You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या आरोपांमुळे ‘कष्टाने जुळवून आणलेले’ भारत-अमेरिका संबंध धोक्यात आलेत का?
अमेरिकेच्या भूमीवर एका फुटीरतावावादी आणि अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या प्रकरणी निखिल गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे.
तब्बल 83 लाख देऊन त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्याच्या मते ज्याला हे काम सोपवण्यात आलं होतं तो अमेरिकन गुप्तहेर एजन्सीचा अंडरकव्हर एजंट होता.
निखिल गुप्ता सध्या चेक गणराज्य येथील तुरुंगात आहे. त्यांच्यावर जे आरोप लागले आहेत त्यानुसार त्यांना 20 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. निखिल गुप्ता यांना एक भारतीय अधिकारी मार्गदर्शन करत होते असा आरोप आहे. दोषारोपपत्रात भारतीय अधिकाऱ्याचं नाव नाही.
दोषारोपपत्रात पीडित व्यक्तीचं नाव नाही. मात्र भारतीय प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार शीख फुटीरतावादी नेते गुरपतवंत सिंह पन्नू यांची हत्या करण्याचा कट होता. गुरपतवंत सिंह पन्नू यांना भारताने आतंकवादी घोषित केलं आहे.
याआधी कॅनडाने फुटीरतावादी नेत हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारत सहभागी होण्याचा आरोप लावला होता. कॅनडाच्या आरोपांनंतर भारत आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे.
पैसे देऊन हत्येचा कट रचल्याच्या या आरोपाने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनाही चिंतेत टाकलं होतं.
अमेरिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, बायडेन यांनी सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स आणि नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक एव्हरिल हेन्स या अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी भारतात पाठवलं होतं.
भारत सरकारने या आरोपांची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.
पैसे देऊन हत्येचा कट रचल्याच्या आरोपावर फायनान्शिअल टाइम्सच्या अहवालात एक दावा करण्यात आला आहे. त्यांच्या मते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तेव्हाच अमेरिकेने भारताला इशारा दिला होता.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे की अमेरिकेने भारतासोबत फक्त काही इनपुट शेअर केले होते. त्यांची 'संबंधित विभागांकडून चौकशी केली जात आहे.'
शीख फुटीरतावादी नेते हरदीप सिंह निज्जर यांची 18 जून रोजी कॅनडात हत्या करण्यात आली होती.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर यांच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता, मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणावही निर्माण झाला होता.
भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून कठोर भूमिका घेतली होती, पण अमेरिकेने या खुनाच्या कटाबद्दल भारताला इशारा दिला होता, त्यामुळे भारत अमेरिकेबद्दल अशी भूमिका घेऊ शकेल का हा प्रश्नच आहे.
पुढे धोके काय आहेत?
अमेरिकेच्या या आरोपानंतर भारताच्या भूमिकेला जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.
‘द डिप्लोमॅटने’ आपल्या एका अहवालात लिहिले आहे की, 'दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा फारसा विचार केला जात नाही हे स्पष्ट आहे. परंतु पन्नूच्या हत्येचा कट रचल्याबद्दल फायनान्शिअल टाइम्सच्या अहवालावर भारताची मवाळ प्रतिक्रिया आहे आणि त्याचा सूर सहकाराचा आहे. हे ट्रूडो यांच्या आरोपांनंतरच्या आक्रमक वृत्तीपेक्षा पूर्णपणं वेगळं आहे.'
द डिप्लोमॅटने लिहिलं आहे की, 'भारताने कॅनडाला ज्या प्रकारे फटकारलं तसं अमेरिकेला फटकारू शकत नाही. याचं एक साधं कारण म्हणजे भारताच्या भू-राजकीय हितसंबंधांसाठी अमेरिका कॅनडापेक्षा महत्त्वाची आहे. इतकंच नाही तर चीनला रोखण्यासाठी अमेरिकेलाही भारताची गरज आहे आणि भारताला हे चांगलंच कळतं.
भारत आणि अमेरिका एकमेकांवर अवलंबून आहेत. द डिप्लोमॅटमध्ये आलेल्या बातमीनुसार एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे निज्जर यांच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ज्या प्रकारे बिघडले, त्या प्रकारे यावेळी संबंध बिघडले नाहीत.
गुरपतवंत सिंग पन्नू हे सक्रिय खलिस्तानी फुटीरतावादी आहेत आणि त्यांनी अनेकदा भारताविरुद्ध हिंसाचाराला खुलं आव्हान दिलं आहे. अलीकडेच पन्नू यांनी एअर इंडियाच्या विमानांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता.
खलिस्तानचा धोका अमेरिकेने गांभीर्याने घ्यावा, अशी भारताची इच्छा आहे.
या हत्येचा कट रचल्याच्या वृत्तानंतर भारत आणि अमेरिका यांच्यात प्रतिक्रियांच्या फेऱ्या सुरू होऊ शकतात. पण भारताला याची चिंता वाटावी का?
भारत अमेरिका संबंधांवर ताण पडेल का?
डेरेक जे. ग्रॉसमन, राष्ट्रीय सुरक्षा समस्यांवरील तज्ज्ञ आणि थिंक टँक रँड कॉर्पोरेशनशी संबंधित आहेत.
ते लिहितात, “आजच्या बातम्यांनंतर, भारताला काळजी करण्याची गरज नाही कारण अमेरिकेला भारताची जास्त गरज आहे. चीनला रोखण्यासाठी बायडन प्रशासनाने जी रणनीती आखली त्यासाठी भारत महत्त्वाचा आहे.
मात्र अमेरिकेने दिलेली सूट अमर्यादित राहणार नाही आणि पुढेही असाच दुर्व्यवहार राहिला तर अमेरिकेकडून जे लाभ मिळाले तेही दूर होऊ शकतात.
द विल्सन सेंटर या थिंक टँकमधील परराष्ट्र धोरण तज्ज्ञ मायकेल कुगेलमन यांनी लिहिलं, "आमच्याकडे आता या हत्येच्या कटाबद्दल अधिक माहिती आहे. तरी मला अजूनही असं वाटतं की यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये फारशी बाधा येणार नाही.”
“व्हाईट हाऊसला जुलैमध्येच या कटाची माहिती मिळाली होती. परंतु त्यानंतरही दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय बैठका रद्द करण्यात आल्या नाहीत. जी-20 मध्ये बायडन आणि मोदी यांची भेट झाली होती.
तेव्हा अमेरिकेने प्रत्युत्तर दिले नाही. मात्र असं पुन्हा होऊ नये एवढंच सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध इतके महत्त्वाचे आहेत की ते इतके सहजासहजी बिघडू शकत नाही.”
त्याचबरोबर सध्याच्या घडामोडींकडे लक्ष न दिल्यास भारत-अमेरिकेतील संबंध बिघडू शकतात, असंही काही विश्लेषकांचं मत आहे.
सेंटर फॉर न्यू अमेरिकन स्टडीजच्या इंडो-पॅसिफिक प्रोग्रामच्या संचालक लिसा कर्टिस यांनी लिहितात,
“भारताने या धक्कादायक घडामोडीकडे लक्ष वेधण्यासाठी अमेरिकेला पूर्ण सहकार्य केलं पाहिजे, अन्यथा भारत-अमेरिका संबंधांमधील प्रगती मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि इतक्या कष्टाने जे जुळवून आणलं आहे ते धोक्यात येईल."
अमेरिकेवर प्रश्नचिन्ह
पाश्चात्य देशांमध्ये शीख फुटीरतावाद हा भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत भारताने शीख फुटीरतावादाचा मुद्दा सर्वोच्च पातळीवर उचलला आहे.
अलीकडेच नवी दिल्लीत अमेरिका आणि भारत यांच्यादरम्यान उच्चस्तरीय बैठक झाली. त्यानंतरही भारताने जारी केलेल्या निवेदनात भारतानेही शीख फुटीरतावादाचा मुद्दा अमेरिकेसमोर मांडल्याचं म्हटलं आहे. नोव्हेंबरमध्येच ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीदरम्यान भारताने वाढत्या शीख कट्टरतावादाचा मुद्दा उपस्थित केला होता.
तर पाश्चात्य देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात आणि शीख अलिप्ततावाद हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, कारण त्याचा त्यांच्यावर थेट परिणाम होत नाही.
जागतिक घडामोडींचे तज्ज्ञ प्रोफेसर जोरावर दौलत सिंग एक्स वर लिहितात,
“हा आरोप एखाद्या कॉमिक्सच्या कथानकासारखा आहे, ज्यामध्ये एका कथित भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याने दलालाच्या माध्यमातून खुनी करार केला होता. हा मारेकरी अमेरिकन गुप्तहेर असल्याचे निष्पन्न झालं.”
जोरावर सिंह लिहितात, “अमेरिकेला सर्व दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना भारताकडे सोपवण्याची गरज आहे जेणेकरून त्यांच्यावर भारतीय कायद्यांनुसार खटला चालवता येईल. मात्र अमेरिका भारतविरोधी दहशतवाद्यांना आपल्या देशात जागा का देते?”
पाश्चिमात्य देशांची दुटप्पी भूमिका
माजी भारतीय मुत्सद्दी अधिकारी विवेक काटजू यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात लिहिलं आहे की,
'एखाद्या देशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खलिस्तानी दहशतवादावर पांघरूण घालावं किंवा दहशतवाद्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे समर्थन करावं, हे अस्वीकारार्ह आहे. दोन्ही बाजूंनी वक्तव्य केल्यानंतर पाश्चिमात्य देश त्याच लोकांवर लक्ष देतात ज्यांच्याविरोधात ते हिंसाचार करतात. त्यांचा दुटप्पीपणा सर्वश्रूत आहे.'
काटजू लिहितात, 'जग अशा दुटप्पीपणाने भरलेलं आहे. तत्त्वं आणि न्याय याच्याबद्दल कितीदाही बोललं तरी हे घडतंय. मुत्सद्देगिरीचा उद्देश हा राष्ट्रीय हिताला पुढे नेण्यासाठी या कठीण आणि निसरड्या वाटेवरून मार्ग काढणं हा आहे.'
या संपूर्ण वादावर, भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल X वर लिहितात,
“ही बातमी चीनशी जवळचे संबंध असलेल्या एका संशयास्पद पत्रकाराने रचली आहे. निज्जर प्रकरणानंतर, अजूनही भारताप्रति अमेरिकेच्या संतापाचा प्रभाव कमी झालेला नाही, अशा परिस्थितीत भारताला एका अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट रचून परिस्थिती आणखी बिघडवायची आहे का? याला काही अर्थ आहे का? भारताविरुद्ध कट केला जात आहे का?”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)