टूर, टोमणे, ट्रोलिंगच्या अनुभवानंतर दिलजीत दोसांझने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

फोटो स्रोत, @DiljitDosanj
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नुकताच त्याचा 'दिल-लुमिनाटी टूर' संपला. त्यानंतर त्यानं घेतलेली ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर दिलजीत दोसांझनं एक व्हीडिओ शेअर केला. त्यात त्यानं ही भेट अविस्मरणीय होती, असं म्हटलं.
दिलजीतचा दिल्लीतून सुरू झालेली 'दिल लुमिनाटी' टूर 31 डिसेंबरला लुधियानामध्ये संपली. त्याची ही टूर अनेक वादांमुळं कायम चर्चेत आणि सोशल मीडियात ट्रेंडींग होती.
दोघांमध्ये काय चर्चा झाली?
दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची आणि मोदींची भेट पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींना पाहताच त्यांनी त्यांना नमस्कार केला.
दुसरीकडं, पीएम मोदींनीही 'सत् श्री अकाल' म्हणत त्यांचं स्वागत केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दिलजीत दोसांझनं पोस्ट केलं की, "2025 ची जोरदार सुरुवात." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक अविस्मरणीय भेट.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये तो देशभर दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारत किती महान आहे याबाबत बोलताना दिसत आहे.
या व्हीडिओमध्ये तो म्हणत आहे की,'संपूर्ण देशाचा दौरा केल्यानंतर त्याला कळलं की, भारताला 'महान' का म्हटलं जातं.
यात तो योगावरही चर्चा करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योगामध्ये अद्भुत शक्ती आहे. ज्याने त्याला अनुभव घेतला आहे त्यालाच ते कळू शकेल.
व्हिडिओच्या अखेरिस दिलजीत दोसांझही पंतप्रधान मोदींसमोर गुरूनानकांचं गाणं गाताना दिसत आहे. दिलजीत गाणं म्हणताना मोदीही टेबल वाजवून ताल धरताना दिसले.
मोदींनी गुरुमुखीमध्ये ट्वीट केलं की, "दिलजीतबरोबरची चर्चा खूपच छान झाली. तो खास व्यक्ती आहे. प्रतिभा आणि परंपरा यांचा मिलाफ त्याच्यात आहे. आम्ही संगीत, संस्कृती आणि अनेक गोष्टींबद्दल बोललो."

फोटो स्रोत, @narendramodi
गेल्या महिन्यात त्याची देशभर सुरू असलेली म्युझिक टूर विविध राज्य सरकार, गायक, बाल अधिकार संरक्षण आयोग आणि इतर काही कारणांमुळे वादग्रस्त ठरली होती.
नेमका काय वाद आहे आणि गेल्या काही काळातील दिलजीत दोसांझच्या बाबतीत कोणकोणते वाद झाले आहेत त्याविषयी...
कोचेला या अमेरिकेतील संगीत महोत्सवात सादरीकरण केल्यानंतर पंजाबी गायक दिलजीत दोसांझची भारतात दिल-लुमिनाटी ही म्युझिक टूर सुरू होती.
पंजाबमध्ये जन्मलेल्या दिलजीत दोसांझची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळे तो जिथे कार्यक्रम करण्यासाठी जातो तिथे मोठी गर्दी होते, स्टेडिअम लोकांनी भरुन वाहतं.
त्याच्या कार्यक्रमाचे म्हणजे कॉन्सर्टच्या तिकिट विक्रीस सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच सर्व तिकिटं विकली जातात.
स्वत:ला पेंडू (ग्रामीण), पंजाबी आणि दोसांझ यांचा मुलगा म्हणवून घेणारा दिलजीत गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत.
जेव्हापासून या टूरची सुरुवात झाली आहे तेव्हापासून तो सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडला.
दिलजीत दोसांझ याच्याशी संबंधित वादांची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा आहे. असेच काही वाद पाहूया.
1. Punjab ऐवजी Panjab लिहिण्याचा वाद
दिलजीत दोसांझ 14 डिसेंबरला एका शो मध्ये परफॉर्म करण्यासाठी चंदीगडला गेला होता. त्याच्या दोन दिवस आधी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये त्याने पंजाब हा शब्द Punjab ऐवजी Panjab असा लिहिला होता. त्यावरून वाद सुरू झाला होता.
1947 मध्ये देशाची फाळणी होत पाकिस्तानची निर्मिती झाली होती. त्यावेळेस पंजाबचे देखील दोन भाग झाले होते.
ज्या लोकांनी दिलजीत दोसांझच्या पोस्टबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानातील पंजाबला इंग्रजीत Panjab असं लिहितात, तर भारतातील पंजाबला Punjab असं लिहिलं जातं.
सोशल मीडियावर हाच मुद्दा उपस्थित करत अनेकांनी आरोप केला की दिलजीत पंजाबशी संबंधित पाकिस्तानी ओळख पुढे नेऊ इच्छितो. दिलजीतने याबद्दल स्पष्टीकरण देखील दिलं.
मात्र, वस्तुस्थिती अशी नाही. पाकिस्तान सरकारच्या अनेक वेबसाईटवर देखील पंजाब शब्दाची स्पेलिंग अशीच लिहिण्यात आलेली आहे.

फोटो स्रोत, @diljitdosanjh
दिलजीतने त्याच्या दुसऱ्या पोस्टमध्ये पंजाब विद्यापीठाचा एक स्क्रीनशॉट देखील दिला आहे. त्यामध्ये पंजाबची स्पेलिंग Panjab अशीच लिहिलेली आहे.
चार दिवसानंतर गायक गुरु रंधावा यांनी देखील दिलजीतवर टीका केली. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी पंजाबची फक्त योग्य स्पेलिंगच लिहिली नाही तर त्यासोबत भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याची इमोजी देखील टाकली होता.
दिलजीत यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "एखाद्या ट्विटमध्ये पंजाबबरोबर भारताचा राष्ट्रध्वज दाखवायचा राहिला तर ते कारस्थान ठरतं, बंगळुरूच्या ट्वीटमध्ये देखील एका ठिकाणी राष्ट्रध्वज द्यायचा राहिला होता. जर पंजाबला Panjab असं लिहिलं तर ते कारस्थान ठरतं. Panjab ला Punjab असं लिहिलं, तरी पंजाब तर पंजाबच राहील."
ते म्हणाले की भविष्यात ते पंजाब हा शब्द पंजाबी भाषेतच लिहितील आणि त्यांना भारताबद्दल खूप प्रेम आहे.


2. बाल संरक्षण आयोगाची सूचना
चंदीगडमध्ये झालेल्या कॉन्सर्टच्या दोन दिवस आधी बाल अधिकार संरक्षण आयोगानं दिलजीत आणि त्याच्या टीमला सूचना दिली होती.
चंदीगड बाल अधिकार संरक्षण आयोगानं (सीसीपीसीआर) त्यांच्या अॅडव्हायझरीमध्ये दिलजीतला लाईव्ह शो मध्ये दारू किंवा मद्यावर आधारित गाणी टाळण्याची सूचना केली होती.
सीसीपीसीआरचे अध्यक्ष शिप्रा बंसल यांचं म्हणणं होतं की दिलजीतने त्याच्या कॉन्सर्टमध्ये पटियाला पेग, पांच तारा सारखी गाणी गाऊ नयेत. तसंच त्याच्या कॉन्सर्टमध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना दारू देखील देण्यात येऊ नये.

फोटो स्रोत, @diljitdosanjh
सीसीपीसीआरच्या नोटिशीत दिलजीतला कॉन्सर्टमध्ये मुलांना व्यासपीठावर न बोलावण्याची देखील सूचना देण्यात आली होती. अनेक वेळा असं दिसलं आहे की शोच्या वेळेस लहान मुलंदेखील व्यासपीठावर जातात.
जिल्हा प्रशासनानुसार, या कॉन्सर्टमध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं होतं. त्यामुळे शो नंतर शोच्या आयोजकांना नोटीस पाठवण्यात आली होती.
या प्रकरणाची सुनावणी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात सुरू आहे.
3. 'सरकारशी वाद असू शकतो, कलाकाराशी नाही'
सध्या एपी ढिल्लन आणि दिलजीत दोसांझ या दोघांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकार चर्चेत आहेत.
अलीकडेच दिलजीत दोसांझने करण औजला आणि एपी ढिल्लन यांच्या कॉन्सर्टबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं.
दिलजीत म्हणाला होता, "माझ्या इतर दोन भावांनी (एपी ढिल्लन आणि करण औजला) देखील टूरची सुरुवात केली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा. स्वतंत्र संगीताचा काळ सुरू झाला आहे."
त्याला उत्तर देताना एपी ढिल्लन म्हणाले, "मला दिलजीत भाईंना एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे त्यांच्या दोन भावांनी टूरची सुरुवात केली आहे. आधी मला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक तरी करा."
मात्र, दिलजीत याचं म्हणणं आहे की त्यांनी एपी ढिल्लन यांना ब्लॉक केलेलं नाही. दिलजीत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्याचा एक स्क्रीनशॉट देत दाखवलं की त्यांना एपी ढिल्लन यांची पोस्ट दिसते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी लिहिलं, "मी तुम्हाला कधीही ब्लॉक केलं नाही. माझा वाद सरकारशी असू शकतो, एखाद्या कलाकाराशी नाही."
मात्र, हा वाद इथेच संपला नाही. दिलजीत यांना उत्तर देताना ढिल्लन यांनी स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ शेअर करत दावा केला की दिलजीत यांनी काही दिवस आधीच त्यांना अनब्लॉक केलं आहे.
या वादासंदर्भात सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलजीत आणि ढिल्लन या दोघांचं थेट नाव न घेता दोन्ही कलाकारांना करियरमध्ये प्रगती करण्याचा सल्ला दिला आहे.
बादशाहनं सोशल मीडियावर लिहिलं, "जी चूक आम्ही केली होती, ती तुम्ही करू नका. तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपल्याला वेगानं पुढे जायचं असेल तर आपण एकट्यानं प्रवास करू शकतो. मात्र जर आपल्या दूरवर जायचं असेल तर एकत्र राहण्याची आवश्यकता आहे."
4. 'हिंदुस्तान कोणाच्या बापाचा थोडाच आहे'
8 डिसेंबरला दिलजीतने मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये म्युझिक कॉन्सर्ट केली होती.
ही कॉन्सर्ट रद्द व्हावी अशी मागणी बजरंग दलानं केली होती. हिंदू संघटनांची मागणी होती की कॉन्सर्टमध्ये दारू आणि मांस दिलं जाऊ नये.
या मागणीसाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर देखील उतरले होते.

फोटो स्रोत, Getty Images
प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, इंदूरमधील कॉन्सर्टमध्ये दारू आणि मांस देण्यात आलं नाही.
दरम्यान, आपल्याला विरोध करणाऱ्यांना दिलजीतने प्रसिद्ध उर्दू शायर राहत इंदौरी यांच्या शायरीनं देखील उत्तर दिलं. त्याचीही खूप चर्चा झाली.
आपल्या लाईव्ह शोमध्ये दिलजीत म्हणाला होता, "सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है."
5. तेलंगणा सरकारची नोटीस

फोटो स्रोत, @diljitdosanjh
15 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये दिलजीत यांचा कॉन्सर्ट झाला होता. त्याआधी तेलंगणा सरकारनं कॉन्सर्टच्या आयोजकांना नोटीस पाठवली होती.
या नोटीसमध्ये म्हटलं होतं की, शोमध्ये दिलजीत यांना मुलांना व्यासपीठावर बोलावता येणार नाही. तसंच त्यांना दारू, अंमली पदार्थ आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी गाणी देखील गाता येणार नाहीत.
यामुळे दिलजीत दोसांझ नाराज झाला होता. तो म्हणाला होता, "जेव्हा परदेशातून कलाकार आपल्या देशात परफॉर्म करण्यासाठी येतात, तेव्हा त्यांना जे करायचं असतं ते सर्व करू दिलं जातं. मात्र, जेव्हा आपल्याच देशातील एखादा कलाकार गाण गातो तेव्हाच लोकांची अडचण होते."
नोटीस मिळाल्यामुळे दिलजीतला त्याच्या शोमधील गाण्यांमधून दारू आणि संबंधित शब्द हटवावे लागले होते.
अर्थात यावर उपाय शोधत दिलजीतने लाईव्ह शोमध्ये दारू सारख्या शब्दांऐवजी 'कोक' या शब्दाचा वापर केला होता. उदाहरणार्थ, त्याने 'तैनू तेरी दारू पसंद'चं रुपांतर 'तैनू तेरी कोक पसंद'मध्ये केलं होतं.
यानंतर महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागानं पुण्यातील त्याच्या कॉन्सर्टमध्ये दारू देण्याचा परवानगी देखील रद्द केली होती.
6. दिल्लीच्या स्टेडियममधील कचरा
26-27 ऑक्टोबरला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये दिलजीतचा लाईव्ह शो झाला होता. मात्र शो संपल्यानंतर स्टेडियममध्ये सर्वत्र पसरलेल्या घाणीमुळे, कचऱ्यामुळे लोकं त्रस्त झाले होते.
स्टेडियममध्ये जागोजागी दारू आणि पाण्याच्या बाटल्या, रनिंग ट्रॅकवर उरलेलं अन्न आणि मोडक्या खुर्च्या पसरलेल्या होत्या.

फोटो स्रोत, UGC
यासंदर्भात अॅथलीट बिअंत सिंह यांनी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि प्रशासनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
दिलजीतच्या कॉन्सर्टमुळे खेळाडूंना 10 दिवस सराव करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असा त्यांचा आरोप होता.
7. अमेरिका टूरवरून वाद
लॉस एंजेलिसमधील कोरियोग्राफर रजत बट्टा यांनी दावा केला होता की दिलजीत दोसांझने टूरमध्ये आलेल्या देशी डान्सरच्या मोबदल्याचे पैसे देखील दिले नव्हते.
बट्टा यांनी देशी डान्सर्सना कमी लेखल्याबद्दल त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर निराशा देखील व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, @diljitdosanjh
मात्र, दिलजीत दोसांझच्या व्यवस्थापकानं या आरोपांबाबत स्पष्टीकरण देत म्हटलं होतं की, त्यांच्या टीमनं कधीही रजत बट्टा यांना संपर्क केलेला नाही.
दिलजीतचं म्हणणं होतं की, त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जाते आहे.
8. पगडीवरून वाद
अलीकडेच दिलजीत दोसांझचा 'अमर सिंह चमकीला' हा चित्रपट आला होता. या चित्रपटात दिलजीत दोसांझने पगडी घातलेली नव्हती. त्यामुळे अनेक जणांनी या गोष्टीवर प्रश्न उपस्थित केले होते. कारण दिलजीत एरवी पगडी घालतो.
गायक दलेर मेहंदी देखील या गोष्टीवर संतप्त झाले होते. त्यांनी नाराजी व्यक्त केली होती की खरा शीख तोच असतो जो कधीही स्वत:ची पगडी काढत नाही आणि केस कापत नाही.
दलेर मेहंदी यांचं म्हणणं होतं की दिलजीत नेहमीच म्हणतो की तो कधीही पगडी काढणार नाही. तसंच चमकीला चित्रपटासाठी त्याने केस का कापले, ही बाब लक्षात आली नाही.

फोटो स्रोत, @NetflixIndia
याशिवाय पंजाबी रॅपर नसीब यांनी देखील या मुद्द्यावरून दिलजीतवर टीका केली होती. त्यांनी दिलजीत यांना प्रश्न विचारत लिहिलं होतं, "किती रुपयांना स्वत:चा आत्मा विकला."
याला उत्तर देत दिलजीतने लिहिलं होतं की, "नसीब भाई, तुम्हाला भरपूर प्रेम. देव करो तुमची खूप भरभराट होवो. तुमची नेहमीच प्रगती करत राहा...माझ्याकडून फक्त प्रेम आणि प्रेमच."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











