Everest Day : ‘एव्हरेस्ट जवळ आलं होतं आणि माझा ॲाक्सिजन संपत आला होता..’

    • Author, शब्दांकन – जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कुठल्याही अवघड यशाला अनेकदा एव्हरेस्टची उपमा दिली जाते. प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी एव्हरेस्ट सर करावं. पण एव्हरेस्टवर चढाई किती खडतर ठरू शकते?

“आम्ही एव्हरेस्टजवळ पोहोचलो होतो. अखेरचा टप्पा मानल्या जाणाऱ्या हिलरी स्टेपपाशी पोहोचलो, तेव्हा माझे दोन्ही ऑक्सिजन रेग्युलेटर खराब झाले होते, पण मला ते लक्षातही आलं नाही. हिलरी स्टेपला चढून पुन्हा थोडं खाली उतरावं लागतं. मी तिथेच खाली बसलो. ऑक्सिजनविना माझं भान हरपू लागलं होतं. मी चालत होतो, तसाच पुढे जातो आहे, असा भास होत होता.”

एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून आलेले संतोष दगडे आपला अनुभव सांगतात. 48 वर्षांचे संतोष अनुभवी गिर्यारोहक आहेत आणि 17 मे 2023 रोजी त्यांनी जगातलं सर्वात उंच शिखर सर केलं.

खरं तर 8000 मीटर उंचीवरचं कुठलंही हिमशिखर सर करणं सोपं नसतं, पण 2023 च्या वसंतातल्या मोसमात मात्र हिमालयात अनेक शिखरांवर गिर्यारोहकांना अडचणी सहन कराव्या लागल्या.

एव्हरेस्टवर या मोसमात किमान बारा जणांचा मृत्यू झाला आहे. पण पण टीममेट्स आणि दोन उत्तम शेर्पा सहकाऱ्यांमुळेच संतोष परत येऊ शकले.

ते सांगतात, “हिलरी स्टेपपाशी किमान वीस एक मिनिटं मी असाच बसून होतो. पण मिंगमा शेर्पा आणि कर्मा शेर्पा तिथे पोहोचले आणि त्यांनी मला हलवून जागं केलं.

"माझा ऑक्सिजन पुरवठा थांबल्याचं त्यांना लक्षात आलं होतं. त्यांनी स्वतःचा रेग्युलेटर काढून मला लावला आणि सांगितलं, सर अभी आगे और जाना है आप चल सकते हो.

“मी पुन्हा चालू लागलो, एव्हरेस्टवर पोहोचू शकलो, सहीसलामात परत आलो ते त्या दोघांमुळेच.”

कर्जतचे रहिवासी असलेले संतोष, ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर येथील संदीप मोकाशी, हेमंत जाधव आणि धनाजी जाधव यांच्यासोबत एव्हरेस्ट मोहीमेवर गेले होते. गेल्या अनेक वर्षे हे चौघेजण सह्याद्री आणि हिमालयात चढाई करत आले आहेत.

पण एव्हरेस्टचं आव्हान किती वेगळं आणि खडतर होतं? संतोष यांच्याच शब्दांत वाचा.

एव्हरेस्टसाठी अशी केली तयारी...

ऑगस्ट 2022 मध्ये माऊंट नून हे 7,135 मीटर उंचीचं शिखर सर केल्यावर आम्हाला माऊंट एव्हरेस्ट खुणावू लागलं.

आम्ही पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे, भूषण हर्षे यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. गिरीप्रेमीनं 2012 साली एव्हरेस्टवर नागरी मोहीम यशस्वीपणे राबवली होती.

त्यांचे अनुभव ऐकल्यावर आम्हीही प्रयत्न करू शकतो, असा आत्मविश्वास मिळाला.

हिमालयात याआधीच्या मोहिमांसाठी सरावाची फार गरज लागली नव्हती. वीकएण्डला ट्रेकसाठी जाणं, मोठी सुट्टी मिळाली की पाठीवर दहा पंधरा किलो वजन घेऊन तीन-चार दिवसांचा ट्रेक करायचा असं मी करत असे. पण एव्हरेस्टसाठी वेगळ्या फिटनेसची गरज होती.

त्यासाठी मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भीमाशंकर, राजमाची हे कर्जतच्या आसपासचे ट्रेक करत होतो. वेग वाढवण्यासाठी दीड तासात भीमाशंकर चढायचो. रोज सकाळी जिममध्ये सराव करायचो 15-20 किलोमीटर सायकलिंग आणि आलटूनपालटून स्विमिंग करायचो, स्ट्रोक्स मारायचो. ऑक्सिजनशिवाय किती काळ राहू शकतो हे पाहण्यासाठी पाण्याखाली ध्यान लावून बसायचो.

सकाळी 4.30 ते 9 वाजेपर्यंत व्यायाम आणि त्यानंतर आर्थिक बाबींची जुळवाजुळव करायचो.

आर्थिक अडचणींचं एव्हरेस्ट

नेपाळ सरकारची फी, तिकिटं, उपकरणं, अवजारं, ट्रेनिंग शेर्पा साथीदारांसाठी वगैरे मिळून या मोहिमेला साधारण खर्च येणार होता प्रत्येकी 42 लाख रुपये.

पैशाचा डोंगर उभा करणं हे सरावापैसा जास्त मोठं आव्हान होतं. क्राऊंडफंडिंग, लोकांना भेटून स्पॉन्सरशिप किंवा मदतीसाठी विनंती करणं असे प्रयत्न करत होतो.

प्रत्येक दिवस नवीन गोष्टी शिकवत होता.

बऱ्याच लोकांनी मदत केली. माझा मित्र निलेश चौडिये यांचं ऑफिसनं तर आमच्या मिशन एव्हरेस्टसाठी वाहून घेतलं होतं. पण कुणी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या. पण काही झालं तरी ही मोहीम यशस्वी व्हायला हवी हा ध्यास घेतला होता.

वेणगावच्या महालक्ष्मी मंदिर ट्रस्टनं मोहिमेसाठी पैसा उभारण्यासाठी गावात एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. रेल्वेकडूनही माझ्या सहकाऱ्यांना मदत मिळाली. त्यातून आम्ही आणखी एक पायरी पुढे सरकलो.

आम्ही शाळांमध्ये जाऊन आमच्या मोहिमेविषयी सांगितलं. यामागे पैसे गोळा करणं हा हेतू नव्हता, तर मुलांना एव्हरेस्टविषयी माहिती देऊन, गिर्यारोहणाविषयी आणि या मोहिमेविषयी जनजागृती करायची होती. पण काही मुलांनी अक्षरशः 100-200 रुपये असे खाऊचे पैसेही काढून दिले.

हिमालयाचं आव्हान

एव्हरेस्ट मोहिम साधारण साठ दिवसांची असते. आम्हाला पंचावन्न दिवस लागले. मुख्य वेळ लागतो Acclimatization म्हणजे हवामानाची आणि उंचीची सवय होण्यासाठी. त्यासाठी वाटेत काही ठिकाणी थांबणं, उंचीचा सराव (हाईट गेन) होण्यासाठी थोडी चढाई करणं गरजेचं असतं.

एक एप्रिलला आम्ही काठमांडूला गेलो आणि हवामानाशी जुळवून घेत १२ एप्रिलला एव्हरेस्ट बेस कँपला पोहोचलो.

बेस कँपला आम्ही महिनाभर थांबलो आणि त्यात बहुतांश वेळ सरावात जायचा. एव्हरेस्टच्या वाटेत खुंबू हिमनदीवर लॅडर (शिड्या) लावल्या आहेत, त्यावरून कसं चालायचं, क्रिव्हासेस (बर्फातल्या मोठ्या घळ्या) पार कशा पार करायच्या याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. गिर्यारोहणातल्या तंत्रांचा सराव करावा लागतो.

एवढ्या उंचीवर शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या काहीही सोसण्यासाठी तयार राहावं लागतं. 18 हजार फुटांवर पोहोचलो होतो तेव्हाच मनात विचार डोकावला, अरे आपण हे नक्की का करतो आहोत? हवा खराब झाली आहे, रोज हिमप्रपात दिसतायत, डोळ्यासमोर मृत्यू होत आहेत...

28 एप्रिलनंतर हवामान एवढं खराब झालं की साधारण बारा दिवस फुकट गेले. एवढी बर्फवृष्टी आणि हवा होती की तंबूबाहेर पडणंही कठीण व्हायचं. मी तर देवाचं नाव घेत होतो, आपलं काय होईल, ही भीतीही वाटायची.

पण आपल्यासाठी लोकांनी पैसे उभे केले आहेत, लहान मुलांनी विश्वास दाखवलाय, त्यांचं काय? आम्ही हे फक्त स्वतःसाठी नाही, तर त्या सगळ्यांसाठी करत होतो. त्यातून नवी उमेद मिळायची.

त्यामुळेच प्रत्यक्ष शिखरावर चढाईची वेळ आली तेव्हा मनात खूप शांतता आणि संयम होता.

समिट पुश

१२ मे नंतर आम्हाला सूचना मिळाली की आता तुम्ही समिट पुशसाठी निघायला हवं. तेव्हा आम्ही बेस कँपवरून थेट 22 हजार फुटांवरच्या कँप दोनवर गेलो. सर्वांनाच तिथे एक दिवस आराम करावा लागला.

आमच्या चार जणांच्या टीममधल्या एकाला, संदीप मोकाशींना तब्येत बिघडल्यानं पुढे जाता येणार नव्हतं. हा टीमसाठी मोठा धक्का होता.

तो पचवून मी, हेमंत आणि धनाजी तिसऱ्या दिवशी कँप थ्रीसाठी निघालो आणि 15 तारखेला कँप फोरपर्यंत पोहोचलो. पण हवा अतिशय खराब झाली आणि आम्हाला त्या रात्री चढाई करता आली नाही.

मोहिमेचं कोऑर्डिनेशन करणाऱ्या एजन्सी आणि शेर्पांनी मेसेज पाठवला की तुमच्याकडचा ऑक्सिजन संपत येईल आणि तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. शेवटी आमच्यापैकी एकालाच वर जाता येईल अशी परवानगी त्यांनी दिली.

तेव्हा माझे सहकारी हेमंत जाधव आणि धनाजी यांनी शिखराच्या एवढ्या जवळ असूनही, स्वतःचा विचार न करता मला संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला, ज्यानं नवं बळ मिळालं. त्यांचे ऑक्सिजन सिलिंडर्स माझ्यासाठी उपलब्ध झाले.

सोळा तारखेला माझ्यासोबत मिंग्मा शेर्पा आणि कर्मा शेर्पा या दोघांनीही गर्दी टाळण्यासाठी लवकरच चढाईसाठी निघायचं ठरलं.

संध्याकाळी साधारण पाच वाजता आम्ही चढाई सुरू केली. पहाटे चार-पाचला शिखरावर पोहोचू असा अंदाज होता, पण वेळेआधीच 1 वाजून 55 मिनिटांनी माथ्यावर पोहोचलो. आपला तिरंगा आणि महाराजांचा भगवा ध्वज वर फडकावला.

हिलरी स्टेपनंतर पुढे थोडा चढाव आहे, तिथे चढताना मी घसरलो, साठ एक फूट खाली आलो असेन. पायाला मारही बसला. पण पुन्हा वर चढलो. दोनशे मीटरवर शिखर होतं.

माझे दोन्ही शेर्पा सहकारी ऑक्सिजनविना या टप्प्याची चढाई करत होते आणि हळूहळू आम्ही शिखरावर पोहोचलो.

एव्हरेस्टवर तुम्ही पोहोचल्याचं तुम्हाला सिद्धही करावं लागतं. त्यासाठी मिंग्मा शेर्पानं तिथले काही फोटो आणि व्हीडियो टिपले. त्या नोंदींच्याआधारेच गिर्यारोहकांना शिखर सर केल्याचं प्रशस्तीपत्र मिळतं.

परतीची वाट

एव्हरेस्टच्या शिखरावर फार काळ थांबता येत नाही आणि खाली उतरणं आणखी जिकिरीचं असतं. खाली उतरतानाच जास्त अपघात होतात कारण ऑक्सिजन कमी झाला असतो, थकवा आला असतो, शिखर सर केल्याची भावना असते.

अंधारातच आम्ही उतरू लागलो, पण तोवर वर येणारी वर्दळ वाढू लागली होती. एकच रोप होता, तो धरून आम्ही खाली येत होतो आणि चढणारे वर येत होते. प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागत होतं.

ऑक्सिजन कमी झाल्यानं बरेच लोक दमले होते, खाली बसले होते, कुणी पडलं होतं. वाऱ्याचा वेग वाढला होता. ते दृष्य मी विसरू शकणार नाही.

हळूहळू आम्ही खाली उतरलो आणि संध्याकाळपर्यंत कँप टूला परतलो. तिथे माझी टीम वाट पाहात होती. त्यांना भेटलो तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते. कारण आमच्यातला एकजण वर पोहोचला होता.

हिलरी स्टेपनंतर मी पडलो होतो, पायाला दुखापत झाल्यानं खुंबू ग्लेशियर पार करणं लगेच शक्य नव्हतं, म्हणून सहकाऱ्यांनी मला चॉपरनं खाली नेण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याशिवाय मी वर पोहोचू शकलो नसतो.

अगदी दोन महिन्यांपूर्वी, 16 मार्चला मी मोहीमच रद्द करण्याचा विचार करत होतो. पण माझा टीमलीडर हेमंत म्हणाला की, ‘जाणार असलो तर चौघंही बरोबर जाऊ, नाहीतर कुणीच जाणार नाही. पैशाचा विचार करू नको, काय करायचं ते पाहू, पण तू येणार आहेस.’ एक नेता आणि मित्र म्हणून हा आधार खूप महत्त्वाचा होता.माझ्या घरचेही पूर्णपणे पाठीशी होते. माझ्या पत्नीला तर बरंच काहीबाही ऐकावं लागलं. मोहिमेसाठी उरलेले पैसे भरण्याची वेळ आली, तेव्हा तिनं घरातले दागिनेही ठेवले, कर्ज काढलं.

गिर्यारोहणात पैसा ही मुख्य अडचण आहे. आजही बहुतांश गिर्यारोहक हौशी गिर्यारोहक आहेत आणि मोहिमांसाठी त्यांना स्वतःहून पैसा उभा करावा लागतो. इतर खेळांसारखी व्यवस्था साहसी खेळांसाठी अजून नाही. अनेक ठिकाणी तर गिर्यारोहणाला खेळ म्हणून मान्यता नसल्यानं निधी मिळवताना अडचणी येतात. पैशाअभावी गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग देणारे प्राथमिक कोर्सेस करणंही अनेकांना कठीण जातं.

लहान मुलांना शाळेतच गिर्यारोहणाचं प्रशिक्षण दिलं, तर ती मोबाईल आणि टीव्हीपासून दूर जायला शिकतील. निसर्गात गेल्यावर टीमवर्क, स्वावलंबन अशा अनेक गोष्टी ती शिकू शकतील. त्यातून निवड करून त्यांना पुढचं ट्रेनिंग दिलं तर आणखी उत्तम गिर्यारोहक आपल्याकडे तयार होतील.

हिमालय मी विसरू शकत नाही. कारण तो पुन्हा साद घालत राहतो. मी पुन्हा तिथे जाईनच. डोंगरानं मला बरंच काही शिकवलं आहे. मैत्री, आत्मविश्वास, टीमवर्क आणि माणूस माणसाला कसा वागवू शकतो हे डोंगर शिकवतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)