इटलीच्या गुहांमध्ये सापडले लाखो वर्षांपूर्वीचे निअँडरथल मानवाचे अवशेष

फोटो स्रोत, ITALIAN CULTURE MINISTRY/AFP/GETTY
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास रंजक आहे. नवनवीन शोध आणि संशोधनाच्या माध्यामातून याबाबत सातत्याने नवीन माहितीचा उलगडा होत असतो.
नुकतंच इटलीमध्ये पुरातत्त्ववेत्त्यांना निअँडरथल मानवाचे 9 अवशेष सापडले आहेत. रोम शहरापासून आग्नेय दिशेला 90 किमी अंतरावर असलेल्या एका प्रागैतिहासिक काळातील गुहेत हे अवशेष सापडले आहेत. तरसांनी या निअँडरथलांची शिकार केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
इटलीच्या सॅन फेलिस सर्सियो या किनारपट्टीलगतच्या शहरात असलेल्या ग्वाटारी गुहेत हा शोध लागला आहे. जीवाश्म स्वरुपात आढळलेल्या या अवशेषांमध्ये कवटीचे तुकडे आणि तुटलेल्या जबड्यांचे तुकडे आहेत.
आजच्या आधुनिक मानवाला शास्त्रीय भाषेत होमो सेपियन्स म्हणतात. प्रागैतिहासिक काळात मानव प्राण्याच्या अनेक जाती या पृथ्वीतलावर होत्या. त्यापैकी होमो सेपियन्स या जातीच्या मानवाशी जवळचं साधर्म असणारा मानव म्हणजे निअँडरथल.
प्रगत मानवाचे पूर्वज मानले गेलेले निअँडरथल जवळपास 40 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीतलावरून नामशेष झाल्याचं मानलं जातं.
मात्र, त्यांच्या डीएनएचे काही सूक्ष्म अंश आजही आधुनिक मानवात जिवंत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
ग्वाटारी गुहेत सापडलेल्या 9 निअँडरथलच्या अवशेषांविषयी इटलीच्या सांस्कृतिक विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या 9 पैकी 8 अवशेष जवळपास 50 ते 68 हजार वर्ष जुने आहेत, तर एक अवशेष 90 हजार ते 1 लाख वर्ष जुनं असू शकतं.
ज्या पुरातत्त्ववेत्यांनी हे अवशेष शोधून काढले त्यांच्या माहितीनुसार या आठ अवशेषांपैकी 7 अवशेष पुरूषांचे, 1 महिलेचा आणि 1 लहान मुलाचा आहे.

जे अवशेष आढळले आहेत त्यापैकी बहुतांश निअँडरथलांची तरसांनी शिकार करून त्यांना गुहेत आणलं असावं, असं पुरातत्त्व विषयाचे प्राध्यापक मारियो रोल्फ यांचं म्हणणं आहे.
गार्डियन वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत प्रा. रोल्फ म्हणतात, "हे प्राणी निअँडरथलांची शिकार करायचे. विशेषतः आजारी किंवा म्हाताऱ्या निअँडरथलांना ते आपलं भक्ष्य करायचे."
इटलीचे सांस्कृतिक मंत्री डॅरिओ फ्रान्सेशिनी यांनी, "सारं जग ज्याविषयी चर्चा करेल, असा हा विलक्षण शोध" असल्याचं म्हटलं आहे.
"या शोधामुळे निअँडरथलांचा अधिक सखोल अभ्यास करण्यास मदत होईल," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Lambert/Ullstein Bild/Getty Images
1939 सालीदेखील याच गुहेमध्ये योगायोगाने निअँडरथलाचे काही अवशेष सापडले होते. "तेव्हापासून हे स्थान निअँडरथल मानवाच्या इतिहासात जगातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण बनलं."
प्राचीन काळात आलेला एखादा भूकंप किंवा भूस्खलनामुळे ही गुहा बंद झाली होती आणि त्यामुळेच मानव उत्क्रांतीच्या इतिहासातला हा प्राचीन ठेवा टिकून राहीला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








