इस्रायल-हमास युद्धः हमासने सोडले ओलीस ठेवलेले 13 इस्रायली नागरिक

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायली मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हमासने 13 इस्रायली ओलीसांना आज शुक्रवारी (24 नोव्हेंबर) रेड क्रॉसच्या हवाली केले आहे.
या लोकांना सध्या गाझामधून इजिप्तच्या सीमेच्या दिशेने नेले जात आहे. इजिप्तमधून इस्त्रायली सैन्य त्यांना आपल्या हेलिकॉप्टरमधून मायदेशी घेऊन जाईल.
या दरम्यान, इजिप्त आणि गाझाच्या दक्षिण सीमेवर असलेल्या रफाह क्रॉसिंगवर मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून येत होत्या.
दुसरीकडे, इस्रायलमधील अनेक कुटुंबे रुग्णालयाबाहेर पोहोचत आहेत. त्यांच्या नातेवाईकांचीही आज सुटका होईल, अशी आशा या कुटुंबीयांना आहे.

बीबीसीच्या इजिप्तमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओलिसांना रेड क्रॉसकडून आता इजिप्तकडे सोपवण्यात आले आहे.
हमासने या ओलिसांना रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट यांच्याकडे दिले होते. त्यानंतर त्यांना रफाह क्रॉसिंगवर येथून इजिप्तमध्ये आणले.
या ओलिसांना पुढे इस्रायली सैन्य अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं जाईल. त्यानंतर ते त्यांना इजिप्तमधील अरिश विमानतळावर घेऊन जातील आणि तिथून त्यांना हवाई मार्गाने मायदेशी नेण्यात येईल.
थायलंडच्या 12 ओलिसांची सुटका
याआधी थायलंडच्या पंतप्रधानांनी हमासने 12 थायलंडच्या नागरिकांची सुटका केल्याचे सांगितले आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात त्यांनाही गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आले होते.
थायलंडच्या ओलिसांच्या संदर्भात थाई दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना थायलंडमध्ये नेले जाणार आहे. पण ओलिसांना सध्या कुठे ठेवण्यात आले आहे, हे त्यांनी सांगितले नाही.
इस्रायलकडून चार दिवसांची शस्त्रसंधी करण्यात आली आहे. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्याच अटींचे पालन करत हमासने 13 इस्रायली नागरिकांनाही सोडले आहे.

फोटो स्रोत, Reuters
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूआणि संरक्षण मंत्री योव गॅलंट हे ओलीसांच्या सुटकेसाठी झालेल्या कराराच्या पालनाचे बारकाईने मूल्यांकन करत आहेत.
दोन्ही नेते इस्रायलची राजधानी तेल अवीव येथील लष्कराच्या मुख्यालयातील कमांड सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत, असं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.
निवेदनानुसार, "हमासच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या इस्रायलींना इस्रायलमध्ये परत आणण्याच्या ऑपरेशनवर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री बारकाईने लक्ष ठेवत आहेत."
हमास इस्रायलच्या ओलीस नागरिकांची सुटका करणार, बहुप्रतिक्षित करार संपन्न

फोटो स्रोत, Getty Images
हमासने ज्या इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं आहे त्यातील 50 ओलिसांची चार दिवसात सुटका केली जाईल आणि यादरम्यान युद्धविराम असेल, असं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.
इस्रायलच्या कॅबिनेटने या कराराला मंजुरी दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे.
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं,
'इस्रायल सरकार सर्व ओलिसांना माघारी आणण्यास कटिबद्ध आहे. आज सरकारने या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार 50 ओलिसांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. त्यांना चार दिवसात सोडलं जाईल आणि त्यादरम्यान युद्ध थांबवण्यात येईल.
इस्रायल सरकार, लष्कर आणि सुरक्षा सेवेतील लोक सर्व ओलीस घरी येईपर्यंत आणि हमासचा खात्मा करेपर्यंत युद्ध सुरू ठेवणार आहे. गाझापासून इस्रायलला पुढे कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.'
हमासचं निवेदन
हमासने टेलिग्रामवर निवेदन जारी करून सांगितलं की, 'मानवतावादी दृष्टिकोनातून युद्धविरामावर सहमती झाली आहे.'
हमासने कतार आणि इजिप्तचे मध्यस्थी करण्यासाठी आभार मानले आहेत.
अनेक आठवडे सुरू असलेल्या चर्चेनंतर हमास आणि इस्रायलने संकेत दिले होते की सात ऑक्टोबरपासून हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली ओलिसांच्या मुद्द्यावर एक करार होणार आहे.
मंगळवारी हमासचे नेते इस्माईल हानिया यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं की, हमास इस्रायलबरोबर युद्धविराम करण्यासंदर्भात अगदी शेवटच्या टप्प्यावर आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू सुद्धा म्हणाले की त्यांच्याकडे सांगण्यासाठी लवकरच चांगली बातमी असेल.
या कराराअंतर्गत मानवी मदत, औषध आणि इंधनाने भरलेल्या शेकडो ट्रक्सला गाझामध्ये प्रवेश मिळेल.
हमासने एका निवेदनात सांगितलं की, चार दिवसांच्या युद्धविरामात इस्रायल कोणत्याही प्रकारचे हल्ले करणार नाही किंवा कुणालाही अटक करणार नाही.
युद्धविरामाच्या दरम्यान दक्षिण गाझामध्ये एअर ट्रॅफिक पूर्णपणे बंद असेल आणि उत्तर गाझात सकाळी सहा तास स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता एअर ट्रॅफिक बंद असेल.
या एअर स्पेसवर गाझाचं नियंत्रण आहे.
हा करार आत्ता का महत्त्वाचा आहे?

फोटो स्रोत, Getty Images
सात ऑक्टोबरपासून हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायलच्या ओलिसांच्या मुद्द्यावर हा बहुप्रतिक्षित करार झाला आहे.
हा करार यासाठी महत्त्वाचा आहे कारण काही ओलीस लोकांच्या कुटुंबियांनी आम्हाला सांगितलं की त्यांना अंशत: करार नको आहे. सर्वच ओलिसांना सोडण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे इतर बंधकही सोडवले जातील अशी आशा आहे.
सुरुवातीला ज्या 50 नागरिकांना सोडण्यात येणार आहे त्यांपैकी बहुतांश इस्रायली नागरिक असतील. त्यांच्याकडे दोन देशांचं नागरिकत्व असेल.
इतर ओलीस सुटण्याचा मार्ग मोकळा
जेरुसलेममध्ये उपस्थित असलेले बीबीसीचे मध्य पूर्व प्रतिनिधी योलांडे नेल यांच्यामते अशा प्रकारे करार तयार करण्यात आला आहे की पुढेही ओलिसांची सुटका होण्याचा रस्ता मोकळा होईल.
करारानुसार सुरुवातीला हमास 50 महिला आणि लहान मुलांची सुटका करेल.
इस्रायल सरकारच्या मते अतिरिक्त दहा ओलिसांच्या सुटकेच्या वेळी एक दिवसाचा युद्धविराम दिला जाईल.
अनेक ओलिसांच्या कुटुंबियांना ही अट महत्त्वाची वाटते. बीबीसी प्रतिनिधीशी संवाद साधताना काही ओलिसांच्या नातेवाईकांनी सांगितलं की कोणताही अंशत: करार व्हायला नको.
ज्या पन्नास ओलिसांची सुटका केली जात आहे त्यात अनेक लोक असे असतील जे इस्रायली नागरिक आहेत किंवा ज्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे.
तसंच अमेरिकेला अपेक्षा आहे की पन्नास पेक्षा अधिक ओलिसांची सुटका होईल.
अमेरिकेच्या मते एका चार वर्षीय अमेरिकन ओलिसाची सुटका होण्याचीसुद्धा अपेक्षा आहे. आणखी तीन ओलिसांची सुटका होण्याची शक्यता आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अमेरिकन अधिकारी म्हणाले की अबीगेल, जी शुक्रवारी चार वर्षांची होईल, तिचीही सुटका होईल. तिच्या आईवडिलांचा हमासच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते ओलिसांनची चार ते पाच दिवसांच्या आत सुटका केली जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेने निभावली महत्त्वाची भूमिका
इस्रायल हमासमध्ये करार होण्यासाठी अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागावर लक्ष ठेवून असणाऱ्या बीबीसी प्रतिनिधी बारबारा प्लेट अशर यांच्या मते या करार पूर्ण करण्यात अमेरिकेने मोठी भूमिका निभावली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन, सीआयएचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा करार करण्यात मोठा वाटा आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहून यांनी बायडेन यांचे आभार मानले आहेत. त्यांनी अटींमध्ये सुधारणा केल्या जेणेकरून कमी प्रयत्नात अधिकाधिक ओलिसांची सुटका होईल.
या करारात अमेरिकेचे हितसंबंध आहेत. दहा अमेरिकन नागरिक बेपत्ता आहेत आणि त्यांनाही ओलीस ठेवलं आहे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिका गाझा पट्टीत जाणाऱ्या संसाधनांविषयीसुद्धा आग्रही आहे आणि त्यात इंधनांचाही समावेश आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांचं मत आहे की युद्ध थांबल्यामुळे गाझाला जाणारी मानवतेच्या दृष्टीने होणारी मदत वाढेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








