाड्यापासून बनवलेली प्रतिकृती अत्यंत लक्ष्यवेधक आहे, कारण त्या निअँडरथल महिलेच्या चेहऱ्यावर दिसणारे भावही तेवढेच वेगळे आहेत पण या महिलेच्या कवटीचा मूळ सांगाडा या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे."

हे काम करणाऱ्या टीमला असं वाटतं की हे मॉडेल जसं बनवलं आहे तशीच ती महिला तिच्या मूळ रूपात दिसत असेल.

हा निष्कर्ष लावण्यासाठी जी हाडं आवश्यक असतात ती मात्र उत्खननात मिळाली माहिती. शरीराच्या वरच्या भागाच्या सांगाड्यात ती हाडं मिळाली नाहीत.

त्याऐवजी संशोधकांनी दातांच्या मुलाम्यात मिळालेल्या प्रथिनांवर जास्त अभ्यास केला कारण ही प्रथिनं महिलेच्या अनुवंशिकतेशी संबंधित असतात. या सोबतच या सांगाड्याची एकूण उंचीदेखील या महिलेचं मूळ स्वरूप समजून घेण्यास काही प्रमाणात मदत करते.

त्या महिलेचं वय काय होतं? तिच्या दातांवरून काढलेल्या निष्कर्षात असं दिसून येतं की या महिलेचा चाळीशीत मृत्यू झाला असावा.

डॉ. एम्मा पोमेरॉय म्हणतात की, "या वयात येईपर्यंत दातांची झीज झालेली असते त्यामुळे अन्न तेवढ्या प्रभावीपणे चावता येत नाही. दात मजबूत असतात त्यावेळचं चावणं आणि दातांची झीज झाल्यानंतरचं चावणं यात फरक असतो."

निअँडरथल्स

फोटो स्रोत, Netflix

"यासोबतच दातांच्या खराब आरोग्याचे आम्हाला इतरही काही संकेत मिळाले ज्यात - काही संसर्ग, हिरड्यांचे आजार झाल्याचं आढळून येतं. आणि यावरूनच हे कळतं की ती आयुष्याच्या नैसर्गिक शेवटपर्यंत पोहोचली होती."

प्रदीर्घ काळापासून, शास्त्रज्ञ आपल्या प्रजातींच्या तुलनेत निअँडरथल्सना क्रूर आणि बेशिस्त मानत होते.

पण शनिदराच्या शोधानंतर हा समज बदलला आहे.

त्याकाळी अंत्यसंस्कार कसे होत असावेत किंवा मृतदेह कसे पुरले जात असावेत याची प्रथा दाखवण्यासाठी या गुहेत सापडलेले अवशेष महत्त्वाचे आहेत. मृतदेह एका उंच खडकाच्या खांबाजवळ असलेल्या जागेत काळजीपूर्वक ठेवण्यात आले होते. या सगळ्या मृतदेहांची मांडणी एका ठराविक पद्धतीत, रांगेत करण्यात आलेली होती.

या अवशेषांमध्ये काही परागकण आढळून आले आहेत. त्यामुळे काहींनी अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहांना फुलांनी सजवलं जात असावं किंवा एखादा धर्मही त्याकाळिया अस्तित्वात असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

डॉ एम्मा पोमेरॉय

फोटो स्रोत, BBC/Gwyndaf Hughes

फोटो कॅप्शन, डॉ एम्मा पोमेरॉय: "मला वाटते की ते कोण होते त्यांच्याशी संपर्क साधण्यात ती आम्हाला मदत करू शकते"

परंतु ब्रिटीश संशोधकांना असं वाटतं की हे परागकण मधमाश्यांनी नंतर सोडलेले असू शकतात किंवा कदाचित शरीराच्या वर ठेवलेल्या फुलांच्या फांद्यांतून ते मृतदेहावर पडलेले असू शकतात.

लिव्हरपूलच्या जॉन मूर्स विद्यापीठाचे प्राध्यापक ख्रिस हंट म्हणतात की, "तरसासारख्या हिंसक प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडू नयेत म्हणून या फांद्या ठेवल्या असाव्यात."

"त्यामुळे अंत्यसंस्कार हा शब्द मी आत्ताच वापरणार नाही. पण चर्च आणि इतर धार्मिक कल्पनांपासून दूर जाण्यासाठी प्लेसमेंट हा शब्द योग्य ठरेल, त्यांची तशी पद्धत असू शकते. पण त्यांच्यात अशी पद्धत होती आणि ती पूर्वजांना जमिनीत पुरण्यासाठी वापरली जात होती याबाबत कसलीही शंका नाही."

हेही नक्की वाचा