वाढत्या कबुतरांमुळे पर्यावरण धोक्यात येतं?

या फोटोत कबुतरांना धान्य टाकताना एक महिला दिसत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेणुका कल्पना
    • Role, बीबीसी मराठीसाठी

शहरात राहण्यासारखं दुसरं सुख पारव्यांसाठी नाही! अन्न आणि पाणी अगदी सहज मिळतं. त्यांची शिकार करणारेही कमी असतात किंवा नसतातच.

शिवाय, उंच इमारती, त्याच्या खिडक्या, घराचं छत, पूल, गोदामं अशा राहण्यासाठी मस्त जागा सापडतात.

महानगरांमधली या पारव्यांची वाढती संख्या हा आता वारंवार उपस्थित केला जाणार प्रश्न झालाय.

या पक्षांमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

पारव्यांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे श्वसनसंस्थेचे संसर्ग होतात. याशिवाय त्वचेवर ॲलर्जी, सायनॅटिस अशा आजारांचा धोका या वाढतो.

पण अशापद्धतीनं कोणत्याही एका जीवाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तर त्याचा पर्यावरणावरही परिणाम होतच असतो, असं तज्ज्ञ सांगतात. पारव्यांची वाढलेली संख्या हा पर्यावरणाचा समतोल ढासाळ्याचं लक्षणंही असू शकतं.

शहराची पोल्ट्री

हे पारवे म्हणजे खरंतर कबुतरांचंच संकरीत स्वरूप असल्याचं जैवविविधतेमध्ये पीएचडी केलेले महेश गायकवाड सांगतात. 'निसर्ग जागर प्रतिष्ठान' या पर्यावरणवादी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. वटवाघुळांचा डॉक्टर अशीही त्यांची ओळख आहे.

खरंतर कबूतरं हीच आपली स्थानिक प्रजाती आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पिवळ्या पायांचा हरियाल म्हणजे हिरवं कबूतर हा तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो. आता शहरात पारवे आणि कबुतरं यांची सोबतच वाढ होताना दिसते, असंही गायकवाड पुढे सांगतात.

खाण्यासाठी, दळणवळणासाठी आणि सोबत व्हावी म्हणून माणसानं जंगलातली ही कबुतरं पाळणं सुरू केलं. पण त्याआधी जंगलात मोठ्या खडकांच्या ढोलीत राहणारी ही प्रजाती उंबरं, वड पिंपळ या झाडांची फळं आणि कधीतरी छोट्या मोठ्या किटकांनी आपलं पोट भरत असत. जंगलात त्याच्या विष्ठेतून या फळांच्या बियांचा फैलाव होत असे.

पण आता त्यांना त्यांचं मूळ अन्न मिळतच नाही. मूळ जंगलीपणाचा काही अंश या पक्षांमध्ये अजूनही राहिलेला असला, तरी आता ते बरेच माणसाळलेलेही आहेत. माणूस जवळ आला, तरी आता ते फारसे घाबरत नाहीत. अशापद्धतीनं कोणत्याही प्राण्याला किंवा जीवाला माणसाची सवय लागली की त्यांची संख्या वाढतेच.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

"नैसर्गिकरित्या ससाणा, घार हे पक्षी पारव्याची शिकार करतात. शिवाय, क्वचित जमिनीवर सापडले तर हे लांडग्यांचं आणि कोल्ह्यांचंही आवडतं खाद्य असतं. अनेकदा माणसंही पारवे खातात. त्यामुळे खरंतर माळरानात पूर्वी जास्त दिसणारे हे पक्षी आता तिकडे कमी झालेत," गायकवाड यांनी पुढे सांगितलं.

पण शहरात या शिकारी पक्षांची कमी झालेली संख्या आणि पारव्यांना मिळणारं संरक्षण यानं त्यांची संख्या वाढायला मदत होते.

या फोटोत एक व्यक्ती कबुतरांना खायला टाकताना दिसत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

उंच इमारतींमुळे त्यांची रहायची सोय होते. माणसं धान्य टाकतात त्यामुळे खायचा प्रश्न सुटतो. मग प्रजनन करणं पारव्यांना फार सोपं जातं, "पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांची संख्या वाढवली जाते. तसंच आता या कबुतरांचं होतंय. ही शहरं म्हणजे एक मोठी पोल्ट्रीच झालीय," असं महेश गायकवाड म्हणतात.

त्यांची संख्या वाढल्यानं निसर्गातल्या इतर जिवांवर छोटे छोटे परिणाम दिसतात. हा पक्षी आकारानं मोठा असल्यानं चिमणी, बुलबुल, खार यासारख्या लहान पक्षी-प्राण्यांवर सहज दादागिरी करू शकतो. हे लहान पक्षी जेथे घरटे करायचे, ती जागा या कबुतरांनी घेतली, त्यांचं अन्न यांनी खाल्लं तर इतर अनेक पक्षी परिसंस्थेतून कमी होऊ लागतात.

मग पारवाच नाही, तर कोणत्याही पक्षाची विष्ठा जर अशी मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास असेल, तर त्याचा माणसाच्या आरोग्याला त्रास होणारच, असंही गायकडवाड यांनी नमूद केलं.

सहसंबंधाचा अभ्यास करायला हवा

पारव्यांचीही पर्यावरणात काही एक भूमिका असली, तरी इतक्या मोठ्या संख्येनं त्यांची वाढ होते, तेव्हा निसर्गाचा समतोल बिघडतोच, असं पर्यावरण अभ्यासक आणि भवताल फाऊंडेशनचे संस्थापक अभिजीत घोरपडे सांगतात.

कोणत्याही ठिकाणी किती पक्षी जगणार याला एक विशिष्ट मर्यादा असते. त्यात एकाच प्रकारच्या जीवात वाढ झाली, तर इतरांना उपलब्ध होणारं अन्न, राहण्यासाठी, उडण्यासाठी जागा हे सगळं स्वाभाविकपणे कमी होऊन जातं.

"पारवा हा पटकन परिस्थितीशी जुळवून घेणारा जीव आहे. शिवाय इतर काही पक्षांप्रमाणे पारव्यांच्या प्रजननाचा कोणताही ऋतू नसतो. ते कधीही प्रजनन करू शकतात. आपल्या घरांची रचना, उपलब्ध करून दिले जाणारे मुबलक अन्न, त्यांचे नैसर्गिक भक्षक मोठ्या संख्येनं नसणं हे सगळं त्यांच्या पथ्यावर पडलं आहे," अभिजीत घोरपडे सांगतात.

कबूतर

फोटो स्रोत, Getty Images

शहरात ही सगळी जागा पारव्यांनी व्यापलेली दिसते. म्हणूनच आता आपल्याला शहरात कावळे फारसे दिसत नाहीत, चिमण्या, साळुंक्या तर गेल्यातच जमा आहेत, हा मुद्दाही ते लक्षात आणून देतात.

"पण पारवे वाढल्यामुळे इतर पक्षांची संख्या कमी झाली असं थेट म्हणता येत नाही. हे पक्षी शहरीकरणाच्या इतर कारणांमुळे कमी झाले आणि पारव्यांना वाढायला जागा मिळाली, असंही असू शकतं. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी दिसत आहेत हे खरं. पण त्याचा एकमेकाशी कसा सहसंबंध आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायची गरज आहे," असंही अभिजीत घोरपडे यांनी नमूद केलं.

असा अभ्यास झाल्यानंतरच त्याची वैज्ञानिक, नैतिक, व्यावहारिक बाजू पाहूनच पारव्यांचं काय करायचं याचा विचार करता येईल. फक्त हा विचार दूरदृष्टीकोनातून केलेला आणि शाश्वत असायला हवा.

कबूतर

फोटो स्रोत, Getty Images

नवं अर्थकारण

धान्यांपासून ते अगदी केक आणि बिस्किटांपर्यंत त्यांच्या आहारात असलं-नसलेलं सगळं कबुतरांना दिलं जातं. यातून अन्नासाठी माणसावर अवलंबून राहण्याच्या वृत्तीत वाढ होते आणि अन्न शोधण्यासाठी नैसर्गिक प्रेरणाही मरून जाते.

एकदा त्यांची संख्या वाढली की, चिमणीसारखाच आहार असणाऱ्या पक्षांवर त्याचा परिणाम होतोच, असं तज्ज्ञ सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)