You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हनी ट्रॅप काय असतो? उच्चपदस्थ अधिकारी यामध्ये कसे अडकतात?
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'हनी ट्रॅप'ची चर्चा सुरू आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एका गोष्टीची चर्चा होतेय, ती म्हणजे हनी ट्रॅपची. पण कुठनं आलं हे काय माहिती. कुठल्याही आजी-माजी मंत्र्यांच्या हनी ट्रॅपची तक्रारही नाही, पुरावेही नाही आणि अशा घटनाही समोर आलेल्या नाहीत."
यापूर्वी राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या संस्थांपैकी एक असलेल्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात DRDO मधील एका शास्त्रज्ञाला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली होती.
डॉ. प्रदीप कुरूलकर असं या शास्त्रज्ञाचं नाव असून हे प्रकरण हनी ट्रॅपचं असल्याचं ATS ने सांगितलं होतं.
डॉ. कुरुलकर यांच्यावर कथितरित्या पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. ते व्हॉट्सअप आणि व्हीडिओ कॉल्सच्या माध्यमातून एका पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होते, असंही ATS ने म्हटलं होतं.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण तत्पूर्वी आपल्याला हनी ट्रॅपसंदर्भात काही प्रमुख प्रश्नांची उत्तरे समजून घेणं गरजेचं आहे.
खरं तर हनी ट्रॅपची प्रकरणे सातत्याने चर्चेत येत असतात. काही महिन्यांपूर्वीच नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली पोलिसांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या एका वाहनचालकाला अटक केली होती.
हनी ट्रॅप मध्ये अडकल्यानंतर हा ड्रायव्हर पाकिस्तानमध्ये एखाद्या व्यक्तीला गुप्त माहिती पुरवत आहे, असं सुरक्षा संस्थांनी पोलिसांना सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
हनी ट्रॅप काय असतो?
हनी ट्रॅप हेरगिरीच्या इतिहासात आजवर सर्वाधिक चर्चा कुणाची झाली असेल तर ती म्हणजे माता हारी होय. पहिल्या महायुद्धानंतर तिला तिच्या कारनाम्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
नेदरलँडची मार्गारेट मॅकलियोड आकर्षक नृत्यकलेत पारंगत होती. तिला नंतर फ्रान्सच्या फायरिंग स्क्वॉडने गोळी झाडून ठार केलं होतं. जर्मन लष्करासाठी हेरगिरी केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. यादरम्यान तिने अनेक फ्रेंच-ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन गुप्त माहिती मिळवली, असाही तिच्यावर आरोप होता.
लोकप्रिय लेखक पावलो कोएल्हो यांच्या ‘द स्पाय’ नामक का कादंबरीत माता हारी ही एक प्रमुख पात्र आहे.
ते लिहितात, “माता हारी पॅरीसमध्ये पोहोचली, तेव्हा तिच्याकडे एक पैसाही नव्हता. पण लवकरच ती पॅरीसमधली सर्वात फॅशनेबर आणि आकर्षक महिला बनली. बहुतांश अधिकारी किंवा लष्करी अधिकारी तिच्यासोबतच्या आपल्या मैत्रीबद्दलच्या कहाण्या रंगवून सांगायचे.”
पण, माता हारीवर हनी ट्रॅप करण्याबाबतचे आरोप पूर्णपणे सिद्ध होऊ शकले नाहीत. पण तरीही माता हारीला फ्रेंच सरकारने शिक्षा दिली कारण, ही प्रकरणे कथितरित्या गुप्त दस्तऐवज शत्रूपर्यंत पोहोचवण्याची होती.
खरं तर, हनी ट्रॅप करण्याची प्रक्रिया म्हणजे एखादं प्रेमळ किंवा लैंगिक नातं बनवून एखाद्या व्यक्तीकडून गुप्त माहिती काढून घेणं अशी असते.
या माहितीचा वापर एखादी मोठी रक्कम मिळवण्यासाठी किंवा राजकीय कारणांसाठी केला जाऊ शकतो.
गेल्या दशकभरात भारतासह इतर अनेक देशांमध्ये हनी ट्रॅपची अनेक प्रकरणं समोर आली. यामध्ये बेकायदेशीर पद्धतीने वसुली किंवा ब्लॅकमेल करण्याचा समावेश आहे.
केम्ब्रिज डिक्शनरीनुसार, “हनी ट्रॅप ही एखादी मोहक गोष्ट असते. यामध्ये लोकांना आमीष दाखवण्यात येतं. हनी ट्रॅपचा वापर हेरगिरीसाठीही करण्यात येतो.”
हेरगिरीसाठी हनी ट्रॅप
परदेशातील किस्से तर आहेतच. पण आधी आपण भारतातील हनी ट्रॅपच्या प्रकरणांची माहिती घेऊ.
बी. रमण यांच्या ‘द काओ बॉयज ऑफ रॉ : डाऊन मेमरी लेन’ मध्ये याबाबत एक अत्यंत सुप्रसिद्ध किस्सा आहे.
यामध्ये मॉस्कोमध्ये तैनात असलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याचं एका रशियन डान्सरसोबत प्रेम जुळतं.
KGB ही रशियाची गुप्तहेर संस्था त्या डान्सरच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून माहिती उकळण्याच्या प्रयत्नात असते. पण ही माहिती देण्यास अधिकारी स्पष्ट नकार देतो. तो थेट दिल्लीला परतून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना याबाबत सांगतो.
यानंतर, संबंधित अधिकाऱ्याला पुढे सावध राहण्याची सूचना देऊन माफ केलं जातं. तेव्हापासूनच भारताच्या परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहण्याची सूचना देण्यात येऊ लागली. ती आजतागायत कायम आहे.
ब्रिटिश इतिहासकार रिचर्ड डेकन आपल्या स्पायक्लोपीडिया पुस्तकात लिहितात, “कोल्ड वॉरदरम्यान रशियाच्या KGB या गुप्तहेर संस्थेने मोजनो कोडवर्ड नामक महिला गुप्तहेरांचा वापर परदेशी अधिकाऱ्यांच्या जवळ येणं, त्यांच्याशी गुप्त प्रकारे संबंध प्रस्थापित करणं, अखेरीस गुप्त दस्तऐवज त्यांच्याकडून मिळवणं यासाठी केला होता.”
2009 आणि 2010 दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनमध्ये परदेशी गुप्तहेरांच्या मुद्द्यावरून हाहाकार माजला होता.
प्रतिष्ठित फॉरेन पॉलिसी जर्नलने याबाबत लिहिलं, “MI5 या ब्रिटिश गुप्तहेर संस्थेला लैंगिक संबंधांच्या मुद्यावर प्रचंड चिंता आहे. गेल्या एका वर्षात ‘द थ्रेट फ्रॉम चायनीज एस्पियोनाज’ नामक एक 14 पानी दस्तऐवज ब्रिटिश बँका, मोठ्या व्यापारी आणि आर्थिक संस्थांमध्ये वाटण्यात आलं. यामध्ये चीनच्या निशाण्यावर पाश्चिमात्य देशांतील व्यापारी असू शकतात. त्यांच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न होऊ शकतात.”
याबाबत अमेरिकेच्या सरकारने एक सविस्तर अहवालही तयार केला होता. यामध्ये वरील सर्व बाबींचा उल्लेख पाहायला मिळतो.
भारतातील हनी ट्रॅप
1980 च्या दशकात भारतात कथित हनी ट्रॅपचं प्रकरण प्रचंड चर्चेत होतं. त्यावेळी रिसर्च अँड अनालिसिस विंस (रॉ) चे अधिकारी के. व्ही. उन्नीकृष्णन यांच्यावर अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIA साठी हेरगिरी केल्याचा आरोप होता.
यादरम्यान उन्नीकृष्णन हे एका हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोपही झाला होता.
के. व्ही. उन्नीकृष्णन हे त्यावेळी चेन्नईच्या रॉ शाखेत नियुक्त होते. ते कथितरित्या LTTE च्या हालचालींवर नजर ठेवून होते.
भारत आणि श्रीलंकेदरम्यान 1987 साली झालेल्या शांती-कराराच्या काही वेळ आधी के. व्ही. उन्नीकृष्णन यांना ताब्यात घेण्यात आलं.
सिंगापूर युनिव्हर्सिटीत आंतरराष्ट्रीय संबंध आणि डिप्लोमसी या विषयांचे प्राध्यापक असलेले के. पी. बाजपेई यांच्या मते, “सॅटेलाईच्या माध्यमातून मिहिती मिळवणे, माहिती तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियन इंटेलिजन्स यांच्या पूर्वीच्या काळची हेरगिरी ही गुप्तहेरांमार्फतच होऊ शकत असे. कारण परदेशी पोस्टिंगवर खूप कमी लोक जात असत. त्यांच्या प्रोफाईलबाबत इतर देश चांगली तयारी करून ठेवायचे.”
गेल्या दशकांबाबत बोलायचं झाल्यास पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे नियुक्तीवर असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील प्रेस-इन्फॉर्मेशन सचिव माधुरी गुप्ता यांचं प्रकरण खूप गाजलं होतं. 2010 मध्ये त्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. त्यांच्यावर पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संस्थेला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप होता.
2018 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. पण सोबतच त्यांना जामिनावर बाहेरही सोडण्यात आलं.
कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं, “माधुरी गुप्ता यांनी संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांची पोस्टिंग आणि त्यांच्या कुटुंबांविषयीची माहिती पाकिस्तानी गुप्तहेरांना दिली होती.”
2021 मध्ये 64 वर्षीय माधुरी गुप्ता यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण संपलं. पण, भारतात अनेकवेळा हनी ट्रॅपच्या वाढत्या प्रकरणांमुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता भासू लागली.
उदाहरणार्थ, 2019 मध्ये राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं होतं, “पाकिस्तानच्या ISI कडून भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. त्यामुळे सर्वांनी जास्त सावध राहण्याची गरज आहे.”
यानंतर काही महिन्यांनीच भारतीय लष्कराने आपल्या कर्मचाऱ्यांना मोबाईलमधून 89 अप डिलीट करण्याचा सल्ला दिला होता. यामध्ये फेसबुक, टिकटॉक, ट्रू-कॉलर आणि इन्स्टाग्रॅम या अपचा समावेश होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)