साप मेल्यानंतरही चावू शकतो का? मृत साप चावल्यास त्याचं विष जीवघेणं ठरतं का?

फोटो स्रोत, Thilina Kaluthotage/NurPhoto via Getty Images
- Author, के. शुभगुणम
- Role, बीबीसी तमिळ
ईशान्य भारतातील आसाम राज्यात 2022 आणि 2023 मध्ये 3 विचित्र घटना घडल्या. या तिन्ही घटनांमध्ये सापांनी मृत्यूनंतर काही तासांनंतर माणसाला चावा घेतला.
या घटनांमधील सापांच्या प्रजाती मोनोकल्ड कोब्रा आणि ब्लॅक क्रेट या होत्या. हे दोन्ही भारतात आढळणारे अतिशय धोकादायक साप आहेत.
त्यामुळं खरंच मृत साप माणसाला चावू शकतात का? आणि चावल्यावर त्याच्या विषाचा परिणाम होतो का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
याबाबत झालेल्या अभ्यासांचा विचार करता, असं होणं शक्य आहे. साप मेल्यानंतरही काही तास त्याची 'विष प्रणाली' सक्रिय राहू शकते आणि परिणामी तो चावला तर त्याच्या विषाचा परिणाम होऊ शकतो.
आता याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊयात.
पहिली घटना : कोब्राच्या तुटलेल्या डोक्यानं घेतला चावा
ही घटना आसामच्या शिवसागर जिल्ह्यातली आहे. त्याठिकाणी एका 45 वर्षीय व्यक्तीनं त्याच्या कोंबड्यांवर हल्ला करणारा साप पाहिला आणि त्याला मारलं. त्यात सापाचं डोकं शरिरापासून वेगळं झालं.
नंतर त्यांनी जेव्हा ते उचलून फेकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सापाच्या तुटलेल्या डोक्यानं या व्यक्तीच्या अंगठ्याला चावा घेतला.
त्यामुळे त्या व्यक्तीचा अंगठा काळा पडला, त्यांना तीव्र वेदना झाल्या आणि त्या खांद्यापर्यंत पोहोचल्या.
नंतर या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं प्रतिविष (अँटी-वेनम) देण्यात आलं. त्यामुळे ते वाचले आणि पूर्णपणे बरे झाले.
दुसरी घटना : ट्रॅक्टरखाली चिरडलेला कोब्रा चावला
आसाममधल्या याच भागात दुसरी घटना घडली. एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन कोब्रा चिरडला गेला.
काही तासांनी जेव्हा शेतकरी ट्रॅक्टरवरून खाली उतरले तेव्हा कोब्रा त्यांच्या पायावर चावला.
चावलेल्या जागी सूज आली आणि त्यांना उलट्या सुरू झाल्या.
25 दिवस उपचार सुरू होते. त्याला प्रतिविष (अँटी-वेनम) आणि अँटीबॉडी औषधं देण्यात आली. अखेर तो शेतकरी बरा झाला.
तिसरी घटना: ब्लॅक क्रेट 3 तासांनी चावला
ही घटना आसामच्या कामरूप जिल्ह्यातली आहे. इथं संध्याकाळी साडेसहा वाजता काही लोकांनी ब्लॅक क्रेट सापाला मारून घरामागे फेकून दिलं.
3 तासांनी म्हणजे साडेनऊ वाजता एका व्यक्तीनं उत्सुकतेपोटी तो मृत साप उचलला आणि हातात घेतला. तेव्हा सापाने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर चावा घेतला.
सुरुवातीला कुटुंबानं दुर्लक्ष केलं. कारण चावलेल्या जागी वेदना किंवा सूज नव्हती. त्यांना वाटलं साप मेला आहे.
मात्र, रात्री 2 वाजता त्या व्यक्तीवर 'न्यूरोटॉक्सिन'चा म्हणजेच नसांवर परिणाम करणाऱ्या विषाचा परिणाम दिसू लागला. त्याच्यात घबराट, अंगदुखी, शरीर सुन्न होणं अशी लक्षणं दिसली. यानंतर लगेच त्याला रुग्णालयात नेलं.
तो व्यक्ती वाचला, पण त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी 6 दिवस लागले.
मृत साप कसा चावू शकतो?
या तिन्ही घटनांवर विश्वास बसणं कठीण आहे, पण तज्ज्ञ सांगतात की अशा घटना घडण्याचा धोका खरा आहे.
या घटनांचा अभ्यास करून 'फ्रंटियर्स इन ट्रॉपिकल डिसिजेस'मध्ये संशोधन प्रसिद्ध झालं आहे. त्यात म्हटलं आहे की, साप मेल्यानंतर किंवा त्याचं डोकं कापल्यानंतरही काही तास साप चावण्याची शक्यता राहते.
संशोधनानुसार काही साप मृत्यूनंतर 3 तासांपर्यंत चावू शकतात. कारण त्यांची विष प्रणाली काही काळ सक्रिय राहते.

फोटो स्रोत, Rishikesh Choudhary/Hindustan Times via Getty Images
युनिव्हर्सल स्नेकबाइट एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. एन.एस. मनोज सांगतात की, विषारी दात असलेल्या (फ्रंट-फॅंग्ड) प्रजातींमध्ये हा धोका जास्त असतो. उदा. एलॅपिडे, वायपेरिडे आणि अॅट्रॅक्टास्पिडिडे.
'फ्रंटियर्स इन ट्रॉपिकल डिसिजेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात म्हटलं आहे, "सापाचं विष माणसाच्या लाळेसारखं असतं. विष ग्रंथी सापाच्या दातांशी जोडलेल्या असतात आणि सिरिंजसारखं काम करतात. जेव्हा साप चावतो तेव्हा विष ग्रंथींमधून दातात येतं आणि तिथून माणसाच्या शरीरात जातं.
आसाममधील एका प्रकरणात सापाचं छाटलेलं डोकं पकडताना नजरचुकीनं त्याची ही ग्रंथी दाबली गेल्यानं विष बाहेर येऊ लागलं होतं.
सापांबाबत या घटना होण्याचा धोका अधिक आहे असा इशारा देताना डॉक्टर मनोज यामागील वैज्ञानिक कारणंही सांगतात.
काय आहेत वैज्ञानिक कारणं?
डॉ. मनोज सांगतात, "मृत्यूनंतर सापाची 'नर्वस सिस्टीम' लगेच बंद होत नाही. शरिरातील भाग हळूहळू निकामी होतात. काही दुर्मिळ वेळा मृत्यूनंतरही 'रिफ्लेक्स' क्रिया होऊन चावलं जाणं शक्य आहे."

याशिवाय, संशोधनात 'फॉल्स बाईट्स'चाही उल्लेख आहे. म्हणजे साप फक्त इशारा देण्यासाठी चावतो, पण विष इंजेक्ट करत नाही.
मात्र, मृत सापामध्ये हे नियंत्रण संपते. त्यामुळे साप मेल्यानंतर त्याचे दात कुणाला लागले, तर विष अनियंत्रितपणे शरीरात शिरू शकतं.
कोणते साप मृत्यूनंतरही चावू शकतात?
डॉ. मनोज म्हणतात की, रॅटलस्नेकमध्ये (एक प्रकारचा व्हायपर साप) अशाप्रकारच्या घटना दिसून आल्या आहेत. ही अमेरिकेत सर्वात जास्त आढळणारी सापांची एक प्रजाती आहे. हे साप अत्यंत विषारी मानले जातात.
कर्नाटकातील 'कलिंगा फाउंडेशन'चे रिसर्च डायरेक्टर डॉ. एस.आर. गणेश यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील ब्राऊन स्नेक्स आणि चीनमधील कोब्रा प्रजातीच्या सापांनी अशाप्रकारे चावा घेतल्याच्या घटनांच्या नोंदी झाल्या आहेत.
भारतात आढळणाऱ्या सापांमध्ये अशा प्रकारचा सर्वाधिक धोका रसेल वायपर, सॉ-स्केल्ड वायपर, बांबू पिट वायपर, मालाबार पिट वायपर, कोरल स्नेक आणि बँडेड पिट वायपर या प्रजातींमुळे असतो.
"दिसायला निरुपद्रवी भासणारे कंडा कंडाई आणि नीरकोलीसारखे पाण्यातील सापही अशाप्रकारे चावू शकतात," असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. मनोज म्हणतात की, सापाला बेजबाबदारपणे हाताळणं चुकीचं आहे. साप मेलेला आहे असं दिसलं, तरी त्याला हात लावू नये.
ते म्हणाले, "खूप लोक मृत साप उचलून पाहण्याचा, त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. हे धोकादायक आहे. माणूस मरण्याची व्याख्या वैद्यकीय शास्त्रात आहे. तशी व्याख्या साप आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी नसते.
आपण गृहित धरतो की, साप चिरडला गेला, त्याचं डोकं कापलं गेलं किंवा तो बराच वेळ हलत नसेल, तर तो मेला आहे. मात्र, ते चुकीचं ठरू शकतं."
"तुम्ही साप जिवंत बघा वा मृत, सर्वोत्तम उपाय म्हणजे याबाबत तज्ज्ञांना कळवणं आणि योग्य ती पावलं उचलणं," असंही ते नमूद करतात.
याशिवाय, तामिळनाडूच्या काही भागांमध्ये अशी अंधश्रद्धा आहे की, मृत हिरव्या सापाला स्पर्श केल्यास व्यक्ती चांगला स्वयंपाकी बनतो.
तज्ज्ञ सांगतात की, यात अंधश्रद्धेचा मोठा वाटा आहे.
या संदर्भात डॉ. मनोज इशारा देतात, "क्रेट आणि हिरवे साप यांच्यासह अनेक विषारी आणि अगदी विषरहित सापसुद्धा रागावल्यावर चावतात. मृत्यूनंतरही त्यांच्या चावण्याचा धोका राहतो. म्हणून अंधश्रद्धेच्या आधारावर असे काही करणे टाळावे."
डॉ. एस. आर. गणेश यांचं म्हणणं आहे की, साप मेल्यानंतर किती वेळापर्यंत त्याचं विष प्रभावी राहतं आणि किती वेळापर्यंत त्याच्या चावण्यामुळे धोका संभवतो, यावर कोणताही सविस्तर अभ्यास झालेला नाही.
डॉ. मनोज याही मताशी सहमत आहेत. ते सांगतात, "भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदे अत्यंत कठोर आहेत. त्यामुळे साप मारून त्यावर असा अभ्यास करणे शक्य नाही. म्हणूनच आसाममध्ये झालेल्या घटनांच्या आधारे अभ्यास केला जातो."
आसाममध्ये झालेल्या घटनांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होतं की, लोकांमध्ये साप चावण्याबाबत जागरुकता वाढवणं आवश्यक आहे आणि या विषयावर अजून सखोल संशोधन होणंही तितकंच गरजेचं आहे.
जे सापांना निष्काळजीपणे किंवा सुरक्षेविना पकडतात वा हाताळतात त्यांना हे संशोधन सावध करतं.











