जेव्हा 140 आयराणींनी आत्महत्या केल्या आणि 500 वर्षे अहिर तिथलं पाणी प्यायले नाहीत...

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
“ढोली तारो ढोल वागे व्रजवाणी
सातविसु सतीयुं रमे आयराणी
ढोलीरुपे कानो आयो तो व्रजवाणी
गोपीरुपे रास रमे आयराणी”
या लोकगीतामागची गोष्ट तुम्हा-आम्हाला माहित असण्याची शक्यता धूसर आहे. किंबहुना, जिथं हे लोकगीत गायलं जातं, त्या गुजरातमधीलही अनेकांना यामागची गोष्ट माहित नाहीय.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील वागड भागातील स्थानिक असं मानतात की, श्रीकृष्ण इथे ढोलवादकाच्या रूपात आले होते आणि त्यावेळ तिथं घडलेल्या एका घटनेमुळे 140 आयराणींनी आपल्या देहाचा त्याग केला होता.
त्यानंतर सुमारे 550 वर्षे अहिरांनी या गावातलं पाणी न पिऊन ‘अपिया’ केला.
कालांतरानं इतर श्रद्धा-अंधश्रद्धा या घटनेशी जोडल्या गेल्या आणि या लोककथेत आणखीच भर पडत गेली.
तीन दिवस, तीन रात्री
स्थानिकांच्या मान्यतेनुसार, व्रजवाणी आणि आजूबाजूच्या 12 गावांमध्ये अहिर समाजाची वस्ती होती आणि ते व्रजनी बोली बोलत. त्यामुळे या गावाला ‘व्रजवाणी’ नाव पडलं. पशुपालन हा अहिर समाजाचा मुख्य व्यवसाय होता.
तसंच, व्रजवाणी आणि आजूबाजूच्या गावातील महिलांनी विक्रम संवत्सर 1512 च्या वैशाख शुद्ध द्वितीयेच्या दिवशी (1455 साली) रास करायला सुरुवात केली.
सकाळपासून संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत ‘राहडा’ सुरूच होता. ढोलवादक म्हणत की, नाचणारे थकले की आम्ही थांबू आणि नाचणारे म्हणत की ढोलवादक थकला की आम्ही थांबू.

फोटो स्रोत, Getty Images
तीन दिवस आणि रात्री घरातील वडीलधारी मंडळी चिंतेत होती. ढोलवादक मांत्रिक असल्याचाही संशय होता. त्यामुळे तरुणांना रासच्या ठिकाणी पाठवण्यात आले. तिथल्या एका संतापलेल्या तरुणाने ढोलवादकाचे डोकं कापलं. मात्र, त्यानंतर त्या ढोलवादकाचा मृतदेह गायब झाला, अशी आख्यायिका आहे.
या आख्यायिकेनुसार, ढोल बंद झाल्यानंतर आयराणींना ढोलवादकाबाबत घडलेली घटना कळली आणि त्यानंतर त्या पृथ्वीच्या पोटात गुडूप झाल्या.
व्रजवाणी धामचे व्यवस्थापक वस्ताभाई अहिर यांच्या म्हणण्यानुसार, “श्रीकृष्णाने गोकुळ, मधुरा आणि वृंदावन इथे तीन रास केले आणि चौथा रास करण्याचा शब्द दिला. हा शब्द त्याने व्रजवाणीत पूर्ण केला.”
तिथे दगडावर कोरलेली 140 शिल्पं आहेत.
स्थानिक सांगतात की, या शिल्पांना कान लावल्यास ढोल-ताशांचा आवाज येतो. इतर अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा, दंतकथा या शिल्पांशी जोडल्या गेल्यात, सांगितल्या जातात.
देह त्यागाची घटना
‘अहिरोनी उदारता’ या पुस्तकात सहावं प्रकरणं कच्छच्या व्रजवाणीबद्दल लिहिलंय.
यात अहिर जातीतील भीमजीभाई बारोट (चोबरीवाला) यांचा हवाला देऊन लिहिलंय की, अमरसर तलावाच्या काठावर मरण पावलेल्या 140 आयराणींची नावे लिहिली आहेत.
वहिवांचा बारोट ही गुजरातमध्ये शतकानुशतकांची परंपरा आहे. यानुसार ते वर्षातून एकदा कुटुंबाला भेट देतात, कुटुंबातल्या नव्या सदस्यांची नावं वंशावळीत जोडली जातात आणि मृतांची नावं, वेळ नोंदवली जाते.
पुस्तकातील नोट्स (पृष्ठ क्रमांक 64-69) नुसार, अहिर वाघड प्रदेशात गाई-म्हशी चारत. इथल्या गुरांची देशभरात चर्चा व्हायची. हे ऐकून परकरच्या यवनांनी हातोड्यांनी हल्ला केला. अहिर आणि यवनांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर यवन माघारी फिरले आणि अहिर पुन्हा आपल्या कामाला लागले.

फोटो स्रोत, VASTABHAI AHIR
त्यावेळी व्रजवाणीमध्ये आयराणी रास खेळत असताना तिथे पटेल खोखा डांगर नामक व्यक्ती आली आणि ती म्हणाली की, “तुम्ही इथे गाईंच्या कामासाठी आला आहात आणि ते सोडून रास खेळत आहात. इथून जा आणि तुमच्या पतीची ओळख पटवून कपाळावर टिळा लावून त्यांना रास खेळायला घेऊन या.”
त्यानंतर तिथं उपस्थित आयराणींनी शुद्ध हरपून शेवटचा रास खेळला. ढोलवादक ढोल वाजवतात आणि मग सकाळपर्यंत 140 तरुणी एकामागोमाग एक आपल्या शरीराचा त्याग करतात. कृष्णा सरती नावाच्या ढोलवादकाच्या रुपात असूनही तीही सर्वांच्या मृत्यूनंतर देह त्याग करते, असा उल्लेख पुस्तकात आहे.
शेवटी दुधाची वडी देऊन खोखा गावातून निघतो. या घटनेमुळे अहिरांनी गावाच्या पाण्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर शतकानुशतके इथल्या आणि जवळच्या अमरसर तलावाचे पाणी प्यायले नाहीत. त्यानंतर अहिरांनी देविसर (खेराई) वसवलं.
मत्सरामुळे नाश झाला
‘अहित रत्न (भाग एक)’ आणि इतर लेखनात आयराणींच्या खांभीच्या इतिहासाबद्दल मतं व्यक्त करण्यात आली आहेत.
एका आख्यायिकेनुसार, अहिरांच्या मुली ढोलाच्या तालावर रास खेळत असताना एक वाटसरूनं अहिरांचा आवाज ऐकून त्याला मारलं. ढोलवादकाचा जीव आपल्यामुळे गेला असं मानून त्यानेही तिथेच जीव सोडला. त्यानंतर अहिरांनी गाव सोडलं आणि अमरसरचं पाणी पिणंही सोडलं.
असाच काहीसा उल्लेख व्रजवाणी धामच्या ‘सरकारी इतिहासात’ही आहे. कच्छ गॅझेटियर (पृष्ठ क्रमांक 162-163) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, रापर तालुक्यातील व्रजवाणी इथे असा एक ढोलवादक होता की त्याच्या ढोलाच्या तालावर नाचण्यासाठी आयराणी घरातील कामे सोडून रास खेळायला धावत असत.

फोटो स्रोत, VASTABHAI AHIR
मत्सराच्या भरात एका अहिर तरुणाने ढोलवादकाच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर व्याकूळ झालेल्या आयराणींनीही आपला प्राणत्याग केला.
मात्र, सरकारी गॅझेटियरमध्ये 120 आयराणींनी शरीराचा त्याग केल्याची नोंद आहे. पुढे काय झालं, याचा उल्लेख नाहीय.

फोटो स्रोत, VASTABHAI AHIR
हेल्लारो, व्रजवाणी आणि अग्रज
1975 सालच्या कच्छची पार्श्वभूमी, प्रतिगामी समाज आणि ढोलवादक केंद्रस्थानी असलेला ‘हेल्लारो’ हा लोककथेवर आधारित सिनेमा आहे. महिलांनी रास खेळणं सामाजिकदृष्ट्या निषिद्ध मानलं जात असल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि सिनेमाच्या शेवटी महिला बंड करत रास खेळण्याची बंधनं झुगारतात. हा सिनेमा प्रदर्शित झाला, त्यावेळीही व्रजवाणीशी तुलना करणारे व्हीडिओही व्हायरल झाले होते.
वस्ताभाई अहिर म्हणतात की, “हेल्लारो सिनेमा आणि व्रजवाणीमध्ये काहीच साम्य नाहीय. शतकानुशतके अहिर किंवा यादव महिला कुटुंबातल्या कुटुंबात रास सादर करतात. पूर्वी बाहेरच्या लोकांसमोर रास सादर करत नव्हत्या.”
आयराणींच्या मृत्यूनंतर किंवा सती गेल्यानंतर अहिरांनी जवळच्याच अमरापारमध्ये मृतांसाठी 140 विहिरी खोदल्या. वर्षानुवर्षे अहिर लोक नववर्ष किंवा इतर सणांवेळी येत असत. पण सोबत पिण्याचे पाणी आणत. कारण ते इथल्या विहिरींमधलं पाणी ते पीत नसत.

फोटो स्रोत, ABHISHEK SHAH/FB
वस्ताभाई अहिर यांच्या माहितीनुसार, 2012 मध्ये वैशाख शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करून 140 आयराणींच्या मूर्ती बसवण्यात आल्या होत्या. शिवाय, तिथे त्यांची नावेही देण्यात आली आहेत.
याशिवाय, इथे राहण्याची आणि भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलीय. जन्माष्टमी आणि वैशाखाच्या पहिल्या आठवड्यात इथे विशेष कार्यक्रम केले जातात.
अपिया साधारणत: 100 किंवा 200 वर्षांचा असतो, पण अहिरांनी 550 वर्षांहून अधिक काळ त्याचं पालन केलं. 2012 नंतर समाजाच्या धार्मिक नेत्यांनी अग्रज सोडण्याचं आवाहन केलं.
त्यानंतर काही अहिरांनी ते सोडूनही दिलं. मात्र, अजूनही काही अहिर कुटुंबं अमरसर तलावाचे पाणी पीत नाहीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








