आदिमानवांचं कामजीवन कसं होतं?

- Author, झरिआ गॉरवेट
- Role, बीबीसी फ्युचर
आपली प्रजाती सामूहिकदृष्ट्या एकत्र येऊ लागली त्या मानवी इतिहासाच्या टप्प्याबद्दल वैज्ञानिकांकडे आश्चर्यकारक वाटावी इतकी माहिती गोळा झालेली आहे. आपण तेव्हा चुंबन घेत होतो का, आणि आपल्या लैंगिक अवयवांचं स्वरूप कसं होतं, इत्यादींसारखे तपशीलही त्यात आहेत.
इतिहासपूर्व रोमानियाच्या खडकाळ पर्वतांच्या प्रदेशात त्यांची नजरानजर झाली.
तो होता निअँडरथल मानव- प्राण्यांच्या केसांपासून तयार केलेला टोप त्याने डोक्यावर घातला होता, बाकी संपूर्ण नग्न. त्याची देहयष्टी चांगली होती, त्वचा पांढुरकी होती, कदाचित उन्हामुळे किंचितशी लालसर झाली असावी. त्याच्या दंडाचे बळकट, पिळदार स्नायू दिसत होते, त्यावर त्याने गरुडाच्या नख्यांचं कडं घातलेलं होतं.
ती होती प्रारंभिक आधुनिक मानव- प्राण्यांच्या केसाळ त्वचेचा डगला होता, त्याला लांडग्याच्या केसांची कडा होती. तिची त्वचा सावळी होती, पाय लांब होते आणि केसांची वेणी घातलेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्याने घशातून खाकरल्यासारखा आवाज केला, तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं, आणि- नाकातून मोठ्या सुरात विचित्र आवाज करत, त्याच्या परीने सर्वोत्तम हाळी घातली. तिने कोऱ्या नजरेने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या सुदैवाने ते एकच भाषा बोलत नव्हते. दोघेही अवघडून हसले, बाकी पुढे काय झालं असेल याचा अंदाज आपण सगळेच बांधू शकतो.
भावना उत्तेजित करणाऱ्या एखाद्या प्रेमकथेसारखा प्रसंग इथे अर्थातच घडला नसणार. कदाचित ती स्त्री प्रत्यक्षात निअँडरथल मानवच असेल आणि तो पुरुष आपल्याच प्रजातीतला असेल. कदाचित त्यांचे संबंध सहजगत्या घडून आलेले, व्यावहारिक प्रकारचे राहिले असतील, कारण त्या वेळी फारसे लोक नव्हते. अशा पद्धतीचे संबंध सहमतीने प्रस्थापित होत नसत, असंही सुचवलं गेलेलं आहे.
या- आणि अशा इतर- भेटप्रसंगांमध्ये नक्की काय घडलं, हे आपल्याला कधीच कळणार नाही. पण अशा प्रकारे जोडपी एकत्र येत होती, एवढं आपण खात्रीने सांगू शकतो. सुमारे 37,000-42,000 वर्षांनी, फेब्रुवारी 2002मध्ये दोन शोधप्रवाशांनी रोमानियातील अनिना या शहराजवळच्या कार्पथिआन पर्वतांच्या नैऋत्य बाजूला भूमिगत गुहांची असाधारण व्यवस्था शोधून काढली.

फोटो स्रोत, Getty Images
हे काम सोपं नव्हतं. आधी ते एका भूमिगत नदीमध्ये 656 फूट खोलपर्यंत गेले. मग पाण्याखालील मार्गातून 98 फूट स्कुबा डायव्हिंग करून जावं लागलं, त्यानंतर 'उंदराच्या बिळा'सारख्या (poarta) जागेतून 984 फूट वर यावं लागलं- तेव्हा कुठे ते आधी अज्ञात असलेल्या खोलीच्या प्रवेशद्वारापाशी पोचले.
तिथल्या 'हाडांच्या गुहे'मध्ये (Peştera cu Oase) त्यांना सस्तन प्राण्यांची हजारो हाडं सापडली. या ठिकाणी प्रदीर्घ काळ गुंफानिवासी नर अस्वलं - तपकिरी अस्वलांचे आता नामशेष झालेले नातलग- राहात असावीत, असं मानलं जात होतं. इथली हाडंही मुख्यत्वे त्यांचीच होती. पण तिथल्या वरच्या बाजूला एक मानवी जबड्याचं हाड होतं. त्याची रेडिओकार्बन प्रक्रियेतून सापडलेली तारीख युरोपातील सर्वांत जुन्या ज्ञात प्रारंभिक आधुनिक मानवांच्याही पूर्वीची होती.
त्यांचे अवेशष नैसर्गिकरित्या गुहेच्या आत वाहून गेले असावेत आणि तेव्हापासून तिथे ते अबाधित राहिले असावेत, असं मानलं गेलं. त्याच वेळी वैज्ञानिकांच्या हेदेखील लक्षात आलं की, जबड्याचं हाड निःसंशयपणे आधुनिक वाटत असलं, तरी त्यात काही असाधारण निअँडरथल मानवाची वैशिष्ट्यं दिसत होती. अनेक वर्षांनी हा अंदाज खरा ठरला.
या शोधातून सापडलेल्या डीएनएचं विश्लेषण वैज्ञानिकांनी २०१५ साली केलं, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, ही व्यक्ती नर होती, आणि ती ६-९ टक्के निअँडरथल असावी. प्रारंभिक आधुनिक मानवामध्ये सापडलेला निअँडरथलचा हा सर्वाधिक अंश होता. सध्याच्या युरोपीय व आशियाई व्यक्तीच्या जनुकीय रचनेमध्ये सुमारे १-३ टक्के निअँडरथल घटक आहेत, त्याच्या तीन पट अधिक अंश या अवशेषामध्ये होता.
या जनुकसंचामध्ये निअँडरथल जनुकांचा प्रदीर्घ क्रम होता, त्यामुळे हा जबडा अगदी चार ते पाच पिढ्या पूर्वीच्या- खापर पणजे, खापर खापर पणजे किंवा खापर खापर खापर पणजे यांच्या आसपासच्या पिढीतल्या- निअँडरथल पूर्वजाचा असण्याची शक्यता आहे, असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. ही व्यक्ती जगली त्याच्या दोनशेहून कमी वर्षांपूर्वी उपरोक्त शरीरसंबंध आलेले असावेत, असा त्यांनी निष्कर्ष काढला.

फोटो स्रोत, Getty Images
जबड्याच्या हाडासोबतच संशोधकांच्या चमूला त्या गुहेमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीच्या कवटीचे तुकडे सापडले. या तुकड्यांमध्येही अशाच प्रकारच्या वैशिष्ट्यांचं मिश्रण होतं. या अवशेषांमधून डीएनए काढणं अजून वैज्ञानिकांना शक्य झालेलं नाही, पण जबड्याच्या हाडाप्रमाणे हे अवशेषदेखील अलीकडच्या निअँडरथल पूर्वजांपैकी कोणाचं तरी असावं, असं मानलं गेलं.
प्रारंभिक आधुनिक मानव आणि निअँडरथल यांच्यातील लैंगिक संबंध वेळोवेळी येत असल्याचे पुरावे तेव्हापासून जमा होत आले आहेत. वर्तमानातील लोकसंख्येच्या जनुकसंचामध्ये लपलेल्या काही खुणा सुचवतात त्यानुसार, अनेक वेगवेगळ्या प्रसंगी आणि विस्तृत भौगोलिक प्रदेशात असे संबंध येत होते. आजतागायत दोन भिन्न निअँडरथल लोकसमूहांमधील जनुकीय सामग्री वाहणारे लोक आहेत. युरोप व आशिया इथे मानवांशी त्यांनी आंतरप्रजनन साधल्याचं एका विश्लेषणानुसार सूचित होतं.
आज जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये निअँडरथल डीएनएचा अंश सापडतो. यात आफ्रिकी वंशाचे लोकही आले. आफ्रिकी लोकांचे पूर्वज या गटाशी थेट संपर्क आल्याचं मानलं जात नाही. शिवाय, हे हस्तांतरण दुसऱ्या बाजूनेही झालं. सायबेरियातील अल्टाय पर्वतांवर सुमारे एक लाख वर्षांपूर्वी राहून गेलेल्या निअँडरथलांमध्ये आधुनिक मानवांच्या पूर्वजांचा जनुकसंच १-७ टक्क्यांदरम्यान उतरलेला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या प्राचीन शरीरसंबंधांचे कामुक तपशील इतिहासाच्या उदरात गडप झाले असावेत, असं तुम्हाला वाटू शकतं, पण हे संबंध कसे राहिले असतील याचे संकेत अजूनही मिळतात. मानवी इतिहासाच्या या उत्तेजित करणाऱ्या विषयासंदर्भात तुम्हाला जे काही जाणून घ्यायचं असेल, त्याचा उलगडा असा:
चुंबन
पेनसिल्वानिआ स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानवशास्त्रज्ञ लॉरा वेरिच यांना 2017 साली एका इतिहासपूर्व दात पकडून ठेवलेल्या 48,000 वर्षांपूर्वीच्या जंतूची अत्यंत सूक्ष्म खूण सापडली.
"प्राचीन सूक्ष्मजंतूंकडून भूतकाळाबद्दल अधिक जाणून घेता येतं, आणि दातांच्या अश्मरी हा प्राचीन मानवांमध्ये वस्तीला राहणाऱ्या सूक्ष्मजंतूंची पुनर्रचना करण्याचा एकमेवर विश्वसनीय मार्ग आहे," असं वेरिच सांगतात. निअँडरथल काय खात होते आणि त्याच्या पर्यावरणाशी होणाऱ्या अन्योन्यक्रीडा कोणत्या होत्या, यामध्ये त्यांना विशेष रस होता. हे शोधण्यासाठी त्यांनी तीन भिन्न गुहांमध्ये सापडलेल्या दातांच्या थराच्या डीएनएचा क्रम निश्चित केला.
स्पेनच्या वायव्य भागातील एल सिड्रॉन इथे सापडलेल्या 13 निअँडरथल अवशेषांमधून दोन नमुने घेण्यात आले. यापैकी बऱ्याच व्यक्तींमध्ये काही जन्मजात शारीरिक विकृती होत्या- उदाहरणार्थ, गुडघ्याच्या वाट्या व कशेरू यांचे आकार बिघडलेले होते- आणि बालपणानंतरही दीर्घ काळ टिकून राहिलेला एक बालकाचा दात तिथे सापडला, त्यामुळे या ठिकाणाभोवतीचं गूढ पुन्हा वाढलं. त्या समूहात जवळचे नातलग असावेत, त्यांच्यात दीर्घ काळ आंतरप्रजनन झाल्याने अप्रभावी जनुकं संचित झाली असावीत, असा अंदाज आहे. या कुटुंबाचा शेवट दुर्दैवी झाला- त्यांचं मांसभक्षण करण्यात आल्याच्या खुणा हाडांवरून मिळतात. या पृथ्वीवर होऊन गेलेल्या शेवटच्या निअँडरथल मानवांमध्ये त्यांचा समावेश होतो, असं मानलं जातं.
एल सिड्रॉन इथे सापडलेल्या एका दातामध्ये बॅक्टेरियासारख्या- मेथानोब्रेव्हिबॅक्टर ओरॅलिस या सूक्ष्मजंतूच्या जनुकीय खुणा सापडल्यावर वेरिच यांना आश्चर्य वाटलं. आज आपल्या तोंडामध्येही या खुणा सापडतात. निअँडरथलमध्ये सापडलेल्या खुणांची आवृत्ती आधुनिक मानवी आवृत्तीशी ताडून बघितल्यावर त्यांना असा अंदाज बांधता आला की सुमारे 120000 वर्षांपूर्वी या दोन्हींमध्ये फारकत झाली असावी.
निअँडरथल व वर्तमानकालीन मानव यांच्यात काही मौखिक सूक्ष्मजंतू सारखे असतील, तर किमान साडेचार लाख वर्षांपूर्वी काय स्थिती असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. त्या काळी या दोन उप-प्रजातींनी वेगवेगळ्या वाटा स्वीकारल्या. "म्हणजे हे सूक्ष्मजंतून तेव्हापासून हस्तांतरित होत होते, असा याचा अर्थ होतो," असं वेरिच म्हणतात.
हे कसं घडलं ते सांगणं अशक्य आहे, पण 120000 वर्षांपूर्वी घडलेल्या दुसऱ्या एका घटनेशी त्याची सांगड घालता येते. "मानव आणि निअँडरथल यांच्यातील आंतरप्रजननाच्या काळातील या खुणा आहेत, ही बाब मला विशेष विस्मयकारक वाटली," असं वेरिच म्हणतात. "तर अशा अन्योन्यक्रीडेचा संदर्भ असलेल्या सूक्ष्मजंतूचं निरीक्षण करणं विलक्षण आहे."
अशा प्रकारे सूक्ष्मजंतूंच्या हस्तांतरणाचा एक संभाव्य मार्ग म्हणजे चुंबन, असं वेरिच स्पष्ट करतात. "आपण कोणाचं चुंबन घेतो, तेव्हा तोंडातील सूक्ष्मजंतून परस्परांच्या तोंडांमध्ये जा-ये करतात," त्या म्हणतात. "हे कदाचित एकदा घडलं असेल, आणि संसर्ग झालेला लोकसमूह अतिशय यशस्वी ठरल्याने जादुई रितीने याचा प्रसार झाला असेल, अशीही शक्यता आहे. किंवा हे अधिक नियमितपणे घडत असण्याचीही शक्यता आहे."
तोंडातील सूक्ष्मजंतूंच्या हस्तांतरणाचा दुसरा मार्ग म्हणजे अन्नाची देवाणघेवाण. निअँडरथल लोक प्रारंभिक आधुनिक मानवासाठी जेवण तयार करत असल्याचा कोणताही थेट पुरावा नसला, तरी प्रेमळ भोजन हा कदाचित एक पर्याय स्त्रोत असेल.
खूप पूर्वी इतर प्रकारच्या मानवांशी होणाऱ्या आपल्या अन्योन्यक्रीडांना आकार देणाऱ्या सूक्ष्मजंतूंचे समूह आजही आपल्यात आहेत, ही बाब वेरिच यांना विशेष उत्साहकारक वाटते.
वेरिच यांना त्यातून एक प्रश्नही पडतो: "आपल्या शरीरातील विशिष्ट ठिकाणचे सूक्ष्मजंतू योग्य तऱ्हेने कार्यरत आहेत, याचं कारण हे सूक्ष्मजंतू निअँडरथलांकडून आले असं असेल का?"
उदाहरणार्थ, मेथानोब्रेव्हिबॅक्टर ओरॅलिसचा संबंध आधुनिक मानवांमधील हिरड्यांच्या आजारांशी जोडला जातो, पण अतिशय निरोगी दात असलेल्या इतिहासपूर्व व्यक्तींमध्येदेखील हा बॅक्टेरिया सापडतो, असं वेरिच सांगतात. या प्राचीन दंतथरातून मिळालेल्या मर्मदृष्टी वापरून आधुनिक जगात जगणाऱ्या लोकांसाठी अधिक सुदृढ मौखिक सूक्ष्मजंतूंची पुनर्रचना करायचा त्यांचा मानस आहे.
पुरुष वा मादी निअँडरथल
प्रारंभिक आधुनिक मानव नरांशी बहुतांशाने निअँडरथल माद्या शरीरसंबंध ठेवत होत्या, की प्रारंभिक आधुनिक मानव माद्यांशी निअँडरथल नरांचे जास्त संबंध होते, हे ठोसपणे सांगणं अशक्य असलं, तरी त्या संदर्भात काही संकेत सापडतात.
रशियातील अल्टाय पर्वतांमधील डेनिसोव्हा गुहेमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना 2008 साली एक तुटलेल्या बोटाचं हाड सापडलं आणि चावण्यासाठी उपयोगात येणारा एक दात सापडला. त्यातून मानवाची एक पूर्णतः नवीन उप-प्रजाती समोर आली. अनेक वर्षं या 'डेनिरोव्हावासीयां'ची ओळख केवळ तिथे सापडलेल्या मोजक्या नमुन्यांपुरती होती, शिवाय त्यांच्या डीएनएचा अभ्यास होत होता. डेनिसोव्हन लोकांचा वारसा आजच्या पूर्व आशियाई व मेलानेशियन वंशाच्या जनुकसंचांमध्ये अजूनही टिकून असल्याचं संशोधकांना सापडलं.
पण आजच्या मानवांपेक्षा निअँडरथलांशी डेनिसोव्हनांचा अधिक निकटचा संबंध होता. लाखो वर्षं आशियामध्ये परस्परव्यापी पद्धतीने या उप-प्रजातींच्या श्रेणी राहिल्या असाव्यात. निअँडरथल माता व डेनिसोव्हन वडील असलेल्या- डेनी असं टोपणनाव मिळालेल्या- लहान मुलीच्या हाडाचा एक तुकडा 2018 साली सापडला, तेव्हा हे ठळकपणे स्पष्ट झालं.
निअँडरथल प्रजातीमधील नर लैंगिक गुणसूत्र डेनिसोव्हन नर गुणसूत्रांशी मिळतंजुळतं असेल, तर ते अर्थपूर्ण होईल. पण 38000 ते 53000 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या तीन निअँडरथल व्यक्तींच्या डीएनएंचा क्रम वैज्ञानिकांनी लावल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला- या नमुन्यांमधील Y गुणसूत्रं आजच्या मानवाशी अधिक साधर्म्य दाखवणारी होती, असं त्यांच्या निदर्शनास आलं.
निअँडरथल आणि आरंभिक आधुनिक मानव यांच्यातील 'सक्षम जनुकीय प्रवाहा'चा हा पुरावा असून त्यांच्यात बऱ्याच प्रमाणात आंतरप्रजनन होत असल्याचं यातून स्पष्ट होतं, असं संशोधक म्हणतात. तर, निअँडरथलांची संख्या त्यांच्या अस्तित्वाच्या अखेरच्या काळात रोडावत असताना त्यांची Y गुणसूत्रं लुप्त झाली असावी, आणि त्या ठिकाणी पूर्णतः आपली गुणसूत्रं आली असावीत. यावरून असं सूचित होतं की, मोठ्या संख्येने मानवी नर निअँडरथल माद्यांशी लैंगिक संबंध ठेवून होते.
पण ही कहाणी इथेच संपत नाही. निअँडरथलांच्या तंतुकणिकेच्या (साखरेला वापरक्षम ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्यासाठी सहाय्य करणारी पेशय यंत्रणा) नशिबीदेखील हेच आलं, असं इतर संशोधनांवरून दिसून येतं. या तंतुकणिका केवळ मातांकडून मुलांकडे हस्तांतरित होतात, त्यामुळे 2017 साली प्रारंभिक आधुनिक मानवी तंतुकणिकांमध्ये निअँडरथल अवशेष सापडले, तेव्हा आपल्या पूर्वज मातांचे नर निअँडरथलांशी संबंध येत असल्याचे संकेत मिळाले. हे आंतरप्रजनन 270000 ते 100000 वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज होता- त्या काळी मानव मुख्यत्वे आफ्रिकेपुरताच मर्यादित होता.
लैंगिक संबंधांतून संक्रमित होणारे आजार
काही वर्षांपूर्वी व्हिल पाइमनॉफ लैंगिक संबंधातून संक्रमित होणाऱ्या 'ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस' (एचपीव्ही) या संसर्गाबद्दल अभ्यास करत असताना त्यांना काही विचित्र गोष्टी दिसून आल्या.
अस्वल, डॉल्फिन, कासव, साप व पक्षी अशा सर्व प्राण्यांमध्ये पॅपिलोमा विषाणू अस्तित्वात आहेत- किंबहुना, आत्तापर्यंत या संदर्भात ज्या प्रजातींचा अभ्यास केला गेला, त्या सर्व प्रजातींमध्ये हे विषाणू सापडले. केवळ मानवांपुरता विचार केला, तर 100 वेगवेगळ्या प्रकारचे पॅपिलोमा विषाणू प्रसारात आहेत. जगभरातील 99.7 टक्के ग्रीवेशी संबंधित कर्करोग या विषाणूमुळे होतो. यातील एचपीव्ही16 हा प्रकार सर्वाधिक प्राणघातक आहे, त्याचा संसर्ग होणारी पेशी शांतपणे खराब होत जाते आणि त्यासाठी कित्येक वर्षं हा विषाणू शरीरात रेंगाळत राहू शकतो.
पण या विषाणूचे विशिष्ट प्रकारांच्या उपस्थितीबाबत जागतिक पातळीवर स्पष्ट विभाजन झालेलं आहे. बहुतांश पृथ्वीवर आपल्याला ए- प्रकारचा एचपीव्ही विषाणू सापडतो, तर सब-सहारन आफ्रिकेमधील बहुतांश लोकांना बी व सी प्रकारच्या विषाणूंची लागण झालेली आहे. विशेष म्हणजे जगभरातील निअँडरथल डीएनएच्या प्रसाराशी हा आकृतिबंध अचूक जुळतो- सब-सहान आफ्रिकेतील लोकांमध्ये एचपीव्हीच्या असाधारण प्रकारातील विषाणूच आहेत असं नव्हे, पण त्यांच्यात निअँडरथल जनुकीय सामग्री तुलनेने कमी आहे.
यात अधिक शोध घेण्यासाठी पाइमनॉफ यांनी आजच्या ए- प्रकारामधील जनुकीय वैविध्य वापरून असा अंदाज मांडला की, या प्रकाराचा उद्भव पहिल्यांदा सुमारे 60000 ते 120000 वर्षांपूर्वी झाला असावा. त्यामुळे या प्रकारचा विषाणू एचपीव्ही-16च्या तुलनेत नवीन ठरतो. प्रारंभिक आधुनिक मानव आफ्रिकेतून उदयाला येत होते, आणि निअँडरथलांशी त्यांचा संपर्क आला, त्याच दरम्यान हे घडलं. हे ठोसपणे सिद्ध करणं अवघड असलं, तरी त्यांच्यात लैंगिक पातळीवरून संक्रमित होणाऱ्या आजारांची देवाणघेवाण लगेचच सुरू झाली, असं पाइमनॉफ मानतात. एचपीव्ही-16च्या प्रकारांमधील फारकत लक्षात घेता आपण त्यांच्या पूर्वजांकडून ए- प्रकारचे विषाणू स्वीकारले, हे स्पष्ट होतं.
"संगणनीय तंत्रं वापरून मी हजार वेळा त्यावर चाचण्या केल्या, आणि प्रत्येक वेळी सारखाच निष्कर्ष निघाला- त्यामुळे हीच संभाव्य परिस्थिती दिसते आहे," असं पाइमनॉफ सांगतात. आज पसरणाऱ्या एचपीव्ही विषाणूंच्या आधारे त्यांनी असा अंदाज बांधला आहे की, हा विषाणू केवळ एकदाच मानवाकडे हस्तांतरित होऊन आलेल नाही, तर वेगवेगळ्या वेळी हे घडलेले असावं.
"हे केवळ एकदाच घडलेलं असण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, कारण तसं झालं असतं तर हे संक्रमण फार काळ टिकलं नसतं," असं पाइमनॉफ सांगतात. "हे लैंगिक संबंध विशेषतः युरेशियामध्ये मानवी लोकसंख्या उपस्थित होती त्या ठिकाणी दिसतात."
ए- प्रकारचा विषाणू निअँडरथलांमधून आल्यामुळे मानवी शरीरात त्यातून कर्करोग उद्भवतो, असं पाइमनॉफदेखील मानतात. कारण, तुलनेने अलीकडच्या काळात हा विषाणू आपल्या शरीरात प्रविष्ट झाला आहे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता या विषाणूचा संसर्ग साफ करण्यासाठी पुरेशी सक्षमपणे उत्क्रांत झालेली नाही.
किंबहुना, निअँडरथलांशी आलेल्या लैंगिक संबंधांमुळे आजच्या मानवामध्ये इतर अनेक विषाणू आलेले असू शकतात. यात एचआयव्हीच्या एका प्राचीन नातलगाचाही समावेश होतो. पण आपल्या या जुन्या नातेवाईकांवर रुष्ट होण्याची काही गरज नाही, कारण आपण त्यांना लैंगिक संबंधांतून संक्रमित होणाऱ्या परिसर्पासारखे आजार दिल्याचेही पुरावे आहेत.
लैंगिक अवयव
निअँडरथलांची शिश्नं व योनी कशा होत्या, याचा विचार करणं अभिरुचीहीन वाटू शकतं, पण वेगवेगळ्या जीवांचे लैंगिक अवयव प्रचंड विस्तृत वैज्ञानिक संशोधनाला विषय पुरवत आले आहेत. सदर लेख लिहिला गेला तेव्हा गुगल स्कॉलवर "शिश्नाची उत्क्रांती" (penis evolution) या शब्दप्रयोगाद्वारे शोध घेतला असता 98000 परिणाम दिसून आले, तर "योनीची उत्क्रांती" (vagina evolution) या विषयावर 87000 परिणाम दिसले.
कोणत्याही प्राण्याच्या लैंगिक अवयवांमधून त्यांच्या जीवनशैलीबद्दल, संभोगविषयक व्यूहरचनेबद्दल आणि उत्क्रांतिविषयक इतिहासाबद्दल आश्चर्यकारक वाटावं इतकी माहिती मिळते- त्यामुळे त्यांच्या या अवयवांबद्दल प्रश्न विचारणं हा त्यांना समजून घेण्याचा आणखी एक मार्ग आहे.
प्राण्यांच्या जगामध्ये अवयवांच्या विविध प्रकारच्या कल्पक रचना दिसतात. ऑक्टोपसचं कीड्यासारखं आणि बाजूला काढता येईल असं शिश्न असतं- ते माद्यांशी संभोग करण्यासाठी एकट्याने पोहून जाऊ शकतं. ऑक्टोपस माद्यांच्या तुलनेत त्यांचे नर सुमारे १० टक्केच आकाराचे असतात, त्यामुळे व्यवहाराचा भाग म्हणून हे वैशिष्ट्य विकसित झाल्याचं मानलं जातं. कांगारूंच्या योनी तिहेरी असतात, त्यामुळे त्यांच्या माद्यांना कायमच गरोदर राहणं शक्य होतं.
मानवी शिश्नांचं एक वेगळेपण म्हणजे ती गुळगुळीत असतात. आपले सर्वांत जवळचे प्रजातीय नातलग असलेले बोनोबो चिम्पान्झी (माणूस व बोनोबो चिम्पान्झी यांच्यात सुमारे 99 टक्के डीएनए सारखे असतात) यांच्यात 'शिश्न कंटक' (penile spine) असतात. त्वचा व केस ज्या पदार्थापासून (केरॅटिन) बनलेले असतात त्यापासूनच बनलेले हे बारीक कंटक स्पर्धक नराचे शुक्राणू साफ करून टाकण्यासाठी किंवा मादीच्या योनीमध्ये हुळहुळ करून तिला पुन्हा थोड्या वेळ संभोगासाठी तयार करण्याकरिता उत्क्रांत झाले असावेत, असं मानलं जातं.
निअँडरथल व डेनिसोव्हन जनुकसंचांमध्ये शिश्नकंटकांचा जनुकीय संकेत उपस्थित नसल्याचं 2013 साली वैज्ञानिकांना कळलं. आधुनिक मानवामध्येही हा भाग दिसत नाही. म्हणजे किमान आठ लाख वर्षांपूर्वी आपल्या सामूहिक पूर्वजांच्या शरीरातून हा भाग लुप्त झाला असावा. हे लक्षणीय आहे, कारण सरभेसळ झालेल्या प्रजातींमध्ये शिश्नकंटक अतिशय महत्त्वाचे मानले जातात. नरांना एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांची मदत होते आणि प्रजननांची शक्यता वाढते. त्यामुळे शिश्नकंटकांचा अभाव असलेले निअँडरथल व डेनिसोव्हन आपल्यासारखे बहुतांशाने एकाच जोडीदारासोबत संबंध ठेवणारे असावेत, असा अंदाज बांधला जातो.
इतरांसोबत शरीरसंबंध
परंतु, आधुनिक मानवाहून अधिक वेळा निअँडरथलांचे इतरांशी शरीरसंबंध येत असत, यासाठी काही पुरावा मिळतो.
गर्भाचा अभ्यास केला असता, असं दिसतं की, टेस्टोटेरॉनसारख्या पुंजकांची गर्भाशयातील उपस्थिती प्रौढ व्यक्तीच्या बोटांची लांबी किती आहे या गुणोत्तरावर परिणाम करू शकते. टेस्टोटेरॉनची उपस्थिती जास्त असेल, तर संबंधितांचं हे गुणोत्तर कमी असतं. शारीरिक संभोग केला नाही तरीही हे लागू होतं.
हा शोध लागल्यापासून बोट-लांबीचं गुणोत्तर आणि आकर्षक चेहरेपट्टी, लैंगिक कल, जोखीम घेण्याची वृत्ती, अकादमिक कामगिरी, स्त्रिया किती सहानुभूती राखतात, पुरुष किती वर्चस्ववादी वाटतात, आणि त्यांच्या वृषणाचा आकार किती आहे यांच्यातील दुवे सापडत गेले- परंतु, या प्रांतातील काही अभ्यास वादग्रस्त ठरले आहेत.
2019 साली संशोधकांच्या एका चमूला मानवांच्या सर्वांत जवळच्या नातलगांमध्येही अशाच प्रकारचा आकृतिबंध दिसून आला. चिम्पान्झी, गोरिला व ओरांगउटान- या सर्वसाधारणतः सरभेसळ झालेल्या प्रजाती आहेत- यांच्यात बोट-लांबीचं गुणोत्तर सरासरी कमी आहे, तर इस्राएलमधील गुहेत सापडलेल्या प्रारंभिक आधुनिक मानवाचं व वर्तमानातील मानवाचं हे गुणोत्तर जास्त आहे (अनुक्रमे, 0.935 व 0.957).
सर्वसाधारणतः मानव एका जोडीदारासोबत शरीरसंबंध ठेवतो, त्यामुळे एखाद्या प्रजातीच्या बोट-लांबीचं गुणोत्तर आणि लैंगिक व्यूहरचना यांच्यात संबंध असावेत, असं संशोधकांनी सुचवलं आहे. त्यांचा अंदाज योग्य असेल, तर निअँडरथल- ज्यांचं बोट-लांबीचं गुणोत्तर दोन गटांदरम्यानचं आहे (0.928)- समूहातील व्यक्ती प्रारंभिक आधुनिक मानवापेक्षा आणि आजच्या मानवांपेक्षाही किंचित अधिक जोडीदारांशी शरीरसंबंध ठेवत असावेत.
सूर्यास्तकाळातील फेरफटका
निअँडरथल आणि प्रारंभिक आधुनिक मानव यांच्यातील जोडपं एकमेकांना भेटल्यानंतर संबंधित पुरुष जिथे राहत होता तिथे स्थायिक झालं असावं, त्यांच्यातील पुढील प्रत्येक पिढीने हाच आकृतिबंध अनुसरला असावा. निअँडरथलांमधील जनुकीय पुराव्याचा विचार केला, तर संबंधित पुरुष, त्यांचे जोडीदार व मुलं अशी कुटुंबाची रचना दिसते. स्त्रियांना जोडीदार मिळाल्यावर त्या स्वतःच्या कुटुंबाचं घर सोडून येताना दिसतात.
प्रारंभिक आधुनिक मानव आणि निअँडरथल यांच्या 'सुखान्ती' कहाणीचा आणखी एक पैलू आजच्या आइसलँडमधील लोकांमध्ये उरलेल्या त्यांच्या जनुकांचा अभ्यास केल्यावर समोर येतो. गेल्या वर्षी अशा 27566 व्यक्तींच्या जनुकसंचाचं विश्लेषण केल्यावर निअँडरथल लोकांना कोणत्या वयात मुलं होत असत याचा अंदाज आला. प्रारंभिक आधुनिक मानवांमधील नरापेक्षा निअँडरथल स्त्री सर्वसाधारणतः वयाने मोठी असायची, आणि पुरुष सर्वसाधारणतः तरणा पिता म्हणून कार्यरत असत.
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या जोडप्याला- इतर निअँडरथलांप्रमाणे- मूल झालं असेल, तर सुमारे नऊ महिने मातेने त्या मुलाला स्तनपान दिलं असतं आणि सुमारे 14 महिन्यांपर्यंत पूर्ण संगोपन केलं असतं. आधुनिक बिगरऔद्योगिक समाजांपेक्षा हे वय तुलनेने कमी आहे.
या प्राचीन अन्योन्यक्रीडांसंबंधीच्या कुतूहलामधून निअँडरथलांच्या एकंदरच जगण्याबद्दल आणि ते लुप्त का झाले याबद्दल नवनवीन माहिती समोर येते आहे.
तुम्हाला प्राचीन मानवांमध्ये काहीच रस नसेल, तरीही आजच्या आधुनिक मानवाच्या अनेक गुणवैशिष्ट्यांमध्ये या अन्योन्यक्रीडांचं योगदान राहिल्याचं सांगितलं जातं. आजच्या माणसांचा वर्ण, केसांचा रंग व उंची इथपासून ते झोपेच्या सवयी, मनस्थिती व रोगप्रतिकारक यंत्रणा इत्यादींपर्यंत हे योगदान दिसून येतं. त्यामुळे या संशोधनांमधून आधुनिक काळातील आजारांवरील संभाव्य उपचारही सापडू लागले आहेत- उदाहरणार्थ, कोव्हिड-19च्या सर्वांत गंभीर रुग्णांना ज्या निअँडरथल जनुकामुळे अधिक त्रास झाला असेल, त्याला लक्ष्य करणारी औषधं तयार करण्यात आली.
सुमारे 40000 वर्षांपूर्वी निअँडरथल प्रजाती नष्ट झाली, त्याला परस्परांविषयीचं आकर्षण अंशतः कारणीभूत ठरलं असावं, असं आता म्हटलं जाऊ लागलं आहे. याशिवाय अचानक झालेला हवामानबदल आणि आंतरप्रजनन असेही घटक आहेत.
एचपीव्ही व परिसर्पासारखे आजार दोन्ही उप-प्रजातींमध्ये पसरले असतील, आणि त्यातून अदृश्य भिंत उभी झाली असावी, त्यामुळे त्यांना स्वतःचा भूप्रदेश विस्तारण्याला प्रतिबंध झाला असेल व संपर्क तुटला असेल, अशी शक्यता सध्या वर्तवली जाऊ लागली आहे. प्रारंभिक आधुनिक मानवांशी त्यांची गाठ पडली अशा मोजक्या ठिकाणी त्यांचं आंतरप्रजनन झालं आणि प्रारंभिक आधुनिक मानवांनी काही उपयुक्त रोगप्रतिकारक जनुकं त्यांच्याकडून स्वीकारली.
पण निअँडरथलांचं नशीब इतकं जोरावर नव्हतं. त्यांच्यावर आजारांचं अधिक ओझं होतं, आंतरप्रजनन घडलं नसतं, तरीही ते या नवीन प्रकारच्या विषाणूंपासून सुरक्षित राहू शकले नसते- थोडक्यात, ते पेचात अडकले होते, असं नमुन्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट होतं. अखेरीस, आजच्या मानवांचे पूर्वज त्यांच्या प्रदेशात गेले आणि त्यांना संपवून टाकलं.
दुसरी एक मांडणी अशीही आहे की, त्यांची तुलनेने कमी लोकसंख्या प्रारंभिक आधुनिक मानवांनी हळूहळू स्वतःमध्ये सामावून घेतली. तसंही त्यांनी आपली Y गुणसूत्रं व तंतुकणिका बहुतांशाने स्वीकारल्याच होत्या, आणि त्यांचा किमान 20 टक्के डीएनए आजही लोकांमध्ये अस्तित्वात आहे.
पूर्वइतिहासकालीन रोमानियामध्ये एकमेकांना भेटलेलं ते जोडपंही कदाचित हा लेख वाचणाऱ्या कोणामध्ये तरी अंशरूपात जिवंत असेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








