गृहमंत्री अमित शाह यांनी बीबीसी डॉक्युमेंट्री, अदानींबाबत काय भाष्य केले?

अमित शहा, बीबीसी डॉक्युमेंट्री

फोटो स्रोत, SOPA IMAGES

फोटो कॅप्शन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी हिंडनबर्ग-अदानी प्रकरण, बीबीसी डॉक्युमेंट्री या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

गौतम अदानी यांच्याबाबत भाजपकडे लपवण्यासारखं काहीच नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. याप्रकरणी कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली. अदानी उद्योगसमूह आणि हिंडनबर्ग अहवालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली आहे. कॅबिनेट सदस्य या नात्याने न्यायप्रविष्ट अशा मुद्यावर मी बोलणं उचित नाही.

गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी आणि त्यांचा उद्योगसमूह चर्चेत आहे.

अमेरिकास्थित संशोधन संस्था हिंडनबर्गने अदानी उद्योगसमूहाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अदानी समूहाने हिंडनबर्ग अहवालात करण्यात आलेले आरोप फेटाळले होते.

हिंडनबर्ग अहवाल प्रकाशित झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली. शेअरधारकांना याचा मोठा फटका बसला.

अमित शहा, बीबीसी डॉक्युमेंट्री

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

हिंडनबर्ग अहवाल आला तेव्हा अदानी आशियातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव तिसरं होतं. पण कंपनीला झालेल्या नुकसानामुळे ते दोन्ही यादीत पिछाडीवर गेले आहेत.

या मुद्यावरुन संसदेच्या सत्रातही मोठा गोंधळ पाहायला मिळाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्यावर भाष्य केलं नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समूह यांच्यातील घनिष्ठ संबंधांवरून जोरदार घोषणाबाजी झाली.

लोकसभेत राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग वगळण्याबाबतही अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिलं.

संसदेचं कामकाज नियमांच्या अधीन राहून करावं लागतं. संसदीय भाषेचाच उपयोग करुन बोलावं लागतं. संसदेचं कामकाज एक्सपंज वाक्यांनी भरून गेलं आहे असं शहा म्हणाले.

भाषणात अदानी आणि अंबानी यांचा उल्लेख केल्यामुळेच भाषणाचा काही भाग वगळण्यात आला असा आरोप खुद्द राहुल गांधी आणि काँग्रेसने केला आहे.

अमित शहा, बीबीसी डॉक्युमेंट्री
फोटो कॅप्शन, काँग्रेस नेते राहुल गांधी

यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्याचं राहुल गांधींनी सांगितलं पण यावर कोणताही कार्यवाही होईल असं वाटत नाही असंही ते म्हणाले.

लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानीसंदर्भात पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान त्याचा उल्लेख केला नाही.

मुलाखतीदरम्यान अमित शाह यांनी 2014 लोकसभा निवडणुकांचा उल्लेख केला.

"2024 निवडणुकीत कोणतीच स्पर्धा नसेल. देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात वाटचाल करतो आहे. देशातल्या जनतेला ठरवायचं आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने विरोधी पक्ष म्हणूनच कोणाचीच निवड केली नव्हती.

जी-20चं यजमानपद भारताला मिळण्याबाबत ते म्हणाले, प्रॉडक्ट चांगलं असेल तर गाजावाजा करत त्याचं विपणन करायलाच हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम जगासमोर गौरवास्पद पद्धतीने मांडायला हवं. हा देशाचा गौरव आहे. मोदीजींच्या कार्यकाळात भारताला जी20चं नेतृत्व मिळालं आणि आपण त्याचं यशस्वीपणे आयोजन केलं तर त्याचं श्रेय मोदींना मिळायलाच हवं. का मिळू नये"? असा सवालही शहा यांनी केला.

'2002 पासून मोदींना केलं जातंय लक्ष्य'

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या मुद्यावरुन शहा यांनी काँग्रेसला घेरलं. भाजपने योग्य पद्धतीने या संघटनेवर बंदी घातल्याचं त्यांनी सांगितलं.

"पीएफआय केडरबाबत अनेक मुद्दे होते. ते संपवण्याचं काम काँग्रेसने केलं ज्याला न्यायालयाने रोखलं. आम्ही संघटनेवर बंदी घातली. पीएफआय देशात धर्मांधता आणि कट्टरतावाद वाढवणारी संघटना होती. दहशतवादीसाठी बैठक तयार करण्याचं काम ही संघटना एकप्रकारे करत होती असं शहा म्हणाले.

अमित शहा, बीबीसी डॉक्युमेंट्री

फोटो स्रोत, PFI

फोटो कॅप्शन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी पीएफआयवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

पीएफआयचे दहशतवादी संघटना जमात-उल- मुजाहिद्दीन बांगलादेश आणि प्रतिबंधित सिमी संघटनेशी संबंध असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं होतं. देशातल्या अंतर्गत सुरक्षेला पीआयएफमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे असंही केंद्र सरकारने म्हटलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेल्या माहितपटाबाबतही शहा यांना विचारण्यात आलं. हिंडनबर्ग अहवालाप्रमाणे बीबीसीची डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली आहे. हा कुठल्या स्वरुपाचा कट असल्याचं तुम्हाला वाटतं का?

यावर शाह म्हणाले, "सत्य हे सत्य असतं. त्याच्यावर कितीही आणि कसलेही थर रचा, त्याने काहीही होत नाही. सूर्याच्या प्रखर तळपत्या किरणांप्रमाणे सत्य तावून सुलाखून बाहेर पडतं. मोदी 2002 पासून हेच करत आहेत. दरवेळी मोदी आणखी मजबूत, सच्चे आणि जनतेच्या मनातील लोकप्रिय कमावणारे नेतृत्व म्हणून तावून सुलाखून बाहेर पडतात".

अमित शहा, बीबीसी डॉक्युमेंट्री

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

फोटो कॅप्शन, मुघल गार्डन आता अमृत उद्यान म्हणून ओळखलं जातं.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं नाव अमृत उद्यान करण्याबाबतही अमित शाह यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, "मुघलांचं योगदान हटवण्यात येऊ नये. आम्हालाही ते हटवायचं नाहीये. पण एखादा देश परंपरा स्थापित करू पाहत असेल तर त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही.

असं एक शहर नाही ज्याचं जुनं नाव नाही आणि ते बदलण्यात आलं. यासंदर्भात आम्ही सारासार विचार करुनच निर्णय घेतो. प्रत्येक सरकारचा तो न्याय अधिकार आहे".

बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

"छत्तीसगढमध्ये शांततेच वातावरण प्रस्थापित होईल असा विश्वास वाटतो. जम्मू काश्मीरमध्येही दहशतवादाशी संबंधित आकडे सुधारले आहेत".

मोदी सरकारचा पूर्वोत्तर राज्यांबाबतच्या धोरणाबाबत शहा म्हणाले, "ईशान्येकडची राज्यं आणि अन्य देश यातलं अंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुष्टात आणलं आहे.

ईशान्यकडील लोकांना आता भारताचा भाग असल्यासारखं हक्काने वाटतं. बाकी राज्यातले लोक ईशान्येकडच्या राज्यात जातात तेव्हा त्यांनाही तिथे आदर सन्मानच मिळतो".

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)