नीलकमल बोट दुर्घटनेतील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला, मृतांचा आकडा 15 वर

गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात, 15 मृत्युमुखी

फोटो स्रोत, ANI

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोटच्या अपघातातील मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. भारतीय नौदलाच्या स्पीडबोटीची धडक या प्रवासी बोटीला बसल्याने अपघात झाला होता.

या दुर्घटनेतील मृतांमध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 3 बालकांचा समावेश आहे.

या दुर्घटनेतील दोन जण बेपत्ता होते. त्यापैकी 43 वर्षीय हंसाराम भाटी यांचा मृतदेह अखेर भाऊचा धक्क्याजवळ सापडा होता. तर सात वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह शनिवारी मुंबई हार्बर परिसरात सापडला.

गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात, 13 मृत्युमुखी

फोटो स्रोत, ANI

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (18 डिसेंबर) विधानसभेचे कामकाज संपल्यावर नागपूर येथे माध्यमांना या घटनेची माहिती दिली होती.

फडणवीस म्हणाले, "3 वाजून 55 मिनिटांनी नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका बोटीने धडक दिली. यामुळे अपघात झाला. 101 लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. तर 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. "

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

बुधवारी (18 डिसेंबर) दुपारी नीलकमल नावाची फेरीबोट ही गेटवे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंटाकडे जाण्यास निघाली होती. उरणजवळील करंजाजवळ स्पीडबोटीशी धडक होऊन नीलकमल बोट बुडाली.

महिनाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. 22 नोव्हेंबर रोजी मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरला पाणबुडीची धडक बसली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. यावेळी नेमके काय चुकले होते, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. नौदल, जेएनपीटी, कोस्टगार्ड, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्यानं मदतकार्य सुरु आहे. या घटनेत 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

बोट बुडण्याच्या घटनेनंतर जेएनपीटी हॉस्पिटल येथे 56 जणांना, नेव्ही डॉकयार्ड हॉस्पिटल येथे 9 जणांना, सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे नऊ तर अश्विनी हॉस्पिटल येथे एका व्यक्तीस दाखल करण्यात आले होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'अद्यापही शोधमोहीम सुरू'

नौदलातील सूत्रांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शोधमोहीम आणि बचावकार्य अद्यापही सुरू आहे. अद्याप एक लहान मुल आणि वयस्कर व्यक्ती यांचा शोध सुरू आहे.

मुंबई हार्बरवरील गर्दीविषयी बोलताना सूत्रांनी सांगितलं, "फेरीबोट आणि स्पीडबोट्स त्यांना ठरवून दिलेल्या मार्गांचाच वापर करतात आणि मुंबई बंदरात पुरेशी जागा आहे. या परिसरात नौदलाशिवाय तटरक्षक दल, सागरी पोलीस आणि इतर स्पीडबोटीही आहेत. त्यामुळे बोटींना सुरक्षित जागा न मिळाल्याचा प्रश्न उद्भवत नाही.

"घडलेली घटना दुर्मिळ आणि दुर्दैवी आहे. स्पीडबोट्स अत्यंत कुशल आहेत. त्यांना ज्या क्षेत्रात राहायचं असतं त्यापासून ते कधीही विचलित होत नाहीत. इंजिनमध्ये काहीतरी चूक झाली असावी. इंजिन जाम झालं असेल, पण तपासानंतरच याविषयी कळेल."

महिनाभरात झालेल्या दोन घटनांविषयी बोलताना त्यांनी म्हटलं, "हे दुर्दैवी आहे आणि हा योगायोग आहे. अन्यथा आपला समुद्र अतिशय सुरक्षित आहे."

व्हीडिओ कॅप्शन, ‘ती बोट मस्तीत होती, मग टक्कर दिली!’ मुंबई बोट अपघातातले प्रत्यक्षदर्शी म्हणाले...

अपघातात मृत्यू झालेले नागरिक

मृतांमध्ये महेंद्रसिंग शेखावत (नेव्ही), प्रवीण शर्मा (NAD बोटीवरील कामगार), मंगेश (NAD बोटीवरील कामगार), मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट), राकेश नानाजी अहिरे (प्रवासी बोट), साफियाना पठाण, माही पावरा (वय-3), अक्षता राकेश अहिरे, मिथु राकेश अहिरे (वय-8), दिपक व्ही., दोन अनोळखी महिला आणि एका अनोळखी पुरुषाचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिली सोशल मीडियावर माहिती

मुंबई बोट दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, "एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मुंबईतील बोट दुर्घटनेच्या मदतकार्याला वेग देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली.

नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.

गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात, 13 मृत्युमुखी

फोटो स्रोत, ANI

एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई बोट अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर म्हटलंय की, "मुंबईवरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीच्या दुर्घटनेची बातमी दुःखद आहे. आतापर्यंत 6 ते 7 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहेत. दुर्घटनेत एका प्रवासी मृत्यू झाला असून आणखी 5 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

बोटीतील सर्व प्रवाशांना वाचविण्यात प्रशासनाला यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबाला आणि जखमींना सरकारने तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी ही सरकारकडे मागणी आहे," असं वडेट्टीवार म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)