‘रॉ’ एजंट कसे निवडले जातात? त्यांना कोणतं प्रशिक्षण दिलं जातं?

शीख फुटीतरतावादी नेता हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केल्यानं भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण बनले आहेत.

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या घटनेनंतर भारताची गुप्हतेहर संस्था असलेल्या रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) ची तुलना इस्रायलच्या ‘मोसाद’शी केलीय. ‘रॉ’बद्दल अनेकजण एरव्हीही इंटरनेटवरून माहिती शोधण्याचा प्रयत्न करत असतात.

रॉ एजंट कसे निवडले जातात, त्यांना ‘रॉ’मध्ये नेमकं काय करावं लागतं, कार्यालय कुठे आहे, अशा प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेऊया.

अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजियन्स एजन्सी (CIA), ब्रिटनची MI6, रशियाची SVR, पाकिस्तानची ISI यांसारखीच भारताची गुप्तचर संस्था आहे. भारताच्या गुप्तचर संस्थेचं नाव ‘रिसर्च अँड अनॅलिसिस विंग’ आहे. ‘रॉ’ असं भारताच्या या गुप्तचर संस्थेला थोडक्यात संबोधलं जातं.

‘रॉ’ची कार्यालयं असतात का?

‘रॉ’चं इंटेलिजन्स यूनिट केंद्रीय कॅबिनेट सचिवालयाच्या अंतर्गत काम करतं. या यूनिटच्या मुख्य अधिकाऱ्याला सचिव (R) असं म्हणतात. त्यांच्या अंतर्गत विशेष सचिव, अतिरिक्त सचिव, विशेष ऑपरेशन विभाग, संरक्षण विभागाचे महासंचालक इत्यादी येतात.

‘रॉ’च्या सचिवांच्या अख्त्यारित देशनिहाय विभाग असतात. ‘रॉ’च्या भाषेत त्यांना ‘डेस्क’ म्हणतात.

‘रॉ’चे सचिव आणि विशेष सचिव हे भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) यांच्याशी थेट संपर्कात असतात.

‘रॉ’च्या दिल्लीतल्या मुख्यालयात पाकिस्तान, चीन, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य पूर्व, आफ्रिकन देश आणि इतर देशांचे डेस्क आहेत. तसंच, स्पेशल ऑपरेशन डेस्कही आहे.

या सगळ्यांसोबतच ‘रॉ’च्या मुख्यालयात इलेक्ट्रॉनिक आणि तंत्रज्ञान विभागही आहे.

याद्वारे परदेशी संशयास्पद संस्था, व्यक्तींचे दूरसंचार, त्यांची संपर्क साधनं (सॅटेलाईटच्या मदतीने) इत्यादींवर देखरेख ठेवली जाते.

‘रॉ’च्या कामगिरींसाठी वेगळी विमानं आहेत का?

‘रॉ’कडे स्पेशल फ्लाईट आहे. आपत्कालीन मोहिमेसाठी आणि विशेष मोहिमांसाठी ‘रॉ’मधील वरिष्ठ अधिकारी भारतीय वायूदलाच्या विमानांचा वापर करतात.

मात्र, कोणताही एजंट वाटेल तेव्हा विमानांचा वापर करू शकत नाही किंवा त्यांद्वारे फिरू शकत नाही. किंबहुना, वाटेल तेव्हा हल्लाही करू शकत नाही.

एरियल सर्व्हेलन्स आणि संरक्षण कामासाठी ‘रॉ’मध्ये एअर ट्रान्सपोर्ट रिसर्च सेंटर आहे. विशेष सचिव हे या सेंटरचे प्रमुख असतात.

परदेशातील मोहिमा पार पाडण्यासाठी विशेष सचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी असतात, जे स्पेशल ऑरेशन ग्रुपचं नेतृतत्व करतात.

‘रॉ’ किती गुप्तपणे काम करते?

परदेशातून गुप्त माहिती गोळा करणं हे तसं संवेदनशील काम आहे. भारत सरकार ‘रॉ’ला कॅबिनेटअंतर्गत यंत्रणा म्हणून वर्गीकरण करतं.

तसंच, ‘रॉ’च्या मोहिमा, आर्थिक व्यवहार इत्यादी गोष्टीही संसदेत जाहीररित्या सांगून सार्वजनिक केल्या जात नाहीत.

‘इंटर्नल ऑडिट’ म्हणून ‘रॉ’च्या कारवाया वर्गीकृत केल्या जातात.

‘रॉ’ची माहिती सार्वजनिक केली जात नाही. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 24 नुसार ही सूट ‘रॉ’ला देण्यात आलीय.

महत्त्वाच्या अधिकृत बैठका, परिसंवादांना केवळ ‘रॉ’चे वरिष्ठ आणि अतिमहत्त्वाचे अधिकारीच उपस्थित राहतात. त्यामुळे ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांची ओळख आणि कारवाया यांबाबत गुप्तता पाळली जाते.

‘रॉ’चे भारतातील कार्यालय कुठे आहे?

भारतातील ‘रॉ’ची एकूण सात कार्यालयं आहेत. ही कार्यालयं विभागनिहाय आहेत.

उत्तर विभाग (जम्मू), पूर्व विभाग (कोलकाता), दक्षिण-पश्चिम विभाग (मुंबई), उत्तर-पूर्व विभाग (शिलाँग), दक्षिण विभाग (चेन्नई), मध्य विभाग (लखनऊ) आणि पश्चिम विभाग (जोधपूर) अशी ही कार्यालयं आहेत.

याशिवाय, वेगवेगळ्या नावांनी भारतातील वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये ‘रॉ’ची कार्यलायं कार्यरत आहेत. फिल्ड स्टाफचं म्हणजे एजंटचं काम अशा कार्यालयांमधून चालतं.

‘रॉ’ कार्यालयांमध्ये प्रामुख्याने सचिव, विशेष सचिव, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव, संचालक, उपसंचालक, ट्रान्सफर ऑफिसर, वरिष्ठ फिल्ड ऑफिसर, फिल्ड ऑफिसर, डेप्युटी फिल्ड ऑफिसर, असिस्टंट फिल्ड ऑफिसर, मंत्रालय कर्मचारी यांचा समावेश होतो.

RAW एजंट परदेशी मोहिमेदरम्यान संबंधित देशांतील भारतीय दूतावासांशी थेट संपर्कात राहून काम करतात.

‘रॉ’मध्ये काम करण्यासाठी अधिकाऱ्यांची निवड कशी होते?

सिनियर फिल्ड ऑफिसर ते सहाय्यक फिल्ड ऑफिसरपर्यंत सगळ्यांची निवड मुलाखतीद्वारे होते. कॅबिनेट सचिवालयामर्फत निवड प्रक्रिया पार पाडली जाते.

याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमधील विशेष कौशल्य असलेले अधिकारी, हवालदार, शिपाई इत्यादींची ‘रॉ’च्या फिल्ड वर्कसाठी निवड केली जाते.

IPS, IRS आणि IFS सेवांसाठी निवडलेल्या उमेदवारांनाही ‘रॉ’ आपल्या विभागात काम करण्यासाठी निवडते.

कधीकधी UPSC आणि SSC बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि संबंधित विभागात सामील झाल्यानंतर पात्र उमेदवारांशी संपर्क साधून ‘रॉ’मध्ये सामील होण्यासाठी बोलावलं जातं.

गट-1 च्या अधिकाऱ्यांनाही ही संधी मिळू शकते.

याशिवाय ‘रॉ’मध्ये कायमस्वरुपी काम करणाऱ्या IAS, IPS अधिकाऱ्यांना गुणवत्तेनुसार ‘RAS’ असा सेवा कोड दिला जातो.

केंद्र सरकारच्या अधिकृत संपर्कामध्ये या कोडसह नावांना प्राधान्य दिले जाते. कारण ते ‘रॉ’ या गुप्तचर संस्थेशी संबंधित असल्याचे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माहीत असते.

‘रॉ’मधील प्रशिक्षण कठीण असतं का?

‘रॉ’मध्ये फिल्ड ऑफिसर आणि एजंट म्हणून काम करणाऱ्यांसाठी अत्यंत कठोर असं प्रशिक्षण असतं. मुळात त्यांना त्यांची मातृभाषा, इंग्रजी, हिंदी याशिवाय आणखी एक किंवा दोन परदेशी भाषांमध्ये प्रभुत्व असणं आवश्यक असतं.

‘रॉ’ इंटेलिजन्स एजन्सीमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच त्यांना पहिल्या वर्षासाठी गुप्तचर माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतात.

फायनान्स, इकॉनॉमिक अॅनालिसिस, स्पेस टेक्नॉलॉजी, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेशन, एनर्जी सिक्युरिटी, इंटरनॅशनल फॉरेन पॉलिसी, डिप्लोमॅटिक ऑपरेशन्सचे प्रशिक्षण दिले जाते.

या अधिकाऱ्यांना परदेशातील भारतीय दूतावासातील कोणत्याही विभागात सामान्य कनिष्ठ अधिकारी, सहाय्यक सचिव, उपसचिव किंवा प्रथम किंवा द्वितीय सचिव म्हणून काम करून गुप्तचर माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

या अधिकाऱ्यांना दिल्लीच्या उपनगरातील गुरुग्राम येथे घरातील प्रशिक्षण आणि भाषेचे प्रशिक्षण दिले जाते.

हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अॅडव्हान्स प्रशिक्षणाच्या नावाखाली फिल्ड ऑफिसर्सना पुढील दोन वर्षांसाठी क्षेत्रीय इंटेलिजन्स प्रशिक्षण दिलं जातं.

असामान्य परिस्थितीत कसं काम करावं? परदेशात कसं जायचं? तिथून पळून मायदेशी कसे यायचं? परदेशात पकडल्यास काय करावं? संपर्क काय असावेत? कपडे कोणते परिधान करायचे? यासोबतच, मार्शल आर्ट्स, शस्त्रे हाताळणे इत्यादींचे प्रशिक्षण दिलं जातं.

त्यांना काही महिन्यांसाठी उत्तराखंडच्या देहरादूनमधील भारतीय सैन्य प्रशिक्षण महाविद्यालयात शारीरिक प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)