AFG vs PAK : यांना पाहून वाटतं हे 8-8 किलो निहारी खातात- वसीम अक्रम

सध्या सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्डकप मध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 8 विकेट राखून दारुण पराभव केला आहे.

सोमवारी (23 ऑक्टोबरला) चेन्नईत झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने अतिशय सुरेख खेळ करून पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखायला लावली आहे.

पाकिस्तानने खेळलेल्या एकूण पाचपैकी तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया आणि आता अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवलं आहे.

वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाल्याने पाकिस्तानची सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याची वाट आता अधिकच बिकट झालीय.

भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुमार खेळ करून पराभूत झाल्याने पाकिस्तानच्या संघावर आधीच टीका केली जात होती पण अफगाणिस्तानसारख्या तुलनेने नवख्या संघाविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्याने पाकिस्तानी क्रिकेट रसिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार झालाय.

सामान्य क्रिकेट रसिकांनी तर टीका केलीच आहे पण आता पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलेल्या अनेक माजी खेळाडूंनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, प्रशिक्षक मिकी आर्थर आणि पाकिस्तानच्या क्रिकेट नियामक मंडळावर टीकेची झोड उठवली आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 283 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 49 ओव्हरमध्येच केवळ दोन विकेट गमावून विजय मिळवला.

वर्ल्डकप स्पर्धेमध्ये एकूण तिसरा विजय मिळवळ्यांनंतर अफगाणिस्तान आता पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचलं आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी अफगाणिस्तान या टेबलवर सगळ्यात शेवटी होता.

याआधी इंग्लंडला हरवलेल्या अफगाणिस्तानने आता पाकिस्तानला हरवून हे सिद्ध केलंय की त्यांनी मिळवलेला पहिला विजय हा काही अपघात नव्हता.

अफगाणिस्तानने खेळलेल्या एकूण पाच सामन्यांमध्ये त्यांनी दोन सामने जिंकले आहेत. पाकिस्तानवर अफगाणिस्तानने पहिलाच विजय मिळवला असून याआधी त्यांना एकाही सामन्यात पाकिस्तानला हरवता आलेलं नव्हतं.

पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या सातही सामन्यांमध्ये याआधी विजय मिळवलेला होता.

याआधी 2015 ला झालेल्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने स्कॉटलंडला हरवून पहिला विजय मिळवला होता. 2019 ला झालेल्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानला एकही विजय मिळवता आलेला नव्हता.

यावेळी मात्र इंग्लंड आणि अफगाणिस्तानसारख्या संघांना हरवत अफगाणिस्तानने एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांचा संघ काय करू शकतो हे दाखवून दिलंय.

शोएब अख्तर वैतागले

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इतिहास बघितला तर त्यांनी या स्पर्धेत ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं आहे ते बघून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल.

मागच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने ज्या पद्धतीने क्रिकेटचे नियोजन केलं आहे त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानचे खेळाडू चांगला खेळ करू शकत नाहीयेत असं पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना वाटतं.

रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे शोएब अख्तर म्हणाले की,"अफगाणिस्तानचे खेळाडू आमचे भाऊ आहेत आणि आम्ही आमच्या भावांकडून मार खाल्लाय त्यामुळे त्यात एवढं काही नाही.

गुरबाज आणि इब्राहीमसाठी मला खरोखर आनंद वाटतो. जागतिक क्रिकेटमध्ये त्यांनी आता स्वतःला सिद्ध केलंय."

अफगाणिस्तानच्या संघाने खूप संघर्ष केल्याचं शोएब यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "मागच्या पाच दशकांमध्ये त्यांच्या देशाची परिस्थिती बिकट राहिली आहे.

त्यांच्या देशात कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीयेत, विशेषतः मागच्या दोन वर्षात त्यांना कठीण काळातून जावं लागलं आहे.

एकीकडे अशी भीषण परिस्थिती असताना अफगाणिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये येतो आणि पाकिस्तानचा आठ विकेट राखून पराभव करतो. अफगाणिस्तानने पाकिस्तानला क्रिकेट कसं खेळावं हे शिकवण्याचा प्रयत्न केलाय."

पाकिस्तान आणि अफगाणिस्ताची तुलना करताना अख्तर म्हणाले की, "अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था चांगली होत आहे, त्यांचं चलन वेगाने प्रगती करत आहे आणि आता ते आमच्यापेक्षा चांगलं क्रिकेटही खेळत आहेत.

अफगाणिस्तानचा खेळ बघून मला आनंद झालाय. त्यांच्याकडे जिंकण्यासाठीची जिद्द आहे, प्रचंड ऊर्जा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी नियुक्त करतात."

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सुमार खेळासाठी शोएब अख्तर यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला जबाबदार ठरवताना असं म्हटलं की ज्यांना क्रिकेटमधलं काहीही कळत नाही अशा लोकांना क्रिकेटचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आमच्या देशात देण्यात आलेली आहे.

ते म्हणाले की, "या संघात असा एकही खेळाडू नाही ज्याच्याकडे बघून कुणीतरी प्रेरणा घेईल आणि क्रिकेट खेळू लागेल.

मी पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलो आहे आणि माझ्या देशाचा संघ असा खेळताना बघून मला वेदना होतात. या संघात जिंकण्याची जिद्दच उरलेली नाहीये."

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर आता पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे उर्वरित सगळे सामने जिंकावे लागणार आहेत.

यासोबतच इतर संघांच्या काही सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने लागतील यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे असं केलं तरच पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो.

वसीम अक्रम म्हणाले आमचे खेळाडू आठ-आठ किलो खातात

वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात जाण्याआधी पाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर होता.

पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी पाकिस्तानच्या पहिल्या क्रमांकावरच बोट ठेवलं आणि म्हणाले की पाकिस्तानने केलेला खेळ बघून हा संघ पहिल्या क्रमांकावर होता असं कुणीही म्हणणार नाही.

पाकिस्तानच्या 'ए स्पोर्ट्स' वाहिनीवर पाकिस्तानच्या पराभवाचं विश्लेषण करताना ते म्हणाले की, "मागच्या सहा ते आठ महिन्यांपासून पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर असल्याचं कवित्व आम्ही ऐकत आहोत.

हा कसला पहिला नंबर? अफगाणिस्तानने त्यांच्या खेळात केलेली सुधारणा आणि त्यांची क्षमता बघून मी प्रभावित झालोय. ते दिवसेंदिवस चांगलं क्रिकेट खेळत आहेत. आधी त्यांनी विश्वचषक विजेत्यांना हरवलं आणि आता आपल्याला हरवलं."

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या फिटनेसवरही अक्रम यांनी टीका केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "आमच्या खेळाडूंने मागच्या दोन वर्षात एकही फिटनेस टेस्ट दिलेली नाहीये. यांची तोंड बघितलं तर वाटेल की हे आठ आठ किलो खातात, निहाऱ्यावर निहाऱ्या पोटात ढकलतायत.

हे खेळाडू अजिबात तंदुरुस्त नाहीयेत. आम्ही दोन वर्षांपासून म्हणतोय की फिटनेस टेस्ट घ्या पण आमचं कुणीही ऐकत नाही."

पाकिस्तानचे माजी खेळाडू मोईन खान म्हणाले की, "संघातील खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी काहीही नियोजन केलं जात नाही. पाकिस्तानने अतिशय खराब फिल्डिंग केली.

पाकिस्तानने श्रीलंकेचा तीन महिन्यांचा प्रदीर्घ दौरा केला, तेथील वातावरणात खेळाडू थकून गेले आणि त्यामुळेच मैदानावर आपल्या खेळाडूंमध्ये उत्साह दिसत नाहीये."

याच कार्यक्रमात बोलताना शोएब मलिकही म्हणाले की, "सध्याच्या परिस्थितीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जबाबदार आहे.

आता हे सिद्ध झालंय की चांगल्या संघांचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानचा संघ तयार नाहीये. आमच्या क्रिकेटची परिस्थिती ढासळत चाललीय, ज्या पद्धतीने क्रिकेटचं नियोजन केलं जात आहे त्याचा परिणाम आता खेळाडूंवर दिसू लागलाय."

पाकिस्तानविरुद्ध खेळताना अफगाणिस्तानने प्रत्येक क्षेत्रात चांगला खेळ केला.

एकीकडे अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणी आल्या तर दुसरीकडे अफगाणिस्तान फलंदाजीला उतरला तेंव्हा एकही पाकिस्तानचा गोलंदाज काहीच करू शकला नाही.

याबाबत बोलताना पाकिस्तानचे माजी कर्णधार मिस्बाह उल हक म्हणाले की, "अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांचा दर्जा खूप चांगला होता. त्यांनी पाकिस्तानला एकेरी धावा देखील सहज घेऊ दिल्या नाहीत.

अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला होता. राशिद खानला जरी विकेट मिळाली नसली तरी त्याने एकही सोपा चेंडू टाकला नाही, एकेक धाव घेण्यासाठी देखील पाकिस्तानच्या खेळाडूंना कष्ट करावं लागत होतं.

दुसरीकडे पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीचा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अगदी सहज सामना केला. त्यांनी खूप सहज धावा काढल्या.

पाकिस्तानचे गोलंदाज अफगाणिस्तानवर कसलाही दबाव टाकू शकले नाहीत. याउलट सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण झाला होता."

मिस्बाह उल हक म्हणाले की, "जर वीस ओव्हर्सच्या सामन्यात तुमच्या एका ओव्हरमध्ये सहा धावा काढल्या जात असतील तर त्यात एवढं विशेष काही नसतं.

पण एकदिवसीय सामन्यांमध्ये वीस ते चाळीस ओव्हर दरम्यान सहा चेंडूत सहा धावा जाणे ही चांगली गोष्ट नाहीये. याचा साधा सरळ अर्थ असा होतो की पाकिस्तानने अतिशय सुमार गोलंदाजी केली आहे."

बाबर आझम हताश झालाय

माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, “विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानकडून झालेला पराभव हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. या पराभवानंतर बाबर आझम निराश झाला होता."

ते म्हणाले की, "पाकिस्तानचा एवढा मोठा पराभव कधीही झालेला नाहीये. अफगाणिस्तानचा या विजयावर हक्क होता. चेन्नईच्या खेळपट्टीवर आठ विकेट राखून विजय मिळवणं खरोखर विशेष आहे.

अफगाणिस्तानचा हा सर्वोत्कृष्ट खेळ आहे. अफगाणिस्तानने त्यांच्या फलंदाजीचा हाच दर्जा राखला ते त्यांना मोठी प्रगती करता येणार आहे."

पाकिस्तानचा संघ जगज्जेता राहिला असून तो आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अफगाणिस्तान संघात पाकिस्तानबद्दल कोणतीही भीती नसल्याचे रमीझ राजा यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, “अफगाणिस्तान संघाला पाकिस्तानच्या गोलंदाजीची किंवा त्याच्या प्रतिष्ठेची भीती नव्हती. ते निर्भयपणे खेळले आणि एका मिनिटासाठीही संघ त्यांचा विश्वास ढळला नाही.

गुरबाजने ज्या पद्धतीने सलामी दिली आणि पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली, तो अफगाणिस्तानच्या विजयाचा पाय ठरला."

अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज नूर अहमदने तीन बळी घेतले. त्याने अब्दुल्ला शफीकला आऊट केले. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानलाही नूरने तंबूत पाठवलं.

नूरचं कौतुक करताना रमीझ राजा म्हणाले की, “कोणताही पाकिस्तानी फलंदाज नूरच्या गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. त्याचा हा पहिलाच विश्वचषक आहे.

नूरने निर्भयपणे गोलंदाजी करत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. नूरने योग्य वेळी बाबर आझमला बाद केले. या युवा गोलंदाजाने अफगाणिस्तानमध्ये कोणत्या प्रकारची प्रतिभा येत आहे हे दाखवून दिलं आहे."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)