एव्हरेस्ट शिखर: गर्दीमुळे 10 मृत्युमुखी, एवढ्या उंचीवर 'ट्रॅफिक जॅम' का होतंय?

    • Author, हेलियर चेऊंग
    • Role, बीबीसी न्यूज

गर्दीपासून दूर जावं, हिमाच्छादित शिखरांचे फोटो काढावेत, असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा...

गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांनी काढलेल्या फोटोतून आज जगातल्या सर्वांत उंच ठिकाणीसुद्धा अशी स्थिती नाही, हे दिसून येईल. एव्हरेस्ट शिखराजवळचा परिसर लोकांनी गजबजून गेलेला तुम्हाला दिसून येईल.

एव्हरेस्टजवळ या हंगामात 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मल यांच्या फोटोंनी सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या फोटोंमुळे जगातील सर्वोच्च शिखराच्या जवळ गिर्यारोहक किती अवघड परिस्थितीचा सामना करतात, याचं एक उदाहरण समोर आलं आहे.

एव्हरेस्टजवळ अशी गर्दी का होते?

इथं अशी स्थिती गिर्यारोहणाच्या काळात नेहमी तयार होते, असं इथले गाईड सांगतात.

'सेव्हन समिट्स ट्रेक'चे अध्यक्ष मिंग्मा शेर्पा सांगतात की शिखरावर पोहोचण्यासाठी 20 मिनिटं ते दीड तास रांगेत थांबावं लागतं. वेगाने वाहणारे वारे टाळण्यासाठी आणि अनुकूल वातावरणासाठी गिर्यारोहकांना थांबून राहावं लागतं, असंही ते म्हणतात.

एखादा आठवडाभर चांगलं वातावरण असेल तर शिखराजवळ गर्दी नसते. पण कधीकधी फक्त दोन-तीन दिवसच चांगलं वातावरण असतं, अशावेळेस खूप गर्दी होते. सर्व गिर्यारोहक एकाचवेळेस शिखराजवळ पोहोचतात, असं शेर्पा यांनी बीबीसीला सांगितलं.

एव्हरेस्टवर गर्दी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2012 साली जर्मन गिर्यारोहक राल्फ जुमोवित्स यांनी काढलेल्या फोटोनं असंच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यास कोंगा लाईन असं नाव देण्यात आलं होतं.

गर्दी कितपत धोकादायक?

जुमोवित्स यांनी 1992 साली एव्हरेस्ट पादाक्रांत केलं होतं. तसंच त्यानंतर सहा वेळा 8,000 मीटर्सपर्यंत त्यांनी चढाई केली.

अशी चढाई धोकादायक ठरू शकते, असं ते सांगतात. "जेव्हा लोक असं रांगेत थांबतात तेव्हा त्यांच्याकडील ऑक्सिजन संपू शकतो. खाली येताना त्यांना ऑक्सिजन अपुरा पडू शकतो," असं त्यांनी सांगितलं.

"1992 साली जेव्हा ते एव्हरेस्टवर गेले होते तेव्हा खाली उतरताना त्यांच्याकडचा ऑक्सिजन संपला होता. तेव्हा मला असं वाटतं होतं की कुणीतरी आपल्यावर हातोड्यानं आघात करतंय. आता काहीच करता येणार नाही असं वाटत होतं. पण थोड्याच वेळात मला बरं वाटू लागलं आणि मी सुरक्षित खाली उतरलो," अशा शब्दांमध्ये ते त्या प्रसंगाचं वर्णन करतात.

प्रतिताशी 15 किमीपेक्षा जास्त वेगानं वारं वाहातं, तेव्हा ऑक्सिजनशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. शरीरातील खूप ऊर्जा निघून जाते.

याहून वाईट म्हणजे कधीकधी गिर्यारोहकांचे ऑक्सिजन सिलिंडर चोरीला जातात. "अशा अत्युच्च परिसरात ऑक्सिजन सिलिंडर चोरणं, हे एखाद्याची हत्या करण्यापेक्षा कमी नाही," असं माया शेर्पा सांहतात. त्यांनी आजवर तीन वेळा एव्हरेस्टवर चढाई केली आहे.

नियमावली लागू करण्यासाठी सरकारने शेर्पांशी समन्वय साधायला हवा, असं त्यांनी बीबीसी नेपाळीशी बोलताना सांगितलं.

हिमालयात 'ट्रॅफिक जॅम' का होतात?

गिर्योराहणाच्या मोहिमा आता लोकप्रिय झाल्यामुळं एव्हरेस्टवर गर्दी वाढत चालल्याचं तज्ज्ञ सांगतात.

एका मोहिमेच्या गाईड उर्सिना झिमरमन यांनी एव्हरेस्टवर 2016 साली चढाई केली होती. त्या म्हणाल्या, "अशा प्रकारचे ट्रॅफिक जॅम योग्य तयारी नसलेल्या गिर्यारोहकांमुळे होते. हे गिर्यारोहक चढाई करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट नसतात. यामुळे केवळ त्यांच्या जीवाला धोका पोहोचतो असं नाही तर त्यांना एव्हरेस्टवर घेऊन जाणाऱ्या शेर्पांचाही जीव धोक्यात येतो."

झिमरमन यांचे पती नोर्बू शेर्पा यांना असाच एक प्रसंग आठवतो. 8,600 मीटर उंचीवर त्यांचा आणि एका गिर्यारोहकाचा वाद झाला होता. तो गिर्यारोहक पूर्णपणे दमलेला होता, मात्र तरीही त्याला शिखरावर जायचंच होतं.

"तेव्हा मोठा वाद झाला होता. यामुळे तुमच्यासह दोन शेर्पांचाही जीव धोक्यात येईल, असं मी त्याला सांगत होतो. त्याला धड चालताही येत नव्हतं. अखेर त्याला दोरीने बांधून आम्ही खाली आणलं. बेस कॅम्पवर पोहोचल्यावर त्याने आमचे आभार मानले."

गर्दी झाल्यामुळं काय होतं?

नोर्बू शेर्पा सात वेळा या शिखरावर गेले आहेत. नेपाळी बाजूने जाणाऱ्यांची भरपूर गर्दी असते. तिबेटकडून जाणं सोपं आहे, पण चीन सरकार अत्यंत कमी परवाने देतं तसेच तिकडून गिर्यारोहण फारसं रोमांचक नाही.

नेपाळी बाजूला शेवटच्या टप्प्यातील चढाईत केवळ एकच कायमस्वरूपी दोरी आहे. जेव्हा गर्दी असते तेव्हा लोकांच्या दोन रांगा असतात. एका रांगेने लोक वर जात असतात तर दुसरी रांग खाली उतरणाऱ्यांची असते. सगळे जण एकाच दोरीला लटकत असतात.

एव्हरेस्टवरून उतरणं सर्वाधिक धोकादायक असल्याचं ते सांगतात. "अनेक लोक शिखरावर जाण्यासाठी प्रयत्न करतात. पण ते एकदा तिथं पोहोचले की खाली जाण्यासाठी लागणरी सर्व प्रेरकशक्ती आणि ऊर्जा गमावून बसतात."

"जेव्हा मी शिखरावर पोहोचलो तेव्हा सर्व ऊर्जा गमावून बसलो," असं जुमोवित्स सांगतात. "जरी तुम्ही शिखरावर पोहोचला नाहीत, तरीही सुरक्षितपणे उतरणं महत्त्वाचं आहे."

"पर्वतावरून उतरताना माझ्या अनेक मित्रांनी जीव गमावला आहे. एकाग्रता नसल्यामुळे उतरताना भरपूर अपघात होतात. एव्हरेस्टसारख्या शिखराजवळ वर जाणाऱ्यांची आणि खाली उतरणाऱ्यांची गर्दी असली तर अपघात जास्तच होऊ शकतात," असं ते सांगतात. "जेव्हा तुम्ही बेस कॅम्पवर परत येता तेव्हा तुम्ही केलेल्या कामगिरीचा आनंद घेण्यासारखं दुसरं काहीच नसतं."

शिखरावर पोहोचणं अधिक महत्त्वाचं असल्यासारखं काही गाईड चढाईवर भर देतात. पण शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आणि योग्यवेळेसच चढाई करणं, यामुळे धोका कमी होऊ शकतो.

"7,000 ते 8,000 मी उंचीवरच्या पर्वतांवर चढाई करण्यासाठी सरावाची गरज आहे, तेव्हाच तुमचं शरीर उंच प्रदेशात योग्यप्रकारे साथ देते," असं नोर्बू शेर्पा सांगतात.

ते आपल्या संघांना सकाळी लवकर चढाई करण्यास सांगतात म्हणजे पुढचे लोक येण्याआधी तुम्हाला उतरताही येईल.

झिमरमन यांनी तिबेटच्या बाजूने चढाई केली होती. मात्र गर्दी टाळण्यासाठी त्यांनी एक दिवस उशिरा चढाई केली होती. पोषक वातावरण संपून जाईल आणि त्यांचा संघ त्यांच्याविना एव्हरेस्टवर पोहोचेल, अशी भीती त्यांना होतीच.

मात्र केवळ झिमरमन आणि त्याचें पतीच शिखरावर पोहोचू शकले. "एव्हरेस्टवर आपल्या पतीसह पोहोचण्याल्यावर किती भारी वाटतं, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. जगातील सर्वोच्च शिखरावर दोघेच. आम्ही सकाळी 3.45 वाजता पोहोचलो आणि सूर्योदयही पाहिला."

हेही वाचलंत का?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)