माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848.86 मीटर्स, नेपाळ आणि चीनची घोषणा

    • Author, नवीन सिंह खडका
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

जगातल्या सर्वोच्च पर्वत शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848.86 मीटर्स असल्याचं नेपाळ आणि चीनने एकत्रितपणे जाहीर केलंय.

नेपाळ आणि चीनच्या सीमेवर असणाऱ्या या सर्वोच्च पर्वतशिखराची नवी उंची पूर्वीपेक्षा 86 सेंटीमीटर्स जास्त आहे. पूर्वीच्या मोजदादीनुसार ही उंची 8,848 मीटर होती. या उंचीमध्ये शिखरावरचं बर्फाच्छादित टोकही (Snow Cap) मोजण्यात आलंय.

पर्वतावरच्या बर्फाच्छादित टोकाची उंची मोजण्याच्या पद्धतीवरून चीन आणि नेपाळचं एकमत होत नव्हतं.

सर्व्हे ऑफ इंडियाने ठरवलेली एव्हरेस्टची उंची ही जगभर प्रमाण म्हणून स्वीकारली जात होती. पण त्या उंचीपेक्षा एव्हरेस्टची उंची 4 मीटरने कमी असल्याचं चीनचं आतापर्यंत म्हणणं होतं.

माऊंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा तर तिबेटमध्ये चोमोलुंग्मा म्हटलं जातं. जगातला हा सर्वोच्च पर्वत नेपाळ आणि चीन या दोन देशांमध्ये पसरला असला तरी त्याचं शिखर हे नेपाळच्या हद्दीत येतं आणि हे शिखर सर करण्यासाठी दोन्ही देशांच्या बाजूंनी चढाई करता येते.

नेपाळनंतर चीननेही एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम सुरू केलं आणि 2019मध्ये नेपाळच्या राष्ट्रपती बिद्यादेवी भंडारी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एका संयुक्त निवेदनावर सह्या केल्या. सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी आणि महत्त्वाची निरीक्षणं एकमेकांना सांगण्याचं यानुसार ठरवण्यात आलं.

अधिकृत उंचीवरून मतभेद का?

माऊंट एव्हरेस्टची उंची मोजताना जिथपर्यंत या पर्वताचा खडक आहे तिथपर्यंतच याची मोजदाद करण्यात यावी असं आतापर्यंत चीनचं म्हणणं होतं.

तर या उंचीमध्ये पर्वताच्या बर्फाच्छादित शिखराचाही समावेश करावा असं नेपाळी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.

चीनच्या सर्वेक्षकांनी 2005मध्ये एव्हरेस्टची उंची मोजली होती.

तर चीनने मोजलेली उंची अधिकृत म्हणून स्वीकारावी यासाठी आपल्यावर दबाव असल्याचं नेपाळच्या सरकारी अधिकाऱ्यांनी 2012मध्ये बीबीसीला सांगितलं होतं. म्हणूनच ही गोष्ट कायमची निकाली काढण्यासाठी नेपाळने यावर पावलं उचलण्याचं ठरवलं.

सर्व्हे ऑफ इंडियाने 1954मध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर असल्याचं जाहीर केलं होतं आणि नेपाळमध्ये हीच उंची अधिकृत मानली जात होती. नेपाळने पहिल्यांदाच एव्हरेस्टच्या उंचीची गणना स्वतंत्रपणे केली आहे.

या मोहीमेसाठी चार नेपाळी भू सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी दोन वर्षं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर हे शिखर सर करण्यासाठीची मोहीम त्यांनी सुरू केली.

नेपाळच्या सर्वेक्षण विभागाचे प्रवक्ते दामोदर धाकाल यांनी बीबीसीला सांगितलं, "यापूर्वी कधीही आम्ही स्वतः मोजदाद केली नव्हती. आता आमच्याकडे एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊ शकेल अशी तरूण तंत्रज्ञांची टीम असल्याने आम्ही हे स्वतः करू शकतो."

उंचीविषयी आक्षेप का?

2015मधल्या भीषण भूकंपाचा या पर्वतावर मोठा परिणाम झाला असण्याची शक्यता काही भूशास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. 7.8 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे नेपाळमध्ये 9,000 जणांचा बळी गेला होता. तर या भूकंपामुळे आलेल्या अॅव्हलांश - हिम स्खलनामुळे एव्हरेस्ट बेस कॅम्पचा काही भाग गाडला जाऊन त्यात 18 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता.

या भूकंपामुळे एव्हरेस्टचं बर्फाच्छादित टोक आकुंचन पावलं असण्याची शक्यता काही भूशास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती.

या भूकंपानंतर काठमांडूच्या उत्तरेकडे असणारी आणि या भूकंपाच्या केंद्राच्या जवळ असणाऱ्या लांगटांग हिमल सारख्या हिमालयातल्या पर्वत शिखरांची उंची जवळपास एक मीटरने कमी झाल्याचं संशोधकांना आढळलं होतं.

तर एव्हरेस्ट जिथे आहे तिथल्या टेक्टॉनिक प्लेट्स (tectonic Plates) म्हणजेच भू - पट्ट्या या हलत असल्याने काळानुरूप एव्हरेस्टची उंची प्रत्यक्षात वाढली असण्याची शक्यता असल्याचं काहींचं म्हणणं होतं. पण मोठ्या भूकंपामुळे ही वाढ पुन्हा कमी झाल्याची शक्यताही काही जाणकार व्यक्त करत होते.

"2015चा भूकंप हे या पर्वताची उंची पुन्हा मोजण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं," धाकाल सांगतात.

माऊंट एव्हरेस्टची उंची पुन्हा कशी मोजण्यात आली?

डोंगरांची उंची मोजताना ती समुद्र सपाटीपासून मोजली जाते. असं केल्याने डोंगराचा तळ नेमका कोणता हे ठरवण्यापेक्षा त्याचं शिखर नेमकं किती उंच आहे, यावर लक्ष केंद्रित करता येतं.

एव्हरेस्टची मोजतात करताना नेपाळने बंगालच्या उपसागराची पातळी ही समुद्रसपाटीची पातळी म्हणून वापरली. पण भारत - नेपाळ सीमेलगत एव्हरेस्टच्या जवळच असणाऱ्या एका जागेची उंची, भारताने हीच समुद्रसपाटी पाया धरत मोजलेली होती. त्यामुळे नेपाळी सर्वेक्षकांना या बिंदूपर्यंतची उंची मिळाली.

तिथपासून पुढे नेपाळच्या अधिकाऱ्यांनी 250 किलोमीटरच्या डोंगर चढणीवर दिसतील असे टप्पे उभारले. एव्हरेस्टचं शिखर दिसू लागेल इतक्या उंचीपर्यंत हे टप्पे उभारण्यात आले. हे सगळे टप्पे जोडून त्यांची उंची मोजण्यात आली.

चीनमधल्या 'चायना डेली' या वर्तमान पत्राने छापलेल्या माहितीनुसार चीनच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी एव्हरेस्टची उंची मोजताना त्यांच्या पूर्वेकडच्या शांडाँग प्रांताजवळच्या पीत समुद्राची (Yellow Sea) पातळी ही पाया - समुद्रसपाटी धरली.

शिखराची उंची मोजण्यासाठी दोन्ही देशांच्या सर्वेक्षकांनी त्रिकोणमिती - Trigonometry ची सूत्रं वापरली. पाया आणि अंशाचा गुणाकार करून त्रिकोणाची उंची काढण्याचं सूत्रं यात वापरण्यात आलं.

पण ही आकडेवारी केल्यानंतरही कोणीतरी शिखर सर करणं गरजेचं होतं. नेपाळच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी एव्हरेस्ट सर केला. तर चीनचे अधिकारी मे महिन्यात एव्हरेस्ट चढले. या काळामध्ये कोरोना व्हायरसच्या साथीमुळे नेपाळने त्यांच्या बाजूने चढाई करणाऱ्या सगळ्या एव्हरेस्ट मोहीमा रद्द केल्या होत्या तर चीननेही परदेशी प्रवासांवर बंदी घातलेली होती.

त्यामुळेच चीनचं सर्वेक्षण पथक हे 2020मध्ये एव्हरेस्ट सर करणारं एकमेव पथक ठरलं आहे.

एव्हरेस्टची उंची मोजताना अधिक अचूक उत्तर मिळावं यासाठी आपण एव्हरेस्टच्या दिशेने असणाऱ्या 12 विविध इतर शिखरांचा वापर केल्याचं नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

तर चिनी अधिकाऱ्यांनीही हीच पद्धत वापरल्याचं चिनी माध्यमांनी म्हटलंय.

"सर्वेक्षणासाठीचा बीकन (स्तंभ) शिखरावर रोवण्यात आल्यानंतर या शिखराच्या इतर बाजूंच्या 6 बिंदूंपासूनची तिथपर्यंतची उंची मोजता आली. म्हणजचे पर्वताची उंची मोजताना 6 वेगवेगळ्या त्रिकोणांची उंची मोजत खातरजमा करता आली," चीनमधल्या सर्वेक्षण आणि नकाशा अकादमीमधले संशोधक जिआंह टाओ यांनी चायना डेलीला सांगितलं.

यापूर्वी चीनने 1975मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर 2005मध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती.

हिमालय डेटाबेसनुसार चीनच्या दुसऱ्या सर्वेक्षण पथकाने एव्हरेस्टच्या शिखरावर एक चिनी जीपीएस उपकरण बसवलं होतं.

पण यावेळी चिनी सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी चीनने विकसित केलेली बायडू नेव्हिगेशन सॅटलाईट प्रणाली (BeiDou Navigation Satellite Systerm) वापरली. ही प्रणाली अमेरिकेच्या मालकीच्या जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमची प्रतिस्पर्धी मानली जाते.

"ही प्रणाली वापरून बर्फाची खोली, हवामान, वाऱ्याचा वेगही मोजता येतो. याचा उपयोग हिमनदी (Glacier)चा अभ्यास करण्यासाठी किंवा पर्यावरण संरक्षणासाठी केला जाऊ शकतो," चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने म्हटलंय.

नेपाळच्या सर्वेक्षकांनी आकडेवारी करण्यासाठी GPS प्रणाली वापरली.

"माऊंट एव्हरेस्टची उंची ठरवण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय मान्यता असणाऱ्या पद्धती वापरून माहितीवर प्रक्रिया केली," धाकल यांनी बीबीसीला सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)