शिखांनी कॅनडामध्ये स्थलांतर करायला केव्हा सुरुवात केली?

    • Author, नवदीप कौर ग्रेवाल
    • Role, बीबीसी पंजाबीसाठी

सध्या कॅनडाच्या राजकारणात, अर्थव्यवस्थेत, सामाजिक बांधणी आणि संस्कृतीमध्ये शीख हे एक महत्त्वाचा भाग झाले आहेत. पण जेव्हा शीख कॅनडात स्थलांतरित होऊ लागले होते तेव्हा त्यांची स्थिती आजच्यासारखी नव्हती.

कॅनडात आपलं बस्तान बसविण्यासाठी शिखांना संघर्ष करावा लागला होता आणि त्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ देखील आहेत.

या लेखात आपण शीख कॅनडात कसे पोहोचले, कॅनडात शिखांचे स्थलांतर कोणत्या वर्षांत वाढले आणि केव्हा कमी झाले? हे पाहणार आहोत.

कॅनडाला पोहोचणारे पहिले शीख कोण होते?

महाराजा रणजित सिंग यांचे नातू प्रिन्स व्हिक्टर अल्बर्ट दलीप सिंग हे कॅनडात जाणारे शीख समुदायातील पहिली व्यक्ती असल्याचं मानलं जातं.

प्रिन्स व्हिक्टर अल्बर्ट हे महाराजा दलीप सिंग आणि राणी बेम्बा मुलर यांचे पुत्र होते.

केंब्रिजमधील इटन आणि ट्रिनिटी मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी सँडहर्स्ट येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांना पहिल्या (रॉयल) ड्रॅगन्समध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आलं.

1888 मध्ये त्यांना ब्रिटिश उत्तर अमेरिकेतील नोव्हा स्कॉशियाच्या हॅलिफॅक्समध्ये नियुक्ती मिळाली. तिथे ते ब्रिटीश सैन्याचे कमांडर जनरल सर जॉन रोन्स यांचे मानद सहाय्यक म्हणून काम करणार होते.

त्यानुसार कॅनडामध्ये येणाऱ्या शीख समुदायातील ते पहिले व्यक्ती असल्याचं मानलं जातं.

1890 मध्ये ते इंग्लंडला परतले.

ही माहिती कॅनडातील शीख संग्रहालयाची वेबसाइट, कॅनडात तीन वेळा खासदार राहिलेल्या गुरमंत गरेवाल यांचा लेख, हिंदुस्तान टाईम्स आणि इतर अनेक स्त्रोतांतून गोळा करण्यात आली आहे.

यानंतर कॅनडात गेलेले शीख ब्रिटिश सैन्याचे सैनिक होते. 1897 साली, इंग्लंडमध्ये राणी व्हिक्टोरियाचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.

या संदर्भात लंडनमध्ये झालेल्या रॅलीमध्ये अनेक राष्ट्रकुल देशांच्या लष्करी तुकड्यांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये शीखही उपस्थित होते.

कॅनेडियन शीख सरजित सिंग जगपाल त्यांच्या 'बिकमिंग कॅनेडियन' या पुस्तकात लिहितात की, राणी व्हिक्टोरियाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात सहभागी झालेले हाँगकाँग रेजिमेंटमधील शीख पुरुष कॅनडामार्गे हाँगकाँगला परतले.

सरजित सिंग जगपाल लिहितात की, ते शीख तरुण कॅनडाची जमीन, हिरवळ पाहून खूप प्रभावित झाले होते. तो भाग त्यांना स्वतःच्या पंजाबसारखा वाटला होता.

शिख कॅनडात येण्यापूर्वी कॅनडाचे शीखांशी संबंध

शिखांनी कॅनडाच्या भूमीवर पाय ठेवण्याआधीच तिथल्या शिखांबद्दलच्या चर्चांचे संदर्भ मिळतात.

भारतातील शीख हे जगातील सर्वात शूर सैनिक म्हणून गणले जायचे.

ब्रिटिश नॉर्थ अमेरिका कायद्यानंतर, सन 1868 मधील कॅनडाचे पहिले पंतप्रधान सर जॉन ए. मॅकडोनाल्ड यांनी भारतातील एका मित्राला पत्र लिहिलं होतं.

कॅनडाच्या शीख हेरिटेज म्युझियमच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलंय की, "जेव्हा इंग्लंड आणि अमेरिका यांच्यात युद्ध होईल, तेव्हा भारत शिखांची फौज पाठवून आम्हाला मदत करू शकेल."

याआधी 1843-1845 या काळात ब्रिटिश साम्राज्यात कॅनडाचे गव्हर्नर जनरल असलेले अधिकारी सर चार्ल्स मेटकाल्फ यांची पत्नी पंजाबी शीख महिला होती.

सर चार्ल्स मेटकाफ यांनी भारतातील ब्रिटीश राज्याचे अधिकारी म्हणून महाराजा रणजित सिंग यांच्याशी लाहोरचा तह केला आणि लाहोर राज्यातील एका शीख महिलेशी विवाह केला.

कॅनडातील गव्हर्नर जनरल म्हणून मेटकाफच्या कार्यकाळात, त्यांची शीख पत्नी त्यांच्यासोबत कॅनडाला गेली की नाही याबद्दल कोणताही संदर्भ उपलब्ध नाही.

शिख लोक रोजगारासाठी कॅनडात कधी आणि कसे येऊ लागले?

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला (1900) शीख लोक रोजगारासाठी कॅनडामध्ये येऊ लागले.

'बिकमिंग कॅनेडियन्स' या पुस्तकात सरजित सिंग जगपाल लिहितात की, राणी व्हिक्टोरियाच्या हीरक महोत्सवादरम्यान कॅनडामार्गे हाँगकाँगला परतलेल्या शीख सैनिकांनी नवा देश, तिथे उपलब्ध असलेल्या संधी यांविषयी आपल्या लोकांना माहिती दिली.

कॅनडातील गद्री बाबांच्या इतिहासावर पुस्तके लिहिणारे सोहन सिंग पूनी यांनी सांगितलं की, "ब्रिटिश शासित हाँगकाँगमध्ये काम करणाऱ्या शिखांना हळूहळू स्थानिक आणि चिनी लोकांद्वारे कॅनडा आणि अमेरिकेची माहिती मिळाली."

"कारण चिनी लोकांनी आधीच कॅनडामध्ये स्थलांतर करायला सुरुवात केली होती. भारतीय लोक आधी ऑस्ट्रेलियात जात होते. पण 1901 मध्ये तिथल्या स्थलांतर धोरणांमुळे ऑस्ट्रेलियात होणार स्थलांतर थांबलं. आता लोकांनी कॅनडाकडे पर्याय म्हणून बघायला सुरुवात केली."

"चांगल्या आयुष्याच्या शोधात शीख कॅनडामध्ये येत गेले आणि मग हळूहळू या नव्या देशाची चर्चा पंजाबपर्यंत पोहोचली."

सोहन सिंग पूनी स्वतः 1972 पासून कॅनडामध्ये राहतात.

1903-04 पासून शीख लोक रोजगारासाठी कॅनडामध्ये येऊ लागले. कॅनडाच्या शीख हेरिटेज म्युझियममधून मिळालेल्या माहितीनुसार, विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये सुमारे 5500 शीख लोक राहत होते.

त्यावेळी बहुतेक शीख लोक लाकडाचे कारखाने, सिमेंट कारखाने, रेल्वे कामगार किंवा शेत मजूर म्हणून काम करायचे. त्यावेळी कॅनडात फक्त शीख पुरुषच रोजगारासाठी येत होते. सरकारच्या स्थलांतर धोरणामुळे ते आपल्या बायका-मुलांना कॅनडात आणू शकले नाहीत. ब्रिटिश कोलंबिया हे कॅनडातील शिखांचे पहिले घर होते.

‘बिकेमिंग कॅनेडियन्स’ या पुस्तकात सरजित सिंग जगपाल लिहितात, "त्या काळात कॅनडात येणारे शीख साधारणपणे अशिक्षित आणि अकुशल असले, तरी मेहनती असायचे. शिवाय ते गोऱ्या कामगारांपेक्षा कमी वेतनावर काम करायचे. त्यामुळे या शीख कामगारांना प्राधान्य मिळू लागले."

लुधियानाच्या जी जी एन महाविद्यालयात प्रवासी साहित्य केंद्राच्या समन्वयक सहायक प्राध्यापक डॉ. तेजिंदर कौर सांगतात की, त्यावेळी स्थलांतरित झालेल्या शीखांचा उद्देश पैसा मिळवणे आणि मायदेशी परत येणे हा होता.

डॉ. तेजिंदर सांगतात, "जेव्हा शिखांनी कॅनडाला जायला सुरुवात केली तेव्हा त्यांना भाषेच्या अनेक समस्या होत्या. परदेशी भूमीत स्थानिक लोकांशी बोलण्यास आणि त्यांच्याशी संवाद साधण्यास त्यांना अडचण यायची."

"ते स्थानिक लोकांशी फारसे संवाद साधत नव्हते. त्यावेळी कमाई करणे आणि मायदेशी परत जाणे एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असायचं. त्यावेळी दळणवळणाची साधनेही मर्यादित होती."

सरजित सिंग जगपाल यांच्या पुस्तकात सापडलेल्या संदर्भानुसार, पंजाबमधून कॅनडात जाणारे स्थलांतरीत आधी पंजाब ते कलकत्ता रेल्वेने प्रवास करायचे. नंतर ते जहाजातून हाँगकाँगमार्गे कॅनडा गाठायचे.

सुरुवातीच्या काळात आलेल्या लोकांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नोंदवहीनुसार, कडाक्याच्या थंडीत शीख लोक घोड्याच्या तबेल्यात किंवा कडक लाकडावर झोपायचे.

ते हिवाळ्यात वापरण्यासाठी भारतातून येताना ब्लँकेट आणत असत अशीही नोंद सापडली आहे.

कॅनडातील पहिला गुरुद्वारा

1906 मध्ये व्हँकुव्हरमध्ये खालसा दिवाण सोसायटीची स्थापना करण्यात आली. शिखांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करणे हा या संस्थेचा उद्देश होता.

खालसा दिवाण सोसायटीने स्वतः कॅनडातील पहिल्या गुरुद्वारा साहिबची पायाभरणी केली. कॅनडाचा पहिला गुरुद्वारा 1908 मध्ये व्हँकुव्हरमध्ये जनतेसाठी खुला करण्यात आला.

या गुरुद्वाराची रचना 1901 मध्ये हाँगकाँगमध्ये बांधलेल्या पहिल्या गुरुद्वारा साहिबसारखीच होती. हाँगकाँग हा भारत ते कॅनडा या प्रवासादरम्यानचा थांबा होता. हाँगकाँगमध्ये राहणारे शीख या गुरुद्वारा साहिबमध्ये आश्रय घेत असत.

कॅनडामध्ये स्थलांतरित झालेल्या शिखांसाठी गुरुद्वारा साहिबचे बांधकाम हा एक महत्त्वाचा टप्पा होता.

सोहनसिंग पूनी सांगतात की, तिथे राहणाऱ्या शिखांना आता हक्काची एक अशी जागा मिळाली होती जिथे जाऊन ते त्यांच्या लोकांशी, समुदायाशी चर्चा करू शकत होते. घर आणि देशापासून दूर असणाऱ्या शिखांसाठी गुरुद्वारा हे एकत्र जमण्याचं केंद्र बनलं होतं.

स्थलांतर थांबले

कॅनडाच्या शीख हेरिटेज म्युझियम आकडेवारीनुसार, 1908 मध्ये शिखांची लोकसंख्या सुमारे 5500 इतकी होती. पण 1918 मध्ये ही संख्या रोडावली आणि 700 वर आली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा शिख कामगार म्हणून कॅनडात स्थलांतरीत होऊ लागले तेव्हा त्यांच्याबद्दल विविध कारणांमुळे द्वेष निर्माण होऊ लागला. राजकीय कारणांव्यतिरिक्त यात इतरही कारणं होती. जसं की स्थानिक लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमावण्याची भीती वाटू लागली होती.

एप्रिल 1907 मध्ये कॅनडातील म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यावेळी शिखांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं. यामुळे संघराज्याच्या मतदानापासूनही शीख बाजूला झाले.

सुमारे चाळीस वर्ष शीख कॅनडाच्या राजकीय प्रक्रियेपासून दूर राहिले. या काळात शीखांना मतदानाचा अधिकार किंवा नागरिकत्वाचा अधिकार नव्हता.

याविषयी सोहन सिंग पूनी यांनी माहिती दिली आहे. शिवाय जगवंत गरेवाल यांनीही आपल्या लेखात त्याचा उल्लेख केला आहे.

या काळात इतर देशांतही शिखांबद्दल जातीय द्वेष पसरला. कॅनडाच्या शीख हेरिटेज म्युझियमच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 1907 मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन या शहरात 400-500 गोर्‍यांच्या जमावाने लाकूड कारखान्यात काम करणाऱ्या हजारो शीख कामगारांना घेरलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. सरतेशेवटी त्यांना शहराबाहेर हाकलून दिलं.

असाच हिंसाचार कॅनडामधील व्हँकुव्हरमध्येही घडला. या घटनेला आशियाई विरोधी दंगल असंही म्हटलं गेलं.

दरम्यान, कॅनडात भारतीयांचे आगमन रोखण्यासाठी स्थलांतर धोरणातील बदलांवर चर्चा होऊ लागली. त्यानुसार जानेवारी 1908 मध्ये नवीन धोरण आणि आदेश जारी करण्यात आले.

या आदेशानुसार, कॅनडामध्ये येणार्‍या सर्व स्थलांतरितांनी त्यांच्या मूळ देशातून थेट कन्फर्म तिकिटाद्वारे कॅनडात यावे. त्यावेळी, कॅनेडियन सरकारने कॅनडाच्या पॅसिफिक स्टीमशिप कंपनीवरही दबाव आणला होता. ही कंपनी थेट भारतातून कॅनडामध्ये माल आणायची. ही एकमेव शिपिंग कंपनी होती आणि तिचीही सेवा बंद करण्यात आली.

कामगटामारू घटना

दुसर्‍या आदेशानुसार, कॅनडामध्ये येणाऱ्या सर्व आशियाई स्थलांतरितांकडे 200 डॉलर असणं गरजेचं होतं. पण तेच इतर स्थलांतरितांसाठी केवळ 25 डॉलरची अट होती. हा आशियाई लोकांविरुद्ध भेदभाव करणारा कायदा होता.

यानंतर 1914 मध्ये कामगाटामारूची घटना घडली.

सरजित सिंग जगपाल यांनी या घटनेबद्दल लिहिलंय की, शीख व्यापारी गुरदित सिंग यांनी कॅनडाच्या स्थलांतर धोरणांना आव्हान दिलं. त्यांनी भारतीयांना कॅनडामध्ये आणण्यासाठी जपानी जहाज कामगाटामारू भाड्याने घेतलं.

हाँगकाँग, शांघाय आणि योकोहामा असा थांबा घेत जहाज 23 मे 1914 रोजी व्हँकुव्हरला पोहोचलं.

या जहाजावर 376 प्रवासी होते, ज्यात बहुसंख्य शीख होते. या जहाजातील प्रवाशांना जमिनीवर उतरू दिलं नाही आणि दोन महिन्यांनंतर 23 जुलै 1914 रोजी हे जहाज परत पाठविण्यात आलं.

जहाज कलकत्त्याच्या बजाज घाटावर परतलं. पण तोपर्यंत कॅनडा पहिल्या महायुद्धात सामील झाला होता.

कलकत्त्यात आल्यावर ब्रिटिश सरकारने प्रवाशांवर ब्रिटिश सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप ठेवला.

जहाजातील अनेक लोकांना अटक करण्यात आली आणि वर्षानुवर्षे तुरुंगात त्यांचा छळ करण्यात आला. यातल्या 20 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण ब्रिटिश सरकारने केलेल्या गोळीबारात जखमी झाले.

या सर्व घटना भारतीयांचे (शिखांचे) कॅनडात स्थलांतर थांबवण्यासाठी पुरेशा प्रभावी ठरल्या आणि कॅनडातील शिखांची संख्या कमी झाली.

बिकेमिंग कॅनेडियन्स या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार 1915 मध्ये एक शीख व्यकी कॅनडामध्ये आला होता. पण त्यानंतर 1919 पर्यंत कॅनडात स्थलांतरित झालेल्या शिखांची संख्या शून्यवर होती.

सरजित सिंग जगपाल लिहितात, "कॅनडात पूर्वीपासून राहणारे अनेक शीख हा विचार करून भारतात परतले की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय कॅनडातील त्यांची स्थिती सुधारू शकत नाही."

"काही शीख चांगल्या जीवनाच्या शोधात अमेरिकेत स्थलांतरित झाले. कॅनडातील जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक शीखांना आपले प्राण गमवावे लागले."

पुढील लाटेत शीख महिलांचे कॅनडामध्ये आगमन

आधीच्या दशकभरातील त्रासानंतर कॅनडात शीखांसाठी पुन्हा उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण झाली आहे.

1918 मध्ये, पहिल्या महायुद्धात कॅनडाला दिलेल्या सेवेमुळे भारतीयांवरील स्थलांतर निर्बंध उठवण्याचा दबाव कॅनडावर होता.

1919 मध्ये कॅनडाने आपली स्थलांतर धोरण बदलली आणि तिथे राहणाऱ्या शिखांना त्यांच्या बायका-मुलांना सुद्धा सोबत आणण्याची परवानगी दिली.

1920 च्या दशकात शीख महिला कॅनडामध्ये येऊ लागल्या.

सरजित सिंग जगपाल यांच्या पुस्तकातील आकडेवारीनुसार, 1920 मध्ये 10 शीख कॅनडामध्ये स्थलांतरित झाले. त्यात महिला आणि लहान मुलेही होती.

या पुस्तकातील माहितीनुसार आणि कॅनडाच्या शीख हेरिटेज म्युझियमच्या वेबसाइटनुसार, हरदयाल सिंग अटवाल हे कॅनडाच्या भूमीवर जन्मलेले पहिले शीख आहेत.

त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1912 रोजी ब्रिटिश कोलंबियातील व्हँकुव्हर इथे झाला.

त्यांचे वडील बलवंत सिंग तिथल्या गुरुद्वारा साहिबचे पाथी होते आणि त्यांच्या आईचं नाव कर्तार कौर होतं. कॅनडाच्या शीख हेरिटेज म्युझियमने त्यांचे जन्म प्रमाणपत्र शेअर केले आहे.

जर 1920 च्या दशकात शीख महिला कॅनडात आल्या तर मग कर्तार कौर 1912 मध्ये व्हँकुव्हरला कशा पोहोचल्या हे स्पष्ट होत नाही.

‘बिकमिंग कॅनेडियन’ या पुस्तकातील आकडेवारीनुसार, 1920 ते 1946 पर्यंत काही शीख कॅनडात गेले. दरम्यान 1930 मध्ये त्यांचा आकडा 80 इतका होता. 1942 ते 1944 पर्यंत कॅनडामध्ये स्थलांतरित झालेल्या शीखांची संख्या शून्य आहे.

भारताचे स्वातंत्र्य आणि कॅनडातील शीखांना 40 वर्षांपूर्वी त्यांचे हक्क मिळाले

चाळीस वर्षांपूर्वी म्हणजेच 1907 मध्ये मतदानापासून वंचित राहिलेल्या शिखांना कॅनडामध्ये मतदानाचा अधिकार मिळाला.

सोहन सिंग पूनी नमूद करतात की, एप्रिल 1947 मध्ये शीख आणि इतर भारतीयांना मतदानाचा अधिकार देणारे नियम बदलले गेले.

त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये शिखांना नगरपरिषदेत मतदानाचा अधिकार मिळाला. त्याच वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

या वर्षापासून तिथे राहणारे शीख देखील शेवटी कॅनेडियन झाले. यानंतर शिखांनी तिथल्या राजकारणातही भाग घ्यायला सुरुवात केली. 1947 मध्ये 130 शीख कॅनडामध्ये स्थलांतरित झाले, ही गेल्या चाळीस वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे.

तरीही, बहुतेक शिखांनी कॅनडामध्ये स्थलांतर करण्याचं कारण होतं रोजगार आणि चांगलं आयुष्य.

त्या वर्षी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. ते देखील एक कारण होतं. प्रभावित पंजाबमध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे स्थलांतर करणं योग्य राहील असं काही शिखांना वाटलं, त्यांनी कॅनडाकडे एक चांगला पर्याय म्हणून बघितलं.

कॅलगरी विद्यापीठातील धर्म विभागात शिकवणारे हरजित सिंग गरेवाल यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील एका लेखात म्हटलंय की, त्या काळात शीख अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये गेले असले, तरीही त्यांच्यापैकी मोठ्या संख्येने शीख कॅनडामध्ये स्थायिक झाले.

शिखांना नागरिकत्व आणि मतदानाचा अधिकार मिळाल्यावर शिखांनीही तिथल्या राजकारणात भाग घेण्यास सुरुवात केली.1950 मध्ये पहिल्यांदाच निरंजन सिंग गरेवाल ब्रिटिश कोलंबियाच्या नगर परिषदेवर निवडून आले.

स्थलांतर धोरणांमध्ये बदल आणि कॅनडामध्ये स्थलांतराची आणखी एक लाट

स्थलांतर धोरणांमध्ये बदल आणि कॅनडामध्ये स्थलांतराची आणखी एक लाट

1947 मध्ये कॅनडात शिखांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी अजूनही भेदभाव सुरूच होता.

भारतातील स्थलांतरितांना कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी किंवा बायका- मुलांना घेऊन येण्यासाठी आणखीन पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागायची. युरोपीय लोक इथे आल्याबरोबर नागरिकत्वासाठी अर्ज करू शकायचे.

शिखांनी भेदभावाविरुद्ध लढा सुरूच ठेवला. 1962 मध्ये, स्थलांतर कोटा पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात आली आणि 1967 मध्ये कॅनडाने नवीन स्थलांतर धोरण लागू केलं.

1964-1971 या काळात मोठ्या संख्येने शिखांनी कॅनडात स्थलांतर केलं. बिकमिंग कॅनेडियन या पुस्तकातील आकडेवारीनुसार, 1964 मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झालेल्या शीखांची संख्या होती, 1,154.

1969, 1970 आणि 1971 मध्ये कॅनडामध्ये येणाऱ्या शिखांची संख्या पाच हजारांहून अधिक होती.

सोहन सिंग पूनी सांगतात की, तोपर्यंत कॅनडात येण्यासाठी व्हिसाची गरज नव्हती.

एखाद्याला कॅनडाला भेट देण्यासाठी यायचं असेल तर तिथे राहण्यासाठी अर्ज करावा लागायचा. हा नियम बदलण्यापूर्वी सोहन सिंगही 1972 मध्ये कॅनडात आले होते.

सोहन सिंग पूनी सांगतात की, त्यानंतर दोआबमधील लोक कॅनडा आणि इतर देशात जाऊ लागले.

"स्थलांतराचं मुख्य कारण होतं, चांगला रोजगार. त्यावेळी लोक बाहेरच्या कमाईतून आपल्या मूळ गावात मोठी घरे बांधू लागले.'

सोहन सिंग पूनी सांगतात, "मी लहान असताना एका अनिवासी भारतीयाचं घर पाहिलं होतं. त्यावेळी मला वाटलं होतं की मीही कॅनडाला गेलो तर आपल्या घरची गरिबीही दूर होईल. मी ज्यासाठी कॅनडाला आलो, त्या परदेशी कमाईच्या प्रभावाने इतरही अनेकांना कॅनडाला यायचं असायचं."

पंजाबमधील दहशतवादाचा कॅनडामधील स्थलांतरावर परिणाम

पंजाबमध्ये 1980 ते 1992 दरम्यान दहशतवादाचा काळ होता. यावेळी पुन्हा एकदा पंजाबी शिखांची परदेशात जाण्याची संख्या वाढत होती. तत्कालीन परिस्थितीचा हा परिणाम होता.

डॉ. तेजिंदर कौर म्हणतात, "काही लोक कायदेशीर मार्गाने गेले, तर काहींनी अवैध मार्गाने प्रवेश मिळवला. पंजाबमधील वातावरण बिघडल्यामुळे काही लोकांनी हे मार्ग स्वीकारले".

"त्यावेळी, इतर अनेक देशांव्यतिरिक्त, कॅनडा देश शिखांनी त्यांच्या स्थलांतरासाठी निवडला. वातावरण दूषित झाल्याने पालक त्यांच्या तरुण मुलांना पंजाबबाहेर सुरक्षित मानत होते. हे तत्कालीन स्थलांतराचं मुख्य कारण होतं"

डॉ तेजिंदर सांगतात की, पंजाब मधील दहशतवादाच्या काळातही कॅनडाला गेलेल्या अनेकांना परिस्थिती सुधारल्यानंतर परत येण्याची अपेक्षा होती. काही जण त्याच विचाराने गेले होते.

पण काही वर्षे परदेशात राहिल्यानंतर त्यांना परत जाण्याचा पर्याय दुय्यम वाटू लागला त्यामुळे बहुतेक लोक तिथेच स्थायिक झाले.

जमीन खरेदी करण्यापासून जमीन विकण्यापर्यंत

यानंतर 2000 सालापासून कॅनडामध्ये शिखांच्या स्थलांतराचा नवीन अंक सुरू झाला.

गेल्या वीस वर्षांत कॅनडामधील शिखांची संख्या दुप्पट झाली आहे. तेजिंदर कौर सांगतात की, कॅनडाला जाण्यासाठी IELTS ची परीक्षा देणारे विद्यार्थी, स्थलांतराबाबतची नवीन धोरणं यांमुळे आता एका वेगळ्या पिढीचं स्थलांतर सुरू आहे.

डॉ. तेजिंदर सांगतात, “एकेकाळी लोक इथे पैसा कमवायला यायचे. इथे स्थिर होऊन आपल्या मालकीची जमीन घेण्याचा प्रयत्न करायचे. आता चित्र उलटं आहे. आता लोक आपली नोकरी सोडून, जमीन विकून इथे येत आहेत. सध्या रोजगाराच्या संधीपेक्षाही जास्त स्थलांतर होताना दिसतंय.”

IELTS नंतर मुलींचं स्थलांतर करण्याचं प्रमाण वाढल्याचं निरीक्षणही डॉ. तेजिंदर नोंदवतात.

याआधी बहुतांश पुरुष स्थलांतर करायचे आणि नंतर त्यांच्या बायकांना घेऊन जायचे किंवा कधीकधी बायका भारतातच असायच्या.

आता मात्र अनेक मुली स्टुडंट व्हिसावर इथे येतात, लग्न करतात आणि आपल्या नवऱ्यांनाही सोबत घेऊन येतात.

डॉ. तेजिंदर सांगतात की, “दरम्यानच्या काळात आपली सामाजिक व्यवस्थाही खूप बदलली आहे. जातीव्यवस्था, आर्थिक परिस्थिती यांचा आता कॅनडा किंवा इतर कोणत्याही देशात स्थलांतर करण्याच्या आकांक्षेशी संबंध राहिला नाही.”

“आपल्या देशातली अतिशय ताठर अशी जाती व्यवस्था काही प्रमाणात लवचिक झाली आहे. शिवाय पंजाबमध्ये जर मुलगी IELTSची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि ती गरीब घरातील असेल, तर मुलाकडचे तिच्या शिक्षणाचा खर्च उचलायला तयार होतात. जेणेकरून तिच्यासोबत आपला मुलगाही परदेशी जाऊ शकेल.”

अर्थात, हे 2000 च्या आधी व्हायचं. आता ही परिस्थिती नाहीये हेही तेजिंदर नमूद करतात. शिवाय पूर्वी घरातला कर्ता पुरूष बाहेर पडायचा आणि मग आपल्या मुलाबाळांना बोलावून घ्यायचा. आता मात्र मुलं परदेशात जातात आणि आपल्या आईवडीलांना बोलावून घेतात.

स्टुडन्ट व्हिसाबद्दलची कॅनडाची उदार धोरणं ही पंजाबमधील सध्याच्या स्थलांतरेच्या लाटेवर थेट परिणाम करत आहेत. इथले शिख तरुण विद्यार्थी म्हणून जात असले, तरी त्यांचा उद्देश हा तिथे स्थायिक होण्याचा आहे.

कॅनडामध्ये सध्या शिखांना असलेलं महत्त्व

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कॅनडामधील शिखांना अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागलं आहे.

वांशिक द्वेषापासून स्वतःची धार्मिक ओळख जपण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी त्यांनी लढा दिला.

आता कॅनडामध्ये प्रत्येक क्षेत्रात शीख समुदाय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अगदी कॅनडा सरकारमधील मंत्रिमंडळातही शीख आहेत. तिथे शीख खासदारसही आहेत.

2015 साली तर कॅनडामध्ये चार कॅबिनेट मंत्री हे शीख होते. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं होतं.

2021 या वर्षातील आकडेवारीनुसार कॅनडामधील शिखांची लोकसंख्या ही 7.71 लाख इतकी आहे. कॅनडामध्ये जन्म झाल्यामुळे तीस टक्के शिखांना इथलं नागरिकत्व मिळालं आहे.

कॅनडाच्या एकूण लोकसंख्येत शीख समुदायाची टक्केवारी 2.1 इतकी आहे. त्यामुळेच इथल्या राजकीय व्यवस्थेत शिखांना महत्त्व आहे.

पंजाबी ही कॅनडामधली तिसरी सर्वाधिक लोकप्रिय भाषा आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)