Josephine Baker : नाझींवर पाळत ठेवणारी बॅले डान्सर

पॅरिसमध्ये तोकडे कपडे घालून नाचणारी स्त्री ते नागरी अधिकारांची उद्गाती, अशा रितीने स्थित्यंतरं अनुभवलेल्या जोसेफिन बेकरने बेघरपणापासून आंतरराष्ट्रीय ख्यातीपर्यंतचा प्रवास केला...

जेमतेम गुप्तांग झाकणारा जी-स्ट्रिंग प्रकारचा पोशाख, सूचक ठिकाणी लावलेली केळी आणि चेहऱ्यावर स्मित- अशा रूपातील जोसेफिन बेकर मंचावर तोऱ्यात चालायची आणि थिरकायची. आपल्या हवे ते आणि हवे तसे कपडे घालण्यासाठी विशिष्ट प्रकारचं धाडस लागतं आणि आफ्रिकी-अमेरिकी नृत्यांगना, गायिका व मनोरंजनकर्ती असणाऱ्या बेकरमध्ये मुबलक धाडस होतं.

"तिला काहीच अशक्य वाटायचं नाही," असं कॅलिफोर्निया-सॅन दिएगो विद्यापीठातील आफ्रिकन अँड आफ्रिकन-अमेरिकन स्टडीज् रिसर्च सेंटरचे संचालक बेनेट्टा ज्यूल्स-रोसेट म्हणतात. त्यांनी 'जोसेफिन बेकर इन आर्ट अँड लाइफ: द आयकॉन अँड द इमेज' हे पुस्तक लिहिलं आहे. "आपल्याला काळाच्या पुढच्या वाटणाऱ्या गोष्टी ती करत असे, कारण आपल्याला अपयश येईल असं तिला कधीच वाटलं नाही," असं बेनेट्टा सांगतात.

सेन्ट लुई, मिसुरी इथे 3 जून 1906 रोजी जन्मलेल्या फ्रेडा जोसेफिन मॅकडोनाल्डच्या सुरुवातीच्या आयुष्यात ती उत्तरायुष्यात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करणार असल्याच्या काहीच खुणा दिसल्या नव्हत्या.

तिचा जडणघडणीचा काळ अत्याचाराने व गरिबीने भरलेला होता, फ्रेडा कुमारवयीन झाली तेव्हा रस्त्यावर राहून कचऱ्यात मिळेल ते उरलंसुरलं अन्न खाऊन जगत होती.

पण या रस्त्यांनीच बेकरच्या गुणांना वाव दिला, यामुळेच ती सेन्ट लुईहून न्यू यॉर्क सिटीतील 'हार्लेम रेनेसाँ'च्या मध्यवर्ती भागात पोचली. एकोणिसाव्या वर्षी बेकरला पॅरिसमधील एका फक्त काळ्या कलाकारांचा समावेश असलेल्या कार्यक्रमासाठी भरती करण्यात केलं. महिन्याला एक हजार डॉलर मिळतील, या हमीवर बेकर फ्रान्सला रवाना झाली.

व्हिनसचा जन्म

पॅरिसमधील मनोरंजनविश्वातील बेकरची उपस्थिती अभूतपूर्व ठरली. Théâtre des Champs-Élysées इथे Revue Nègreमध्ये तिने 2 ऑक्टोबर 1925 रोजी पहिल्यांदा सहभाग घेतला. काही मोती आणि पिसं लावलेल्या तोकड्या पोशाखात बेकरने उत्तेजित प्रेक्षकांसमोर नाच सादर केला. उघडे स्तन ठेवून थिरकत केलेलं हे नृत्य दर रात्री अधिकाधिक प्रतिसाद मिळवायला लागलं आणि इथेच फ्रान्सचं 'ब्रॉन्झ व्हिनस'सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं.

"काळी स्त्री म्हणून ती अमेरिकेत राहिली असली, तर तिला प्रत्यक्षात जे यश मिळवता आलं ते मिळवता आलं नसतं," असं ज्यूल्स-रोसेट सांगतात.

बेकरने स्वतःचं नवीन आयुष्य कवटाळलं, तिने फ्रेंचसोबतच इटालियन व रशियन भाषाही शिकून घेतल्या. वादग्रस्त.. किंवा विचित्र गोष्टींना ती बुजली नाही. चित्ता पाळणारी किती माणसं तुमच्या माहितीत आहेत?

बेकरने चार चित्रपटांमध्ये काम केलं- Siren of the Tropics (1927),ZouZou (1934), Princesse Tam Tam (1935) and Fausse Alerte (1940). काळी महिला म्हणून स्वतःवर येणारी आणखी काही बंधनं तिने यातून तोडली.

"तिने कधीही हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये काम केलं नाही. पण ती फ्रान्समध्ये काम करत होती तेव्हा गॉन विथ द विंडसारख्या हॉलिवूडपटांमध्ये हॅटी मॅकडॅनिअलसारखी अभिनेत्री मोलकरणीचं काम करत होती."

अभिनयाचं काम बाजूला ठेवून जोसेफिन बेकरने सैनिकी सेवेसारख्या अनपेक्षित क्षेत्रात प्रवेश केला. दुसऱ्या महायुद्धात ती फ्रान्सच्या हवाई दलामध्ये महिला पथकात सब-लेफ्टनंट म्हणून कार्यरत होती. हे पुरेसं नव्हतं म्हणूनच की काय तिने फ्रेंच प्रतिकार फौजांसाठी गुप्तहेरगिरीसुद्धा केली- तिच्या सुरावटीच्या कागदावर अदृश्य शाईने नाझींची सैनिकी गुप्तचरविषयक माहिती लिहून आणत होती.

अनेक कौशल्यं

फ्रान्समध्ये राहायला गेल्यानंतरही बेकरने अमेरिकेकडे पाठ फिरवली नाही. "स्वतःची प्रसिद्धी, सेलिब्रिटी असणं राजकीय उद्देशाने वापरणाऱ्या आरंभिक पथदर्शक व्यक्तींमध्ये तिचा समावेश होतो," असं ज्यूल्स-रोसेट म्हणतात. बेकर अनेक वेळा तिचे नृत्याविष्कार दाखवण्यासाठी अमेरिकेला जात राहिली.

1951मध्येदेखील ती तिकडे गेली होती. वांशिक भेदभावाचा मुद्दा इतरांनी न्यायालयात हाताळला, तर बेकर या मुद्द्याला थेट सामोरी गेली. वांशिक संमिश्र प्रेक्षकांना परवानगी नसलेल्या ठिकाणी कला सादर करायला ती नकार देत असेल. अमेरिकेमध्ये अगदी टोकाचा भेदभाव असणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांमधील कार्यक्रमांबाबतसुद्धा तिने हेच धोरण ठेवलं. लास वेगासमध्ये शारीरिक रंगांचं विभाजन मोडून काढणाऱ्या आघाडीच्या व्यक्तींमध्ये ती होती. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मात्र तिचे यासंबंधीचे प्रयत्न दुर्लक्षिले जातात.

ही बाब खटकणारी असल्याचं सांगत ज्यूल्स-रोसेट म्हणतात, "लास वेगासमधील कॅसिनोंमधील वांशिक विभाजनाचं धोरण मोडून काढणारी ती पहिली होती, फ्रँक सिनात्रा आणि सॅमी डेव्हिस ज्यूनिअर यांच्या आधी तिने हे करून दाखवलं होतं."

बेकर ख्यातनाम झाली म्हणून वंशभेदापासून तिला सुरक्षितता लाभली होती असं नाही. 1951 साली अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना तिला अनेक हॉटेलांमध्ये व उपहारगृहांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

न्यूयॉर्कमधील स्टॉर्क क्लब इथे आपल्याला सेवा देण्यात आली नाही, असं सांगत बेकरने संबंधित नाइटक्लबच्या मालकावर वंशभेदाचे आरोप केले. परिणामी, ती एफबीआयच्या काळ्या यादीत आली आणि दशकभरासाठी तिला अमेरिकी नागरिकत्वाचे अधिकार गमवावे लागले.

अटर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडी यांच्या मदतीने अखेरीस 1963 साली बेकर अमेरिकेत पुन्हा आली. या वेळी वॉशिंग्टनमधील एका मोर्चात तिचं भाषण झालं. आता भडक पोशाख, बटबटीत मेक-अप आणि उत्तेजक वावर नव्हता. उलट, फ्रेंच हवाई दलाच्या गणवेशात बेकर तिथे आली, तिने जाड काचांचा चष्मा घातला होता आणि कुरळे केस मोकळे सोडले होते.

"मी कायम खडतर मार्गांनी चालत आले, हे तुम्हाला माहीत आहे,' बेकर गर्दीला संबोधून म्हणाली. "मी कधीही सोपा मार्ग पत्करला नाही, पण हळूहळू वय वाढत गेलं, आणि माझ्याकडे ताकद नि सामर्थ्य होतं म्हणून मी खडतर मार्ग स्वीकारला नि तो काहीसा सुसह्य करण्याचा प्रयत्न केला.

तुमच्यासाठी तो अधिक सहजसोपा करावा, असं मला वाटत होतं. मला जे करायची संधी मिळाली तशीच संधी तुम्हालाही मिळावी, असं मला वाटतं."

बेकरला अनेक गोष्टी करायची संधी मिळाली. अँजेलिना जोलीच्या कितीतरी आधी तिने जगभरातील 12 मुलं दत्तक घेऊन स्वतःची एक 'रेन्बो ट्राइब' तयार केली. वांशिक सौहार्द व समजूत निर्माण करण्याचा हा तिचा प्रयत्न होता.

ती एक स्टाइल आयकनसुद्धा होती. याबाबतीत तिचा प्रभाव केवळ मंचांवरील तोकड्या कपड्यांपुरता मर्यादित नव्हता. "फॅशनविश्वावर तिचा ठसा उमटला होता. कलाकार पॉल कॉलिन यांच्या प्रभावाखालील तिच्या फॅशनसोबतच, तिच्या फोटोग्राफिक वावराचीही फॅशन वेगाने पसरत असे," असं ज्यूल्स-रोसेट म्हणतात.

निधनानंतर जवळपास 40 वर्षांनी बेकरचा ब्रँड अजूनही जिवंत आहे. तिच्यामुळे प्रसिद्ध झालेल्या खास हॅटसोबत 'एटॉन' कट असणारी तिची केशभूषाही अजून चलनात हे. बार्बाडोसमधील गायिका रिहाना अनेकदा अशाच पोशाखामध्ये 'रेड कार्पेट'वर येताना दिसते. बेकरने वापरलेल्या केळ्यांनाही विशिष्ट स्थान लाभलं आहे. मिउस्सिआ प्रादासारख्या डिझायनरांनी त्यातून स्फूर्ती घेऊन 2011 साली फळांची नक्षी असमारा स्कर्ट तयार केला होता.

जोसेफिन बेकर एक आकर्षक तरुणी म्हणून कशी ओळखली गेली? "जोसेफिन बेकर अनेक आयुष्यं जगली," असं ज्यूल्स-रोसेट सांगतात. "मोहकता, निश्चय, सादरीकरणाची कला व माणुसकी यांचा परिपूर्ण संयोग तिच्यात झाला होता. तिच्याकडे दूरदृष्टी होती. बालपणापासून मरण येईपर्यंतच्या काळात तिने निर्माण केलेलेला मार्ग आपल्यासारख्या अनेकांना अनुसरता येण्यासारखा आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)