इस्रायल-हमास युद्ध थांबल्यामुळं गाझाला फायदा झाला आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पीटर आर न्यूमन
- Role, किंग्ज कॉलेज, लंडनचे प्राध्यापक
इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला युद्धविराम आता संपला आहे.
हमासने हा कालावधी वाढवून देण्याची मागणी केलेली असली तरी इस्रायलने मात्र याबाबत अजूनही कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
इस्रायलमध्ये बंदिस्त असलेल्या 39 पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमासने शुक्रवारी (24 नोव्हेंबर) 24 ओलिसांची सुटका केली, त्यापैकी 13 इस्रायली नागरिक होते.
शनिवारीही (25 नोव्हेंबर) हमासने पकडलेल्या 13 इस्रायली ओलिसांची 39 पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात सुटका करण्यात आली. याशिवाय चार थायलंडच्या नागरिकांनाही सोडण्यात आलं आहे.
या करारानुसार, या चार दिवसांच्या युद्धबंदीदरम्यान, मदत साहित्य घेऊन दररोज दोनशे ट्रक यासोबतच चार इंधनाचे ट्रक आणि इतर चार ट्रक गाझामध्ये दाखल होणार आहेत.
या कालावधीत, दोन्ही बाजू उत्तर आणि दक्षिण गाझामध्ये कोणतीही कारवाई करणार नाहीत आणि इस्रायल गाझावर पाळत ठेवणारे ड्रोन देखील उडवणार नाही असं ठरवलं आहे.
मात्र हमासने असा आरोप केला आहे की, अजूनही इस्रायलने 97 ट्रक अडवले आहेत.
हे सगळे ट्रक उत्तर गाझामध्ये मदत घेऊन जात होते, तर दक्षिण गाझावर टेहळणी करण्यासाठी इस्रायलने ड्रोन वापरल्याचा आरोपही हमासने केलाय.
हा युद्धविराम हमाससाठी देखील फायद्याचा आहे.
यामुळे हमासला अनेक आठवडे चाललेल्या भीषण युद्धातून सावरण्यास मदत होईल कारण या काळात इस्रायलच्या हल्ल्यामुळे हमासची नाकेबंदी झालेली होती आणि त्यांना खूप नुकसान सहन करावं लागलेलं होतं.

फोटो स्रोत, HOSTAGES AND MISSING FAMILIES FORUM
हमास या वेळेचा उपयोग आपल्या संघटनेची साखळी पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी आणि आपल्या सैनिकांना नवीन जागांवर तैनात करून इस्रायली सैन्याचं जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी करेल यात शंका नाही.
विशेष म्हणजे हे युद्ध काही दिवसांसाठी थांबवल्यामुळे उर्वरित ओलीसांना एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी हमासला वेळ मिळणार आहे जेणेकरून इस्रायल त्यांचा ठावठिकाणा शोधू शकणार नाही किंवा त्यांच्यासाठी ते अधिक कठीण होईल.
थोडक्यात काय, तर या युद्धवीरमातून स्पष्टपणे कोणतेही फायदे हमासला मिळत नसले तरी, ओलिसांच्या सुटकेचा करार हा हमाससाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक आणि रणनीतिक फायद्याचा आहे.
ज्या लोकांची हमासने सुटका केलीय त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब असली तरी अजूनही हमासच्या ताब्यात असलेल्यांच्या सुटकेची प्रक्रिया यामुळे अधिक खर्चिक आणि अवघड होणार आहे.
ओलिसांच्या सुटकेचा हमासला फायदा?
या तात्पुरत्या युद्धबंदीमुळे दोन्ही पक्षांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण यामुळे सगळ्याच ओलिसांचा प्रश्न सुटेल असं दिसत नाही.
याचा हमासला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.
या चार दिवसांत हमासने ओलिस ठेवलेल्या डझनभर वृद्ध, महिला आणि मुलांची सुटका ही इस्रायलींसाठी मोठा दिलासा देणारी बाब आहे.
याचा अर्थ असा आहे की हमासकडे आता 150 हून अधिक लोक ओलीस असतील, आधीच्या तुलनेत कमी झालेली ही संख्या खरंतर हमाससाठी अधिक चांगली गोष्ट आहे कारण त्यांना कमी लोकांची व्यवस्था करावी लागेल.

फोटो स्रोत, HOSTAGES AND MISSING FAMILIES FORUM
याआधी हमासकडे अंदाजे 240 लोकांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं. त्यामुळे एवढ्या लोकांना ताब्यात ठेवणे युद्धामुळे कठीण होऊन बसलं होतं.
या ओलीसांची सतत देखरेख आणि आवश्यक असल्यास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं ही सगळी कामं हमासला करावी लागायची. त्यांच्यापैकी काहींना विशेष उपचारांची आवश्यकता असल्यास, ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते.
त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांची सुटका करून हमासने औदार्य दाखवलं आहे असं नाही याउलट हमासला आता कमी लोकांना सांभाळावं लागणार आहे.
विशेषतः थायलंड आणि नेपाळमधील सुमारे दोन डझन मजुरांच्या बाबतीत हे खरं आहे कारण त्यांना ओलीस ठेवणं हे हमाससाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं नाही, कारण ते इस्त्रायली किंवा ज्यू नाहीयेत.
आणखी एक कारण म्हणजे उरलेल्या लोकांना ताब्यात ठेवण्यासाठी त्यांच्याकडे आता आणखीन एक सोपं कारण असणार आहे.
उरलेल्यांमध्ये बहुतांश इस्रायली सैनिक आहेत किंवा तरुण आहेत त्यामुळे त्यांना हमास युद्धबंदी असल्याचं घोषित करू शकतं आणि वाटाघाटींमध्ये अधिकाधिक पॅलेस्टाईनच्या लोकांना सोडण्याची मागणी करू शकतं.
याआधीही केवळ काही इस्रायली सैनिकांच्या बदल्यात इस्रायलने शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याचं कबूल केलं होतं. एकदा तर हजारो कैद्यांची सुटकाही इस्रायलने केली होती.
गाझामध्ये नेमकी किती मदत पोहोचली आहे?
बीबीसीचे पत्रकार योलांडे नेल यांच्या म्हणण्यानुसार, इजिप्तच्या रफाह क्रॉसिंगवरून गाझाला मदत पुरवठा करण्यासाठी ट्रक आणि मोठ्या गाड्यांच्या रांगा त्यादिवशी पहाटेपासूनच लागल्या होत्या.
इस्रायलने डिझेलचे चार टँकर आणि एलपीजी गॅसने भरलेले चार ट्रक आणि काही मदतीचं सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकना गाझात जाण्याची परवानगी दिलेली आहे.
इस्रायली संरक्षण दलाचं असं म्हणणं आहे की, मदत सामग्रीने भरलेले सुमारे 200 ट्रक शनिवारी गाझामध्ये दाखल होण्याची अपेक्षा होती.

फोटो स्रोत, BBC SPORT
शुक्रवारी, संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं होतं की युद्ध सुरू झाल्यानंतर म्हणजेच 21 ऑक्टोबरनंतर गाझाला मिळालेली ही सगळ्यात मोठी मदत होती.
युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी(UNRWA) चे प्रवक्ते ज्युलिएट टॉमा यांच्या मते, गाझाला सर्व प्रकारच्या मदतीची नितांत गरज आहे.
त्यांच्या मते, “आवश्यक वैद्यकीय साहित्य, रेशन, औषधे, पिण्याचे पाणी. स्वच्छतेसाठी आवश्यक स्वच्छता किट. हे खूप महत्वाचे आहेत."
गाझामधील बहुतेक निवारे गर्दीने भरलेले आहेत. UNRWA म्हणते की सुमारे दहा लाख विस्थापित लोक शाळा आणि इतर ठिकाणी राहत आहेत.
गाझामधील लोकांनी सांगितले की, युद्ध सुरु झाल्यावर अंगावरील कपड्यानिशी ते घरातून बाहेर पडलॆ होते.
सामान आणि कपडे नसल्यामुळं बहुतेकांना अंघोळ करता येत नाही.
त्यामुळं युद्धविराम सुरू झाल्यापासून, त्यांनी पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांच्या उद्ध्वस्त घरांकडे परत जाताना आणि ढिगाऱ्यात काही मिळतं का ते शोधताना पाहिल्याचं ज्युलिएट यांनी सांगितलं.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








