बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा? या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. धारावी पुनर्विकास प्रकल्प: झोपडीधारकांना अदानी घरं कशी देणार?

उंबरठ्यापासून 20 पावलं चालत नाही तोपर्यंत समोर भिंत येईल एवढंच घर...खरं तर ‘घर’ फक्त इथल्या चार भींतीत राहणाऱ्या लोकांसाठीच. बाकी जगासाठी ती झोपडीच.

अशा काही मोजक्या नाही तर हजारो झोपड्या म्हणजे ‘धारावी’.देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या मध्यवर्ती वसलेल्या धारावीला आशिया खंडातील 'सर्वांत मोठी झोपडपट्टी' म्हणूनही ओळखलं जातं.

40 वर्षांच्या अर्चना पवार याच धारावीत 10x15 फुटाच्या घरात राहतात. अर्चना पवार यांचा जन्म धारावीतच झाला आणि लग्नानंतर त्या आताही धारावीतच राहत आहेत.

“मी लहान असल्यापासून ऐकत आले आहे की धारावीत घरं बांधून दिली जाणार आहेत. पण फक्त चर्चाच सुरू आहे. माझं लग्न होऊन माझी मुलगी आता 16 वर्षांची झाली तरी धारावी पुनर्विकास कुठे दिसत नाही. आता पुन्हा म्हणतायत घरं मिळणार आहेत. पण तोपर्यंत आमची मुलं आमच्या वयाची होतील. आमची स्वप्नं स्वप्नच बनून राहिली.” असं अर्चना पवार सांगतात.

2. सॅम माणेकशॉ : 1971च्या बांगलादेश युद्धाचे हिरो आत्ता का ट्रेंड होताहेत?

1971च्या बांगलादेश युद्धाचे हिरो, जनरल सॅम माणेकशा बुधवारी 1 डिसेंबर रोजी अचानक सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागले.

तेही त्यांच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी. कारण? त्यांच्यावर बनवण्यात येणाऱ्या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर.माणेकशा कदाचित भारताच्या इतिहासातले सगळ्यांत चांगले आर्मी जनरल असतील.

1971 साली पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात ते लष्करप्रमुख होते. याच युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली.फिल्ड मार्शल या पदावर पदोन्नती मिळणारे ते पहिले लष्करी अधिकारी होते.

3. केरळच्या लेस्बियन कपलचं फोटोशूट चर्चेत कारण...

"आज आम्ही स्वतंत्र आहोत आणि आता आम्हाला आमची स्वप्न जगता येतील."

यावर्षाच्या सुरुवातीला अदिला नसरीन आणि फातिमा नूरा या तरुणींची नावं बऱ्याच वृत्तपत्रात छापून आली होती. या मुलींच्या पालकांनी त्यांना जबरदस्तीने वेगळं केलं होतं.

पण केरळमधील न्यायालयाच्या एका निर्णयाने या दोघी पुन्हा एकत्र आल्या.त्या दोघींना त्रासाला सामोरं जावं लागत होतं, त्यामुळे यातल्या एकीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आता मागच्या महिन्यात या मुली पुन्हा चर्चेत आल्यात. त्याच्या मागचं कारण म्हणजे एका वेडिंग फोटोशूटसाठी या दोघींनी कपल पोज दिली आहे.

4. AIIMS वर झालेला सायबर हल्ला ही धोक्याची घंटा?

एम्स (AIIMS) हे भारतातील सर्वांत जुनं, प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह सरकारी रुग्णालय आहे.1956 मध्ये एम्स सुरू झालं आहे.

मात्र 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत तिथे पाच कोटी रुग्णांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.

कारण 23 तारखेला तिथल्या कॉम्प्युटर सर्व्हरवर सायबर हल्ला झाला आणि तिथले सगळे सर्व्हर ठप्प झाले.

त्यात रुग्णालयाच्या ई- हॉस्पिटलच्या नेटवरर्कचाही समावेश होता. ते नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर तर्फे चालवण्यात येतं.

या अफरातफरीत आपात्कालीन रुग्ण, आऊट पेशंट- इन पेशंट आणि सगळ्या लॅबच्या कॉम्प्युटरमध्ये अडचणी निर्माण झाल्याने एम्सने मॅन्युअली काम करायला सुरुवात केली.

5. फुटबॉल वर्ल्डकपमधून जर्मनी बाहेर पडण्याचं काय कारण आहे?

स्पर्धेतील अव्वल संघांपैकी एक मानला गेलेला जर्मनीचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे.

जपानने स्पेनचा पराभव केल्यानंतर जर्मनीच्या पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा संपल्या. जपान आता ग्रुप ई मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.

वरचा फोटो पाहा. तुम्हाला वाटेल की चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. पण याच बॉलवर पुढे जपानने दुसरा गोल केला आणि मैदानात एकच कल्लोळ झाला.

मैदानावरील पंच आणि लाईन रेफरींनाही हा बॉल बाहेर असल्याचं वाटत होतं म्हणून हा निर्णय VAR कडे गेला.

टीव्ही अंपायरने व्हीडिओच्या साहाय्याने त्याचा आढावा घेत बॉल पूर्णपणे ‘ओव्हर द लाइन’ (रेषेबाहेर) नसल्याचं म्हटलं आणि हा गोल ग्राह्य धरला गेला. जपानने नाट्यमयरीत्या स्पेनचा 2-1 असा पराभव केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)