मानवी सांगाड्यांच्या भारतातील 'या' तलावाचं रहस्य काय?

फोटो स्रोत, ATISH WAGHWASE
रूपकुंड सरोवर समुद्रपातळीहून 5 हजार 29 मीटर (16,500 फूट) उंचावर आहे. उत्तराखंड राज्यामध्ये भारतातील सर्वांत उंच पर्वतावर त्रिसूल इथे एका तीव्र उताराच्या तळाशी हे सरोवर दिसतं.
या 'सांगाड्यांच्या सरोवरा'मध्ये बर्फाच्या खाली व अवतीभवती अवशेष पसरलेले आहेत. पेट्रोलिंग करणाऱ्या एका ब्रिटिश फॉरेस्ट रेंजरला 1942 साली याचा शोध लागला.
वर्षाचा बहुतांश काळ गोठलेल्या अवस्थेत राहणारं हे सरोवर ऋतुमानानुसार प्रसरण पावतं किंवा आकुंचन पावतं. त्यातला बर्फ वितळल्यावरच सांगाडे दृश्यमान होतात, काही वेळा त्याला चिकडून असलेलं मांस दिसतं, ते जतन केल्यासारखं स्पष्ट कळतं. आत्तापर्यंत अंदाजे 600-800 लोकांच्या सांगाड्यांचे अवशेष इथे सापडलेले आहेत. पर्यटनाला चालना देण्यासंदर्भातील उपक्रमांमध्ये स्थानिक प्रशासन याचं वर्णन 'रहस्यमयी सरोवर' (Mystery Lake) असं करतं.
अर्ध्या शतकाहून अधिक काळ मानवशास्त्रज्ञ व वैज्ञानिकांनी या अवशेषांचा अभ्यास केला असून अनेक प्रश्न त्यांना बुचकळ्यात पाडत आलेले आहेत.

फोटो स्रोत, Himadri sinha roy
हे मरण पावलेले लोक कोण आहेत? ते कधी मरण पावले? ते कुठून आले होते?
एका जुन्या कथनानुसार, एक भारतीय राजा, त्याची पत्नी व त्याच्या सहकाऱ्यांचे हे सांगाडे आहे. सुमारे 870 वर्षांपूर्वी जोरदार बर्फवृष्टी झाली, त्यात ते सर्व मरण पावले.
दुसऱ्या एका सिद्धान्तानुसार, 1841 साली तिबेटवर स्वारी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भारतीय सैनिकांचे हे अवशेष आहेत. त्यातील सत्तरहून अधिक सैनिकांना हिमालयातून घरी परतण्याची वेळ आली आणि वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या एका सिद्धान्तात असं गृहित धरलेलं आहे की, ही "दफनभूमी" होती आणि साथीच्या रोगांना बळी पडलेल्या लोकांची प्रेतं इथे दफन केली जात असत. या भागातील गावांमध्ये एक लोकगीत आहे, त्यात म्हटल्यानुसार, नंदा देवीने गारांचं वादळ आणलं, ते "लोखंडाइतकं कठीण होतं", अशा वादळाला तोंड देत सरोवर पार करू पाहणाऱ्या लोकांना तिथेच प्राण गमवावे लागले. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा नंदा देवी हा पर्वत देवता म्हणून पूजला जातो.
इथे मरण पावलेले बहुतांश लोक उंच होते- "सरासरीहून अधिक उंच देहयष्टी"चे होते, असं आरंभिक अभ्यासांमधून समोर आलं. यातील बहुतांश मध्यमवयीन प्रौढ-35 ते 40 वर्षांचे आहेत. त्यात कोणीच बालकं किंवा लहान मुलं नाहीत. काही वयस्क स्त्रिया आहेत. या सर्वांची तब्येत तुलनेने बरीच चांगली होती.
शिवाय, सर्वसाधारणतः असं गृहित धरलं जातं की, हे मरण पावलेले लोक एकाच समूहाचा भाग होते आणइ नवव्या शतकादरम्यान भयंकर आपत्ती कोसळली त्यात ते एकाच वेळी मरण पावले.

फोटो स्रोत, Getty Images
अगदी अलीकडे पाच वर्षं एक अभ्यास केला जात होता, त्यात भारत, अमेरिका व जर्मनी इथल्या 16 संस्थांमधले 28 सहलेखक सहभागी होते. वरील सर्व गृहितकं खरी नसावीत, असा निष्कर्ष त्यांनी नोंदवला.
वैज्ञानिकांनी तिथल्या 38 प्रेतांचं (यात 15 स्त्रिया होत्या) जनुकीय विश्लेषण व कार्बनपरीक्षण केलं. त्यातील काही प्रेतं सुमारे 1,200 वर्षांपूर्वीची आहेत.
हे मरण पावलेले लोक जनुकीयदृष्ट्या वैविध्यपूर्ण गटांमधील होते व त्यांचे मृत्यू वेगवेगळ्या वेळी झालेले आहेत- अगदी 1,000 वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी झालेलेही असू शकतात.
"एकाच भयानक आपत्तीत ते मरण पावले, अशी स्पष्टीकरण फोल ठरतात," असं या अभ्यासातील प्रमुख लेखिका व हार्वर्ड विद्यापीठात डॉक्टरेट करणाऱ्या इडाओइन हार्नी मला म्हणाल्या. "रूपकुंद सरोवरामध्ये काय घडलं हे अजून स्पष्ट नाही, पण या व्यक्तींच्या मृत्यूचं कारण एखादीच विशिष्ट घटना होती, हे स्पष्टीकरण आपल्याला देता येणार नाही."
पण विशेष म्हणजे ही जनुकीयदृष्ट्या विभिन्न गटांमधील माणसं असल्याचं जनुकीय अभ्यासानुसार समोर आलं आहे: यातील एक गट सध्याच्या दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या लोकांशी जनुकीय साधर्म्य दाखवणारा आहे, तर दुसरा गट सध्याच्या युरोपातील- विशेषतः क्रेटे या ग्रीक बेटावरील लोकांशी "जवळचे संबंध" राखणारा आहे.
शिवाय, दक्षिण आशियातून आलेले लोक "एकाच लोकसंख्येचा भाग असल्याचंही दिसत नाही."
"त्यातील काही जणांचा वंश उपखंडाच्या उत्तरेकडील गटांशी जास्त सारखेपणा दाखवणारा आहे, तर इतरांचा वंश दक्षिणेकडील गटांशी अधिक साधर्म्य दाखवणारा आहे," असं हार्नी म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
काही शे वर्षांच्या कालावधीत छोट्या गटांमध्ये इतक्या विभिन्न समूहांमधील लोक या सरोवरापाशी आले होते का? त्यातील काही जण तरी एकाच विशिष्ट घटनेदरम्यान मरण पावले असतील का?
या सरोवरापाशी कोणतीही शस्त्रास्त्रं किंवा व्यापारी वस्तू सापडलेल्या नाहीत- हे सरोवर कोणत्याही व्यापारी मार्गावर नव्हतं. या मृत्यूंना एखादा आजार कारणीभूत ठरल्याचं सुचवणारा कोणताही प्राचीन रोगकारक जीवाणू जनुकीय अभ्यासांमध्ये आढळला नाही.
या सरोवराजवळून जाणाऱ्या एका यात्रेसाठी लोक इथून गेले असण्याची एक शक्यता आहे. पण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत या भागात यात्रा होत असल्याचे विश्वसनीय वृत्तान्त मिळत नाहीत, असं अभ्यासक म्हणतात. पण स्थानिक मंदिरांमधील कोरीव लेख आठव्या व दहाव्या शतकांच्या दरम्यानचे आहेत, "त्यामुळे आधीपासून ही मंदिरं अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतात."
या ठिकाणी सापडलेली काही प्रेतं तरी "यात्रेदरम्यान झालेल्या सामूहिक मृत्यूमधील असावीत," असं वैज्ञानिक मानतात.
पण पूर्वेकडी भूमध्ये समुद्राजवळचे लोक भारतातील सर्वांत उंच पर्वतातल्या एका दुर्गम सरोवरापाशी का आले होते?
युरोपातील लोक एखाद्या हिंदू यात्रेसाठी इतकं दूर, रूपकंद सरोवरापाशी आले असतील, ही शक्यता वाटत नाही.
किंवा, खूप पूर्वीच्या एखाद्या पौर्वात्त्य भूमध्ये वंशाचे काही जनुकीयदृष्ट्या अलग पडलेले लोक अनेक पिढ्या या प्रदेशात राहत होते का?
"आम्ही अजून उत्तरं शोधतो आहोत," असं हार्नी म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








